प्रियदर्शिनी कर्वे
नव्याने स्वतंत्र झालेल्या आणि स्वत:चा शोध घेणाऱ्या भारताच्या शैक्षणिकसंशोधकीय जडणघडणीत इरावती कर्वे या विदुषीचे योगदान आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मानववंश विज्ञानातील त्यांचे काम याची जाणीव खरी संशोधक आणि अभ्यासकांपुरतीच मर्यादित. हिंदू म्हणजे काय, हिंदुत्व म्हणजे काय याबाबत अत्यंत उथळ आणि अत्यंत भीतीदायक अशा कल्पना रेटून बिंबवल्या जात असणाऱ्या आजच्या काळात ‘इरू : द रिमार्केबल लाइफ ऑफ इरावती कर्वे’ हे पुस्तक नुकतेच दाखल झाले आहे. महाराष्ट्राच्या आजच्या वास्तवाकडे पाहण्याची दृष्टी तयार करू शकणाऱ्या या ग्रंथाची ओळख…

डॉ. इरावती कर्वे यांच्याबद्दल आजच्या महाराष्ट्राला काय माहिती आहे?

त्यांच्याशी रक्ताचे नाते सांगणाऱ्या आम्ही सात नाती आहोत. बरेचदा काही समारंभांत किंवा कार्यक्रमांत कोणाला तरी आमचे नातेसंबंध माहीत असतात किंवा कोणीतरी विचारतात – ‘त्या इरावती कर्वे तुमच्या कोण?’ आणि मग मी सख्खी नात आहे हे कळल्यावर भारावून जातात. बरेचदा लोक खूप भरभरून महाभारतातील व्यक्तिरेखा आणि प्रसंग यांची आधुनिक विचारांच्या चष्म्यातून चिकित्सा करणाऱ्या ‘युगान्त’ या त्यांच्या पुस्तकाबद्दल बोलतात. पण या पुस्तकाचाही १९८०-९० पर्यंत लोकांना विसर पडलेला होता. त्याच्या प्रती बाजारात मिळतही नव्हत्या. दूरदर्शनवरील बी. आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ मालिकेनंतर या महाकाव्याशी संबंधित साहित्य लोक परत वाचू लागले व त्यातून ‘युगान्त’च्या नव्या आवृत्त्या आल्या.

loksatta editorial on ajit ranade marathi news,
अग्रलेख : ‘माहेर’चे मस्तवाल!
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Loksatta editorial on Gau rakshak killed Brahmin boy Aryan Mishra in Faridabad
अग्रलेख: वाद आणि दहशत
interest and curiosity while making a documentary
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : आस्था आणि कुतूहलासाठी…
Who was CPI(M) General Secretary Sitaram Yechury in marathi
अग्रलेख : उजवा डावा!
loksatta editorial on tax on medical insurance premium issued in gst council meeting
अग्रलेख: आणखी एक माघार…?
Prime Minister Narendra Modi visiting Ganapati puja at the home of Chief Justice of India Dhananjay Chandrachud
‘व्यक्तिगत’ पूजा- आरतीचे जाहीर प्रदर्शन झाल्यानंतर…
Loksatta editorial Loksatta editorial on Israel Hamas war akshay shinde Encounter
अग्रलेख: बुल्स इन चायना शॉप्स!

भेटणाऱ्या लोकांमध्ये क्वचित कोणी पुण्यातले जुने रहिवासी व वयस्क व्यक्ती असतील तर त्यांनी स्वत: लहानपणी पाहिलेल्या-ऐकलेल्या किश्श्यांची उजळणी होते- नवऱ्याला नावाने हाक मारणारी पहिली बाई किंवा पुण्यात स्कूटरवर फिरणारी पहिली बाई, इ. त्यांच्या ‘परिपूर्ती’ या लेखाचा संदर्भ देऊन या विदुषीने आईपणात आपल्या जीवनाची सार्थकता मानण्याने आपण कसे भारावून गेलो आहोत असे भक्तिभावाने सांगणारे तर खूप खूप लोक भेटतात. हा लेख औपरोधिक आहे, त्यांना खरे तर उलटेच म्हणायचे होते, हे सांगितल्याखेरीज मला राहवत नाही, आणि दरवेळी लोकांचे भारावलेपण हादरलेपणात बदललेले पाहावे लागते. बरेचदा भाषणाआधी किंवा मुलाखतीआधी माझी ओळख करून देण्याऐवजी माझी वंशावळ सांगून निवेदक व्यक्ती मला त्या लेखातील इरावती कर्वे यांच्या जागी आपणच आहोत की काय असे वाटायला लावते, ही आणखी एक वेगळीच गंमत असते. आता त्यांच्या निधनाला पन्नासहून वर्षे होऊन गेली असली तरी अजूनही एखादी बाई आपल्या स्वकर्तृत्वापेक्षा आपल्या कुटुंबातल्या पुरुषांशी असलेल्या आपल्या नात्यांना जास्त महत्त्व दिले जाण्याने कृतार्थ नाही तर अस्वस्थ होऊ शकते, हे लोकांच्या पचनी पडत नाही. त्यांनी लिखाणातून व्यक्त केलेल्या ‘एकेश्वरी’ पंथांच्या – म्हणजे एका व्यक्तीचे किंवा विचारधारेचे आंधळे भक्त होण्याच्या – वाढत्या प्रवृत्तीबद्दल व्यक्त केलेली चिंता आजचे वर्तमान पाहून मला सतत आठवत राहते. या साऱ्यातून आपली आजी किती काळाच्या पुढचा विचार करणारी होती हेही माझ्यासाठी पुन्हा पुन्हा अधोरेखित होते. मीच नाही, तर इरावती कर्वे यांच्या सर्वच नाती आणि आता पणत्याही हे सारे अनुभवत असतात. पण नव्याने स्वतंत्र झालेल्या व स्वत:चा शोध घेणाऱ्या भारताच्या शैक्षणिक-संशोधकीय जडणघडणीतले त्यांचे योगदान किंवा एकभाषिक आणि बहुसांस्कृतिक, पण तरीही काही समान धाग्यांनी एकत्र गुंफलेली अशी महाराष्ट्र राज्याची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात त्यांनी कळत-नकळत बजावलेली भूमिका. किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर मानववंश विज्ञानातील त्यांचे योगदान याबद्दल काही मोजके अभ्यासक व त्यांच्या विषयात काम करणाऱ्या संशोधकांखेरीज इतरांना फार माहिती आहे असे दिसत नाही. दर दोन-पाच वर्षांनी त्यांच्या साहित्यावर किंवा शैक्षणिक क्षेत्रातील कामावर पीएच.डी करणारे कोणीकोणी त्यांच्या मुलाची- आनंद कर्वे यांची मुलाखत घ्यायला येतात, पण त्यांच्या अभ्यासाचा आवाका इरावती कर्वे यांच्या बहुआयामी योगदानातल्या एखाद्याच अंगापुरता मर्यादित असतो.

हेही वाचा : भयकथांचा भगीरथ…

पुण्यात नळस्टॉपजवळ मेट्रोच्या खांबांवर पुण्याच्या इतिहासात भरीव कामगिरी केलेल्या काही महिलांची चित्रे व माहिती लावण्यात आली आहे. त्यात इरावती कर्वे यांना अगदी भर चौकातच स्थान देण्यात आले आहे, हा आम्हा सर्वच कुटुंबीयांसाठी एक आश्चर्याचा धक्काच होता. अर्थात, यामागे त्यांच्या कर्तृत्वाची काही जाणीव आहे की महर्षी कर्वे यांचे नाव असलेल्या रस्त्यावर त्यांच्या कुटुंबातील कर्तबगार बाईला मानाचे स्थान द्यायला हवे, असा विचार आहे (पुन्हा एकदा परिपूर्तीची आठवण!), कोण जाणे. कारण काही का असेना, यामुळे आणखी काही वर्षांसाठी त्यांचे नाव तरी लोकांच्या आठवणीत राहील, असे रोज या चौकातून जाताना माझ्या मनात येत असते.

या पार्श्वभूमीवर इंग्रजी भाषेत ‘इरू द रिमार्केबल लाइफ ऑफ इरावती कर्वे’ हे त्यांच्या जीवनावरील पुस्तक प्रसिद्ध होणे ही खूप महत्त्वाची घटना आहे. विशेषत: हिंदू म्हणजे काय, हिंदुत्व म्हणजे काय याच्या एकाच वेळी अत्यंत उथळ आणि अत्यंत भीतीदायक अशा कल्पना रेटून बिंबवल्या जात असल्याच्या काळात या विषयावर वस्तुनिष्ठ भूमिकेतून काही मूलभूत अभ्यास व चिंतन करणाऱ्या व्यक्तीच्या योगदानावर प्रकाश टाकला जाणे आवश्यक होते.

या पुस्तकाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे लेखक. त्यापैकी एक आहेत इरावती कर्वे यांची नात व इंग्रजी भाषेत ललित लेखन करणाऱ्या ऊर्मिला देशपांडे तर दुसरे आहेत मानववंशशास्त्रज्ञ व इरावती कर्वे यांच्या वैज्ञानिक योगदानाच्या ऐतिहासिक-सामाजिक पैलूंचे आंतरराष्ट्रीय अभ्यासक थियागो पिंटो बार्बोसा.

एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीबद्दल त्याच्या कुटुंबातील कोणी लिहिते तेव्हा त्यात दोन शक्यता असतात. एक म्हणजे लिहिणारी व्यक्ती फारच भक्तिभावाने लिहिते आणि त्यामुळे वाचणाऱ्यांना काहीच नवीन हाती लागत नाही. दुसरे म्हणजे कधी कधी नात्यातला लेखक फारच प्रामाणिक कथन करतो! कोणत्याही माणसाचे सार्वजनिक व्यक्तिमत्त्व आणि खासगी व्यक्तिमत्त्व यांत फरक असतोच. प्रसिद्ध व्यक्तीच्या बाबतीत घरातल्या लेखकाच्या कथनात दोन्ही व्यक्तिमत्त्वांची झलक प्रतिबिंबित होते. यातून खरे तर त्या प्रसिद्ध व्यक्तीचे माणूसपण अधोरेखित होत असते, पण काही वाचकांच्या मनात प्रतिमाभंजन होऊन आपण फसलो असे त्यांना वाटू शकते.

जेव्हा प्रसिद्ध व्यक्तीवरील लेखन हे एखाद्या अकादमिक अभ्यासकाच्या प्रबंधाचा परिपाक म्हणून येते तेव्हाही एक धोका असतो. प्रबंधाचे परीक्षण अभ्यासासाठी निवडलेल्या व्यक्तीच्या कर्तृत्वावर ठरत नाही, तर त्या कर्तृत्वाचे मूल्यमापन करताना अभ्यासकाने आपल्या विद्वत्तेचे किती प्रदर्शन केले आहे यावर ठरत असते. त्यामुळे मग अभ्यासाचे लक्ष्य असलेल्या व्यक्तीच्या लेखन-कथन-वर्तन यांचे वेगवेगळे अन्वयार्थ लावण्यासाठी बौद्धिक कोलांटउड्या मारणे अभ्यासकासाठी अनिवार्य ठरते. यातून अभ्यासविषय असलेल्या व्यक्तीचे कर्तृत्व झाकोळले जाऊ शकते.

हेही वाचा : आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : आकाशपाळण्यातील धाडस..

कुटुंबातील व्यक्ती आणि अभ्यासक अशा दोघांनी मिळून लिहिले तर? ऊर्मिला देशपांडे आणि थियागो पिंटो बार्बोसा यांनी हेच केले आहे. ‘स्पीकिंग टायगर’ या प्रकाशन संस्थेने त्यांचे ‘इरू द रिमार्केबल लाइफ ऑफ इरावती कर्वे’ हे २६० पानी पुस्तक प्रसिद्ध केले आहे. पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणात दोघा लेखकांनी आपल्या लेखनप्रक्रियेवरही संभाषणात्मक भाष्य केले आहे. त्यातून हे पुस्तक लिहिण्यामागील दोघांच्या स्वतंत्र, पण परस्परपूरक प्रेरणांवरही प्रकाश पडतो. मला वाटतं, दोन्ही लेखक स्वत: आतंरराष्ट्रीय परिप्रेक्ष्यात राहणारे-वावरणारे असल्यानेही या पुस्तकाच्या मूल्यात भर पडली आहे. केवळ महाराष्ट्रातील किंवा भारतातीलच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय वाचकालाही या पुस्तकातून खूप काही हाती लागेल.

इरावती कर्वे यांचा जन्म विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा व त्यांचे निधन त्याच शतकाच्या उत्तरार्धात झाले. ही साठ-सत्तर वर्षे म्हणजे जागतिक इतिहासात अनेक घडामोडींनी भरलेला व आजच्या जगाचा पाया रचणारा काळ होता. याच काळात दोन महायुद्धे झाली आणि भारतासह इतर अनेक नवे देशही जन्मले. या नाट्यमय घडामोडींनी भरलेल्या काळात सर्वसामान्य मराठी उच्चजातीय स्त्रियांच्या तुलनेत अतिशय वेगळे बालपण इरावती कर्वे यांच्या वाट्याला आले. ब्रह्मदेशात जन्म, मग पुण्यात रॅंग्लर परांजपे यांच्या निरीश्वरवादी व पुरोगामी कुटुंबात लहानाचे मोठे होण्याची संधी हे निव्वळ योगायोग होते. पण सुधारणावादी व स्त्रीशिक्षणाचे महत्त्व जाणणाऱ्या कुटुंबात आपला जोडीदार शोधणे, या जोडीदाराच्या पाठिंब्याने इतर कुटुंबीयांच्या मताविरुद्ध परक्या देशात एकट्याने जाऊन एका अनवट विषयात उच्च शिक्षण घेणे… आपल्या घरात त्या काळच्या सामाजिक धारणांच्या तुलनेने फारच बंडखोरीचे समजले जाईल असे वातावरण आपल्या जोडीदाराबरोबर तयार करून, त्या धारणांनुसार मुलांना वाढवणे, एरवी त्या काळातील सुशिक्षित स्त्रिया ज्या प्रकारच्या कामात पडण्याचा विचारही करू शकत नव्हत्या अशा क्षेत्रात संस्थांच्या पायाभरणीपासून ते जागतिक दर्जाच्या संशोधनापर्यंत व्यापक योगदान देणे… या साऱ्यामध्ये त्यांनी जाणीवपूर्वक घेतलेल्या निर्णयांचा वाटा फार मोठा होता. दुर्दैवाने हृदयविकारामुळे त्यांना अकालीच मरण आले. त्या आणखी दहा-वीस वर्षे जगल्या असत्या तर त्यांच्या कर्तबगारीने आणखी नवी शिखरे गाठली असती… आणि कदाचित त्यांनी स्वत:चे आत्मचरित्रही लिहिले असते.

इरावती कर्वे यांनी मराठीत जे ललित लेखन केले आहे ते बऱ्याच अंशी आत्मचरित्रात्मक आहे. लेखकद्वयीने अर्थातच त्यांच्या मानववंशशास्त्रविषयक लिखाणाबरोबरच त्यांच्या ललित लिखाणाचा बऱ्यापैकी आधार घेतला आहे. त्याशिवाय त्यांची मुले, सहकारी, इतर आप्तेष्ट, इ.कडून त्यांच्या आठवणीही गोळा केल्या आहेत. या साऱ्यामुळे आणि त्यांचा अल्प का होईना, पण सहवास लाभलेली आणि स्वत:च्या आईकडून त्यांच्याबद्दल वेळोवेळी ऐकलेली त्यांची नात या लेखकद्वयीचा भाग असल्यामुळे, इरावती कर्वे यांच्या ललित लेखनात न आलेल्या त्यांच्या आयुष्यातल्या काही महत्त्वाच्या घटना व त्या घटनांप्रसंगी प्रकट होणारे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध कंगोरे या पुस्तकातून पुढे आले आहेत. नाझीवादाच्या उदयाच्या थोडेसेच आधी, पुढे जाऊन नाझीवादाला वैज्ञानिकतेचा मुलामा जे देणार होते अशा व्यक्तीच्या हाताखाली, जर्मनीत पीएच.डी करताना त्यांना कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागले, त्याला त्या कशा सामोऱ्या गेल्या हे सारे केवळ त्यांच्या ललित लेखनाशी किंवा भारतात केलेल्या संशोधनाशी परिचित असणाऱ्यांसाठीही नवीन असेल.

हेही वाचा : भयकथा म्हणजे…

हे पुस्तक मी केवळ दोन बैठकींत वाचून संपवले. कदाचित दोन वेगळ्या उद्दिष्टांनी या लेखनाकडे पाहणारे दोन लेखक एकत्र आल्याने असेल, पण पुस्तक वाचताना त्यात दोन स्वतंत्र शैलींची सरमिसळ झाली आहे. काही भागांत अत्यंत ओघवत्या शैलीत ललित लेखनाच्या अंगाने इरूच्या आयुष्यातल्या काही महत्त्वाच्या घडामोडींवर प्रकाश टाकलेला आहे. त्यात संशोधनातून गोळा केलेली माहिती आणि इरावती कर्वे यांनी स्वत: वर्णन केलेले प्रसंग व त्या त्या वेळचे त्यांचे विचार व मानसिक अवस्था हे सारे एकत्रितरीत्या अत्यंत रंजक गोष्टी रूपाने पुढे येते. पुस्तक खाली ठेवणे मुश्कील होईल असा हा भाग जुळून आला आहे. याच शैलीत सर्व पुस्तक आले असते तर जास्त चांगले झाले असते असे वाटले.

काही प्रकरणांमध्ये त्यांच्या लेखनातील संदर्भ देऊन स्त्रीवाद, धर्म, महाराष्ट्राची प्रादेशिकता, इ. विषयांवर असलेल्या त्यांच्या भूमिका स्वतंत्रपणे उलगडून दाखवलेल्या आहेत. त्यांच्या मुलांच्या आणि सहकाऱ्यांच्या त्यांच्याबद्दलच्या आठवणी वेगळ्या मांडल्या आहेत. या साऱ्यातूनही इरावती कर्वे यांच्या विचारसरणीवर व व्यक्तिमत्त्वावर प्रकाश पडतो. ही अभ्यासपूर्ण विश्लेषणेही रसाळ भाषेत आहेत आणि हा भागही अत्यंत वाचनीय निश्चितच आहे. पण या शैलींच्या सरमिसळीमुळे किंचित रसभंगही होतो. चरित्र आणि व्यक्तिचित्रण या दोन्हींपैकी नेमके कोणत्या दिशेने जावे असा काहीसा संभ्रम दोन लेखकांमध्ये आहे का असे वाटते. पण ही अल्पशी त्रुटी सोडली तरी इरावती कर्वे हे नाव माहीत असलेल्या आणि नसलेल्या सर्वांनी हे पुस्तक जरूर वाचायला हवे. त्यातून महाराष्ट्राच्या आजच्या वास्तवाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी वाचकांना निश्चितच मिळणार आहे. या पुस्तकाचा मराठी भाषेत चांगला अनुवाद येणेही फार आवश्यक आहे.

इरावती कर्वे यांनी ‘युगान्त’मध्ये रंगवलेल्या महाभारतातील स्त्रियांच्या व्यक्तिचित्रणांवरून प्रेरणा घेऊन अनेक भाषांमध्ये नाटककार, कादंबरीकार व इतर कलाविष्कारींनी या महाभारतकालीन स्त्रियांवर प्रभावी सादरीकरणे केली आहेत. ‘इरू : द रिमार्केबल लाइफ ऑफ इरावती कर्वे’ या पुस्तकापासून प्रेरणा घेऊन इरावती कर्वे यांच्याच जीवनावरील असे आविष्कार पुढच्या काही वर्षांत केले गेले तर मला अजिबात नवल वाटणार नाही!
pkarve@samuchit.com