‘राजहंस’ प्रकाशनातर्फे ‘निसर्गकल्लोळ’ या अतुल देऊळगावकर लिखित पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ नाटककार प्रा. महेश एलकुंचवार यांच्या हस्ते आज (२६ मार्च) होत आहे. त्यानिमित्ताने पुस्तकांतील संपादित अंश..

दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात पाश्चात्त्य संगीताचा कायापालट होत गेला. १९६०च्या दशकात महिला, कामगार व कृष्णवर्णीयांच्या न्याय्य मागण्या पाश्चात्त्य संगीतातूनच व्यक्त झाल्या होता. ‘पर्यायी संस्कृती चळवळ’ फोफावण्यात त्या संगीताचा मोठा वाटा होता. बंडखोरीचं प्रतीक झालेल्या ‘बीटल्स’नं जगभरातील संगीत बदलून टाकलं.

kutuhal buks
कुतूहल: रॉडनी अॅलन ब्रुक्स
Permanent Heat Waves in Indian Ocean, Threatening Marine Ecosystems, Marine Ecosystems, Coastal Communities,
हिंदी महासागराबाबत शास्त्रज्ञांचे नवे संशोधन… काय आहे इशारा?
Marathi Serial World First AI Experiment
मराठी मालिका विश्वातील पहिलावहिला ‘एआय’ प्रयोग
Loksatta kutuhal Geoffrey Hinton a pioneer of artificial intelligence
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रणेते जेफ्री हिंटन
magic of generative ai magic of generative technology
कुतूहल : जनरेटिव्ह तंत्रज्ञानाची कमाल
article about indian psychoanalyst sudhir kakar
व्यक्तिवेध : सुधीर कक्कर
loksatta kutuhal generative artificial intelligence and art
कुतूहल : जनरेटिव्ह तंत्रज्ञान आणि कला
Broadcaster Science Inculcation of scientific approach in India Prof R v Sowani
विज्ञान प्रसारकाची जन्मशताब्दी..

१९७० ला अमेरिकेच्या सांता बार्बारा येथे तेलगळती झाली. या काळातच व्हिएतनामवरील हल्ल्यांच्या विरोधात अमेरिकेतील युवक जोरदार निदर्शने व निषेध करीत होते. ‘युद्ध नको शांतता हवी’ या घोषणा सर्वत्र झळकत होत्या. अमेरिकेतील महिला रस्त्यांवर उतरून स्वत:च्या सरकारविरोधात संताप व्यक्त करण्याचं धैर्य दाखवत होत्या आणि त्यांची संख्याही थक्क करणारी होती. ‘सायलेंटा प्रिंग’मुळे प्रदूषण मानवी शरीराची व पर्यावरणाची नासाडी करत असल्याची, नवी दृष्टी गवसली होती. आपली पृथ्वी ही युद्धापासून आणि निसर्ग हा विनाशापासून जपला पाहिजे, ही जनतेची भावना होती. हे पाहून गेलॉर्ड नेल्सन यांनी २२ एप्रिल हा ‘वसुंधरा दिन’ साजरा करण्यात यावा, असं सुचवलं. २२ एप्रिल १९७० ला अमेरिकेत लाखो तरुण रस्त्यावर उतरले. १९७१ साली निसर्गरक्षणासाठी ‘ग्रीनपीस इंटरनॅशनल’ या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेच्या पन्नास देशांत शाखा असून त्या संशोधन व प्रबोधन करत असतात. या वातावरणाचा वैज्ञानिक व कलावंतांवर परिणाम झाला नसता तरच ते नवल ठरलं असतं. जॉनी मिचल यांनी लोकभावनांना शब्दबद्ध करून ‘बिग यलो टॅक्सी’ ही संगीतरचना सादर केली. (तर वैज्ञानिकांच्या आग्रहामुळे १९७२ साली स्टॉकहोम येथे पहिली जागतिक पर्यावरण परिषद भरवली गेली.)

‘त्यांनी स्वर्ग साफ करून वाहनतळ स्थापन केलं. माझ्यासकट वृक्षांना संग्रहालयात धाडलं.’ अशा भावना व्यक्त करून कवी शेतकऱ्यांना आवाहन करतो,

‘मला सफरचंदावर डाग चालतील

पण शेतकरी दादा, तू रसायन फवारणी थांबव, चिमण्या पाखरांना वाचव!’

१९७१ सालची ही रचना आज लोकगीत होऊन गेली आहे. त्यानंतर निसर्गरक्षणाची हाक देणाऱ्या संगीताची लाट पसरत गेली. नील यंग यांचं ‘आफ्टर द गोल्ड रश’ हे गीत आजही तरुणांच्या ओठावर आहे.

पर्यावरणाविषयीची जागरूकता वाढवण्यात वैज्ञानिक, कलावंत व पत्रकार या सर्वाचा मोलाचा वाटा आहे. संगीतानं लाखो तरुणांना विचारप्रवृत्त करण्याची किमया करून दाखवलेली आहे. १९९०च्या दशकात जगभर ओझोन थराला पडलेलं भगदाड, वाढतं तापमान, वाळवंटीकरण, दारिद्रय़ आणि पर्यावरण या विषयांवर वादविवाद झडू लागले. संशोधकांनी पुराव्यानिशी दाखवून दिलं, ‘‘औद्योगिक क्रांतीपासून आजतागायत अतिशय नगण्य कर्बउत्सर्जन करणारे अविकसित देश हेच धनाढय़ देशांनी केलेल्या अतोनात प्रदूषणाचे बळी होत आहेत. उत्तर आणि दक्षिण गोलार्धात झालेली जगाची विभागणी केवळ भौगोलिक नाही. ती आर्थिकसुद्धा आहे. उत्तरेकडील युरोपीय देश व अमेरिका श्रीमंत आहेत. याउलट, दक्षिणेकडील आशिया व आफ्रिका खंडातील देश दरिद्री अवस्थेत आहेत. प्रदूषण करून जगाचा ताप वाढवण्याचे प्रताप धनाढय़ राष्ट्रांचेच आहेत.’’ या काळात हवामान बदलाचे चटके तीव्र होत गेले. कॉर्पोरेट कंपन्यांची आर्थिक व राजकीय ताकद विलक्षण वाढली व त्यांनी जगाचा ताबा घेतला. त्यांनी जंगल व शेतजमिनी बळकावण्याची लाट आणली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या  वाढू लागल्या.

या वातावरणात अस्वस्थ झालेल्या मायकेल जॅक्सननं १९९५ साली ‘इतिहास : काल, आज आणि उद्या’ हा अल्बम सादर केला.  त्यातील ‘आपणच जग आहोत’, ‘आरशातील मानव’, ‘पृथ्वी जखममुक्त करा’ आणि वसुंधरा गीताचं गारूड अजूनही कायम आहे. हे सादर करताना मायकेल जॅक्सन म्हणाला, ‘‘मानवाने पृथ्वीच्या चालवलेल्या हेळसांडीतूनही स्वत:ला सावरण्यासाठी निसर्ग प्रयत्नरत आहे. पर्यावरण विनाशामुळे निसर्गाचं संतुलन ढासळत चाललं आहे. पृथ्वी जखमी होत असून तिच्या वेदना जाणून घ्या. ’’ त्यातील वसुंधरा गीतानं (अर्थ साँग) लोकप्रियतेचे सर्व उच्चांक मोडले.  मायकेलनं, वसुंधरा गीत ही दृक्-श्राव्य रचना सादर करताना आशिया, आफ्रिका, युरोप व अमेरिका या चारही भौगोलिक क्षेत्रांचं प्रभावी चित्रण केलं. त्यातून भल्या मोठय़ा पडद्यावर प्रदूषण, प्राणिहत्या, अरण्यांची होळी हा खिन्न करणारा निसर्ग विनाश दाखवला.

तो या गीतातून विचारतो, ‘‘आपण जगाचं काय करून ठेवलंय? सूर्योदय कुठंय? पाऊस कुठंय? आमचा लाभ होईल, असं तुम्ही म्हणत राहिला, तो कुठंय? शांती हरवून गेलीय. फुलांच्या बागा कोमेजून गेल्या आहेत. सर्व मुलं युद्धात मरून गेली. तुम्ही एकुलत्या एक मुलाला गहाण ठेवता? त्यांच्या स्वप्नांचं काय? तुम्हाला विचार करायला क्षणाची तरी फुरसत आहे का? मला श्वासही घेता येत नाही. आमचं काय? प्राण्यांचं काय? हत्तींचं काय? रडणाऱ्या देवमाशाचं काय? उद्ध्वस्त समुद्राचं काय? जंगलातील पायवाटांचं काय? सामान्य माणसाचं काय? आम्ही कुठे चुकलो? कोणी तरी मला सांगा, तान्ह्य बाळाचं काय? पुन्हा मृत्यूचं काय?’’ ‘ही आक्रंदणारी पृथ्वी, हे आसवं ढाळणारे किनारे?’ असं म्हणताना मायकेलचा आक्रोश कोटय़वधींच्या काळजात घुसत असे. ते ऐकताना लाखो प्रेक्षक ओक्साबोक्सी रडत. याचा परिणाम कसा व किती होत असेल?

सर्व सीमा व बंधनं ओलांडून मानवी भावनांना साद घालणाऱ्या संगीत व दृश्यकला या वैश्विक भाषा आहेत. याची प्रचीती नेहमीच येत असते. आव्हानात्मक व संघर्षांच्या काळात तर या कला लख्खपणे उजळून निघतात. आशा-निराशा, आनंद-दु:ख, संताप-प्रेम, वेदना-आक्रंदन अशा भावना संगीतातून व्यक्त होतात आणि त्या थेट हृदयाला जाऊन भिडतात. त्यामुळेच संगीत हे बदल घडवण्यासाठीचं प्रभावी माध्यम आहे. आजवरच्या अनेक चळवळींनी संगीतात नवीन वारं आणलेलं आहे. जगातील मुलांचं ‘विद्यालय बंद’ व ‘फ्रायडे फॉर फ्युचर’ या आंदोलनात, तसंच खनिज इंधन कंपन्यांच्या महाकाय प्रकल्पांच्या विरोधातील आंदोलनांनी कित्येक गीतांना जन्म दिला आहे. जागतिक परिषदांमध्येही ही गीतं आवर्जून ऐकवली जातात. देश व भाषा भिन्न असल्या तरीही संगीत जगभरातील माणसांना जोडण्याचं कार्य करत आहे. त्यामुळे पर्यावरणविषयक सांगीतिक अभिव्यक्ती वरचेवर प्रगल्भ होत आहे.

पाश्चात्त्य संगीतामध्ये पर्यावरण हा महत्त्वाचा विषय (थीम) झाला असून, पर्यावरणीय संगीतशास्त्र (इकोम्युझिकॉलॉजी) ही ज्ञानशाखा निर्माण झाली आहे.  संगीतशास्त्र, जीवशास्त्र, पर्यावरणशास्त्र व मानववंशशास्त्र या शाखा एकत्र येऊन पर्यावरणीय संगीतशास्त्र विकसित करत आहेत. ‘भूप्रदेश व ऋतूंनुसार त्या भागातील स्थानिक (आदिवासी) संगीत कसं बदलतं?’ यावर पर्यावरणीय संगीतशास्त्रज्ञ व संस्कृती संगीतशास्त्रज्ञ (एथ्नोम्युझिकॉलॉजिस्टस्) संशोधन करत आहेत. निसर्गात ऐकू येणाऱ्या वारा, पाणी, पक्षी व प्राणी यांचे नैसर्गिक ध्वनी व त्यांत होणारे बदल यांच्या अभ्यासातून सांगीतिक रचना तयार केल्या जात आहेत. सामान्यजनांपर्यंत हवामान बदलाच्या संकटाचं गांभीर्य पोहोचवण्यासाठी त्या रचनांचे सांगीतिक जलसे (कॉन्सर्टस) सादर केले जात आहेत. २००७ साली अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष, नोबेलने सन्मानित अल्गोर यांच्या पुढाकारातून एकाच वेळी जगातील बारा ठिकाणी ‘लाइव्ह अर्थ’ हा महत्त्वाकांक्षी सांगीतिक जलसा सादर करण्यात आला होता. दूरचित्रवाणी वाहिन्या व आंतरजालामुळे १३० देशांतील २ कोटी लोकांना हा सोहळा अनुभवता आला होता. त्याचं बी.बी.सी.नं थेट प्रक्षेपण करताना, ‘पर्यावरणीय जाणीव वाढण्यात असे कार्यक्रम अमूल्य योगदान देतात’ अशी प्रशंसा केली होती. तर २०२० साली ऑस्ट्रेलियातील जळून गेलेलं अरण्य सावरण्यासाठी १०० संगीतकारांनी एकत्र येऊन ‘मेक इट रेन’ हा जलसा सादर केला होता.

आपल्याकडे अशोक दा. रानडे यांनी संस्कृती व अन्य शास्त्रांमार्फत होणाऱ्या संगीताच्या पुनर्विचाराची मांडणी केली होती. संगीतशास्त्रानुसार ‘संगीत म्हणजे गीत, वाद्य व नृत्य यांचा एकत्र आविष्कार होय. केवळ महाराष्ट्राचा विचार केला तर  भिल्ल, महादेव कोळी, गोंड, वारली, कोंकणे, कातकरी, ठाकूर, गावीत, कोलम, कोरकू, मल्हार व पारधी जमातींच्या संगीताचे खास गुणधर्म आहेत. वारली जमातीची तारपी व घोर नृत्ये आणि  आगरी समूहांची गणेश व होळी नृत्ये उल्लेखनीय असतात. रानडे यांनी आदिम संगीतातून संगीत कसे विकसित होत गेले, हे उलगडून दाखवले होते. त्यांचा आदिम संगीत, लोकसंगीत, कलासंगीत, धर्मसंगीत, जनसंगीत व संगमसंगीत या संगीत शाखांचा व्यासंग होता. त्यांच्या कार्याचा काळानुरूप विस्तार झाला तर ती मोलाची भर होऊ शकेल. पुढील पिढय़ांना आपला सांगीतिक ऐवज समजू शकेल आणि निसर्गाविषयीचं कुतूहल वाढण्यास मदत होईल. याचं स्पष्ट भान असणारे कर्नाटकी संगीताचे प्रख्यात गायक थोदूर मदाबुसी ऊर्फ टी. एम. कृष्णा यांचं संगीतप्रसाराचं कार्य अजोड आहे. कला आपल्या स्वातंत्र्याची अस्सल अनुभूती देते. मग या अनुभवाचं क्षेत्र विशाल करणं, हे कलावंतांचं कर्तव्य नाही का? बुद्धीच्या मर्यादा ओलांडणारं संगीत थेट हृदयाला जाऊन भिडतं. मात्र सर्वसामान्यांना सभागृहात जाऊन गायन ऐकणं, हे आवाक्याबाहेरचं असतं. हातावर पोट असणाऱ्यांसाठी तर कला व करमणूक शक्यच नसते. कृष्णा यांनी कष्टकऱ्यांपर्यंत संगीत पोहोचवलं. साथीदार घेऊन ते अचानक रस्त्यावर, रेल्वेत वा बसमध्ये जाऊन गायन सादर करू लागले. खेडय़ांत व शहरांत सार्वजनिक ठिकाणी गायन करणारे डोंबारी, जोगी व तृतीयपंथी यांच्यासमवेत राहून त्यांची गायनकला समजावून घेतली व त्यांच्यासोबत गायन सादर केलं. समुद्रात नावा हाकताना सहजस्फूर्त गाणारे कोळी मैफलीतील गायनाला कसा प्रतिसाद देतात? हे जाणून घेण्यासाठी त्यांनी चेन्नईच्या कोळीवस्तीत जाऊन संगीताच्या अनेक मैफली सादर केल्या. त्यांच्या संपर्कात राहून त्यांच्याशी मन:पूर्वक संवाद साधला. यातून ते लोककला व मंचीय कला यांच्या खोलात गेले. ते म्हणतात, ‘मी समुद्रकिनारी गायन सादर करतो, तेव्हा तिथे फेरफटका मारायला आलेले मध्यमवर्गीय, मासेमारी करणारे कोळी, फुगे-खेळणी-भजी विकणारे, तिथे थांबलेले रिक्षाचालक, असे बहुरंगी लोक उपस्थित होत. नकळत जमलेले व जाणीवपूर्वक आलेले श्रोते कलेचा अनुभव घेत होते. तिथं सर्व काही उत्स्फूर्त होतं. कोणी ऐकण्यात दंग होऊन कमाई विसरून जात होतं. कोणी काम करत ऐकत होते. पारंपरिक अवकाश ओलांडून मैफलींचे सादरीकरण करणं हेच कृष्णा यांचं मोठं सांगीतिक विधान आहे. १९६० च्या दशकात पाश्चात्त्य संगीताला रस्त्यावर आणून ‘बीटल्स’ गटानं सांस्कृतिक बंड पुकारलं होतं.  त्याच मार्गावर कृष्णा निघाले आहेत.  मागील तीस वर्षांपासून अरण्य व आदिवासींची परवड वाढत चालली आहे.

निसर्गविनाशातून सहजगत्या संपत्ती निर्माण करता येत असल्यामुळे अरण्य नष्ट करून आदिवासींना हुसकावणे हा राष्ट्रीय कार्यक्रम झाला आहे. प्रसारमाध्यमं व राजकीय नेत्यांनी अस्पृश्य ठरवलेल्या या समस्या कृष्णा यांनी जवळून समजून घेतल्या. ते, पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते नित्यानंद जयरामन यांच्यासमवेत अनेक कार्यात सामील झाले. तमिळमध्ये ‘पोरोम्बोकू’ म्हणजे सर्वाचे- समष्टीचे!  त्यामध्ये तलाव, नद्या, नाले, कुरणं, पाणथळ जागा व समुद्रकिनारे यांचा समावेश होतो. या सार्वजनिक जागांमधूनच सार्वजनिक कलांचा आविष्कार घडत असतो. कृष्णा, अतिक्रमणाच्या विळख्यातून विस्मरणात जाणाऱ्या ‘पोरोम्बोकू’ रक्षणाच्या मोहिमेत सहभागी झाले. कोणतीही कला आपल्यामध्ये आस्था जागवते. असा आस्थेवाईक अनुभव सर्वांपर्यंत पोहोचवायला हवा. पाश्चात्त्य संगीताच्या सिंफनी सादरीकरणात अनेक कलावंतांच्या कलांचं संमीलन होत असतं. त्यात सामाजिक उतरंडीतील वरपासून खालपर्यंतचे सहभागी होतात. त्यामुळे तिथली विषमता दूर होते, असा त्याचा अर्थ नाही. कला सादरीकरणात समाजातील सर्व घटक एका पातळीवर येतात. ही बाब लोकशाहीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. त्या दिशेने भारतानं जावं, अशी कृष्णा यांना आस आहे. त्यामुळे ते देशातील राजकीय, सामाजिक व आर्थिक पर्यावरण उमजून घेत आहेत. ते विविध सुधारणांबाबत लिहिताना लेनिन, आंबेडकर, गांधी व पेरियार यांचे विचार सांगतात. जगातील व देशातील अनेक संदर्भ देतात. जातीयतेने जीर्ण होत चाललेलं आपलं सामाजिक वस्त्र कलात्मकरीत्या विणण्यासाठी, कृष्णा वाचकांना उभे व आडवे धागे दाखवत आहेत. डोळे, कान व मन  खुलं असणाऱ्या सुजाण लोकांनी कला जतन करण्यासाठी एकत्रित कृती करावी हा उद्देश घेऊन कृष्णा यांनी निबंधलेखन केलं आहे. विषयाची कळकळ, विश्लेषणाचं धैर्य व मांडणीतील प्रामाणिकपणा यामुळे ते वाचकांच्या मनाला थेट भिडतात. ‘रिशेपिंग आर्ट’ (कलेची पुनर्घडण- मराठी अनुवाद- शेखर देशमुख) या पुस्तकात ते लिहितात, ‘‘माझ्या आजवरच्या अनुभवांनी मला माझ्यामधील अपुरेपणा दाखवून दिला आहे. सभोवतालचे लोक, धर्म, संस्कृती, राजकारण यातून मी शिकत आलो आहे, स्थळ व प्रसंगानुसार मी कधी समन्वय तर कधी संघर्ष केला आहे. सतत काही शोधत राहणारा हा प्रवास आहे.’’ जात, वर्ग, लिंग व भाषा यांना ओलांडून उभ्या मानवजातीला आवाहन करणारी संगीत ही एक वैश्विक भाषा आहे. तिला समकालीन करण्यासाठी सर्व भेद मिटवून सर्वाना संगीत सौंदर्याचा आस्वाद घेता यावा, यासाठीच कृष्णा यांचा अट्टहास आहे.