जो स्वत:वर प्रेम करीत नाही त्याच्यावर जग प्रेम करीत नाही, हे मी कायम माझ्या शिष्यांना सांगत असतो. पण मी मनापासून ज्यांना शिष्य मानतो, ते मला अजिबात गुरू मानत नसल्याने ते हे अजिबात मनावर घेत नाहीत. स्वत:वर लट्टू असलेले लोक हे मला कायमच भुरळ घालत आलेले आहेत. माझा भाऊ रोज सकाळी घराबाहेर पडताना मोजे घालण्यापूर्वी आधी स्वत:च्या पाया पडतो. गेली अनेक वर्षे तो हे नित्यनेमाने करतो आहे. त्याला मनापासूनच असे वाटते, की मोजे न घातलेले त्याचे पाय हे तीर्थरूप पाय आहेत आणि रोज श्रद्धेने आणि कृतज्ञतेने नतमस्तक होण्याच्या लायकीचे आहेत. त्याला अनेक लोकांनी विविध मार्गानी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.. ‘या जगात इतक्या साऱ्या बाबा-बुवा लोकांचा सुळसुळाट आहे, अनेक देवदेवता आहेत.. त्यांच्यापैकी एखाद्यासमोर झुकून पाया पडून बाहेर पडत जा.’ पण तो ऐकतच नाही. ‘यांच्या पाया पडायचे तर मी काय वाईट आहे?’ असा त्याचा युक्तिवाद आहे. त्याच्या ३५-३७ वर्षांच्या आयुष्यात जी एकमेव अलौकिक व्यक्ती त्याच्या वाटय़ाला आली, ती व्यक्ती म्हणजे तो स्वत:च आहे. आणि थोरामोठय़ांच्या समोर नतमस्तक व्हायला पाहिजे म्हणून तो स्वत:च्या समोरच नतमस्तक होतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वत:वर कायम खूश असणाऱ्या एका नरपुंगवाने मला असे सांगितले होते की, कधीही डान्स बारमध्ये जायचे नाही असे त्याने ठरवले आहे. हे सांगताना त्याच्या चेहऱ्यावर जो आत्मविश्वास होता तो थक्क करणारा होता. ज्याला ज्याला सरकारने आधार कार्ड दिले आहे, त्या प्रत्येकाला डान्स बारमध्ये जाणे सरकारने जणू सक्तीचे केले आहे. आणि त्याने मात्र ठरवले आहे, की तो कधीही जाणार नाही.. असा सगळा आविर्भाव. मीही गाफील होतो. त्यामुळे मी विचारलेच की, ‘का रे बाबा, का नाही जाणार तू डान्स बारमध्ये?’ तो म्हणाला, ‘मला काय उपयोग आहे डान्स बारमध्ये जाण्याचा? आपण कधी दुसऱ्यावर खूश होतच नाही. आपण स्वत:वरच खूश असतो. आता डान्स बारमध्ये जाऊन मी जर स्वत:वरच पैसे उडवले तर इतरांना किती गोंधळून जायला होईल. आणि खरा धोका तर पुढेच आहे. समजा, तिथले इतर लोकही खूश झाले आणि

त्यांनी माझ्यावरच दौलतजादा करायला सुरुवात केली तर फारच ऑकवर्ड परिस्थिती होईल.’ त्यामुळे तो या भानगडीत कधीच पडणार नाहीये, अशी मौलिक माहितीही त्याने मला दिली. आता काय बोलणार यावर?

मला एकाने स्वत:चे व्हिजिटिंग कार्ड दिले होते. त्यात त्याने स्वत:च्या नावाआधी ‘माननीय’ लिहिले होते. हे कार्ड मला देताना त्याच्या चेहऱ्यावर कोणताही संकोच नव्हता. छापताना चुकून छापले गेले असावे म्हणून मी त्याला खुलासा विचारला. तेव्हा त्याने मला सांगितले की, तो त्याच्या परिसरातला एक महत्त्वाचा माणूस आहे. त्याच्या आजूबाजूचे लोक त्याला खूप मानतात. पण नवीन माणूस जेव्हा भेटतो तेव्हा त्याला हे सगळे सांगत बसायला वेळ नसतो. त्याला थेट आणि नेमकी माहिती मिळावी म्हणून त्यानेच त्याच्या नावाआधी ‘माननीय’ छापून घेतले आहे.

स्वत:चे कौतुक करणाऱ्यांना आपल्या देशात अजिबात प्रतिष्ठा नाही. मी माझ्या मित्र-मैत्रिणींना नेहमीच माझ्या लेखाची लिंक पाठवत असतो. ती वाचून सगळेच ‘अरे वा! फारच छान. खूप मजा आली वाचून..’ वगैरे कळवत असतात. सहज प्रयोग करायचा म्हणून मी एकदा लेखाची लिंक पाठवली आणि त्यावर लिहिले, ‘‘माझ्या एका अप्रतिम आणि दर्जेदार लेखाची लिंक पाठवतो आहे. वाचून तुम्ही तुडुंब खूश व्हाल.’’ त्यानंतर मात्र सगळेच उखडले. ही काय पद्धत आहे का लिहायची, वगैरे म्हणायला लागले. मी त्यांना म्हणालो की, ‘अरे, मला मनापासूनच असे वाटते की, मी फारच भारी लिहिले आहे. तुम्ही वाचून नंतर ‘अरे वा!’ वगैरे म्हणणार. त्यापेक्षा मी आधीच तसे कळवले तर तुम्हाला राग का येतोय? मी भारी लिहिलेय असे तुम्ही म्हणालात तर ते न्यायाचे; आणि मीच म्हणालो तर आढय़ताखोरीचे.. असे कसे चालेल?’

स्वत:वर खूश असणाऱ्यांना लोक खूप घाबरतात असा माझा अनुभव आहे. त्यांना या लोकांबद्दल असूया वाटते. सर्वसामान्य माणसे जगात सर्वाधिक नाराज जर कोणावर असतील, तर ती स्वत:वरच असतात. त्यांच्या हातून चुका होतात. कधी कधी तर त्याच त्याच चुका परत परत होतात. नियतीचे फासे सततच असे पडत राहतात, की सारखेच हास्यास्पद व्हायची वेळ यावी. इतरांच्या हातात कायम राजे, एक्के आणि यांच्या हातात र्दुी-तर्िी, हे तर नेहमीचेच. यांनी चुका सुधारायच्या ठरवल्या तरी पटापट यांना त्या सुधारता येत नाही. त्याच त्याच बॉलवर परत परत विकेट जात राहते. काय केले म्हणजे आपल्याला प्रतिष्ठा मिळेल? लोक आपल्याला महत्त्वाचे आणि सन्माननीय समजतील? याचा विचार करण्यात यांचे तासन् तास जातात. आणि तरीही त्यांना असाच निष्कर्ष काढावा लागतो, की अजून आपल्याला खूपच मेहनत करावी लागेल. आणि मग स्वत:ला दोष देत, स्वत:ला सुधारण्याचा पुन:पुन्हा प्रयत्न करत ते जगत राहतात. अशा खचलेल्या आणि जगाच्या गणितात हुकलेल्या लोकांनी सगळा परिसर भरलेला असताना जर एखादा नखशिखांत स्वत:वर खूश असेल तर जगाला त्रास होणारच.

नाना पाटेकरांच्या एका चित्रपटात एक मस्त सीन आहे. ते एका हॉटेलचे मालक असतात आणि ऑफिसमध्ये आल्यावर आधी ते आरशासमोर उभे राहतात आणि स्वत:च्या प्रतिमेला उदबत्त्यांनी ओवाळतात. आणि स्वत:च्या प्रतिमेसमोर उभे राहून चेहऱ्यावर मस्त नतमस्तक भाव आणतात. स्वत:वर खूश असणाऱ्या माणसांचे वर्णन करायला यापेक्षा जास्त चांगला सीन सापडणार नाही. एका चित्रपटात करिना कपूर म्हणते, ‘‘मैं तो मेरीही फेव्हरिट हूँ!’’ वा! काय डायलॉग आहे! माझ्या माहितीतली एक मुलगी रोज घराबाहेर पडताना आरशात बघते आणि स्वत:लाच फ्लाइंग किस् देऊन बाहेर पडते. मला तर नेहमीच स्वत:वर खूश असणाऱ्या माणसांची भुरळ पडते.

खरं तर स्वत:वर खूश असायचा पाया हा भारतीय तत्त्वज्ञानात घातला गेला आहे. ‘मी कोण आहे?’ ‘माझी औकात काय आहे?’ यांसारखे प्रश्न काळाच्या सर्व खंडांमध्ये सामान्य माणसाला पडत गेले. ज्यांना स्वत:ला असले प्रश्न पडले नाहीत, त्यांच्या मनात असले प्रश्न निर्माण करायला त्या- त्या काळात धर्म आणि धर्मगुरू होतेच. काहीही कारण नसताना स्वत:ला कमी लेखत स्वत:चा शोध घेण्याचा शौक हा सर्वच काळांत माणसाला असत आला आहे. थोडेसे आर्थिक स्थैर्य आले, किंवा असलेले आर्थिक स्थैर्य संपूर्ण नाहीसे झाले की माणूस भिरभिरा होतो आणि त्याला स्वत:च्या अस्तित्वाबद्दल प्रश्न पडायला लागतात असा माझा अनुभव आहे.

‘कोऽऽ हम्?’ असा प्रश्न एखाद्या भल्या माणसाला स्वत:ला विचारायला लावून नंतर या प्रश्नाच्या शोधात त्याला रानोमाळ फिरायला लावण्याचा खेळ तर अगदी अनादि काळापासून चालत आला आहे. गावोगावचे गरीब, साधे, भाबडे लोक रोजच्या कटकटींमुळे गांजले की

त्यांच्या अडचणी  सोडवायच्या सोडून त्यांना ‘कोऽऽ हम्?’च्या प्रश्नाच्या जाळ्यात गुंतवायचे. आणि मग तो बसतो शोधत.. आणि आपण बसायचे दाढी वाढवून मजा बघत. हा खेळ तर ऋषी-मुनींची अनेक तपे हुकमी करमणूक होती. एका कुठल्यातरी स्वत:वर खूश असलेल्या द्रष्टय़ा माणसाला जेव्हा या लबाड ऋषींनी ‘कोऽऽ हम्?’ हा प्रश्न विचारला तेव्हा त्यानेही बाणेदार उत्तर दिले, ‘अहं ब्रह्मास्मि!’ ‘मीच ब्रह्म आहे..’ असे खणखणीत उत्तर दिल्यावर ऋषी-मुनींचे चेहरे काय पडले असतील हे आठवून मला आजही हसू येते. ‘मीच ब्रह्म आहे!’ यावर आपले लोक विश्वास का ठेवत नाहीत? त्याने अनेक प्रश्न सोपे होतील. ब्रह्म हे सत्य आहे.. ‘अहं ब्रह्मास्मि’ म्हणजे मीच ब्रह्म आहे.. आणि मुख्य म्हणजे जगन्मिथ्या! उरलेल्या लोकांना एकदा मिथ्या मानले की सगळे प्रश्न किती सोपे होतात.

मी उरलेल्या आयुष्याबद्दल जेव्हा विचार करतो तेव्हा माझ्या लक्षात येते की, अजून खूप काम करायचं राहिलंय. कितीतरी देश आहेत- जे मी अजून पाहिलेले नाहीत. कितीतरी रंग आहेत, गंध आहेत- ज्यांचा आस्वाद मी घेतलेला नाही. सोनाक्षी सिन्हा कधीतरी हॉट दिसेल आणि रिक्षावाले विनम्र होतील- याची आशा मी अजूनही सोडलेली नाही. मी किती पांचट जोक ऐकतो आणि लोकांना सांगतो, पण तरीही अजून कितीतरी पांचटपणा करायचा बाकी आहे- ज्याला जन्म पुरणार नाही. असे कितीतरी डिझर्विग भुक्कड लोक आहेत- ज्यांच्याशी तुसडेपणाने वागायला मला वेळच मिळालेला नाही. पुरी कायनात मला ‘तू किती टिनपाट आहेस,’ हे सांगायला टपलेली असते आणि ‘अहं ब्रह्मास्मि’ म्हणत पुऱ्या कायनातीला शिवीगाळ करायला मला वेळच पुरत नाही.

माझ्या परिचयातल्या एकाला असे वाटले की, सगळे जग त्याच्या वाईटावर आहे, तो कुणालाच आवडत नाही, आपल्या आयुष्यात आता काहीही शुभंकर होऊ  शकणार नाही. या जगाला तो फारच महत्त्वाचे आणि स्वत:ला फारच बिनमहत्त्वाचे समजला आणि फासाचा दोर त्याने जवळ केला. साला.. त्याला ‘अहं ब्रह्मास्मि’ आणि जगन्मिथ्याचा फॉम्र्युला सांगायचाच राहून गेला.

तुम्ही कोणी प्लीज हा फॉम्र्युला विसरू नका.

मंदार भारदे mandarbharde@gmail.com

मराठीतील सर्व बघ्याची भूमिका बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mandar bharde article about happy people
First published on: 07-05-2017 at 01:34 IST