श्रुती आणि भक्ती या जुळय़ा बहिणी माझ्या खूप जुन्या मैत्रिणी. एकेकाळच्या गाण्याच्या क्लासमधल्या. नंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं तरी आमची मैत्री मात्र सगळे टक्केटोणपे खाऊनही टिकली.
मध्यंतरी श्रुती अचानक दवाखान्यात आली. तिला पाच-सहा महिन्यांपासून सर्दीचा त्रास चालू झाला होता आणि आता त्याचं रूपांतर Sinusitis मध्ये  झालं होतं. मी तिला तपासून औषधं दिली, पथ्य सांगितलं आणि १५ दिवसांनी परत बोलावलं. त्या १५ दिवसांचा दीड महिना झाला तरी श्रुती आली नाही. मैत्रिणीच्या काळजीनं मी फोन केला, तेव्हा तिनं यायला न जमण्याची ठोक कारणं सांगितली. ‘या आठवडय़ात नक्की येते,’ म्हणाली. तरी आली नाही. १५ दिवसांनी ती मला बाजारात दिसली. मी लांबून तिला हात केला. तिचं लक्ष होतं, असावं. पण दुसऱ्याच क्षणी ती रस्ता ओलांडून पलीकडच्या रस्त्यावरून निघून गेली. अशा छोटय़ा छोटय़ा गोष्टींवरून लगेच निष्कर्षांप्रत जायची मला सवय नाही. साहजिकच मी तो प्रसंग विसरले. पण आठ दिवसांनी परत तसंच घडलं. मला श्रुतीचं वागणं झेपेना. का टाळत होती ती मला कुणास ठाऊक! नेमकी त्याच दिवशी मला भक्ती भेटली. माझी सगळी गोष्ट ऐकून ती हसली. म्हणाली, ‘‘अगं, सहा महिन्यांपासून श्रुती वजन कमी करण्याच्या मागे लागली आहे. त्यासाठी तिनं फलाहार वाढवलाय. तुझ्याकडे आल्यावर तू नेमकी तिची फळंच बंद करायला सांगितलीस. आम्हाला सगळय़ांना पटलंय तुझं. कारण हिची सर्दी हटतच नाहीये ना. आता तिला ज्या दिवशी पटेल, तो सुदिन!’’
या अशा कारणासाठी श्रुती मला टाळत होती? मला वाईट वाटलं. नेमका त्याच दिवशी कुणीतरी फेसबुकवर एक संदेश टाकला. खास माझ्यासाठी बनवल्यासारखा- ‘जर तुम्हाला तुमचा जवळचा मित्र गमवायचा असेल तर तुम्ही त्याला त्याच्या हिताचा सल्ला द्या.’
सर्दी, दमा, सायनसायटिस असे कफाचे आजार असणाऱ्या रुग्णांनी फलाहार टाळणं हे खरं तर त्यांच्या हिताचं असतं. पण वैद्यांकडे पोहचण्यापूर्वी, ‘फलाहार चांगला,’ ‘रोज भरपूर फळं खावी,’ अशा घोषवाक्यांचा त्यांच्यावर इतका मारा झालेला असतो, की आम्ही कितीही टाहो फोडून ‘फलाहार नको’ असं सांगितलं तरी ते पटायला कधी अवघड, तर कधी अगदी अशक्य होऊन बसतं.
आमचे एक ज्येष्ठ वैद्य, वैद्यराज रमेशजी नानल, त्यांच्या ‘आहार रहस्य’ या पुस्तकात म्हणतात, ‘कोणत्याही स्वस्थ व्यक्तीने आहारात फळांचा वापर तारतम्याने करावा. एक वेळ खाण्याने, थोडेच खाण्याने काय होणार आहे, असा विचार करू नका. फलाहार केल्यानं दमेकरी, तापकरी रुग्णाचे प्राण कंठाशी येतात असा अनुभव आहे. एक दिवस, एक वेळ, एक प्लेट फळांच्या फोडी खाल्ल्यानं १२-१२ तास श्वास घेणं आणि सोडणं अशक्य झाल्याची उदाहरणं आहेत.’
आयुर्वेदशास्त्राच्या मते, साधारणत: सगळी फळं ही गोड चवीची, पचायला जड, रसदार आणि थंड असतात. त्यामुळे ती ‘कफकर’ असतात.
सुवर्णा ही माझी शाळेतली मैत्रीण. सध्या गोव्यात राहते. आमचा संपर्क आणि मैत्री अजून टिकून आहे. एक दिवस तिचा फोन आला, ‘‘अगं, संतोषला न्यूमोनिया झालाय. औषधं चालू केली आहेत. पण भूक लागत नाही. तो म्हणतो फळं दे. देऊ का?’’ मी तातडीनं नकार दिला. म्हटलं, ‘‘अगं, दम लागतोय ना? फळं खाल्ली तर वाढेल. हाताबाहेर जाऊ शकेल.’’ पण मैत्रिणीचा आपल्यावर विश्वास असला, तरी मैत्रिणीच्या नवऱ्यानं तो का ठेवावा? त्यानं हट्टानं फळं खाल्ली. तीन दिवसांत साहेब थेट व्हेंटिलेटरवरच गेले! दोन दिवसांनी व्हेंटिलेटर काढला, तर याचा परत फळांचा हट्ट सुरू. शेवटी सुवर्णानं मलाच त्याच्याशी बोलायला सांगितलं, मी म्हटलं, ‘‘तुम्ही फळांबद्दल इतके आग्रही का आहात? तुम्हाला आवडतात का?’’ तर संतोष म्हणाला, ‘‘नाही. मला खूप अशक्तपणा आला आहे. डॉक्टर म्हणाले, पोटात प्रथिनं जायला पाहिजेत भरपूर. म्हणून मला फळं पाहिजेत.’’ आता फळांमध्येच प्रथिनं असतात, हे चुकीचं ज्ञान त्यानं कुठून मिळवलं होतं माहीत नाही. त्यावेळी सुवर्णानं नवऱ्याच्या हिताकरिता स्वत:कडे वाईटपणा घेऊन दिलेला लढा अजिबात मामुली नव्हता.
देशपांडे काका-काकू आणि कुटुंबीय हे माझे फार जुने रुग्ण. त्यांची मुलगी स्तुती सध्या फॅशन डिझायनिंग करते आहे. करिअरच्या या नवनवीन शाखा दिसायला आकर्षक असतात, पण तिथली विचारप्रणाली मध्यमवर्गीय कुटुंबांना झेपत नाही. स्तुतीचंही तसंच झालं. या अभ्यासक्रमाच्या दुसऱ्याच वर्षी तिला ‘झिरो फीगर’च्या विचारानं पछाडलं. सतत माझ्याकडे ‘वजन कमी करण्यासाठी’ औषधं मागायची. ‘तुझं कुपोषण होईल,’ अशी मी वारंवार तिची समजूत घालायचे. ‘औषध नको तर नको. नुसता फलहार करून राहते की!’ असा तिचा वारंवार आग्रह चालायचा. मी ठाम नकार देऊन होते. ‘चार-पाच दिवस सलग फलहार केलास तर शेंबडी होशील हं,’ अशी आगाऊ भीतीही  घालून झाली.
तरी स्तुतीनं एकदा संधी साधलीच. समस्त देशपांडे कुटुंबीय एका लग्नासाठी बाहेरगावी गेले. स्तुतीची परीक्षा होती म्हणून ती गेली नव्हती. जवळच्या पोळी-भाजी केंद्रावर काकूंनी हवाला ठेवला होता. पण स्तुतीचा ‘डाएट’ करण्याचा विचार पुन्हा जागृत झाला. पहिल्याच दिवशी तिनं खरबूज, टरबूज, पेरू, केळी, अननस यांनी फ्रीज भरून ठेवला. सोबत टोमॅटो, काकडी होतेच. भूक लागली की तिन्ही त्रिकाळ हेच खाणं सुरू होतं. दोनच दिवसांत तिला सर्दी-तापानं ग्रासलं. त्यात परीक्षा चालू. मी ओरडेन, म्हणून माझ्याकडे औषधासाठी आलीच नाही. जवळून कुठूनतरी औषध घेतलं. फलाहार हट्टानं चालूच ठेवला. सरतेशेवटी काकूंना सगळा कार्यक्रम बाजूला ठेवून तातडीनं परत यावं लागलं. आल्या आल्या त्यांनी तिला माझ्यासमोर आणून बसवलं. तिच्या या सगळय़ा अगोचरपणावर त्याच जास्त संतापल्या होत्या. ‘नको म्हणाल्या होत्या ना मॅडम? फळं खातेय म्हणे! आता भोगा ती ‘फळं.’’ काकू माझ्यासमोरच तिचं राशनपाणी घेत होत्या.
‘‘इतके सगळेजण खातात. त्यांना कुठे काय होतं?’’ युवा पिढी बंडखोर असते ती अशी.
‘‘इतके सगळे म्हणजे कोण गं? आणि त्यांना काही झालं तर ते तुला थोडेच सांगायला येणार आहेत? ते त्यांच्या डॉक्टरकडे जाणार.’’ मी तिला समजावलं. ‘अशानं आम्हाला फळं कधी खायला मिळणार?’ स्तुती कुरबुरली. ‘कष्टेवीण फळ ना मिळते..’ मी वातावरण निवळण्यासाठी हसत बोलले. ‘म्हणजे?’ स्तुतीनं काही न समजून विचारलं.
‘म्हणजे कष्ट करा, व्यायाम करा तरंच खाल्लेली फळं पचतील.’ ‘तुम्ही असं म्हणता, पण पूर्वी ऋषी-मुनी वगैरे लोक तर फक्त फळं आणि कंदमुळं खाऊन जगायचे की!’ स्तुतीनं पलटवार केला.
‘तू ऋषी-मुनींबद्दल बोलते आहेस स्तुती. त्यांची दिनचर्या आणि आपली दिनचर्या यांत जमीन-अस्मानाचा फरक आहे. ते मोठय़ा प्रमाणात शारीरिक कष्ट करत असत. शिवाय त्यांचं त्यांच्या राग, लोभ, भीती यांवरही नियंत्रण होतं. आपलं नसतं. हे सगळे मानसिक भाव पचनशक्ती कमी करणारे आहेत असं आता संशोधनानं सिद्ध झालंय. त्यामुळे आपल्याला ऋषीमुनींसारखा फलाहार करायचा असेल, तर आधी त्यांच्यासारखं वागायला हवं, नाही का?’ मी तिचं शंकानिरसन केलं.
काकूंचा स्तुतीवर चिडण्याचा मुद्दा तसा बिनतोड होता. सगळे रुग्ण जर असा सरळमार्गी विचार करतील, तर तमाम वैद्यांचं काम किती हलकं होईल. शास्त्र असं सांगतं की, कुठलाही आजार जर लवकरात लवकर बरा करून घ्यायचा असेल तर रुग्ण ‘भिषग्वस्य’ असायला हवा. वैद्य जे सांगेल ते सगळं प्रामाणिकपणे ऐकणारा, वैद्याला वश झालेला असा हवा. ‘क्षेमकुतूहल’ या आहारविषयक संस्कृत ग्रंथात तर त्याहीपुढे जाऊन असं सांगितलंय की, केवळ रुग्णच नव्हे, तर रुग्णाचा आचारीसुद्धा ‘भिषग्वस्य’ असायला हवा. (आता हा आचारी कुठून आला? आपल्याकडे तर हजारो वर्षांपासून स्त्रियांचं आयुष्य रांधा-वाढा-उष्टी काढा यात वाया जातंय असं म्हणतात.)
तात्पर्य : कुटुंबात आरोग्य नांदावं असं वाटत असेल तर चाणाक्ष गृहिणींनी कुटुंबियांच्या जिभेचे चोचले पुरवण्यापेक्षा वैद्यांच्या सल्ल्याने वागावे. अशी ही फळांची कहाणी सुफळ होवो. हीच धन्वंतरी चरणी प्रार्थना!    

two Children Drown While Swimming, Surya River, palghar taluka, One Rescued, two dead Body Found , two Children Drown in Surya River, palghar news, Drown news,
सूर्या नदीत दोघांचा बुडून मृत्यू; एकाला वाचवण्यात यश
Itishree thinking about What do I really want is very important in relationship
इतिश्री : ‘मला नेमकं हवंय काय?’
Gajlaxmi Rajyog
येत्या ७ दिवसांनी ‘या’ राशींचे येणार चांगले दिवस? ‘शुभ योग’ बनल्याने लक्ष्मी कृपेने बँक बँलेन्समध्ये झपाट्याने होऊ शकते वाढ
Death of two brothers
पाण्याच्या टाकीत पडून दोन भावांचा मृत्यू: दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना लगेचच झोपडीवरही कारवाई, न्यायालयाने घेतली दखल