या जगात वावरताना आपला कॉन्फिडन्स कसा अबाधित ठेवायचा, हा मोठाच प्रश्न आहे. जिकडे जावं तिकडे जो-तो आपल्याला ‘गिल्ट’ द्यायचा प्रयत्न करतो. सगळी कायनात आपल्याला हताश करायला टपून बसली आहे असं मला कायम वाटत असतं. सकाळी सकाळी मोबाईल पाहिला. गुड मॉर्निंगचे कितीतरी मेसेजेस आलेले होते. फुल काय, गोंडस बाळ काय, धावणारे ससे व हरणं काय, कुठले कुठले हिमाच्छादित डोंगर आणि नद्या काय.. फोटोच फोटो. आणि त्याखाली काहीतरी आनंददायक, उत्साहवर्धक लिहिलेलं. मला तोंडात मारल्यासारखं झालं. सगळं जग कसं सकाळी जाग आल्या आल्या आनंदी झालंय आणि झडझडून कामाला लागलंय आणि आपल्यालाच तेवढं अजून थोडा वेळ पडून राहावंसं वाटतंय की काय, यानं मी संकोचून गेलो.
मला ‘गिल्ट’ देण्याची संधी जगात एकही जण सोडत नाही. मागे एकानं मला हिशेब करून सांगितला होता. माणसाचं आयुर्मान ऐंशी वर्ष मानलं आणि एखादा माणूस जर रोज सहा तास झोपला, तर तो त्याच्या आयुष्यातली वीस वर्ष झोपण्यात घालवतो. आणि जर तो आठ तास झोपला तर जवळजवळ सत्तावीस वर्ष झोपण्यात घालवतो. ही आकडेवारी त्याने मला अशा तोऱ्यात दिली, की जशी काही माझी एकटय़ाचीच वीस वर्ष झोपण्यात जाणार आहेत. आणि त्याची मात्र सगळी ८० वर्ष जागेपणात जाणार आहेत. तुम्ही कसं आयुष्य जगायला हवं याचे सल्ले लोक किती हिरीरीने देत असतात. दुसऱ्याला सल्ला देण्याइतका हुरूप कसा काय टिकून राहत असेल लोकांचा? आयुष्याची लढाई लढताना सगळं जग कसं ताजंतवानं असतं. कष्ट पडले, संघर्ष वाटय़ाला आला तरी कुणी डगमगत नाही. आणि आपल्यालाच साऱ्याचा कंटाळा का येतो? हाही विचार माझ्या मनात अनेकदा डोकावतो. सकाळी घराबाहेर पडलो तर आमचा एक विक्षिप्त शेजारी कबुतरांना दाणे खायला घालत होता. मला नेहमी मुंबईतली कबुतरं जाम रगेल आणि रंगेल असावीत असं वाटतं. एखाद्याला फुकट काहीही मिळालं तर तो रगेल होतोच. आणि मग रंगेल होणंही त्याला परवडतं असं माझं मत आहे. कबुतराला खायला घालताना शेजाऱ्याच्या चेहऱ्यावर मात्र कृतार्थ आणि परोपकार केल्यावर जसा अहंकार दाटून येतो तसे भाव होते. जणू काही त्याने दाणे घातले नसते तर या भूतलावरून कबूतर ही प्रजाती नष्ट झाली असती. पुन्हा एकदा माझी उदासी दाटून आली. आपला तिरसट शेजारीही परोपकार करतो; पण आपण मात्र आयुष्यात कधीच कबुतरांना दाणे घालायचा विचार का केला नसावा? आपण नीच वगैरे तर नाही ना? हाही विचार मनात डोकावून गेला.
पाल्र्यात एकाने गाय आणून बांधून ठेवलीये. जो येईल तो तिला खायला घालतो आणि तिच्या अंगाला हात लावून पुण्याचा करंट मिळवायचा प्रयत्न करतो. एके दुपारी गाईचं पोट तुडुंब भरलेलं असताना एक शेठ तिला घास भरवण्याचा प्रयत्न करत होते. गाईला घास भरवल्याशिवाय ते कोणतंही टेंडर भरत नसत. गाय घास घ्यायला तयार नाही आणि टेंडर भरायची वेळ तर निघून चाललेली.. त्यामुळे चिडून जाऊन त्यांनी गाईला बळेच भरवायचा प्रयत्न केला तर ती शिंग उगारून शेठजींवर धावून गेली. पण त्यांची तिच्यावरची भक्ती कमी झाली नाही. ते दुसऱ्या दिवशी गाईला घास भरवायला पुन्हा हजर झाले. आपल्याला कधी गाईला घास भरवावासं का वाटत नसेल? आपण अप्पलपोटे तर नाही ना? शेठ गाईला खायला घालतो, त्यामुळे तर तो आपल्यापेक्षा जास्त श्रीमंत नसेल ना, या विचारानं मनात एक खिन्नता दाटून आली.
माझ्या एका मित्राचे वडील रोज सकाळी भटक्या कुत्र्यांना बिस्किटं खायला घालायचे. ते घराबाहेर पडले की गल्लीतली कुत्री त्यांना खडी सलामी द्यायची. एकदा सकाळी मी मित्राकडे गेलो असताना त्याने मला आणि स्वत:ला चहाबरोबर खायला बिस्किटं मागितली तर त्यांनी चक्क नकार दिला आणि ‘कुत्र्यांना कमी पडतील’ असं कारण दिलं. तेव्हापासून सकाळी चहाबरोबर बिस्किटं खायचा अधिकार फक्त भटक्या कुत्र्यांनाच आहे; आपल्याला नाही असंच मला वाटत आलंय.
मला एकाने भाषणाचा व्हिडीओ पाठवला. ‘आपला समाज मनोधैर्य गमावून बसला आहे, सतत युद्धाला सज्ज असणं हे जागरूक समाजासाठी गरजेचं आहे, काळावर ठसा उमटवायचा असेल तर आपण कायम शस्त्रसज्ज आणि युद्धसज्ज असलं पाहिजे..’ असं बरंच काही तो बोलत होता. ही काळावर ठसा वगैरे दगदग मला अगदी नकोशी वाटते. आधार कार्डावर तीन वेळा प्रयत्न केल्यानंतर शेवटी एकदाचे माझ्या बोटांचे ठसे उमटले तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं, की आपण काही काळावर ठसा उमटवायला जन्माला आलेलो नाही. आणि खोटं कशाला बोलू? हाती तलवार घेऊन लढायला पाहिजे आणि समोरच्याला आव्हान दिलं पाहिजे असं मला कधीच वाटलं नाही असं नाही; पण आपल्याला सैन्यात घेतलं असतं तर लढाईची दगदग आपल्याला झेपली असती का, हाही विचार मनात येत राहतो. सैनिकांच्या प्रती शिवाजीमहाराजांचं धोरण काय होतं याची मला मोठीच उत्सुकता आहे. विद्युल्लतेच्या वेगाने महाराज त्यांच्या निवडक सैन्याला घेऊन आले, गनिमी काव्याने शत्रूच्या गोटात शिरले, हाहाकार माजवला आणि त्यांचा तळ उद्ध्वस्त करून ज्या वेगानं आले त्याच वेगानं निघूनही गेले. हे जेव्हा मी वाचतो तेव्हा या सगळ्यात माझा रोल काय असता, याचादेखील मी विचार करीत राहतो. आणि मग मला लक्षात येतं, की शत्रूचा तळ कसा आहे, त्यांच्या मुदपाकखान्यात काय शिजतं याची उत्सुकता वाटून काही मावळे मागेच रेंगाळले आणि त्यांना विद्युत्वेगानं निघून जायची चपळता साधली नाही म्हणून ज्यांना शत्रूनं पकडून तुरुंगात टाकलं अशा मावळ्यांत माझा नंबर लागला असता. मराठा सैन्यात मला विश्वासू सगळेच समजले असते, पण आवर्जून स्वराज्याची काही गुपितं माझ्याशी शेअर करण्याइतकं मला महत्त्वाचं समजले असते का, याबद्दल मला शंका आहे. त्यामुळे मी गनिमाच्या तावडीत सापडलो असतो तर निष्ठावान मावळे जसे ‘प्राण गेला तरी बेहत्तर, पण तुम्हाला माझ्या तोंडून स्वराज्याबद्दल एक शब्ददेखील कळणार नाही’ असं मोठय़ा तडफेनं म्हणाले असते, तसं मी काय म्हणालो असतो? ‘तुम्हाला माहिती पाहिजे हे बरोबर आहे. पण मला कुणी जर काही सांगितलंच नसेल तर मी तुम्हाला काय सांगणार? त्यामुळे तुम्ही कितीही दमदाटी केली तरी ‘आडातच नाही, तर पोहऱ्यात कुठून येणार?’ हे सत्य सांगण्याशिवाय माझ्यासमोर दुसरा कोणता मार्ग उरला नसता. आणि शत्रूच्या इतक्या फुटकळ सैनिकाला पकडून तरी काय करायचं, या विचारानं मुघलांनीही मला सोडून दिलं असतं. आणि परत स्वराज्यात आल्यावर मी चतुराईनं आणि धाडसानं सुटका करून घेतली, असं कितीही कुणाला सांगायचा प्रयत्न केला असता तरी कुणीच माझ्यावर विश्वास ठेवला नसता. आता या पाश्र्वभूमीवर माझ्यासारख्याला उगा ‘शस्त्रसज्ज व्हा’ वगैरे भाषणात सांगून गिल्ट देण्यात काय अर्थ आहे?
गरोदरपणाच्या सातव्या महिन्यातच गर्भाचा ‘आय क्यू’ काढायला हवा असं मला एकानं सांगितलं. एका मैत्रिणीनं तिची मुलगी तीन वर्षांची असतानाच तिला करिअर कौन्सिलिंगला नेलं.
माझ्या टूथपेस्टमध्ये मीठ आणि जेवणात पेस्टीसाइड असल्याचं प्रत्येकानं सांगितलं.. मी उन्हाळ्यात पक्ष्यांना प्यायला पाणी मिळावं यासाठी काहीही करीत नाही.. माझ्याच बेजबाबदार वर्तनानं ओझोनच्या थराला भगदाड पडलंय.. मी शेतकऱ्यांप्रती आणि सैनिकांप्रती कृतघ्न आहे.. मी अजूनही कोणताही महाराज नाही केलेला- त्यामुळे मला मोक्षाचा रस्ताच सापडणार नाही.. कशाकशाचा म्हणून गंड माणसानं बाळगायचा? व्यायामवाल्यांनी आणि डाएटवाल्यांनी तर उच्छादच मांडलाय. काहीतरी सीक्रेट सांगतोय असा आव आणून ते अतक्र्य काहीबाही सांगत राहतात. दुपारी ऑफिसात डबा खाताना मी पाहिलं तर माझा एक सहकारी डब्यात गवत आणि दही घेऊन आला होता. आपले पूर्वज कंदमुळं खायचे व त्यामुळे स्लिम राहायचे, त्यामुळे होता होईल तो त्यानं कंदमुळंच खावीत असं त्याच्या डाएटशियनने सांगितलंय म्हणाला! शर्ट-पॅन्टऐवजी झाडपाला लेऊन यायला डाएटशियनने कसं काय नाही सांगितलं याचंच मला आश्चर्य वाटलं. आमच्या चौकात लोक एकत्र येऊन हसण्याचा व्यायाम करतात. टपऱ्या कमी- इतके जिम आजूबाजूला झालेत. हल्ली लग्नाच्या पंगतीत लोक गोडधोड, पराठे, भजी असले काही वाढून घेत नाहीत; फक्त सलाड घेतात. आणि ‘अरे, काकडी खाल्ल्याशिवाय जायचं नाही,’ असा आग्रह करतात. नवरा-नवरी एकमेकांना टोमॅटोचा घास भरवतात आणि स्ट्रॉने फोटोसाठी प्रोटिन टाकून दूध पितात. तुम्हाला जे खायला आवडतं त्यात डाएटने पाचर मारलीय. जे ल्यायला आवडतं त्यात संस्कृतीनं पाचर मारलीय. जसं असायला आवडतं तसं असण्यात अध्यात्मानं पाय अडवलाय. आणि ‘समाज’ नावाचा कराल दैत्य ना गाढवावर बसू देत, ना पायी चालू देत.
डाएट, मुलांचं संगोपन, कार्बन सजगता, सेंद्रिय खाणे, पक्ष्यांना पाणी,दोन तासांत मोक्ष आणि दोन दिवसात पाच किलो वजन घटवण्याचे उपाय अशा सगळ्या बाजूने सगळं जग जेव्हा दिवस-रात्र तुम्हाला ‘गिल्ट’ द्यायचा प्रयत्न करतं तेव्हा करावं तरी काय, असा प्रश्न जेव्हा तुम्हाला पडेल तेव्हा- ‘हे पार्था, द्रष्टय़ा माणसाचं वचन आठव. जगाचं काय करायचं, या प्रश्नाबद्दल तुकोबारायांनी सांगून ठेवलंय- ‘सत्य- असत्याशी मन केले ग्वाही, मानियलें नाही बहुमत.’ थोडक्यात काय, तर जग फारच घाबरवायला लागलं तर काय करायचं? तर हे पार्था, जगाला ७७वर मारायचं!
मंदार भारदे mandarbharde@gmail.com