दिल्लीला असताना एकदा दूरदर्शन केंद्रावर गेले होते. म्हणजे तसे अजून दूरदर्शन सुरू झालेले नव्हते. आठवडय़ातून दोन-तीनदा दिवसाचे काही तास शालेय कार्यक्रम सादर होत. पार्लमेंट स्ट्रीटवर ‘आकाशवाणी भवन’मध्ये पाचव्या मजल्यावर एक नखाएवढा स्टुडिओ होता. भारतात दूरदर्शन ‘येणार, येणार’ अशी दाट हवा होती. देश त्याची वाट पाहत होता. पद्धतशीर रीतीने शालेय कार्यक्रम राबवून जणू त्याची रंगीत तालीम सुरू होती. टेलिव्हिजनच्या तयारीसाठी कार्यमग्न असलेल्यांमध्ये पु. ल. देशपांडे हे अध्वर्यु होते. मी त्यावेळी दूरदर्शन छावणीत (अजून ते ‘केन्द्र’ झाले नव्हते.) का आणि कशासाठी गेले होते, हे आता आठवत नाही, पण पुलंनी स्वत: मला ‘गाइडेड टूर’ दिली, हे चांगलेच स्मरते. स्टुडिओ, कंट्रोल रूम, रेकॉर्डिग पॅनेल, कॅमेरे, इ. दाखवून प्रत्येकाचे तांत्रिक कार्य त्यांनी मला समजावून सांगितले. त्या छोटेखानी कार्यक्षेत्रात मोठी चळवळ सुरू होती. दूरदर्शनचा आगामी संसार नेटका व्हावा यासाठी सर्वजण झटत होते. उत्साहाला जणू उधाण आले होते. मी हरखून गेले. या भावी अभियानामध्ये आपलाही सहभाग असणार आहे याची पुसटशीसुद्धा कल्पना तेव्हा मला नव्हती.
कालांतराने दूरदर्शनच्या या योजनेस मूर्त स्वरूप देण्याची वेळ येऊन ठेपली. प्रोडय़ूसरच्या जागेसाठी मी अर्ज केला आणि सुदैवाने माझी निवड झाली. गाशा गुंडाळून मी पुणे सोडले आणि छोटय़ा विनीला घेऊन दिल्लीला आले. अरुणचे राष्ट्रीय नाटय़विद्यालयात तिसरे.. शेवटचे वर्ष चालू होते, तेव्हा आमचा गृहस्थाश्रम पुन्हा सुरू झाला.
मी आकाशवाणी भवनमध्ये दाखल झाले. अद्यापि त्या छोटेखानी स्टुडिओतूनच काम चालत होते. आम्ही सहाजण दूरदर्शनचे पहिले शिलेदार होतो : प्रख्यात नाटय़कर्मी हबीब तन्वीर, शमा झैदी, पी. कुमार, ए. प्रताप, स्वदेशकुमार आणि मी. कुणालाच टेलिव्हिजनचा प्रत्यक्ष अनुभव नव्हता. आम्हाला शिकवायला हम्फ्री वॉरन हे बी. बी. सी.चे एक नामवंत तज्ज्ञ आले होते. अतिशय रोचक पद्धतीने ते शिकवत. तीन महिन्यांचा कोर्स होता. पाहता पाहता टेलिव्हिजनचे गौडबंगाल आम्हाला आकलन होऊ लागले. त्याकाळी घराघरांवर अँटेनाच्या शेंडय़ा नव्हत्या. घरी टी. व्ही. सेट असणे हे दुर्मीळ होते. रस्त्याने जाणारे-येणारे बोट दाखवून ‘या घरात टी. व्ही. आहे,’ असे मोठय़ा अदबीने सांगत. आमच्या दोस्तांकडे- पेंढरकरांकडे नव्या कौतुकाचा टी. व्ही. सेट आणलेला होता. दोघे स्वभावाने अतिशय आतिथ्यशील होते. टी. व्ही.वर चांगला कार्यक्रम (म्हणजे ‘चित्रहार’ हा फिल्मी गाण्यांचा गुलदस्ता!) असला, की त्यांच्या घरी गर्दी उसळत असे. जरा घसट असलेले लोक सरळ दिवाणखान्यात, तर अनोळखी शौकीन दाराबाहेर उभे राहून किंवा खिडकीतून डोकावून दूरदर्शनवरील कार्यक्रम पाहत असत. कौतुकाचा हा सोहळा नंतर नंतर वैतागवाणा वाटू लागला. ‘कुठून ही ब्याद आणली!’ असे निर्मल म्हणू लागली. सुदैवाने टी. व्ही.वाल्यांची संख्या झपाटय़ाने वाढली आणि त्याची नवी नवलाई लवकरच कमी झाली.
कोर्स संपला आणि आम्हा प्रत्येकाला एकेक वीस मिनिटांचा कार्यक्रम तयार करावा लागला. एक प्रकारची परीक्षाच होती. मी एक एकांकिका बसवली. ती फारच रटाळ ठरली आणि मी माझ्या सहकाऱ्यांच्या टिंगलीचा विषय बनले. माझा आत्मविश्वास डळमळला. तो सावरायला पुष्कळ वेळ लागला. आकाशवाणी, बालरंगभूमी आणि फिल्म इन्स्टिटय़ूटमध्ये मानाने वावरल्यानंतर हा पराभव पत्करायला जडच गेलं. पण गरीब गाय बनून (हा एक ‘अनोखा अनुभव’) मी दिले काम निमूटपणे करीत राहिले.
अखेर रणांगणात उतरण्याची वेळ येऊन ठेपली. शेजारच्या इमारतीमध्ये आता मोठा सुसज्ज स्टुडिओ तयार झाला होता. जिथून प्रत्यक्ष कार्यक्रम प्रसारित होणार, तो हॉल लखलखत होता. जणू एक नवा इतिहास घडविण्याची तो आतुरतेने वाट पाहत होता. फ्लोअरवर तीन कॅमेरे दृश्य टिपण्यासाठी सज्ज होते; तर एक कॅमेरा केवळ लिखित मजकूर, नामावली तक्ते, फोटो, सूचना, रेखाकृती इ. नोंदविण्यासाठी तयारीत उभा होता. छतावरून सोडलेल्या सक्षम दिव्यांच्या रांगा प्रकाश पाडण्यासाठी सावधान होत्या. सेट उभारण्यासाठी मोकळीढाकळी जागा होती. स्टुडिओमध्ये घडणाऱ्या घडामोडींचे नियंत्रण करणारा कारभारी म्हणजे ‘फ्लोअर मॅनेजर’! प्रोडय़ूसरचे काम आत कंट्रोल पॅनेलवर. स्टुडिओलगतच त्याचा कंट्रोल बूथ असे. काचेच्या तावदानातून फ्लोअरवर घडणारा सर्व देखावा त्याला दिसे. पण प्रत्यक्ष संपर्क फक्त फ्लोअर मॅनेजर आणि कॅमेरामेन यांच्याशीच काय तो साधायचा असे.. माइक आणि हेडफोनद्वारा! प्रत्येक कॅमेराने नेमका काय शॉट घ्यायचा आहे, ते प्रोडय़ूसरने आतून सांगायचे असते. छोटय़ा मॉनिटर्सवरून प्रत्येक शॉटची प्रतिमा दिसते. ती दृश्ये सतत बदलती राहिली पाहिजेत. शेजारी इंजिनीयर बसलेला असतो. प्रत्यक्ष फेडर वर-खाली तो करणार. तांत्रिक बाजू तोच सांभाळणार. सगळ्यांची कामे चोख वाटून दिलेली असतात. प्रोडय़ूसरला सतत दक्ष राहावे लागते. डोके थंड ठेवून भराभर पुढच्या गोष्टीचा विचार करून त्याप्रमाणे सूचनांचा भडिमार चालू ठेवावा लागतो. अशा सिलसिल्याचे एक काल्पनिक उदाहरण :
प्रोडय़ूसर : रेडी टु गो! तयार? ‘क्यू’ नाना. कॅमेरा वन- नानांचा क्लोझअप्. अजून टाइट. अजून. हां, ठीक. कॅमेरा टू- नानांच्या हातातल्या पार्सलवर जा. झूम इन् ऑन द पार्सल. कॅमेरा थ्री- बी ऑन द डोअर. बी रेडी फॉर कमला’ज एंट्री. बोस दा (फ्लोअर मॅनेजरचे नाव), ‘क्यू’ कमला. कॅमेरा थ्री- फॉलो हर. वन् ऑन हर क्लोझअप्. टू लाँग शॉट ऑफ द रूम.. वगैरे.
कार्यक्रमाचे आगाऊ मुद्रण (रेकॉर्डिंग) करायचे असेल तर ठीकच आहे. चूक सुधारायला वाव असतो. रीटेक करता येतो. पण जर का कार्यक्रम ‘लाइव्ह’.. म्हणजे ‘प्रत्यक्ष’ प्रसारित होत असेल तर मोठी बिकट जबाबदारी पेलावी लागते. तारेवरची कसरतच. तीर एकदा सुटला की सुटला. प्रत्येक कार्यक्रम ‘वैऱ्याची रात्र’ भासत असे. अजूनही मला कधी कधी स्वप्न पडते. मी पॅनेलवर आहे आणि माइक थंड पडला आहे. स्टुडिओशी संपर्क तुटला आहे. तावदानाच्या पलीकडून फ्लोअर मॅनेजर, कॅमेरामेन आणि नट मंडळी हवालदिल होऊन हातवारे करताहेत.. ‘आता काय? आता काय?’
विमा कंपन्या टी. व्ही. प्रोडय़ूसरला अतिशय कमी दराने जीवनविमा देऊ करतात, ते उगीच नाही.
काम करायला मी दबकत दबकतच सुरुवात केली. शत्रूवत वाटणारे कॅमेरे हळूहळू दोस्त वाटू लागले. अचानक एके दिवशी माझा एक कार्यक्रम गाजला. दर्शक आणि समीक्षक- दोघांनीही दाद दिली. कार्यक्रम होता ‘सुवर्णबंधन.. दिल्ली दूरदर्शन के दादा-दादी.’ थोडक्यात म्हणजे, ज्यांच्या लग्नाला ५० वर्षे झाली आहेत अशा जोडप्यांची ही स्पर्धा होती. पुरेशी जोडपी सापडतील का, याची आम्हाला चिंता होती. पण ३०० हून अधिक अर्ज आले. एक-दोन प्राथमिक चाचण्यांमधून स्पर्धक निवडत निवडत शेवटी सुयोग्य अशी १५ जोडय़ांची आम्ही अंतिम फेरीसाठी निवड केली. त्यातली काही वयोपरत्वे उद्भवलेल्या तक्रारींमुळे पोहोचू शकली नाहीत. आधीच गळाली. पण जे जे जोडीदार उतरले, त्यांनी आपल्या हजरजबाबीपणाने आणि मार्मिक उत्तरांमुळे कार्यक्रमाला बहार आणली. आपल्या सुखी संसाराचे रहस्य सांगताना एक आजी म्हणाल्या, ‘‘मी ह्य़ांना कधीच ‘नाही’ म्हटलं नाही; पण कायम आपल्याला हवं तेच करीत आले.’’ यावर आजोबा हसून म्हणाले, ‘‘असं का? आता उद्यापासून बघतो.’’ आणखी एक बुजुर्ग म्हणाले, ‘‘आमच्या यशस्वी वाटचालीचं रहस्य आहे- एक प्याली चहा! गेली ५० वर्षे मी नेमाने सकाळी उठून, चहा करून गरम गरम पेला तिला बिछान्यातच नेऊन देतो. मग पुढे दिवसभर ती माझं कौतुक करते.’’ विजेत्या जोडप्याचा कानमंत्र होता की, ‘दिवसा कितीही कडाक्याचे भांडण झाले, तरी ते दुसऱ्या दिवसापर्यंत लोळवत न्यायचे नाही. ते मिटवून मगच झोपायचे!’ या अशा उत्स्फूर्त उद्गारांमुळे कार्यक्रम खूप रंगला आणि माझा भाव वधारला.
मी एकूण आठ वर्षे दिल्ली दूरदर्शनमध्ये नोकरी केली. बातम्या आणि कृषिदर्शन सोडल्यास बाकी सर्व विभाग मी कधी ना कधी सांभाळले असं म्हणता येईल. बायकांचे आणि मुलांचे कार्यक्रम, क्विझ, टेलिनाटके, लघुपट, चर्चासत्रे, विशेष दिन प्रसारण, मुलाखती, संगीत सभा, कला परामर्श, सांस्कृतिक झलक, चित्रपट तथा नाटय़समीक्षण आणि मीच सुरू केलेला विविध रंजनाचा ‘पिटारा’.. अशी जंत्री सांगता येईल. बहुत पापड बेले!
बायकांच्या कार्यक्रमांत पाककृती, गृहोपयोगी सूचना, संसारोपयोगी कानमंत्र, फॅशन, मिताहार, वेणीफणी, बालसंगोपन, छंद, कलाकृती, बचत मंत्र या नित्याच्या अपेक्षित उपक्रमांखेरीज थोडी वेगळी गंमत करण्याचा मी प्रयत्न करीत असे. एका प्रकल्पाचा मथळा होता- ‘चार चाकांवर स्वार बाईसाहेब!’ त्याकाळी कमी बायका गाडी चालवीत. तेव्हा महिला ड्रायव्हर्सच्या समस्या, त्यांचे अनुभव, त्यांचे विक्रम इत्यादीचा आढावा घेणारा एक ‘व्रात्यपट’ आम्ही बनवला. एक वयस्कर शीख गॅरेज वर्कशॉपचे मालक तावातावाने बोलले, ‘‘बायका ड्रायव्हर केव्हाही श्रेष्ठ! गाडी जरा कुठे बंद पडली की आम्हाला लगेच फोन करणार.. ‘सरदारजी, साडी गड्डी पंडारा रोड ते बंद हो गईये. तुशी छेती छेती आओ.’ पण पुरुष ड्रायव्हर अतिशहाणे! आधी स्वत: इंजिन खोलून नको ती खटपट करणार, आणि मामला हाताबाहेर गेला की मगच आम्हाला पाचारण करणार. तोपर्यंत गाडीची पुरती वाट लागलेली असते.’’
याच कार्यक्रमासाठी घेतलेली माझ्या एका मैत्रिणीची मुलाखत अविस्मरणीय आहे. भारत-चीन लढाईच्या वेळी ती होमगार्डमध्ये होती. तिची एकूण तडफ पाहून जनरल माणेकशॉ फार प्रभावित झाले होते. त्या काळात तेजपूरला नेमाने अ‍ॅम्ब्युलन्स चालवून तिने मोठीच कामगिरी केली. एवढेच नव्हे तर एकदा मुंबईला बेस्टचा संप चालू असताना तिने डबल डेकर बस चालवली होती. माणिक (कालिंदी) ही प्रसिद्ध नाटककार गो. पु. देशपांडे यांची पत्नी. तिला मोटारची इंजिनपासून सगळी माहिती होती. तिची मी मुलाखत घेतली ती, ती ऐन गाडीचे चाक बदलताना. सराईतपणे चाकाचे स्क्रू काढणे-  बसवणे चालू ठेवून मोठय़ा ऐटीत खांद्यावर मागे वळून पाहत तिने कॅमेऱ्याबरोबर मनमोकळी बातचीत केली. वा!
आपली मराठी मंगळागौरही आम्ही दिल्लीकरांना दाखवली. प्रांताप्रांतांमधले खास खाद्यपदार्थ पेश करणारा प्रोगॅ्रम विशेष लोकप्रिय होता. कार्यक्रम संपल्या संपल्या ‘आजच्या ताज्या पदार्था’वर स्टुडिओमधल्या खवय्यांची टोळधाड तुटून पडत असे. दोन मिनिटांपूर्वी घरोघर झळकलेल्या मिष्टान्नाचा क्षणात फडशा पडे.
मुलांचा कार्यक्रम करायला मला काहीच अडचण पडली नाही. कारण ‘बालोद्यान’ आणि ‘बालरंगभूमी’तून माझी भरपूर रंगीत तालीम झालेली होती. एका गाजलेल्या आणि एका फसलेल्या प्रयोगाची गोष्ट नमूद करते. श्रमजीवी वर्गामधल्या बाळांची आरोग्यस्पर्धा. एक वर्षांपर्यंतच्या मुलांना स्पर्धेत भाग घेता येत होता. कार्यक्रमाच्या दिवशी दूरदर्शनचा स्टुडिओच काय, पण अवघा परिसर शेकडो बालकांनी फुलला होता.
प्रोडय़ूसरला फारसं काहीच करायचं नव्हतं. एकेका बछडय़ाचा ‘मिलियन डॉलर’ क्लोझअप् दाखवत सुटायचं. बस्स! या छोटय़ांनी आमच्यासाठी ‘गुडविल अ‍ॅम्बॅसेडर्स’चं प्रचंड काम केलं. तर हा साधलेला कार्यक्रम. फसलेला प्रयत्न असा : एकूण वेगवेगळ्या प्रसंगी कसे वागावे, हे लहान मुलांच्या गळी उतरवायला एका गंमतपटाची आम्ही शक्कल काढली. ‘पपली आणि पप्पू’ हे बहीण-भाऊ योजले. वय वर्षे सात आणि पाच. पपली शहाणी. पपलू वेडा. एकेका दिवशीची त्या दोघांची एका विशिष्ट प्रसंगामधली वागणूक चित्रित करायची. उदा. जेवावे कसे? जेवायच्या टेबलावर बसून पपली छान व्यवस्थित जेवण करते. इतरांना हवं-नको विचारते. पप्पू सांडासांड करतो. मचमच आवाज करतो. हात बरबटवतो. तोंड माखतो. उष्टय़ा हाताने पाण्याचा जग उचलतो. पार्कामध्ये पपली सुज्ञपणे वावरते. रांगेत उभी राहते. पप्पू दांडगाई करतो. फुलं तोडतो. टरफलं इकडे तिकडे टाकतो. ढकलाढकली करतो.. इ. गंमत अशी की, मालिकेचे तीन-चार भाग दाखवेपर्यंत पालकांच्या तक्रारी येऊ लागल्या- ‘आमच्या मुलांना पप्पूसारखं व्हायचं आहे. त्यांना तोच आवडतो.’ आम्ही तत्काळ पपली-पप्पूला रजा दिली.
‘पिटारा’ हा तऱ्हेतऱ्हेच्या करमणूकप्रधान प्रस्तुतींचा एक खजिना होता. दर खेपेला सुमारे दहा मिनिटांचा एक विक्षिप्त लघुपट त्यासाठी मुद्दाम बनवला जाई. त्यातला एक लघुपट आजही आठवतो. जनावरांचे, पक्ष्यांचे तऱ्हेतऱ्हेचे शॉट्स आम्ही एकत्र गुंफले होते. म्हशी नदीत डुंबून बाहेर पडताहेत, कावळे झाडावर बसले आहेत, बकऱ्या बागडताहेत, इत्यादी. या देखाव्यांवर आम्ही माणसांचे अनुरूप संवाद ‘डब’ केले. म्हशी कुठल्या ब्यूटी पार्लरमध्ये ‘फेशियल’ छान करतात त्याची चर्चा करताहेत. कावळे घराच्या ‘कारपेट एरिया’ची चौकशी करताहेत. वेगवेगळ्या जातींच्या कुत्र्यांच्या जमावात एक अ‍ॅल्सेशियन ‘जातिभेद निर्मूलन’ या विषयावर भाषण करतो आहे. पिंजऱ्यामधल्या दोन छोटय़ा पक्ष्यांच्या शॉटवर ‘हम तुम एक कमरे में बंद हो’ या लोकप्रिय गाण्याचे पाश्र्वगीत टाकून कार्यक्रमाची सांगता केली होती. पिटाऱ्यामध्ये अनेक हुरहुन्नरी कलाकार चमकले. वंदना खांडेकर (भोळे) तेव्हा दिल्लीत होती. लोभस व्यक्तिमत्त्व, उत्कृष्ट गाणे आणि सहज अभिनय याची देण असलेली वंदना आमची हुकमी कलाकार होती.
‘पिटारा’च्या यशाबरोबर माझा लुप्त झालेला आत्मविश्वास बळावला. आता आम्ही चौघेच प्रोडय़ूसर उरलो होतो. हबीब तन्वीर आणि शमा झैदी दोघे नोकरी सोडून निघून गेले होते. आम्ही सगळे प्रथमपासून ‘ग्रेड बी’ प्रोडय़ूसर होतो. ही ग्रेड का आणि कशी ठरली, कोण जाणे. पण एवढे मात्र खरे, की कितीही तीर मारला, तरी बढतीची बात नव्हती. काही विचारले की, ‘सरकारी नियम’ असे साचेबंद उत्तर मिळे. ग्रेड ‘बी’चा ‘ए’ होण्याचे चिन्ह दिसेना. साहजिकच आम्ही सारे निराश, निरुत्साही झालो होतो. मधूनमधून आम्ही वरिष्ठांकडे आलटूनपालटून विनवण्या आणि तक्रारी करीत होतो. व्यर्थ! कपाळावर ‘बी ग्रेड’ हा टिळा लावून आम्ही काम चालू ठेवले.
माहिती आणि नभोवाणी खात्याचे नवे सचिव म्हणून नुकतेच जमाल किडवाई रुजू झाले होते. एके दिवशी, आधी न कळवता, ते दूरदर्शनला भेट द्यायला उगवले. माझे काही रेकॉर्डिग चालू होते. मी पॅनलवर बसले होते. हाताची घडी घालून शांतपणे सर्व सोपस्कार पाहत किडवाई मागे उभे होते.
माझे काम आटोपल्यावर त्यांनी माझी चौकशी केली. नाव-गाव सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘मी पुण्याच्या फग्र्युसन कॉलेजमध्ये शिकलो. सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि गणिती डॉ. आर. पी. परांजपे हे माझे प्रिन्सिपल होते.. ते तुझे कोण?’’
‘‘ते माझे आजोबा.’’ मी अभिमानाने सांगितले.
‘‘अस्सं!’’ गंभीरपणाचा आव आणून किडवाई उद्गारले, ‘‘तुला माहीत नसेल, पण कॉलेजच्या नियमांविरुद्ध विद्यार्थी चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांनी मला रस्टिकेट केले होते!’’
‘‘मग सर, मला नोकरीवरून काढून टाकून तुम्ही त्याचा बदला तर नाही घेणार ना?’’
माझ्या या काहीशा आगाऊ उत्तरामुळे भोवतालची सर्व मंडळी चपापली. पण खुद्द किडवाई गडगडाटी हसले.
त्यांनी मला काढून तर टाकले नाहीच; पण त्यांच्यात मिनिस्ट्रीत मोडत असलेल्या ‘बाल चित्र समिती’मध्ये (Children’s Film Society) ‘प्रमुख प्रोडय़ूसर’ म्हणून त्यांनी माझी बढतीवर बदली केली. माझ्या या नव्या नेमणुकीमुळे माझ्या सहकाऱ्यांमध्ये थोडी कुरबुर झाली. गाईची आता ‘वाघीण’ झाली होती. (भाग १)