माया पंडित

समीना दलवाई यांचे ‘भटकभवानी’ हे हरिती प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले वृत्तांतकथन. एकूण ४५ लेखांचे हे संकलन. हे पुस्तक वेगळे ठरते ते त्यातल्या विषय व आशय आणि अभिव्यक्तीमुळे. कारण ते केवळ विविध भौगोलिक प्रदेशांमधल्या प्रवासांचे वर्णन नाही. आपल्या स्वत:च्या आणि अन्य देशांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रांमध्येही त्यांनी जी भटकंती केली त्यातून त्यांना आपण ‘स्त्री’, ‘मुस्लीम’ आणि ‘भारतीय’ असणं म्हणजे काय यांचे अर्थ कसे उलगडत गेले, संपन्न करत गेले याचं चित्र या पुस्तकात आहे. भारतात असताना आपण मुस्लीम म्हणजे काय हे त्यांना नेमके समजले नव्हते, पण इस्लामचे ग्लोबल स्वरूप त्यांना या भटकंतीमधून प्रत्ययाला आले. देशोदेशीचे मुस्लीम एकाच एकरंगी संस्कृतीत बांधले गेलेले नसून अरब, आफ्रिकन, मलेशियन, तुर्की, बांगला देश या संस्कृतींमध्ये भटकंती करताना त्यांना एका अनोख्या पॅन इस्लामिक सहिष्णू जीवनप्रणालीचे दर्शन झाले. पुरोगामित्व आणि विद्वत्ता अशा वातावरणात वाढलेली, हिंदू-मुस्लीम तहजीबमध्ये वाढलेली एक तरुण मुलगी आपल्या जीवनाच्या भटकंतीत काय तथ्ये शोधते आणि त्यातून तिची वास्तवाची समज किती बहुआयामी व परिपक्व होते याचा उत्तम आलेख या पुस्तकात आढळतो.

once upon a tome the misadventures of a rare bookseller book review
बुकमार्क : पुस्तकवेडे आणि बाकीचे सगळे!
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
talathi bharti
तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; ७० संशयितांचा निकालही थांबवला
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन

समीना दलवाईंची परंपराच मुळी बाहेरच्या निषिद्ध जगांमध्ये भटकणाऱ्या आणि त्यात कृतीशील हस्तक्षेप करणाऱ्या स्त्रियांची. आजी नलिनी पंडित या ख्यातनाम मार्क्सवादी अर्थतज्ज्ञ, तर आई शमा दलवाई या युक्रांदच्या कार्यकर्त्यां, प्रसिद्ध स्त्रीवादी विचारवंत आणि शिवाय हुसेन दलवाई या मुस्लीम समाजसेवी माणसाबरोबर आंतरधर्मीय प्रेमविवाह करणारी ‘धाडसी’ स्त्री! त्यांच्यामुळे समृद्ध अशा हिंदू मुस्लीम संस्कृतीसंगमात वाढलेल्या, मार्क्स – फुले – आंबेडकरांच्या विचारांचे बाळकडू मिळालेल्या आणि त्यामुळे इथल्या मातीत पाय घट्ट रुजलेल्या या लेखिकेचे हे वृत्तांत कथन खूप महत्त्वाचे ठरते.
भारतात मुस्लीम म्हणून वावरताना लेखिकेला आलेले अनुभव बहुसंख्य हिंदू समाजामधल्या असहिष्णु आणि मुस्लीमविरोधी अडाणी प्रवृत्ती दाखवतात. मुस्लीम म्हणजे काहीतरी वेगळे, उर्दू बोलणारे ‘ते’ लोक असा प्रातिनिधिक समज असतो. त्यातून मुस्लीमांना एक आयडेंटिटी क्रायसिस तयार होतो. याची अनेक उदाहरणे त्यांना आढळतात. ‘एक दिवस मुंबईत’ हा लेख वाचकाला अंतर्मुख करणारा. या लेखात त्या एक सवाल उपस्थित करतात- ‘‘जर मुसलमानांनी आमची भाषा बोलू नये, आमच्या आसपास राहू नये, आमच्या मुलांबरोबर खेळू नये, आमच्या घरी जेवायला येऊ नये, सुंदरदेखील दिसू नये- मग त्यांनी हा देश आपला मानावा तो कसा?’’

‘मुसलमानांनी राष्ट्रीय प्रवाहात येण्याची गरज आहे ही काळाची गरज आहे’ अशा विषयांवर टीव्हीवर चर्चा होतात. यावर समीनाचा अत्यंत रास्त सवाल असा की ‘हे मेनस्ट्रीम म्हणजे काय हो काका? सलवार-कुर्ता इस्लामी वेश, मेहंदी मुसलमानी, जिलेबी, पान, लाडके हिरो मुसलमान, जुन्या सर्व गायिका आणि नटय़ासुद्धा मुस्लीम, राष्ट्रभाषा हिंदूुस्थानी जी अनेक भाषांचा मिलाप – फारसी, उर्दू, संस्कृत – मग मुसलमानांनी मेनस्ट्रीममध्ये यायचं म्हणजे नेमकं काय करायचं बुवा?’’ वाचकाला विचारप्रवृत्त व्हायला भाग पाडतो असा हा सवाल! तर ‘हा आपला मनमिलाप’ या लेखात हिंदू-मुस्लीम दंगली झाल्या तेव्हाच्या वास्तवाचे विश्लेषण आहे. आता मुस्लीम म्हणजे काय? अशा सवालाची दुसरी बाजू म्हणजे ‘हिंदू म्हणजे काय?’ या लेखात मांडली आहे. ‘हिंदू धर्म ही एक जीवनप्रणाली आहे’ असे म्हणणाऱ्या साऱ्या मुखंडांना (आणि त्यात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे एक न्यायमूर्तीही आले!) समीना विचारते, ‘जीवनप्रणाली म्हणजे काय? कोणाची जीवनप्रणाली?’ आणि याच्या पुष्टीसाठी ती इतिहासातले एक अत्यंत समर्पक उदाहरण देते. मुस्लीमांबद्दलच्या अनेक प्रचलित लोकभ्रमांचा निरास समीना सहजगत्या करतात. ‘हमीद दलवाई व मुस्लीम प्रतिमा’ हा लेख याचे उत्तम उदाहरण आहे. या लेखात त्या विचारतात- आधुनिक व उदार बनण्याची गरज कोणाला आहे? हिंदूना की मुस्लीमांना? उदाहरणार्थ, फ्लाविया अग्नेस यांच्या मते इस्लाममधले स्त्रीविषयीचे कायदे उदार आहेत. मुलींना वारस म्हणून निम्मा हक्क तरी मिळतो. मुस्लीम स्त्रीदेखील खुला मागून स्वत:ला अन्याय्य विवाहातून सोडवू शकते. तलाकनंतर ती दुसरं लग्न करू शकते. विधवांना अमंगल मानलं जात नाही. योनिशुचितेची परंपरा नसल्याने परित्यक्ता वा विधवा अशा अडगळीत टालेल्या स्त्रिया कमी दिसतात. मदिनेतील पैगंबराचं राज्य धर्मनिरपेक्ष होते; ज्यू, ख्रिश्चन व्यापारी पैगंबराकडे सल्लामसलतींसाठी येत.

पैगंबरांनी मुलींना वाळूत पुरून टाकण्याची प्रथा उखडून टाकली किंवा स्त्रीभ्रूणहत्या करायला मुसलमान कचरतात हे आपण लक्षात घेत नाही. महत्त्वाचे म्हणजे मुस्लीम तलाकपीडित महिलांची स्थिती ही हिंदू शादीपीडितांपेक्षा जास्त वाईट आहे काय? हा प्रश्नही त्या उपस्थित करतात.‘मुख्य प्रवाह आणि मुसलमान’ या लेखात मुसलमान शैक्षणिकदृष्टय़ा का मागासलेले आहेत याची सच्चर आयोगाच्या आधारे केलेली चिकित्सा फार महत्त्वाची आहे आणि सामाजिक अवकाशात ती फारशी प्रतििबबित होत नाही. मुसलमानांचा शिक्षणात कमी सहभाग आहे, त्यांची स्थिती दलितांपेक्षाही वाईट आहे.मुस्लीमांमधील दलित जमाती आरक्षणापासून दूर आहेत. मुस्लीम वस्त्यांमध्ये शाळा नाहीत, फळे, बाथरूम नाहीत, मोडल्या इमारतींची डागडुजी नाही ही उर्दू शाळांची परिस्थिती.

लेखिकेला ‘तुम्ही हिंदू व मुसलमान दोन्ही कसे काय?’ ‘अय्या, तुम्ही ईदपण साजरी करता?’ असे प्रश्न विचारले जातात. त्यांचे कुटुंबीय हिंदू व मुस्लीम समाजात त्यातल्या वेगवेगळय़ा जाती व वर्ग स्तरात सहजतेने वावरतात याचेच कोडे लोकांना पडते. हा आधुनिक जगाचा आयडेंटिटी क्रायसिस आहे. एका परिघात चपखल बसलेल्या लोकांना बदललेल्या जगाशी जुळवून घेणं जरा कठीणच जातं. लेखिकेचा हा ‘दोन धर्म एक भाषावाला’, ‘आयडेंटिटी क्रायसिस’ तिच्या एका परदेश प्रवासात तिला मो नावाचा जो मुस्लीम माणूस भेटतो तो सोडवतो. ‘‘मला काकीची बिर्याणी व मामीच्या हातचं श्रीखंड दोन्ही पाहिजे.’’ हे म्हणणारी समीना आपल्याला त्यामुळे अतिशय मानुष जगण्याच्या पातळीवर घेऊन येते. मात्र मुस्लीम जगातील स्त्रीवादाविषयी या भटकंतीतून काही तरी सटीक वाचता येईल अशी माझी अपेक्षा होती. कदाचित त्यांच्या भटकंतीच्या पुढच्या दौऱ्यात त्या ही निरीक्षणे मांडतील.

स्त्रिया हा समीनाच्या अत्यंत जिव्हाळय़ाचा विषय आहे. मग त्या हिंदू असोत वा मुस्लीम वा ख्रिश्चन. त्यांची दृष्टी असमानता, स्वातंत्र्याचा संकोच आणि उपेक्षा या स्त्रियांच्या वाटय़ाला कायमच आलेल्या बंधनांना अचूक अधोरेखित करते. भारतात स्त्री म्हणजे लाज, संकोच, शरम, त्रास, टोमणे, धक्के, दूषणे बंधने, अवघडलेपणा! यातून बाई असण्याची त्यांना स्वत:ला नाही म्हटले तरी थोडीशी लाजच वाटायची. यांच्यावर उतारा त्यांना युरोपमध्ये मिळाला आणि त्यांचे स्वत:कडे पाहण्याचे परिप्रेक्ष्य बदलले. समतेची वागणूक, स्त्रियांना मदत करण्याची प्रवृत्ती, अगदी स्त्रीदाक्षिण्याचाही अनुभव आला आणि मग झाडाखाली एकटीने झोपा काढणे, एकटीने विनाभय प्रवास करणे, यांच्यामुळे त्यांना स्वत: मुलगी असणे आवडू लागले. या वृत्तांकनातला एक धागा त्यांची डाव्या विचारांशी ओळख कशी झाली याचाही आहे.

पुराणकथा आणि मिथकांचे विश्लेषण हा त्यांच्या परखड स्त्रीवादी दृष्टीचा उत्तम दाखला आहे आणि जेव्हा समाजातील स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता या आदर्श मूल्यांच्या विरोधात जाऊन एखादी लब्धप्रतिष्ठित व्यक्ती अशा मिथकांचे समर्थन करू लागते तेव्हा त्यांच्या लेखणीला धार चढते. ‘शिकार’, ‘सीतेचा आदर्श: मिथकांची पुनर्माडणी’ हे लेख याचे उत्तम उदाहरण आहे.‘मातृत्व आणि काळजी’, ‘लैंगिक आरोग्य : स्त्रियांचा अधिकार’, ‘सेरेना आणि निरोगी गर्भारपण’ हे लेख जितके माहितीपूर्ण आहेत तितकेच ते स्त्रीवादी राजकारणातले महत्त्वाचे मुद्दे आहेत. ‘चांगली बाई- वाईट बाई’ या लेखात परंपरेने रुजवलेल्या मूल्यांची चिकित्सा आहे.

शोषित वर्गातील स्त्रियांच्या बाबतीतले त्यांचे एक निरीक्षण फार महत्त्वाचे आहे. ज्याज्या वेळी या स्त्रियांना संधी मिळाली तेव्हा त्यांनी तिचे सोने केले आहे. ‘एका बॅंकेची कथा’ आणि ‘माणदेशी चॅंपिअन्स’ ही त्याबद्दलची उदाहरणे आहेत. या साऱ्या विवेचनातून त्या म्हणतात की ‘झगडा आहे तो परुषप्रधानता, स्त्रीदास्य, धार्मिक आंधळेपणा, जाती वर्चस्व यातून येणाऱ्या अन्याय्य संकल्पना व चालीरीति तर दुसरीकडे समानता व न्यायाची मागणी करणारा आग्रह. अन्याय जोपासणारे व न्याय हवा असणाऱ्या ते यांच्यातली ही दुभंगरेषा आहे. तुम्ही कोणत्या बाजूला?’ या मुख्य विचारसूत्रांबरोबरच इतरही लेख फार इंटरेस्टिंग आहेत. व्यक्तिचित्रण हा या वृत्तांतामधला अतिशय मानुष आणि आकर्षक भाग आहे.

सर्वसाधारणपणे या पुस्तकातून आपल्याला मुस्लीम प्रश्न नेमका काय आहे? त्याकडे कसे निरोगीपणे पाहावे, तथाकथित पुरोगामी मंडळीही हिंदू मुस्लीम दंगलींच्या वेळी आपले भगवे रंग कसे उधळतात, हिंदू-मुस्लीम अशी दुहेरी ओळख लेखिका कशी निभावते, स्त्रियांचे नेमके प्रश्न काय? प्रस्थापित बामणी स्त्रीवादाच्या एकेरी दृष्टीतले अडचणीचे मुद्दे कोणते? या साऱ्या प्रश्नांबरोबरच वर्तमानाच्या भटकंतीतील काही वर्णनात्मक लेख (‘कराची आणि पंडित’) आणि भाजप -मोदी प्रणित राजकीय व्यवहाराची चिकित्सा हे या भटकंतीतले काही महत्त्वाचे वैचारिक प्रदेश आहेत. आणि अर्थातच या साऱ्यांना वेढून राहिलेली नर्मविनोदी अवखळ शैली हे या पुस्तकाचे वैशिष्टय़ आहे.

‘भटकभवानी’, – समीना दलवाई,
हरिती पब्लिकेशन,
पाने-१७६, किंमत-२२५ रुपये.
mayapandit@gmail.com