एखादा प्रश्न, समस्या कधी एकटीच समोर येऊन ठाकत नसते. तिची उत्तरेही तिच्यासोबतच असतात. समस्या किंवा प्रश्न जेवढा मोठा, गंभीर; तेवढी उत्तरे अनेक! पण ती सहज हाती लागत नाहीत. त्यांचाही शोध घ्यावा लागतो. त्यातून आपल्या समस्येचं नेमकं उत्तर आपणच निवडायचं असतं. नापिकी, दुष्काळ, कर्जबाजारीपणा, पाणीटंचाई अशा अनेक समस्यांनी सध्या महाराष्ट्रातला शेतकरी अक्षरश: पिचून गेलाय. एकाच वेळी असे अनेक प्रश्न समोर उभे राहिल्याने तो संभ्रमित झालाय. उत्तरं शोधायची उमेद हरवून बसलाय. आणि त्या निराशेनं त्याला पुरतं ग्रासलंय. अशी भीषण वेळ आली की माणूस उत्तरं शोधायचा नादच सोडून देतो. पण एखादा मात्र हात धुऊन उत्तराच्या शोधामागे लागतो. हा एक संघर्ष असतो. त्यात दमछाक झाली तर समस्येचा विजय होतो. हे एकदा माहीत झालं, की विजयासाठी झटावंच लागतं. मग अपयश येत नाहीच; उलट अशांच्या लढाईकडे पाहून इतरांच्या अंगातही लढाईचं बळ संचारतं..
पुणे जिल्ह्यत सात-आठ वर्षांपूर्वी असाच एक संघर्ष सुरू झाला. समस्येविरुद्धचा संघर्ष! आजच्या विकासाच्या भाषेत जुन्नर तालुका तसा मागासलेलाच. बिबटय़ांसाठी आरक्षित हरितपट्टा म्हणून हा भाग घोषित झाल्याने या परिसरात एमआयडीसी किंवा उद्योग सुरू होण्याची शक्यता मावळली आणि रोजगाराच्या चिंतेने येथील तरुणांना ग्रासले. शेती आणि पारंपरिकरीत्या केले जाणारे जेमतेम जोडधंदे हेच आपलं आयुष्य राहणार असा समज तयार होऊ लागला. आणि यातून बाहेर पडायचं असेल तर घरदार सोडून शहराचा आश्रय घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, या समजुतीचा पगडा त्यांच्यावर बसला.
एका तरुणाला मात्र फार पूर्वीपासून एक आशेचा किरण गावातच खुणावत होता. दरवर्षी १९ फेब्रुवारीला गावात शिवजयंती साजरी व्हायची. गडकिल्लय़ांनी वेढलेल्या या तालुक्याला इतिहासाच्या पानापानांत स्थान आहे. शिवजयंतीला गावात कुणी मंत्री, पुढारी यायचा आणि आपल्या भाषणात नेहमी बोलून जायचा, ‘जुन्नर तालुक्यात पर्यटनाला मोठा वाव आहे!’ पण हा वाव म्हणजे नेमकं काय, हे मात्र कधीच कुणीच सांगत नसे. शेतीचं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंतच्या अभ्यासाबरोबरच हा वाव शोधायचा ध्यास मनोज हाडवळेनं घेतला. म्हणूनच या संघर्षांची सुरुवात तशी जुनीच.
शिक्षण पूर्ण झाल्याबरोबर त्यानं थेट विदर्भ गाठला. कारण तेथे समस्यांनी थैमान घातलेलं आहे. त्यांच्याशी लढायची जिद्द मनोजच्या मनात होती. आत्महत्याग्रस्त विदर्भात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दोन र्वष तो वणवण हिंडला. अनेक शेतकरी कुटुंबांशी त्यानं संवाद साधला. त्यांच्या समस्यांची उत्तरं शोधण्यासाठी त्यांना मदतीचा हात त्यानं देऊ केला. आणि त्याच्या मनानं स्वत:शी एक खूणगाठ बांधली. या समस्यांची उत्तरं शोधणं कठीण नाही. त्याचवेळी पुन्हा त्याच्या डोक्यात ते वाक्यही घर करून होतेच. तोवर मनोजला स्टेट बँकेत कृषी अधिकारी म्हणून नोकरीही मिळाली होती. पण डोक्यातलं ‘ते’ वाक्य त्याला स्वस्थपणे नोकरी करू देत नव्हतं. अखेर नोकरीचा राजीनामा देऊन मनोज हाडवळे गावी- जुन्नरला परतला. तेव्हा त्याच्या डोक्यात भविष्याचा आराखडा तयार झालेला होता.
‘जुन्नर तालुक्यात पर्यटनास मोठा वाव आहे..’ हे वाक्य मनोजच्या ध्यासाला सतत खुणावत होतं. मग शोध सुरू झाला. जुन्नरमध्ये असलेल्या पर्यटनाच्या संधी, जुन्नरचे वैभवशाली वैविध्य आणि त्याचा पर्यटनाच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीकरता कसा वापर करून घेता येईल याचा विचार सुरू झाला. आसपासचे गडकिल्ले, हिरवाईने नटलेल्या दऱ्याखोऱ्या, प्राचीन मंदिरे, संस्कृतीचे पुरावे असलेली प्राचीन लेणी, जगातील सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण आणि विविधरंगी लोकजीवन ही जुन्नरची संपदा पर्यटकांसमोर ठेवायची आणि जुन्नर हे पर्यटनविकासाचे शाश्वत मॉडेल म्हणून उभं करायचं, हे नक्की झालं. औद्योगिक वसाहत नसणे हेच येथील रोजगाराच्या नव्या संधीचे निमित्त होऊ शकते, याचा जणू त्याला साक्षात्कार झाला होता.
मनोजची ही हकिगत आता त्याची एकटय़ाची राहिलेली नाही. पाच-सहा वर्षांच्या तपस्येनंतर अनेक प्रश्नांशी झुंजून त्याने त्यावर अनेक उत्तरं शोधून काढली आहेत, हे त्याच्याशी बोलताना सहज जाणवतं. कारण केवळ तो सांगतो म्हणून हे पटावं असं नाही. त्याने शोधलेली उत्तरं आपल्या डोळ्यासमोर असतात. मनोज हाडवळे या ३२ वर्षांच्या तरुणाने जुन्नरला पर्यटन विकासाचे एक मॉडेल बनवले आहे. देशविदेशातील पर्यटकच नव्हे, तर शेतीचे अभ्यासकही मनोजच्या कृषी पर्यटन केंद्रास भेट देण्यासाठी जुन्नरला वाकडी वाट करून येतात. मनोजचं स्वप्न हे त्याच्या एकटय़ाच्या प्रगतीचं स्वप्न नाही, हे त्याचं आणखीन एक वेगळेपण. जुन्नरचा पर्यटन विकास करायचा असेल तर त्याला संघटित परिश्रमांची साथ हवी, हे त्यानं तेव्हाच ओळखलं होतं. त्यासाठी या उद्योगाचा पाया भक्कम झाल्याचं लक्षात येताच तालुक्यातील अनेकांना त्यानं हात दिला. पर्यटनास पूरक उद्योग सुरू करण्याच्या कल्पना इतरांच्यातही त्यानं रुजवल्या. आणि जुन्नर पर्यटन विकास संस्थेची स्थापना झाली. हौशी व अभ्यासू तरुणांना एकत्र केले गेले. शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन गोष्टी, व्याख्याने, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून जुन्नरच्या पर्यटनाची माहिती देण्याचा एक उपक्रमच सुरू झाला. जुन्नरचा पर्यटन आराखडा तयार करण्यात आला. जुन्नरजवळून जाणाऱ्या महामार्गावरील हॉटेल्समध्ये हा आराखडा लावला गेला. एक वेबसाइटही तयार झाली. तिच्या माध्यमातून हा आराखडा जगभर पोहोचविला गेला. जुन्नरचे वैभव जगात पोहोचवण्यासाठी जमेल त्या, मिळेल त्या माध्यमाचा वापर केला गेला आणि पर्यटकांची पावले जुन्नरच्या दिशेनं वळू लागली. समस्यांची उत्तरं जणू हात जोडून स्वत:हून समोर उभी राहिली..
पर्यटक म्हणून आलेल्या पाहुण्यांना जुन्नरचं वैभव दाखविण्यासाठी काहीतरी व्यवस्था असावी म्हणून ‘हचिको टुरिझम’ या संस्थेची निर्मिती करण्यात आली. दिवसभर फिरल्यानंतर त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था कुठे असावी म्हणून विचार सुरू असताना त्याच्या मनात आलं- जुन्नरमध्ये फिरून मुक्कामी असताना पर्यटकांना एखाद्या हॉटेलमध्ये ठेवण्यापेक्षा जर जुन्नरची ग्रामीण संस्कृती अनुभवायला देता आली तर आलेल्या पाहुण्यांना अजून वेगळा अनुभव मिळेल. म्हणून मग जुन्नरच्या कृषी आणि ग्रामीण संस्कृतीचा अनुभव देण्यासाठी ‘पराशर कृषी व ग्रामीण पर्यटन केंद्र’ सुरू करण्यात आले आणि ‘जुन्नर पर्यटन’साठी एकात्मिक आणि शाश्वत मॉडेल तयार झाले.
२०११ पासून या ‘जुन्नर मॉडेल’चे प्रत्यक्ष काम सुरू झाले. लोकांनी एकत्र येऊन चालवल्या जाणाऱ्या या पर्यटन लोकचळवळीने आता बाळसे धरले आहे. उद्योग नाहीत म्हणून रोजगाराच्या चिंतेने ग्रासलेल्या इथल्या तरुणांना रोजगाराचे एक भक्कम साधन मिळाले आहे. शेती हा या साऱ्या पसाऱ्याचा पाया असल्याने शेतीतले सौंदर्यही प्रत्येकाला पटले आहे.
‘पराशर’च्या परिसरात शेताच्या बांधावरील निंबोणीच्या झाडाखाली सावलीत बसून मनोजच्या तोंडून जुन्नरच्या पर्यटन विकासाची ही गाथा ऐकताना खूप मजा येते. ती सांगताना मनोज आपल्याकडे पाहतच नसतो. त्याची नजर लांबवर कुठेतरी भिरभिरत असते. बहुधा ती आणखी काही नव्या उत्तरांचा शोध घेत असावी. हे पर्यटन मॉडेल त्याला जुन्नरमध्येच गुरफटवून ठेवायचं नाहीये, तर उत्तराच्या शोधाची उमेद असणाऱ्या, निराशा झटकण्याची तयारी असणाऱ्या प्रत्येकाच्या दारात आपण शोधलेलं हे उत्तर नेण्याचा त्याचा इरादा त्याच्या बोलण्यातून डोकावत असतो.
‘प्रत्यक्ष शेतकरी सोडला तर थेट शेतीशी संबंध येणारी माणसं हल्ली कमी होत आहेत. दुकानातून आणलेलं अन्नधान्य, बाजारातून आणलेली भाजी आणि सकाळी दारात हजर असणारी दुधाची पिशवी अशा नागर संस्कृतीची शेतीशी नाळ राहिलेली नाही, हे शेतकऱ्याच्या समस्येचं एक अंधुकसं उत्तर आहे,’ असं काहीतरी मनोज बोलून जातो. ‘हा शहरी वर्ग जेव्हा पर्यटनाची मजा अनुभवण्यासाठी का होईना, शेतावर येईल, बांधावर बसून शेतात पिकलेल्या पिकातली कणसं कुरवाळेल, शेतकऱ्याशी थेट संवाद साधेल, तेव्हाच त्याला शेतीचं आणि अन्नधान्याचं महत्त्वही कळेल. मग ही शहरी माणसं पानात अन्न वाया घालवणार नाहीत. शेतकऱ्याचा आदर करतील. पुढारलेपण आणि मागासपण हे शहरी-ग्रामीण, मैदानी- डोंगराळ अशा भौगोलिक परिस्थितीत किंवा कुठल्या सामाजिक दरीतील नसून ते वैचारिक कुवतीवर अवलंबून असते, कारण मी जेवढे सुशिक्षित आणि शहरी ‘अडाणी’ पाहिलेत, तेवढेच ‘संवेदनशील’ ग्रामीण लोकही पाहिलेत. एकदा का पोटावर अप्पलपोटी झूल चढवली, की मग कसलं शहरी आणि कसलं ग्रामीण? सर्वाचा रंग, जात, भाषा आणि भूक एकच. आमच्याकडे विविधता आहेच; एकता फार फार तर याच गोष्टीत होऊ शकते..’ असं त्याचं म्हणणं.
बांधावरच्या झाडाच्या सावलीत बसून असं काहीसं स्वत:शीच बोलताना मनोजचा समोरच्या गवताची पात बोटाभोवती फिरवत तिला हवा तसा आकार देण्याचा प्रयत्न चाललेला असतो. मनोजचं बोलणं संपतं आणि गवताच्या पातीसोबतचा तो खेळही थांबतो. मग तो समाधानानं हातातल्या गवताच्या पात्याकडे पाहतो. बराच वेळ बोटाभोवती घोळवलेल्या त्या पात्यानंही झोकदार वळणावळणांचा पीळ घेतलेला असतो. मग मनोज ती पात सरळ करून सोडून देतो. पुन्हा ती पात पीळदार होते. कितीतरी वेळ हा खेळ सुरू असतो. अगोदर सरळसोट असलेली ती पात आता कायमची पीळदार झालेली असते.
मनोजचं ते स्वगत ऐकताना आपणही त्या पात्याचा खेळ पाहू लागतो. त्यात रमून जातो. निघताना मनोजच्या स्वप्नांचा एक वेगळा पदर आपल्या डोळ्यासमोरही झोका घेत असतो..
दिनेश गुणे – dinesh.gune@expressindia.com