scorecardresearch

सुहृद…

चित्रकलेची श्रीपुंना उपजत ओढ आणि जाण. परदेशांतल्या जगप्रसिद्ध चित्रगॅलऱ्या, प्रतिभावंत चित्रकारांची चित्रं त्यांनी पाहिलेली.

|| श्रीनिवास विनायक कुलकर्णी

गेली सुमारे पाच दशकं मराठी साहित्यविश्वात चित्रकार बाळ ठाकूर यांनीं अनन्यसाधारण स्थान प्राप्त केलं होतं. साहित्याच्या अभिजाततेचा शिक्का म्हणजे सोबतची बाळ ठाकूर यांची चित्रं असं समीकरणच रूढ झालं होतं. त्यांच्या हृद्य आठवणी कथन करणारा त्यांच्या दीर्घकाळच्या  मित्राचा लेख…

‘‘आमच्या देवरुखच्या शाळेला लागून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पटांगण होतं. त्यांचं तिथंच कार्यालयही. त्या दिवशी आमच्या शाळेचा काही उत्सव होता. संस्थेच्या अध्यक्षांचं भाषण चाललेलं. एवढ्यात संध्याकाळचे सहा वाजले. सायंशाखा भरण्याची वेळ. श्री. पु. भागवत सायंशाखेचे प्रमुख होते. त्यांनी पटांगणावर जाऊन शिट्टी फुंकली. त्याबरोबर अनेक विद्यार्थ्यांनी पटांगणावर धाव घेतली. निम्मंअधिक सभास्थान ओस पडलं. संयोजकांची तारांबळ उडाली. भाषण करत असलेले संस्थेचे अध्यक्ष जाणते. समाजात प्रतिष्ठा असलेले. त्यांनी शाळेचे मुख्याध्यापक आणि काही ज्येष्ठ शिक्षकांना बोलावून घेतलं आणि सांगितलं, ‘भाषण सोडून जे विद्यार्थी सायंशाखेकडे गेले त्यांच्यावर काहीही कारवाई करू नका. त्यांतला सायंशाखा प्रमुख भागवत हा तर आपल्या शाळेतला बुद्धिमान विद्यार्थी.’

पण एवढ्यावरच भागलं नाही. शाळेच्या प्रमुखांनी पालक भागवतांना बोलावून घेतलं आणि सांगितलं, ‘इत:पर तुमच्या मुलाला आमच्या शाळेत येता येणार नाही. हा त्याचा शाळा सोडल्याचा दाखला.’

एका परीनं झालं ते बरंच झालं. भागवतांचं शिक्षण मुंबईत झालं. ते कुठल्याही राजकीय विचारसरणीत अडकले नाहीत. मुंबईत ते नामवंत प्राध्यापक म्हणून ओळखले जाऊ लागले. श्रेष्ठ संपादक म्हणून त्यांना आदराचं स्थान प्राप्त झालं. साहित्यिक, विचक्षण वाचक त्यांना जाणू लागले. आणि समुद्रापारचे मराठी रसिकही.

त्यावेळी मी नुकताच शाळेत जाऊ लागलेलो. आणि देवरुखला एकच वर्ष शिकायला होतो. नंतर मी शिकायला इंदूरला गेलो. देवरुखच्या शाळेत मी खूपच खालच्या वर्गात आणि भागवत दहावीच्या वर्गात होते. त्यामुळं देवरुखला भागवतांची तशी ओळख झाली नाहीच. ती झाली मुंबईला मी आल्यावर…’’ बाळ ठाकूर सांगत होते.

ठाकुरांची चित्रं मी पाहत होतो. रंग-रेषांमधून मिळणारा आनंद मिळवत होतो. आणि त्यांचा माझा संपर्क घडला मुंबईतच. माझ्या पहिल्या ‘जन्म’ या लेखनाला ठाकुरांनी सुंदर चित्र काढलं ते काकतकरांच्या ‘रहस्यरंजन’ मासिकात. १९६१ साली. ‘रहस्यरंजन’चं स्वरूप तेव्हा बदललेलं होतं. या मासिकासाठी दुर्गा भागवत, अशोक शहाणे, बाळ ठाकूर साहाय्य करत होते. अशा मासिकात लेखन येणं हे हुरूप आणणारंच होतं.

‘मौज’च्या कार्यालयात राम पटवर्धन यांनी मला ठाकूर यांची ओळख करून दिली आणि मी साक्षात् बाळ ठाकूर पाहिले.

माझ्या अनेक लेखांना ठाकुरांनी सुंदर रेखाटनं केली. ‘मौज’च्या दिवाळी अंकाच्या वेळी ठाकूर माझ्या शेजारी बसून रेखाटनं करत. अंकाचा ले-आउट बघत. अंकाचा कविता विभाग १६ पानांचा असे आणि तो शेवटी छापला जाई. ठाकूर कवितेचा तो विभाग छापण्याआधी बघत आणि त्या फॉर्ममध्ये ज्या मोकळ्या जागा दिसत, त्या तिथल्या तिथं सुंदर रेखाटनांनी सजवत. ती त्यांनी केलेली रेखाटनं म्हणजे कुठंतरी काहीतरी घडत असलेल्या क्षणांची कविता आहे असं वाटे.

एक लेखक म्हणाले, ‘‘माझ्या आईला ठाकुरांनी बघणं अशक्य. पण मी केलेल्या लेखातलं वर्णन वाचून ठाकुरांनी तिचं इतकं जिवंत रेखाटन केलं की माझी आई खरोखरी माझ्या डोळ्यापुढं आली आणि मी थरारलो.’’

नवीन येणाऱ्या पुस्तकासाठी ठाकूर दोन-तीन चित्रं घेऊन येत. भागवत ती पाहत. मला म्हणत, ‘‘कुठलं निवडू या?’’ मग ते ठाकुरांना म्हणत, ‘‘हे एक आता घेऊ या. सगळीच देण्यासारखी आहेत.’’ भागवतांना मी म्हटलं, ‘‘पुढच्या आवृत्त्यांना उरलेली वापरावीत.’’ त्यावर ‘‘तसं भाग्य असू दे… पुस्तकाचं आणि लेखकाचंही…’’ भागवत म्हणाले.

चित्रकलेची श्रीपुंना उपजत ओढ आणि जाण. परदेशांतल्या जगप्रसिद्ध चित्रगॅलऱ्या, प्रतिभावंत चित्रकारांची चित्रं त्यांनी पाहिलेली. मुंबईत भरणाऱ्या चित्रप्रदर्शनांना ते मला घेऊन जात. भागवत पुस्तकाचं वेष्टनचित्र संबंधित लेखकाला चित्रकलेत रस असेल तर पुस्तकाच्या प्रसिद्धीआधी दाखवत. एका पुस्तकाचं काम चाललं होतं. वेष्टन ठाकुरांनी केलेलं. पुस्तकाच्या लेखकानं ते वेष्टन पाहिलं. ते भागवतांना म्हणाले, ‘‘या वेष्टनातल्या चित्रातील बाईच्या हाताचा कोन चुकलेला आहे. ठाकुरांना तो सुधारायला सांगा.’’ श्रीपु म्हणाले, ‘‘नाही. ठाकूर anatomy मध्ये पक्के आहेत. ते चुकणार नाहीत.’’ त्यांनी ते तसंच छापायला पाठवलं.

‘नदीकाठी’ या वासंती मुझुमदारांच्या पुस्तकाचं काम चाललेलं. श्रीपु मला म्हणाले, ‘‘वासंतीबाई चित्रकार आहेत. तेव्हा त्यांनी लिहिलेलं पुस्तक सचित्र काढू या. त्यांच्या पुस्तकात चित्रांना पुष्कळ जागा आहेत. ठाकूर चित्रं आणि मांडणी करतील. या पुस्तकातला आशय कऱ्हाडशी निगडित आहे. कऱ्हाड तुमचं आजोळ. वासंतीबाई कऱ्हाडच्याच. तेव्हा ठाकुरांना घेऊन तुम्ही तिघे कऱ्हाडला जा. ठाकुरांना पुस्तकात आलेली स्थळं, परिसर दाखवा. ते रेखाटनं करू देत.’’ त्याप्रमाणे आम्ही तिघे कऱ्हाडला गेलो. तीन दिवस तो आमचा कऱ्हाडातला प्रकल्प चालला. ठाकुरांनी केलेली रेखाटनं भागवतांना आवडली. तीच रेखाटनं ‘नदीकाठी’मध्ये समाविष्ट आहेत.

मी चार वर्षं सांगलीच्या ‘अनाथ विद्यार्थी आश्रम’ या संस्थेत राहून शाळेत जात होतो. हा अनुभव मी भागवतांना सांगितला. माधुकरी मागायची, घरोघरी झोळी घेऊन जायचं, कोरडी भिक्षा मागायची… आणखी पुष्कळ कामं करायला लागायची. तो अनुभव भागवतांना सांगितल्यावर त्यांना मी ते सगळं लिहावं वाटू लागलं. श्रीपु मला तो अनुभव लिहिण्यासाठी नेहमी आठवण करत. एकदा म्हणाले, ‘‘तुम्ही हा अनुभव लिहावा. तुमच्याकडून दारिद्य्राचं प्रदर्शन होणार नाही. एका अनुभवाचं ते अलिप्तपणं केलेलं चित्रण होईल. आता आपण एक नवीन प्रयोग करू या : ‘नदीकाठी’ पुस्तकाच्या वेळी तुम्ही त्या पुस्तकातला आशय रेखाटण्यासाठी ठाकुरांना कऱ्हाडला घेऊन गेला होता. आता उलटी प्रक्रिया करू या. तुमचा ‘आश्रम’मधला अनुभव सांगलीतला. त्या अनुभवाचं चित्रण करण्यासाठी ठाकुरांना घेऊन तुम्ही सांगलीला जा. नंतर ‘आश्रम’ लिहायला घ्या.’’

मग खरेच मी आणि ठाकूर सांगलीला गेलो. लेखनविषय झालेला परिसर ठाकुरांना दाखवला. ‘आश्रम’ची वास्तू दाखवली. लगतचं विष्णुमंदिर, माईघाट, आशाराणींचं घर, राजवाडा हे दाखवलं. आश्रमाची वास्तू बंद होती. ओसाड दिसत होती. श्रीपुंचे इंजिनीयर जामात प्रा. घारपुरे यांच्याकडून किल्ली मिळवली. घारपुरे म्हणाले, ‘‘जपून जा. पुष्कळ दिवस ‘आश्रम’ची वास्तू बंदच आहे. सापांनी वस्ती केलीय म्हणतात.’’ सांगलीला अनेक संस्थांशी निगडित असलेले आमचे आप्त  अरुण दांडेकर यांचंही साहाय्य झालं. आश्रमाच्या पाठीमागून कृष्णा नदी वाहत होती. दोन दिवसांचा सांगलीला मुक्काम करून मुंबईला परतलो.

ठाकूर म्हणाले, ‘‘आता ‘आश्रम’ लिहा.’’

मी म्हणालो, ‘‘श्रीपु सांगतीलच. आता तुम्हीही सांगायला लागला.’’

उदयन आर्किटेक्ट आहे. त्याला ते म्हणाले, ‘‘एकदा तू भांबेडला आमच्या गावी ये. आमच्या जुन्या झालेल्या वाड्याचं काय करावं ते सांग.’’ उदयननं भांबेडला जायचं ठरवलं. मी, ललिता, सूनबाई वर्षा असे सगळे गेलो. वाडा बराच जुना. भोवती दगडी भिंत होती. मधेच प्रवेशद्वार होतं. त्यातून चार-पाच पायऱ्या उतरून खाली आलं की अंगण. नंतर वाड्यात जाता येई. वाड्यामागं ठाकुरांची वडिलार्जित शेतजमीन. ठाकुरांचे वडील खोत होते. शेतजमीन संपली की त्यांच्याच जमिनीतून एक लहानशी नदी वाहत होती. ठाकूर म्हणाले, ‘‘नदी लहान असली तरी तिला बारा महिने पाणी असतं. साताठ फूट खोल असेल नेहमीचं पाणी. पण आताशा नद्यांचं काही सांगता येत नाही. नदीला पूर येतो, पण भिववण्याइतका नाही. पुढल्या वेळी नदी बघायला जाऊ.’’

वाड्यात ठाकुरांचे थोरले चिरंजीव श्रीकांत, त्यांच्या पत्नी, त्यांचा दहा-बारा वर्षांचा नातू. हा नातू ठाकुरांचा आवडता. ठाकूर असले की त्याचा आणि ठाकूर आजोबांचा आनंदाचा संवाद चाले. श्रीकांतचा गावात लोकसंपर्क चांगला होता. काही काळ तो गावचा सरपंच होता.

ठाकुरांनी मुंबईत राहून स्वत:ला सांस्कृतिक समृद्धी मिळवली होती. ठाकूर ब्रिटिश लायब्ररीचे दीर्घकाळ सदस्य होते. नवी नवी दुर्मीळ पुस्तकं आणून वाचत. एनसीपीएच्या वेचक कार्यक्रमांना जात असत.

भागवतांच्या घराजवळ अनिल आणि लताबाई काटदरे हे डॉक्टर दाम्पत्य राहत होतं. त्यांचं स्वत:चं हॉस्पिटल होतं. गुणी कलावंतांचं त्या दोघांना अप्रूप होतं. त्यांना बाळ ठाकुरांबद्दल, त्यांच्या चित्रकलेबद्दल, ज्ञानोत्सुकतेबद्दल कुतूहल होतं. त्यांना घरी बोलवावं, त्यांची चित्रकार म्हणून घडण कशी झाली ते ऐकावं अशी काटदरे दाम्पत्याची इच्छा होती. ते दोघं श्रीपुंना भेटले… हे इच्छित साधण्यासाठी.

‘‘ठाकूर अबोल. फारसं बोलणार नाहीत. बघू या…’’ असं ते काटदऱ्यांना म्हणाले. भागवत बोलल्यामुळं ठाकूर काटदऱ्यांकडे यायला तयार झाले. मी ठाकुरांना काही प्रश्न विचारले. श्रीपु त्यांच्याशी बोलल्यावर ठाकूर आपलं मन उघड करत राहिले. ती त्यांची भेट अविस्मरणीय झाली.  ठाकूर शांत वृत्तीचे. स्वत:विषयी फारसं न बोलणारे. आपल्या कलेत, उत्तमोत्तम ग्रंथांच्या वाचनात मग्न. साधा पेहराव. चांगलं रूप लाभलेलं. सतेज कांती. उंचेपुरे. बोलणं सौम्य सुरातलं.

१९४७ मध्ये ठाकूर मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. नंतर ते चित्रकला शिकण्यासाठी मुंबईत आले. चित्रकार व्हायचं शाळेत असल्यापासून त्यांच्या मनात होतं. पण चित्रकार होण्यासाठी काय करायचं, कुठं शिकायचं, काहीच माहीत नव्हतं. कुठंतरी ऐकलं आणि अदमासानं त्यांनी जे. जे. स्कूलला एक कार्ड टाकलं. आश्चर्य म्हणजे कोकणातल्या भांबेडसारख्या खेड्यात मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सकडून ठाकुरांना चित्रकलेच्या शिक्षणासंबंधीचं सविस्तर माहितीपत्रक टपालानं आलं. त्यातला कमर्शियल आर्टचा अभ्यासक्रम करावा असं त्यांना वाटलं. त्यासाठी मुलाखत द्यायला ठाकूर मुंबईत आले. आणि चित्रकलेचं एक नवं विश्व ठाकुरांपुढं उघडलं. ठाकूर यांना चित्रकलेत जशी गती, तशीच वाङ्मय व कलांचीही आवड. त्यांच्या कोकणातल्या घरी ‘किर्लोस्कर’, ‘केसरी’, रत्नागिरी आणि मुंबईतून निघणारी नियतकालिकं, पुस्तकं येत. विभावरी शिरूरकरांचं पहिलं प्रगल्भ पुस्तक शाळेत असताना ठाकुरांनी वाचलं होतं. वि. स. खांडेकर पुष्कळ वाचले. मग पुष्कळच पुष्कळ वाचन.

मुंबईत वा. रा. ढवळे यांच्या घरी मुक्कामाला असल्यामुळं वाङ्मय, कला यासंबंधीचं व्यापक विश्व ठाकुरांना अनुभवायला मिळालं. तीव्र संवेदनशीलता आणि चित्रकलेची उपजत जाण यांचा सुंदर संगम त्यातनंच झाला. शब्दांतून चित्रांत किंवा चित्रांतून शब्दांत ठाकूर सहजपणानं उतरताना दिसतात याचं रहस्य या इतिहासात आहे.

जे. जे.मधलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ठाकुरांनी मुंबईतल्या ‘थॉम्पसन’ या जाहिरात कंपनीत चित्रकार म्हणून कामाला प्रारंभ केला. मात्र, तिथं ज्या पद्धतीनं काम करावं लागे ती पद्धती ठाकुरांच्या मनाला मानवणारी नव्हती. कामाला जुंपलेली चित्रकला हे स्वरूप त्यांना व्यथित करी. जे. जे.मध्ये शिकूनसुद्धा व्यक्तिचित्रणाचा नीट अभ्यास करता आला नाही याची खंत खोलवर त्यांच्या अंतर्यामी होती असं जाणवे. तरीही जवळजवळ २५ वर्षे त्यांनी जाहिरात कंपनीत काम केलं.

जयवंत दळवींचं ‘चक्र’ हे झोपडपट्टीच्या जीवनाचं चित्रण करणारं पुस्तक. ते खूप गाजलं. ‘चक्र’मधील बाळ ठाकूर यांनी केलेली रेखाटनंही खूप नावाजली गेली… आणि मराठी ग्रंथसृष्टीत एक महत्त्वाचा चित्रकार प्रवेश करत आहे याची जाणत्यांना जाणीव झाली. मर्मज्ञ शां. शं. रेगे हे ठाकुरांची चित्रं पाहून म्हणाले होते, ‘‘टोपोलस्की या अमेरिकन चित्रकाराइतकी ती प्रभावी आहेत आणि स्वयंसिद्धही.’’

प्रारंभी चित्रकार द. ग. गोडसे यांचा ठाकुरांवर प्रभाव होता. ‘अय्यर्स अ‍ॅड’ या कंपनीतले कामत यांनी डेव्हिड स्टोन मार्टिन या अमेरिकन चित्रकाराच्या स्टाईलनं काम करावं असं ठाकुरांना सुचवलं होतं. त्या चित्रकाराचाही आपल्यावर प्रभाव पडला होता असं ठाकुरांना वाटे. ‘याच काळात गुणसंपन्न चित्रकार प्रा. जोमराज यांची गाठ पडली. त्यांचा सहवास लाभला. त्यांच्यामुळं चित्रकलेत खूप वैविध्य अनुभवता आलं…’ असं ठाकूर सांगत.

१९८७ ते ९० या काळात ‘माणूस’च्या श्री. ग. माजगावकर यांच्या ‘ग्रामायन’च्या धर्तीवर कोकणात काम करावं या ऊर्मीनं ठाकूर भारून गेले होते. त्या काळात चित्रकलेचा संपर्क तुटल्यासारखाच होता. पण त्यातून काही निष्पन्न झालं नाही. ठाकूर पुन्हा चित्रकलेकडे परतले.

तेव्हापासून ठाकूर अव्याहत चित्रं रेखाटत होते. ग्रंथांची मुखपृष्ठं, सजावट करत होते. चित्रकलेमुळं अनेक प्रतिभावंतांशी, व्युत्पन्न संपादकांशी त्यांचा जवळून संपर्क जडला. विजय तेंडुलकर ‘वसुधा’ मासिकाचं काम पाहायचे. ‘त्यांच्याबरोबर काम करताना सर्जनशीलतेचा आनंद मिळे…’ असं ठाकूर म्हणत. ठाकुरांनी असंख्य चित्रं काढली, रंगवली. पण त्यांच्याकडे त्याचा हिशेब नव्हता. ती संकलित व्हायला हवीत, त्यांच्यावर ग्रंथ निघायला हवा अशी तेंडुलकरांची इच्छा होती. गेली अनेक वर्षे श्रीपुंशी संवाद साधत ठाकूर कलाविषयक काम करत. भागवतांचं अव्यक्त प्रेम आणि विश्वास याचा ठाकूर नेहमी उल्लेख करत. ‘त्यांच्यामुळं वैविध्यपूर्ण आणि उत्तम काम करण्याचा आनंद मिळाला,’ असं म्हणत.

ठाकुरांना चित्रकला इतकी वश आणि सहज प्रकट होणारी, की आधी कच्ची चित्रं, पेन्सिलीचा आधार असे मधले टप्पे त्यांना आवश्यक वाटत नसत. मनातले रंग, रेषा सरळसरळ कागदावर… कॅनव्हासवर उतरत. ठाकूर अनवधानानं कधी काही करत नसत. ते मुळातच अबोल आणि संकोची. क्वचित कधी ठाकुरांचा शून्य प्रहर सुरू होई. अंतरी राहिलेलं थोडंसं उघडं होई. तो असर संपला की म्हणत, ‘‘अरे, काय मी सांगत राहिलो.’’ त्या गप्पांत त्यांच्या भांबेडच्या वाड्यासंबंधी काहीबाही असे. तो वाडा बंद असताना एका कुणी वरचा मजला मोडतोड करून उद्ध्वस्त केला. ते त्यांच्या जिवाला फार लागलं होतं… हे त्यांच्या शून्य प्रहरात कळलेलं.

त्यांच्या भांबेडच्या वाड्यात ते असताना काही वेळा मी मुक्कामाला तिथं राहिलो होतो. तेव्हा ते पुष्कळ बोलत. वाड्याच्या वरच्या मजल्यावरच्या जुन्या आठवणी सांगत. असेच एकदा माधव भागवत व सौ. ललिताबाई आणि मी आणि माझी पत्नी भांबेडला अचानक गेलेलो. तेव्हा ठाकुरांना झालेला आनंद सूक्ष्मपणं त्यांच्या मुद्रेवर दिसत होता.

ठाकुरांचं राहणं अगदी साधं. अंगात खादीचं रंगीत दंडकं नेहमी असे. निरंगी पॅन्ट. एक कवयित्री ठाकुरांचं रूप विठोबासारखं आहे असं म्हणाल्याचं ठाकुरांना मी सांगितलं. ठाकूर थोडंसं हसले. म्हणाले, ‘‘ईश्वर सर्वांचे ठायी आहे. कधी तो कोणाच्या तरी रूपात क्षणभर प्रकट होऊन जातो. मग ईश्वराला आपली चूक कळते. आणि तो लोप पावतो, हे त्या कवयित्रीला सांगा.’’

ठाकूर पुष्कळदा कऱ्हाडला आमच्याकडे मुक्कामाला येत. त्यांना त्यांचा आर्टिस्ट मुलगा राहुल आपल्या कारनं आमच्याकडे सोडत असे आणि पुन्हा घेऊन जात असे. ठाकुरांना आमच्या गावी औदुंबरला आम्ही कधी कधी घेऊन जात असू. त्यांना तिथला निसर्ग आवडे. कृष्णा नदीचा डोह, नदीपलीकडची भुवनेश्वरीची बांधेसूद मूर्ती आवडे.

कधी ठाकुरांना मुंबईला जायचं असे. ते कऱ्हाडहून आमच्याकडून निघत. कृष्णा हॉस्पिटलच्या मधल्या वाटेने आम्ही जात असू. एकदा मी आणि उदयन ठाकुरांच्या बरोबर त्या वाटेला लागलो. थोड्याच अंतरावर आठ-दहा फूट लांबीचे साप रस्त्यावर आडवे पडलेले. मी ठाकुरांना थांबवलं. त्यांनी बघितलं. म्हणाले, ‘आम्हाला गावाकडं हा नेहमीचा अनुभव आहे. धामिणी आहेत. जातील त्या.’ आम्ही त्या जोडीला लांबचा वळसा घालून पुढं गेलो.

ठाकुरांच्या पत्नी काही दिवस आजारी होत्या. घरी दोन मुलगे. ते त्यांच्या व्यवधानात. घरची आवराआवर करून ठाकूर ‘मौज’मध्ये येत. श्रीपु मला म्हणाले, ‘‘ठाकुरांच्या पत्नी आजारी आहेत. हॉस्पिटलमध्ये आहेत. आपण ठाकुरांना भेटून येऊ.’’ भागवतांनी ठाकुरांना फोन केला. ते थोडा वेळ हॉस्पिटलातून घरी चुनाभट्टीला आले होते. आम्ही त्यांच्याकडे गेलो. ठाकुरांचं तेज उणावलेलं. थोडा वेळ थांबून, ठाकुरांची विचारपूस करून आम्ही उठलो. जाताना श्रीपुंनी एक पाकीट ठाकुरांच्या दंडक्याच्या खिशात ठेवलं. ठाकूर म्हणाले, ‘‘तशी काही आवश्यकता नाही.’’

‘‘असू देत. उपयोग होतो.’’ श्रीपु म्हणाले.

थोड्या दिवसांत ठाकुरांच्या पत्नी निवर्तल्या. ठाकुरांचा आधार गेला.

आता बाळ ठाकूरही गेले.

ठाकुरांना मी मधून मधून फोन करत असे. त्यांचाही फोन येई. गेल्या आठवड्यात मी आणि ललिता त्यांच्याशी बोललो. ‘‘पुष्कळ दिवसांत आपली भेट नाही. कऱ्हाडला या विश्रांतीला.’’ मी म्हणालो.

‘‘येईन.’’ ठाकूर म्हणाले.

ठाकुरांना फोनवर यायला थोडा वेळ झाला की मी म्हणत असे : ‘‘ठाकूर, ठाकूर कुठं आहात?’’

एवढ्यात ते फोनवर येत. म्हणत, ‘‘हा काय बोलतोय.’’

वाटते, आताही त्यांना फोन करावा. ते फोनवर येतील आणि म्हणतील : ‘‘हा काय बोलतोय.’’

udayankulkarni@yahoo.co.in

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Author shrinivas vinayak kulkarni article painter bal thakur in the world of marathi literature akp

ताज्या बातम्या