ओंकार प्रकाश फंड

‘कॉर्नेलियाची कहाणी’ या मुकुंद वझे लिखित पुस्तकात कॉर्नेलियाच्या जीवनात आलेली सुख-दु:खे आणि चढउतार एकापाठोपाठ एक लेखकाने २८ प्रकरणांतून मांडलेले आहेत. पुस्तकाच्या प्रारंभीच सोराबजी खरसेडजी- म्हणजेच कॉर्नेलियाच्या वडिलांची माहिती लेखकाने दिली आहे. सुधारकी वळणाचे म्हणून ते पारशी समाजात ओळखले जात असत. सोराबजींनी बायबल शिकण्यास सुरुवात केली, त्याचबरोबर हिंदू धर्म आणि झोरास्ट्रियन धर्माच्या वर्गातही ते जात असत. दैवयोग असा की धर्मातराला विरोध करणाऱ्या सोराबजींनी पुढे १८४१ साली ख्रिस्ती धर्म स्वीकारला तेव्हा एकूणच धर्मातर हे प्रकरण खूपच चिघळू लागले होते. पारशी लोकांचा सहसा सौम्य वाटणारा स्वभाव धर्माभिमानाच्या बाबतीत त्यावेळीदेखील किती प्रखर होता हे या पुस्तकात लक्षात येते.

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

फ्रान्सिना (कॉर्नेलियाची आई) आणि सोराबजी यांना सहा मुली आणि एक मुलगा होता. त्यापैकी एक कॉर्नेलिया. तिचा जन्म १५ नोव्हेंबर १८६६ रोजी झाला. कॉर्नेलियावर झालेल्या चांगल्या संस्कारांची मुळे ही मिशनरी आणि तिच्या पालकांच्या विचारांमुळे तिच्यात रुजली होती. सोराबजींची आर्थिक चणचण आणि बिनपगारी कामामुळे ते आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊ शकले नाहीत. मात्र, कॉर्नेलिया ही मुंबई विद्यापीठाची पहिली महिला मॅट्रिक्युलेट! कॉर्नेलियाच्या नावावर पहिलेपणाचे जे अनेक विक्रम जमा झाले त्याची ही सुरुवात होती. परंतु हे पहिलेपण तांत्रिक स्वरूपाचे होते. पुढच्या शिक्षणासाठी ती डेक्कन कॉलेजमध्ये जाऊ लागली. तीनशे विद्यार्थ्यांत ती एकटीच मुलगी! तिची तिथे इतर विद्यार्थ्यांकडून सातत्याने टिंगलटवाळी होऊ लागली. तिच्या तोंडावर वर्गाचा दरवाजा बंद केला जाई आणि तिला बाहेर ठेवलं जाई. अशा विरोधांना तोंड देत ती १८८७ साली बी. ए.ची परीक्षा पास झाली. डेक्कन कॉलेजमध्ये ती पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती. परंतु तिला जे कायदेविषयक शिक्षण घ्यायचे होते ते शक्य झाले तेही ब्रिटिश उच्चपदस्थांनी केलेल्या बदलांमुळे! त्यामुळे ब्रिटिशांची सकारात्मकता तिच्यावर प्रभाव टाकणारी ठरली हे नैसर्गिकच होय.

कायद्याची पहिली परीक्षा जून १८९० मध्ये झाली. कॉर्नेलिया अभ्यास करत होती कायद्याच्या पदवीसाठी; परंतु पदवीचा अभ्यास सोडून ‘बॅचलर ऑफ सिव्हिल लॉ’ (बी. सी. एल.) म्हणजेच पदवी परीक्षा पास होण्यापूर्वीच पदव्युत्तर अभ्यास करण्याची संधी कॉर्नेलियाला मिळाली. बी. सी. एल. तिसऱ्या वर्गात पास झाल्यावर पुढे काय करायचे, हा प्रश्न कॉर्नेलियापुढे उभा राहिला. लंडनमध्ये त्यावेळेस महिलांना वकील म्हणून प्रॅक्टिस करायची परवानगी नव्हती. एवढेच काय, बी. सी. एल. उत्तीर्ण होऊनही ही पदवी तिला मिळाली नव्हती.

या पुस्तकात काही गमतीशीर किस्सेही आहेत. इंदोर व राजकोट येथे तिने वकील म्हणून नाव नोंदवल्यावर तिला हवे असलेले काम मिळू लागले. वारसा हक्क, स्त्रीधन, पोटगी इ.संबंधीचे! या प्रकरणांसाठी तिला प्रवासही पुष्कळ करावा लागे. कधी पालखी, कधी रेल्वेगाडी, कधी हत्तीवरून, कधी उंटावरून. एकदा तर हद्दच झाली. तिला प्रवासाचे साधन म्हणून रेडा देण्यात आला. बडोदे येथे तिने आठ महिने काम केले. तिचे मुख्य काम हे वकिलीशी संबंधित नव्हते हे खरे; परंतु गोषातील स्त्रियांची बाजू मांडणे, त्यांना कायदेशीर बाबतीत मदत करणे हे तिचे मुख्य ध्येय होते.

कॉर्नेलिया आणि न्यायाधीश हॅरिसन ब्लेअर एकमेकांच्या प्रेमात पडले तेव्हा २६ एप्रिल १९०१ ला ब्लेअर यांचे वय ६३ आणि कॉर्नेलियाचे वय होते ३४ वर्षे. परंतु त्यांचे हे प्रेमप्रकरण असफल ठरले. १९०७ ते १९१३ या काळात तिच्या या असफल प्रेमाची पुनरावृत्ती कशी झाली आणि तिची या प्रेमप्रकरणात कशी वाताहत झाली हे पुस्तकात विस्ताराने वाचावयास मिळते.

गरजू महिलांना कायदेशीर मदत मिळावी यासाठी महिला वकिलांची गरज आहे हे तत्त्व व व्यावहारिक बाजू अनेकांना मान्य असली तरी प्रत्यक्षात महिलांनी वकिली करण्यास त्याकाळी मनाई होती. ही मनाई दूर व्हावी म्हणून कॉर्नेलियाचे प्रयत्न सुरू होते. स्त्रियांना वकिली करण्याची परवानगी देऊ नये, ही कर्मठ भूमिका ब्रिटिश जनसामान्यांमध्येच नाही, तर न्यायाधीशांसारख्या उच्चशिक्षितांमध्येही किती खोलवर रुजली होती हे कार्नेलियाच्या प्रकरणात पाहावयास मिळते. १८९३ साली मुंबई उच्च  न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीच्या आडमुठेपणामुळे आणि १८९९ मध्ये अलाहाबाद हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांमुळे सनद मिळविण्याचे कॉर्नेलियाचे स्वप्न अधुरेच राहिले. शेवटी १९२३ साली तिला कोर्टात वकिली करायची परवानगी मिळाली. मात्र, वकिली करायची परवानगी मिळालेली पहिली महिला कॉर्नेलिया नव्हती. ती होती इव्ही विल्यम्स. १९२२ साली तिला वकिलीची सनद मिळाली होती; पण तिने वकिली कधीच केली नाही. म्हणून इथेही कॉर्नेलियाच अग्रस्थानी होती.

२५ जून १९०९ रोजी कॉर्नेलियाला ‘कैसर-ए-हिंद’ सुवर्णपदक जाहीर झाले. तिच्या कार्याची सरकारी पातळीवर घेतली गेलेली ही सर्वोत्तम दखल होती. हे सुवर्णपदक खुद्द राज्याधिपतींकडून दिले जाते.

कॉर्नेलिया ही एक सिद्धहस्त लेखिका होती. वैचारिक लेख आणि कथा हे दोन्ही साहित्यप्रकार ती लीलया हाताळत असे. अनेक पहिलेपणाचे विक्रम नावावर असणारी कॉर्नेलिया कर्तृत्ववान आणि ध्येयनिष्ठ होती. अनेक स्तरांवर तिने केलेले काम त्या काळाचा विचार करता नक्कीच वेगळे ठरते. ब्रिटिश सत्ताधारी व उच्चभ्रू वर्तुळाने तिला दिलेला पाठिंबा, आपुलकी आणि त्याचबरोबर वेळोवेळी तशाच अधिकारी वर्गाने अनेकदा खालच्या पातळीवर जाऊन तिला केलेला विरोध, पडदाशीन महिला आणि त्यांच्या मुलांचे संरक्षण आणि विकासासाठी तिने केलेले कार्य पाहता कॉर्नेलिया सोराबजीचे कर्तृत्व किती महान होते, हे प्रकर्षांने जाणवते. कॉर्नेलियाची लढाई स्वत:च्या हक्कांसाठी तर होतीच; शिवाय गोषातील महिलांना या समाजात इतर सर्वसामान्य स्त्रियांप्रमाणे मुक्तपणे वावरता यावे, त्यांना साक्षर करावे यासाठीही ती प्रयत्नशील होती. हे पुस्तक प्रेरणादायी तर आहेच; त्याचबरोबर कॉर्नेलियाने केलेल्या असामान्य कार्याची ओळख त्यातून होते. कॉर्नेलियाला पुरुषप्रधान समाजव्यवस्थेचा कसा व किती विरोध होता आणि ती या विरोधाला न जुमानता यशाच्या शिखरापर्यंत कशी पोहोचली, हा तिचा संघर्ष वाचकांना या चरित्रात अनुभवता येतो. लेखक मुकुंद वझे यांनी या चरित्रात ब्रिटिश राज्यातील व्यवस्थेचे यथातथ्य वर्णन केले आहे. पाश्चात्त्य राष्ट्रांतसुद्धा पुरुषप्रधान संस्कृती कशी खोलवर रुजली होती हे त्यातून वाचकांना कळून येते. ब्रिटिश वसाहतीतील राष्ट्रांमध्ये स्त्रियांना प्राथमिक स्वातंत्र्य असले तरी ज्ञानार्जनाच्या बाबतीत समता प्रस्थापित होण्यास एकोणिसावे शतक उजाडावे लागले. मुकुंद वझे यांनी कॉर्नेलियाच्या जीवनाची ही कहाणी लिहून ब्रिटिश राजवटीतील समाजव्यवस्था आणि तत्कालिन ब्रिटिश शासनाचा परंपरावादी दृष्टिकोनही विशद केला आहे. 

कॉर्नेलियाची  कहाणी’- मुकुंद वझेशब्दमल्हार प्रकाशन, पाने- २५८, मूल्य- ३५० रुपये.

onkarfund13@gmail.com