जयदेव डोळे

चळवळींचा इतिहास नेहमीच वादग्रस्त असतो. चळवळ चालू असताना नोंदी, दाखले, पुरावे, संदर्भ अथवा साक्षी जपून ठेवता येत नसतात. कारण ती चळवळ खरोखर ऐतिहासिक अन् सर्वथा नवी आहे असे कोणाला वाटत नसते. एक तर साऱ्या चळवळी व्यापक घटना व घडामोडी यांच्या प्रक्रिया असतात. त्यांची वैचारिक बाजू नेतृत्वस्थानाचे दोन-चार लोक मांडत असले, तरी असंख्य व्यक्तींचा तीत अप्रत्यक्ष संबंध असतो. दुसरी गोष्ट अशी की, चळवळींचा आरंभ दाखवता येत असला तरी अंत, निष्कर्ष, फलित या बाबी ठोस दाखवता येत नाहीत. चळवळीला अव्याहतपणाचा जन्मसिद्ध नाद असतो. तो वेगवेगळय़ा नावारूपांनी प्रकटत असतो. म्हणून चळवळींचा इतिहास ठाशीवपणे ना कोणी सांगू शकतो, ना तसा दावा करू शकतो. ‘दलित पँथर’ ही महाराष्ट्रातील इतिहास घडवलेली एक संघटना आणि चळवळ अशा वेगवेगळय़ा इतिहासात बद्ध झालेली आहे. आपली अडचण इतिहास घडवायच्या कामात सामील झालेले घटक, त्यांचे कार्य, अनुभव आणि आकलन हाच त्या चळवळीचा इतिहास आहे, असे सांगू लागतात. कारण सगळेच मातब्बर, त्यागी व सहभागी असतात, त्यातच पँथर नावाचे कार्यरत असलेल्या संघटना अजून आहेत. तरीही ‘दलित पँथर’ असे नाव प्रथम घेऊन साधारण पाचएक वर्षे राजकीय, सामाजिक कार्य केलेल्या संघटनेचा इतिहास अर्जुन डांगळे यांनी ‘दलित पँथर : अधोरेखीत सत्य’ या पुस्तकात मांडला आहे. खुद्द लेखक या पुस्तकाचे वर्णन इतिहास असे न करता ‘दलित पँथरच्या पहिल्या पर्वाचा सम्यक दृष्टीतून समग्र असा वस्तुनिष्ठ कालपट उभा करण्याचा प्रयत्न’ असे करतात.

bangladesh objection on mamata banerjee remark
“ममता बॅनर्जींबाबत आमच्या मनात आदर, पण त्यांनी…”; ‘त्या’ विधानानंतर बांगलादेशने व्यक्त केली नाराजी!
Hundred years of Bhiskrit Hitkarini Sabha founded by Dr Babasaheb Ambedkar
‘बहिष्कृत हितकारिणी सभे’ची शंभर वर्षे
arvind kejriwal low calorie diet allegation by delhi lg
Arvind Kejriwal : “अरविंद केजरीवाल जाणीवपूर्वक…”, तुरुंगातील आहारावरून नायब राज्यपाल वी.के. सक्सेना यांचा गंभीर आरोप!
History of Budget in Marathi | अर्थसंकल्पाचा इतिहास
History of Budget : भारतातील अर्थसंकल्पांचा इतिहास; स्वातंत्र्यपूर्व अन् नंतर कसं बदललं चित्र?
article about veteran feminist writer vidyut bhagwat career journey
व्यक्तिवेध : विद्युत भागवत
divorced Muslim woman can seek alimony Supreme Court Hamid Dalwai Muslim Satyashodhak Mandal
शाहबानो, शबानाबानो आणि सायराबानो! मुस्लीम महिलांच्या पोटगीसंदर्भातील न्यायालयाचा निर्णय महत्त्वपूर्ण का आहे?
maharani yesubai latest marathi news
महाराणी येसूबाईंची कर्तृत्वगाथा इतिहासात आजही उपेक्षित : राजेंद्र घाडगे
Parliament Session 2024 LIVE Updates in Marathi
“माझ्या भाषणातील काही भाग वगळणं हे लोकशाही तत्त्वाच्या विरोधात”, राहुल गांधींचे लोकसभा अध्यक्षांना पत्र; म्हणाले..

हेही वाचा >>> भारतीय क्रिकेटमधील मैलाचा दगड

सदर पुस्तकाचे स्वरूप चळवळीशी संबंधित सत्ये व तथ्ये समाजाला सांगणारे आहे. कारण त्या आधीचे प्रयत्न अर्धसत्य, सत्याचा अपलाप, एकारलेपण, तथ्यांशी छेडछाड या स्वरूपाचे झाल्याचा डांगळे यांचा आरोप आहे. म्हणजे काय? तर आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळी यांच्याविषयी लिहिणारे ज. वि. पवार यांच्या दलित पँथर विषयी केलेल्या पुस्तकातील दाव्यांचे खंडन डांगळे यांनी या पुस्तकात केले आहे. त्यासाठी त्यांनी १९७२ पासूनची वृत्तपत्रीय कात्रणे, निवेदने, पत्रके, लेख आदींचा आधार घेतला आहे. दलित पँथर या संघटनेची स्थापना, स्थापनेची तारीख, विविध संस्थापक, भूमिका, कार्यक्रम अशा अनेक घडामोडी डांगळे आपल्याकडील पुरावे मांडत संगतवार आपल्याला सांगतात. दलित पँथरमध्ये पडलेली फूट आणि संघटनेची बरखास्ती यांची कारणमीमांसा व घटनाक्रम डांगळे मांडताना नामदेव ढसाळ आणि राजा ढाले या दोन नेत्यांमधील स्पर्धा, व्यक्तिविशेष, स्वभाव, कर्तृत्व यांचे वर्णन भरभरून करतात. डांगळे स्वत: ढसाळ यांच्या बाजूने त्यांचे मित्रच. पँथरमधले डांगळे यांचे कार्य तसेच त्यांचे साहित्यिक कर्तब महाराष्ट्र जाणतो. तब्बल ५० वर्षांनी एक जाज्वल्य अन् प्रभावकारी संघटनेविषयी ते लिहायला बसले तेव्हा खरे तर इतिहासच आत्मचरित्र लिहायला बसला असे वाटावे. इतिहास आणि माणूस वेगळे काढत येत नसतात. चळवळींमधील बहुतांश माणसे चालताबोलता इतिहास असतो. कोणाचे खरे कोणाचे बरोबर असे संशय सामान्यांना न यावेत इतका प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा.

हेही वाचा >>> समाजपरिवर्तनवादी तरुणांचा जीवनसंघर्ष

तरीही डांगळे यांनी संघटनेच्या स्थापनेच्या तारखेपासून ते राजा ढाले यांनी केलेल्या तिच्या बरखास्तीपर्यंत जवळपास सर्व ठळक घटना कष्टपूर्वक उभ्या केल्या आहेत. ‘दलित पँथर’ या नावात जातीचा उल्लेख आहे. साहजिकच संघटनेचा विचार आंबेडकरी असला पाहिजे, असा त्यामागचा आग्रह. रिपब्लिकन पक्षामधल्या गटबाजीमुळे आणि तेथील नेत्यांच्या ठरावीक राजकरणामुळे संतापलेल्या तरुणांचा दलित राजकारण आक्रमक, व्यापक व सर्जक करायचा निर्धार म्हणजे पँथर. संघटनेच्या स्थापनेची प्रेरणा अर्थातच अमेरिकन ‘ब्लॅक पँथर’ ही संघटना व तिचे स्वरूप होती. पण महाराष्ट्रात आधी दलित साहित्य आविष्कृत झाले अन् नंतर पँथरचा जन्म झाला असे डांगळे यांचे म्हणणे आहे. ते खरेही आहे. कोणाला समाजवादी पक्षाची पार्श्वभूमी होती तर कोणाला लघु अनियतकालिकांची. साहित्यातून संघटन अशी अत्यंत दुर्मीळ उत्पत्ती महाराष्ट्र पाहत होता. मराठी भाषेचे एक विद्रोही अस्फूट रूप दणक्यात प्रकटलेले तो अनुभवत होता.

पण पक्षाला जशी एक वैचारिक आणि कार्यक्रमांची शिस्त असते तशी या संघटनेला नाही लाभली. चळवळ म्हणूनच तिचा स्वीकार- प्रसार झाला आणि ठाम, ठोस असे राजकारण तिला दुरावले. जातीयता, अस्पृश्यता, विषमता, भेदकारण, अन्याय, अत्याचार अशा अनेक घडामोडी पँथरच्या तडाख्यात सापडून हादरू लागल्या. भाषा रांगडी व रोखठोक, कृती बेधडक व थेट आणि त्याग व समर्पण यांनी भारावलेली मने यांमुळे पँथरचा विलक्षण दबदबा निर्माण झाला. मात्र हे कशासाठी, सत्ताप्राप्तीसाठी की सामाजिक क्रांतीसाठी यांचा पेच सुटेना. मार्क्‍सचा मार्ग की बाबासाहेबांची दिशा अनुसरावी या पेचात पँथर फुटली.

हेही वाचा >>> संवादाच्या दुष्काळाची कविता

या फुटीची साद्यंत दखल या पुस्तकात आहे. खेरीज वरळीची दंगल, पोटनिवडणूक, आणीबाणीचे आगमन- कॉँग्रेसच्या नेत्यांशी संबंध, ग्रामीण भागात दलितांवर होणारे जुलूम व त्यामागची जातीय वृत्ती, मोर्चे, अधिवेशने, आरक्षणे, सवलती यांचे आग्रह अशा कैक घटना अन् त्यांचा पँथरशी असलेला संबंध यांचा आढावाही हे पुस्तक घेते. पण एकंदर हे पुस्तक ढसाळ व डांगळे वि. ढाले व पवार अशी फट कशी निर्माण झाली याचा सविस्तर उलगडा करणारेच जास्त वाटते. ते अर्थात आवश्यक आहे. मौलाना आझाद यांनी लिहिलेले ‘इंडिया मीन्स फ्रीडम’ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक कसे अनेक थापांनी भरलेलं आहे. हे सांगताना डॉ. राममनोहर लोहिया ‘गिल्टी मेन ऑफ इंडियाज् पार्टिशन’ असे आपली बाजू मांडणारे पुस्तकच लिहितात. तशा प्रकारचे ‘दलित पँथर’ असून वैयक्तिक व मानसिक विश्लेषण त्यात अधिक आहे. महत्त्वाचे म्हणजे दलित पँथरचा जाहीरनामा व त्याला ढाले यांनी दिलेले ‘नामा जाहीर’ हे दोन भागांतले उत्तर, पँथरवरचे लेख, नामांतराचे निवेदन आदी काही दस्तऐवज या पुस्तकाच्या परिशिष्टांत समाविष्ट केले आहेत. त्यामुळे अगदी दलित मध्यमवर्गातल्या तरुण पिढीलाही अज्ञात असलेल्या एका जळजळीत, धारदार अशा वैचारिक व कृतिशील संघटनेविषयी खूप काही जाणून घेता येईल. आज दलित पँथरसारखी चळवळ दिसत नाही की दलित साहित्यासारखे आविष्कार. राजकीय व सामाजिक वातावरणात कुंद झालेल्या भारतात असा एक अद्वितीय विद्रोह झाल्याचे अनेक परदेशी अभ्यासकांना आश्चर्य वाटते. त्यांनी या संघटनेचा व तिच्या परिणामांचा अभ्यास केलेला आहे. हे तो करतेवेळी प्रत्येकाने खासगी व्यक्तिगत साधनांचा वापर केला. या पुस्तकाच्या निमित्ताने डांगळे यांनी अस्सल साधनांचा मोठा ठेवा वाचक-अभ्यासक यांना दिलेला आहे. तो अतीतप्रीती अथवा अतीतरंजन यांसाठी न व्हावा, ही अपेक्षा.

‘दलित पँथर- अधोरेखित सत्य’- अर्जुन डांगळे, लोकवाङ्मय गृह प्रकाशन, पाने- ३८०, किंमत- ६०० रुपये.