भावग्रस्त जिणं असणाऱ्या भागात माणसाला परिस्थितीला तोंड कसं द्यायचं, हे शिकवलं जात नाही. जगण्यासाठीचा चिवटपणा आणि लढा देण्याची वृत्ती आपसूकच त्याच्यात विकसित होते. मात्र, त्यासाठी मनात जिद्द असावी लागते. ‘देशी खेळांची किंमत शून्य’ असं समजणाऱ्यांची संख्या आपल्याकडे खूप. त्यामुळेच कबड्डी, खो-खो या खेळांत चमकदार कामगिरी केल्यानंतरही कौतुक पदरी पडेल याची खात्री देता येत नाही. परंतु यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर मात्र समाज दखल घेतो. उस्मानाबादच्या सारिका काळेचंही असंच झालं. ती यावर्षीच्या दक्षिण आशियाई क्रीडास्पध्रेत भारतीय महिला खो-खो संघाची कर्णधार होती. भारताच्या विजयाचा तिरंगा फडकवून ती गुवाहाटीवरून परतली तेव्हा विमानतळावर तिचं कुणी स्वागत केलं नाही. अर्थात कुणी सत्कार केला असता तरी सारिकाने तेदेखील मनावर घेतलं नसतंच. परिस्थितीला खो देताना कोणत्या दिव्यांतून जावं लागतं, हे तिला आता चांगलंच समजून चुकलं आहे.
सारिकाचे वडील एका हाताने अपंग. बरोबरीला व्यसनही. त्यांचा सारिकाच्या खेळाला विरोध.
आई सुलोचना चार घरची धुणीभांडी करून संसाराचा गाडा ओढते. घरात आजी, भाऊ, बहीण असा परिवार. त्यामुळे खेळ हे काही जगण्याचं साधन होऊ शकत नाही, असं घरातल्या कर्त्यां माणसाला वाटणं साहजिकच. त्यामुळे क्रीडास्पध्रेला जायचं म्हटलं की घरात कटकट ठरलेलीच.
दक्षिण आशियाई क्रीडास्पध्रेसाठी संघनिवडीकरता सोलापूरला सामने होणार होते. घरातील नेहमीचा विरोध टिपेला गेलेला. असं असूनही तत्पूर्वी सारिका तब्बल २२ राष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभागी झाली होती. पण यावेळी मात्र घरातून विरोध आणखीनच वाढलेला. शेवटी सारिकाने स्वत:ला घरात कोंडून घेतलं. सगळ्यांशी संपर्क तोडला. आपला खेळ सुटला याचं दु:ख कवटाळत ती घरी बसली. तिच्या आजीचा जीव मात्र कासावीस होत होता. तिनं कुठूनतरी सारिकाचे प्रशिक्षक चंद्रजीत जाधव यांचा फोन नंबर मिळवला. त्यांना विनंती केली. म्हणाल्या, ‘पोर सुकून गेली आहे. तुम्हीच काहीतरी करा.’ चंद्रजीत जाधवांनी सारिकाचं घर गाठलं. सारिका त्यांना म्हणाली, ‘मला यावेळी जमणार नाही, सर!’ चंद्रजीत जाधव यांना तिच्या घरातल्या परिस्थितीची पूर्ण कल्पना होती. त्यांनी शांतपणे विचारले, ‘पसे नाहीत का? वडिलांना सांगायचं आहे का?’ त्यांच्या त्या प्रश्नांनी सारिकाच्या डोळ्यांत अश्रू तरळले. शेवटी चंद्रजीत जाधव यांनी तिचे काका प्रभाकर काळेंना नेहमीप्रमाणे गाठलं. प्रभाकर काळेही खो- खो खेळाडू. दोघांनी तिच्या वडिलांना समजावलं. पशाची काळजी करू नका म्हणाले. ‘एवढा वेळ येऊ द्या बरोबर,’असं सांगत वडिलांना त्यांनी पटवलं. तेव्हा कुठे सारिका सोलापूरला निवड समितीसमोर खेळली. तिची खो-खोमधील चपळाई पाहून निवड समितीने तिच्याकडे संघाचं कर्णधारपद दिलं. सारिका पुन्हा खेळणार, हे नक्की झालं.
खो-खो हा तसा चपळाईचा खेळ. पाठशिवणीचा हा खेळ ३६ मिनिटांचा. प्रत्येक संघाला नऊ मिनिटे बचावाची आणि तेवढीच चढाईसाठीची. क्रिकेटच्या भाषेत टेस्ट मॅचसारखं- दोनदा फलंदाजी आणि दोनदा गोलंदाजी. मागास भागात क्रीडासाहित्य उपलब्ध नसतंच. त्यातही ते मुलींच्या वाटय़ाला येण्याची शक्यता तशी दुरापास्तच. त्यामुळे खो-खो हा खेळ ग्रामीण भागात प्रत्येक शाळेत खेळला जातो. उस्मानाबादमध्ये खो-खो या क्रीडाप्रकाराला आकार दिला तो चंद्रजीत जाधव यांनी. सारिका त्यांच्याकडे खेळायला आली तेव्हा ती पाचवीमध्ये होती.
दोन खांबांच्या मधील २४ मीटरमध्ये सतत हुलकावणी देण्याचा हा खेळ आपल्याला जमेल असं तिला वाटलं. ती मदानात उतरली आणि सगळ्यांची चाहती झाली. सरावासाठी कधीच खाडा न करणारी सारिका मधेच कधी कधी गायब व्हायची. मग काय झालं, याचा शोध सुरू व्हायचा तेव्हा सारिकाच्या घरची परिस्थिती समोर यायची. आई कसंबसं घर चालवत होती. वडिलांचा तिच्या या खेळाला कडाडून विरोध होता. खेळून काय साधणार? त्यात खो-खो हा असा क्रीडाप्रकार, की ज्याला बाजारात फारशी किंमत नाही. त्यामुळे असं काहीही झालं की प्रशिक्षकांनी सारिकाच्या घरी जायचं, घरच्यांना समजवायचं, अडीअडचणीला मदत करायची आणि सारिकाला क्रीडास्पध्रेला घेऊन जायचं, हा नित्याचाच परिपाठ झाला होता. असं करत करत एक-दोन नाही, तर तब्बल २२ राष्ट्रीय स्पर्धामध्ये सारिका खेळली.
उस्मानाबादच्या उंबरे कोठय़ावर सारिकाचं घर. भारतीय खो-खो कर्णधाराचं घर. घरात जाण्यासाठी पायऱ्या नाहीत. दोन सिंमेटच्या गोण्या वाळूनं भरून केलेल्या पायऱ्या. घरात एक लोखंडी पलंग. एका लाकडी टेबलावर दूरचित्रवाणी संच. सारिकानं कमावलेली अनेक पदकं एका सुटकेसमध्ये भरून ठेवलेली. ती दर्शनी सजवून ठेवण्यासाठी एखादं कपाट तिला मिळालं नाही ते नाहीच. भारतीय क्रीडाविश्वात सारिकाचं देदीप्यमान यश एका बाजूला आणि तिच्या घरची आíथक परिस्थिती दुसऱ्या टोकाला. दोन ध्रुवच जणू!
सारिका सांगते, ‘हा खेळ आपल्याला पुढे घेऊन जाईल, असा विश्वास देणारी बरीच मंडळी भोवताली होती. तसं स्पध्रेला जायचं आहे आणि पसेच नाहीत, असं कधी झालं नाही. कारण प्रशिक्षक चंद्रजीत जाधव सगळा खर्च करायचे. पण शेवटी त्यांच्याकडे तरी किती दिवस मागणार?’ सोलापूरच्या स्पध्रेच्या वेळी शेजाऱ्यांकडून पाच हजार रुपये उसने घेतले. एखादी स्पर्धा जिंकली की घेतलेली रक्कम परत करता येईल, असा सारिकाचा हिशेब. अलीकडे अडल्या-नडल्यासाठी स्पध्रेतून मिळणारे पसे सारिका घरात देते. पण तरीही सारिकाच्या खेळाला होणारा विरोध काही थांबेना. सारिकाला खो-खोबद्दल आत्यंतिक प्रेम. त्याची किती आवड असावी? इयत्ता पाचवीमध्ये ‘खो’ म्हणत मदानात उतरलेली सारिका आज मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेते आहे. एवढय़ा वर्षांत तिने अगदी अपरिहार्य कारणांसाठीच जेमतेम ३०-३५ दिवस सुटी घेतली असेल. खो-खोमध्ये ती उत्तम संरक्षक आहे. पाठशिवणीला आलेल्या प्रतिस्पर्धी खेळाडूला हुलकावणी देण्यात तिचा हात कुणी धरत नाही.
या सगळ्या प्रवासात सारिकाची आजी तिच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. रुईभर हे काळे कुटुंबाचं मूळ गाव. आजोबा जिल्हा परिषदेत शिपाई. त्यामुळे रेल्वे आरक्षणाच्या इमारतीच्या परिसरातील सरकारी खोल्यांत सारिकाचं बालपण गेलं.
जन्मा आली लेक, बाप म्हणतो कचरा
माय म्हणते असू दे, माझ्या जिवाला आसरा
असं घरचं वातावरण. त्यात खो-खोसारख्या देशी खेळात सारिकाने आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवलं. आत्ता आत्ता कुठे तिची ही झुंज यशोशिखराकडे चालली आहे. गावात तिचे सत्कार सुरू झाले आहेत. तिचे यश पाहताना तिची आजी गहिवरते. आईचे डोळे पाणावतात. तेव्हा त्यांच्या डोळ्यांतली श्रीमंती बरेच काही सांगून जाते.
सारिकाच्या पुढच्या शिक्षणाची जबाबदारी काहींनी उचलण्याचं आश्वासन दिलं आहे. आíथकदृष्टय़ा स्थिर होण्यासाठी तिला शासनाच्या मदतीची गरज आहे. ती कदाचित होईलही. मात्र, निभ्रेळ यश मिळवण्यासाठी सातत्य, जिद्द आणि चिकाटी लागते, हे वास्तव सारिका पुन: पुन्हा अधोरेखित करते आहे.
सारिकाचं कर्तृत्व सिद्ध करणारी पदकं..
suhas.sardeshmukh@expressindia.com
dinesh.gune@expressindia.com