‘गुड न्यूज आहे! अर्थात मातृत्व उपनिषद’ या डॉ. अरुण गद्रे लिखित पुस्तकात गर्भवती स्त्रीसाठी परिपूर्ण मार्गदर्शन केलं आहे. त्यामुळे हे पुस्तक मातृत्वाविषयी महत्त्वपूर्ण माहिती देतं. डॉक्टर प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ असल्याने त्यांचं मार्गदर्शन अधिक मोलांचं आणि शास्त्रीय आहे.
बाळाचं आगमन हे घराला वेगळंच परिमाण प्राप्त करून देतं. स्त्री गर्भवती राहण्यापासून ते बाळाचा जन्म हा खूप महत्त्वाचा टप्पा असतो. स्त्री गर्भवती आहे, हे समजल्यावर संपूर्ण घराचं त्या बाळाच्या जन्माभोवती एक आनंदमयी िरगण सुरू होतं. त्याचा जन्म हा प्रत्येकासाठी सुखावणारा असतो. परंतु या काळात आईला तिच्या घरातल्या मंडळींचा पाठिंबाही हवा असतो. कारण अनेकदा आपल्याकडे फक्त ती आईचीच जबाबदारी आहे असं मानलं जातं; परंतु या समजाला हे पुस्तक धक्का देतं आणि बाळाविषयी मातेच्या आजूबाजूच्या मंडळींनाही अधिक सजग करण्यास मदत करतं, हे या पुस्तकाचं वैशिष्टय़ आहे. आपल्या पूर्वापार चालत आलेल्या अनेक गृहीतकांविषयीही हे पुस्तक भाष्य करतानाच शास्त्रीय गृहीतकं अधिक साध्या-सोप्या शब्दांमध्ये मांडण्यातही यशस्वी झालं आहे.
या पुस्तकात गर्भारपणापूर्वीचे व नंतरचे विशेष टप्पे नमूद करून त्यातील सत्यता मांडली आहे. आपलं बाळ सुखरूप जन्माला यावं यासाठी आपल्या पातळीवर मातेने व तिच्या घरातल्यांनी कोणती विशेष काळजी घेणं आवश्यक आहे, याविषयी गद्रे यांनी अचूक मार्गदर्शन केलं आहे. विवाहोत्सुक, नवविवाहित आणि मातृत्वाचा अनुभव घेणाऱ्या सर्व स्त्रियांनी व घरातील अन्य सदस्यांनही हे पुस्तक आवर्जून वाचावं.
या पुस्तकातील माहितीपूर्ण लेखांबरोबरच पुस्तकाची आकर्षक मांडणीही भावते.
‘गुड न्यूज आहे अर्थात मातृत्व उपनिषद!’ – डॉ. अरुण गद्रे,
मनोविकास प्रकाशन, मुंबई,
पृष्ठे – १५९, मूल्य -२९५ रुपये.
महिला पंतप्रधानांचा आलेख
राजकारणात जगभरच स्त्रियांची टक्केवारी फारशी समाधानकारक म्हणता येईल अशी नाही. तरीही काही कर्तृत्ववान स्त्रियांनी राजकारणात आपली मोहोर उठवली आहे. १९३ देशांपैकी ५० देशांत महिला पंतप्रधान झाल्या आहेत. यात प्रगत आणि अप्रगत देश आहेत.
हे पद भूषविताना त्यांनी जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवला आहे. या महिलांची दखल ‘देशोदेशीच्या पंतप्रधान’ या पुस्तकात शिल्पा बेळे यांनी घेतली आहे. यात अर्थातच भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा समावेश आहे. तसेच श्रीलंकेच्या सिरीमाओ बंदरनायके, बेनझीर भुट्टो, खालिदा झिया, शेख हसीना, चंद्रिका कुमारतुंगा या आशियाई व मार्गारेट थॅचर, गोल्डा मायर यांसारख्या अनेक छोटय़ामोठय़ा देशांच्या महिला पंतप्रधानांचा समावेश आहे. या महिलांनी अनेक सामाजिक परिस्थितींवर मात करून आपले स्थान बळकट केले. सामाजिक, आर्थिक, जातीय, धार्मिकचे जोखड तोडून त्या पुढे आल्या. अनेकींना पुरुषी मानसिकता, अवहेलना यांना तोंड द्यावे लागले. काहींनी राजकारण आणि समाजकारण यांचा योग्य मेळ साधला. आपल्यातील बाईपण विस्तारत देशाचं नेतृत्व करताना बुद्धिमत्ता, निर्णयक्षमता, धडाडी या नेतृत्वगुणांचा मेळ या स्त्रियांमध्ये दिसून येतो.
‘देशोदेशीच्या पंतप्रधान’ –
शिल्पा बेळे,
परममित्र पब्लिकेशन्स, मुंबई,
पृष्ठे – १४८, मूल्य – १५० रुपये.
नकाशाच्या विश्वात
आपलं नकाशाशी नातं जुळतं ते शाळेत. भूगोल शिकताना नकाशांद्वारे जगभरातील चित्रविचित्र आकारांचे देश (काही मोठे तर काही टिंबाइतके) अभ्यासताना मनात कुतूहल निर्माण होतं. मग नकाशावरून देश शोधून काढण्याचा एक गमतीशीर खेळही होतो आणि त्यातून देशांच्या स्थानाविषयीची पक्की माहिती मेंदूत शिरते. अरुण मळेकर यांचे ‘विश्व नकाशाचे’ हे पुस्तक नकाशाविषयीचे कुतूहल जागृत करते व क्षमवितेही. हे पुस्तक विविध प्रकारच्या नकाशांची माहिती देतानाच नकाशाविषयीच्या ज्ञानात भर घालते आणि नकाशांची उपयुक्तता अधोरेखित करते. लष्कर, सागरी प्रवास, भूमी आलेखन, सुरक्षा या क्षेत्रांतील नकाशाचे महत्त्व मोठे आहे आणि ते कसे याची माहिती या पुस्तकातून होते. नकाशाविषायी कुतूहल असणाऱ्या व नकाशा अभ्यासणाऱ्या व्यक्तींना तसेच शालेय पातळीवरील मुलांना हे पुस्तक निश्चितच मार्गदर्शक ठरेल.
‘विश्व नकाशांचे’ –
अरुण मळेकर,
मैत्रेय प्रकाशन, मुंबई,
पृष्ठे – ८८, मूल्य – ९० रुपये.
नोबेलस्त्रियांची यशोगाथा
जगातील सर्वोच्च पुरस्कार समजला जाणाऱ्या नोबेल पुरस्काराच्या यादीतील स्त्रियांचं कर्तृत्व मीरा सिरसमकर यांनी ‘नोबेल ललना भाग २’ या पुस्तकात शब्दांकित केलं आहे. शिरिन इबादी, वँगरी मुटा मथाई, एल्फ्रिड येलिनेक, लिंडा बक, डॉरि लेसिंग, फ्रांस्वाज बारे सिनूस्सी, एलिनॉर ऑस्ट्रॉम, अदा योनॅथ, एलिझबेथ ब्लॅकबर्न, कॅरोल ग्रेडर, हॅर्टा म्यूलर, एलेन जॉन्सन सरलिफ, लीमा बोवी, तवक्कुल करमान या महिलांची ही यशोगाथा! पुस्तक वाचताना या स्त्रियांच्या कार्यकर्तृत्वाचा मोठा पट उलगडत जातो. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या या स्त्रियांचा सामायिक धागा म्हणजे त्यांची आत्मप्रेरणेने काम करण्याची वृत्ती. स्त्री म्हणून सर्वसमावेशक विचार करण्याची वृत्ती, चिकाटी, सामाजिक परिस्थितीवर मात करून पुढे जाण्याचे धाडस, असे अनेक पैलू या पुस्तकातून उलगडले आहेत. अनेकींना सामाजिक बंधनांना तोंड द्यावे लागले. स्त्री म्हणून होणारा अन्याय सहन करावा लागला. या अन्यायाला न जुमानता आपल्या कामात, संशोधनात त्यांनी खंड पडू दिला नाही. त्यात त्या यशस्वी झाल्या. ध्येयवेडय़ा महिलांची यशोगाथा असेच या पुस्तकाचा उल्लेख करावा लागेल.
‘नोबेल ललना भाग २’ –
मीरा सिरसमकर,
मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे,
पृष्ठे – १००, मूल्य – १०० रुपये.
पर्यटनाविषयी..
वेळ थोडा, बजेट छोटे, पण आनंद मोठा या त्रिसूत्रींवर आधारित पर्यटनाचा अनोखा आनंद घेण्यास मार्गदर्शक ठरणारे ‘पर्यटन’ हे श्रीनिवास घैसास यांचे पुस्तक होय. कोकणापानू ते दुबई-थायलंडर्पयचा प्रवास कसा सहज करता येईल याची माहिती हे पुस्तक देते. सहल वा पर्यटनासाठी जाताना कालावधी, पैसे यांचे योग्य नियोजन करून सहल वा पर्यटनाचा आनंद कसा घ्यावा, याचे मार्गदर्शन मिळते. तसेच कोकणातील महत्त्वपूर्ण स्थळं, तिथली महत्त्वाची ठिकाणं, त्यांची वैशिष्टय़ं यांची माहिती या पुस्तकात मिळते.
‘पर्यटन’ -श्रीनिवास घैसास,
मनोरमा प्रकाशन, मुंबई,
पृष्ठे – २२४ , मूल्य – १०० रुपये.
बाळ ठाकरेंविषयी..
‘हिंदुहृदयसम्राट’ हे उन्मेष गुजराथी यांचं पुस्तक. यात बाळ ठाकरेंविषयी विविध मान्यवरांनी लिहिलेले लेख आहेत. त्यात उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांपासून गोविंद तळवलकर, आर. के. लक्ष्मण, अंबरिश मिश्र, मनोहर जोशी, जॉर्ज फर्नाडिस, भारतकुमार राऊत अशा अनेक मान्यवरांनी बाळासाहेबांवर कधी सडेतोड, तर कधी आपुलकीने लिहिले आहे. हे लेख वाचताना बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविधांगी पैलू उलगडत जातात. या लेखांत विशेषत्वाने जाणवतो तो बाळासाहेब यांच्यातील ‘प्रेमळ माणूस’. बाळासाहेबांविषयी ज्ञात आणि अज्ञात माहिती या पुस्तकातून मिळते. खुद्द बाळासाहेबांच्या मुलाखतींमधूनही त्यांच्या कठोर, हळव्या व्यक्तिमत्त्वाबरोबरच त्यांच्यातील रसिक कलावंतही उलगडत दिसतो. या पुस्तकाचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे बाळासाहेबांचे दुर्मीळ फोटो . थोडक्यात अनेक जुन्या आठवणींचा मेळ यात साधला आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या जाण्यानंतर वाचकांना हे पुस्तक अधिकच हळवं करून जातं.
‘हिंदुहृदयसम्राट’-
उन्मेष गुजराथी,
नवचैतन्य प्रकाशन, मुंबई,
पृष्ठे – ३८८ , मूल्य – ३८० रुपये.