रमा हर्डीकर-सखदेव
माधुरी पुरंदरे या मराठीतल्या एक वाचकप्रिय लेखिका. मुलांचं भावविश्व अचूकपणे त्या आपल्या गोष्टींमध्ये मांडतात. सहजपणे सुंदर शब्दांत गोष्ट सांगतात. मुलांसाठी त्यांची ३०हून अधिक पुस्तकं प्रकाशित आहेत. ‘राधाचं घर’ आणि ‘यश’ ही त्यांची पुस्तकं तर घरोघरी असतात. अलीकडेच त्यांची ‘नदीवर’, ‘घोटाळा’, ‘नाही माहीत’ आणि ‘आता का?’ ही चार पुस्तकं ज्योत्स्ना प्रकाशनाने प्रकाशित केलीत. त्यात शहरी, मध्यमवर्गीय मुलांच्या गोष्टी आहेत, तर या नवीन आलेल्या पुस्तकांपैकी तीन पुस्तकांत निमशहरी आणि ग्रामीण पार्श्वभूमीवरच्या गोष्टी आहेत. त्यामुळे त्यातली संवादाची भाषाही वेगळी दिसते.
मुलांना आपलेच वाटतील असे विषय, घरोघरी पालक आणि मुलांच्यात घडणारे गमतीशीर संवाद, मुलांना वाचता वाचता एकदम हसू येईल असे मजेशीर घोटाळे यात आहेत! सगळ्याच मुलांच्या आपल्या आईबाबांशी काही तरी कुरबुरी होतच असतात, कधी हट्ट केला जातो, शाब्दिक चकमकी होतात. तसंच ‘आता का?’ गोष्टीतल्या पिटकू उंदराला आपल्या आईचा खूप राग येतो. मग त्याला वाटतं, आपल्याला दुसरी चांगली आई आणायला बाबाला सांगू या. यावर आई काय उत्तर देते ते पुस्तकात मुळातच वाचायला हवं! यातल्या पिटकू आणि आईचे संवाद, पिटकूचे आविर्भाव, लकबी या इतक्या उत्तम टिपल्या आहेत की, माधुरीताईंच्या निरीक्षणशक्तीची ताकद त्यातून दिसून येते.
‘घोटाळा’ गोष्ट फार गमतीशीर आहे. आई शेणाने अंगण सारवत असताना, आजोबा तिसरा चहा पीत बसलेले असताना आणि अमोल आणि निशी अभ्यास करत असताना कुठूनशी एक माशी येते. ती नेमकी आजोबांच्या नाकावर जाऊन बसते. मग पुढे जी काही धमाल उडते ती चित्रांतून पाहायला आणि वाचायला हवी. नाकावरच्या माशीकडे पाहताना तिरळे डोळे झालेले आजोबा, शेपटीवर गरम चहा सांडल्याने ओरडणारा मामू बोका, शेणात पाय घसरून पडलेली आई अशा गमतीशीर जलरंग चित्रांत मुलं गुंगून जातील. ‘अमोलचा नेम चुकवून सुसाट निघालेली माशी’, ‘आजोबांची शिंक म्हणजे सुतळी बॉम्बचा दणकाच’ वगैरे वाक्यं तुम्हाला हसवतील.
लहान मुलांना बरेचदा आपल्या भावना शब्दात मांडता येत नाहीत. नक्की काय वाटतंय, कशामुळे तसं वाटतंय हे सांगता येत नाही. पण ते आईला, बाबाला, आजी-आजोबांना मात्र बरोबर समजतं. ‘नाही माहीत’ गोष्टीतल्या अपूलाही सकाळी खूप छान वाटतं, मग दुपार होते, संध्याकाळ होते आणि रात्र होऊन अंधारही पडतो. प्रत्येक वेळी अपूला काही तरी वेगवेगळं वाटतं. आईला बरोब्बर कळतं की अपूचा राग हा खरं तर पोटातल्या जोराच्या भुकेमुळे आलेला आहे. किंवा दुपारी अपूला कंटाळा आल्यासारखं वाटत असलं तरी खरं तर त्याला बाबानं त्याच्याशी खेळावं असं वाटत असतं. संध्याकाळी भीतीने छातीतून येणारे कसले कसले आवाज आजीच्या पदरात लपेटून, तिच्या मिठीत शिरलं की कमी होऊन जातात! आणि रात्री तर आई त्याला अंधारातल्या सुंदर सुंदर गमती दाखवते, आणि अपूच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. सगळ्याच मुलांना आणि पालकांना ही गोष्ट अगदी आपली वाटेल.
चित्रांतले बारीक बारीक तपशील, चेहऱ्यांवरचे हावभाव गोष्टीला जिवंत करतात. आणखी एक गंमत मुलांच्या नजरेस आणून देता येईल, ती म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत गोष्ट पुढे जाताना दिवसातल्या त्या त्या वेळेनुसार एकेका पानाला रंग दिला आहे. म्हणजे, चित्रांच्या शेजारी मजकूर लिहिलेल्या पानांना सकाळसाठी फिकट पिवळा, दुपारसाठी किंचित लालसर पिवळा, संध्याकाळ दाखवायला निळसर करडा आणि रात्रीसाठी जरा गडद निळसर रंग वापरला आहे. हा बदल अगदी कळेल न कळेल असा आहे. पण जेव्हा आपण मुलांसोबत केवळ गोष्ट न वाचता त्यांना चित्रंही ‘वाचायला’ शिकवू, तेव्हा अशा सूक्ष्म गमती त्यांच्या लक्षात येऊ लागतील आणि वाचनाची मजा आणखी वाढेल.
या तिन्ही पुस्तकांतली चित्रं माधुरी पुरंदरे यांनीच काढली आहेत. ‘नदीवर’ या गोष्टीसाठी मात्र भार्गव कुलकर्णी यांनी चित्रं काढली आहेत. याही गोष्टीत ग्रामीण भागातला परिसर. कपडे धुवायला नदीवर जाणाऱ्या आईसोबत पहिल्यांदाच लहानगा आकाशही जातो. त्याने नदी कधीच इतक्या जवळून पाहिलेली नसते. केवढं पाणी! सुरुवातीला आकाशला भीती वाटते. पण मग तो दादाबरोबर पाण्यात जातो आणि त्याची भीती कमी होते. चित्रकार भार्गव कुलकर्णी यांनी जलरंगात नदीचा परिसर जिवंत केला आहे. पाण्यात खेळणारी मुलं, कपडे धुणाऱ्या बायका, काठावरचे बगळे छान वातावरणनिर्मिती करतात.
अशी ही चार पुस्तकं अगदी लहान मुलांना चित्रवाचन करायला, गोष्ट ऐकायला आवडतील आणि जरा मोठ्या, वाचायला शिकणाऱ्या किंवा वाचू लागलेल्या मुलांनाही आपापली वाचता येतील.
‘आता का?’,‘ नदीवर’ , ‘नाही माहीत’, ‘घोटाळा’ – माधुरी पुरंदरे, ज्योत्स्ना प्रकाशन, अनुक्रमे पाने- १२,१६, २४, २४, अनुक्रमे किंमत- ७५ रुपये, १०० रुपये, १०० रुपये, १२५ रुपये.
rama.hardeekar@gmail.com