सक्काळी सक्काळी उठावे. स्वत:स साबूने स्वच्छ धुवावे. शुचिर्भूत व्हावे. नवी कापडे चढवावीत. दोन लाडू हाणावेत. कोपभर चहा प्यावा. मग दारी यावे. तेथे लयदार रंगावलीवर लवलवत असलेल्या इवल्याशा पणतीवर हातातला फुलबाजा पेटवावा. तो असा गोलगोल फिरवावा आणि त्यातून झडणाऱ्या त्या शुभ्र चांदणफुलांकडे पाहात मस्तपकी गाणे म्हणावे –
दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी
गाई म्हशी कुणाच्या? लक्षुमणाच्या..
लक्षुमण कुणाचा? आईबापाचा..
बाळपणी काळ सुखाचा होता, तेव्हापासून आमुची दिवाळी पहाट ही अशी सांस्कृतिक उगवते. आज तेवढंसं होत नाही. म्हणजे मुदलात आज सक्काळी सक्काळी उठवतच नाही. उठलो तरी दोन लाडू खाण्याची धमक अंगी राहिलेली नाही. आणि काळ असा आला आहे, की सुरसुऱ्या अन् तडतडय़ांतून उडणारी चांदणफुले आणि वेिल्डग करताना उडणाऱ्या ठिणग्या यांतला फरकच जाणवेनासा झालेला आहे! आणि बरोबरच आहे ते! आपण कितीही टेक केअर म्हणत गाíनयरी क्रिमा लावल्या, तरी वयपरत्वे कातडी निबर होतेच!
पण तरीही काही गोष्टी या परंपरेने साजऱ्यागोजिऱ्या करायच्या असतात. आम्ही त्या जरूर करतो. उदा- टिंब दिवाळीत आम्ही घरी चकल्या-लाडू खातो. गेल्या वर्षीचा आकाशकंदील छान साफसूफ करून लावतो. पास वगरे मिळालाच फुक्कट, तर दिवाळी पहाटेच्या कार्यक्रमास जातो. वाचनालयातून दिवाळी अंक आणून वाचतो. झालेच तर चार-दोन फटाके उडवतो.
होय! मिलॉर्ड, जर फटाके उडवून दिवाळीचा आनंद साजरा करणे हा गुन्हा असेल, तर आम्ही तो गुन्हा करतो!
आमचे परमशेजारी रा. रा. लेले यांना तर हा गुन्हा आहे हेच मान्य नाही. परवा ती फटाक्यांच्या कर्णभेदी आवाजांवर र्निबधांची बातमी वाचून केवढे संतापले होते ते. म्हणत होते, जनहित याचिकाच टाकायला पाहिजे या विरोधात! तिकडं दहशतवादी एवढे बॉम्ब फोडतात, त्यावर नाही कोणी ध्वनिमर्यादा घालत! आणि आम्ही सामान्य माणसांनी फक्त बसायचं इथं डेसिबल मोजत! हा म्हणजे आमच्या सनातन संस्कृतीवरचा हल्लाच आहे!
आता लेलेंचे हे वक्तव्य अतिरेकीच आहे, हे अगदी मन:पूर्वक मान्य! पण आमचे लेले हे अत्यंत सुसंस्कृत आहेत. त्यामुळे संस्कृतीचा विषय आला, की ते थोडे जास्तच अतिरेकी बनतात! तेव्हा ते काही फार मनावर घ्यायचे नसते. पण एक मात्र खरे, की तुम्ही काहीही म्हणा, फटाक्यांच्या आवाजाशिवाय दिवाळीत मौज नाही! आणि खास करून यंदा तर नाहीच नाही!
यंदा, तुम्हांला सांगतो, काय नाना प्रकारचे फटाके आले आहेत बाजारात! उदाहरणार्थ सध्या अतिशय वाजत असलेला हा खास डबल शॉट सुतळी बॉम्ब पाहा. याचे नाव गडकरी बॉम्ब. या फटाक्याचे वैशिष्टय़ म्हणजे त्याचे दोन स्फोट होतात. पहिला स्फोट खूपच जोरदार असतो. दुसरा स्फोट खुलाशाचा असतो! तिकडे नागपूरमध्ये हा बॉम्ब अतिशय लोकप्रिय आहे म्हणतात. पण लवकरच तो ‘आऊट ऑफ स्टॉक’ होण्याची शक्यता आहे. तेव्हा त्वरा करा आणि याचा आनंद लुटा.
आणि हा पवार आपटबार पाहा. हा फटाका शक्यतो लोकांच्या पाठीवर फोडावा. चांगला फुटतो! मात्र तो शक्यतो मित्रांच्या, तसेच आपल्या मुलांच्या, पुतण्यांच्या हाती देऊ नये. खूप बेभरवशाचा आहे! अचानक हातातच फुटू शकतो! हा बॉम्ब फुटल्यानंतर ध्वनिप्रदूषण फारसे होत नसले, तरी हलक्या कानाच्या व्यक्तींनी यापासून सावध राहिलेले बरे. यातच एक वेगळी व्हरायटीही आहे. त्यास पवार सेव्हन शॉट बॉम्ब असे म्हणतात. हा बॉम्ब एकदा फुटला, की सात वेळा वाजतो आणि मग नुसताच धुमसत राहतो!
हे पाहिलंत? सध्या बाजारात या न. मो. रॉकेटचीही खूपच चर्चा आहे. हे मेड इन गुजरात रॉकेट उडते बाकी छान. ते बऱ्यापकी उंचावर जाते आणि वर जाऊन उगाचच ढमदिशी फुटते! नीट सरळ उभे केले, तर आणखीही वर जाऊ शकते. सध्याच्या दिवसांत भवताली एकंदरच अंधार असल्याने ते चांगले चमकते, हे बरीक खरे! मात्र हे न. मो. रॉकेट बिनआवाजी असते, तर बरे झाले असते. न्यायालयीन डेसिबलच्या मर्यादेतून तरी सुटले असते.
या दिग्गीछाप लवंगी फटाक्यांना मात्र अशी डेसिबलची काहीही मर्यादा नाही. हे लवंगी फटाके आपले फुटतच राहतात. कधी आवाज होतो, कधी फुसकाच बार होतो. हल्ली यांस लहान मुलेसुद्धा फारसे मनावर घेत नाहीत. पण एक मात्र नक्की, की प्रत्येक दिवाळीत हे दिग्गी छाप लवंगी सर दिसतातच.
आणि तुम्हाला माहीत आहे? हल्ली हा एक पॅराशूट बॉम्ब नावाचा नवाच प्रकार बाजारात आलेला आहे. पृथ्वीछाप पॅराशूट बॉम्ब. हा बॉम्ब थेट वरून येऊनच फुटतो. परंतु त्याची वात खूपच नरम असल्याने तो पेटायला फारच वेळ घेतो! पण एकदा का पेटून फुटला तर मात्र त्याचा आवाज आणि आतषबाजी पाहण्यासारखी असते. त्याचे प्रतिध्वनीही बराच काळ उमटतात. मात्र त्यामुळेच जिल्हा बँका, बिल्डरांची कार्यालये अशा शांतताक्षेत्रात तो लावण्यास मनाई आहे.
बच्चे कंपनासाठी यंदा बाजारात हा खास वेगळ्याच प्रकारचा फुलबाजा आलेला आहे. यास अरिवद तडतडी असे म्हणतात. ही तडतडी शक्यतो संध्याकाळी चारनंतर टीव्हीसमोर लावावी. बऱ्याच ठिणग्या निघतात. थोडय़ाच वेळात विझून जातात. मात्र गरम असताना तिला हात लावू नये. अनेकांचे हात पोळले आहेत!
याशिवाय ज्यात कुणीच ओले होत नाही असा अण्णा पाऊस, ऐकणाऱ्यांच्या कानाखाली (पण टीव्हीच्या पडद्यावरच) फुटणारी राजछाप चिमणचिडी, भुईवर एकाच जागी गोलगोल फिरणारे राहुल भुईचक्र, यूपीए फायर वर्क्सची मनमोहन छाप नागाची गोळी असे विविध प्रकारचे फटाकेही यंदा बाजारात दिसत आहेत.
आता हे फटाके नाही वाजवायचे, तर मग करायचे काय?
तुम्हाला वाटते, की याने ध्वनिप्रदूषण होते. पण भवतालच्या कोलाहली शांततेत हेच आवाजी फटाके तर आमचे मनोरंजन करतात! आता या मनोरंजनावरही बंदी आली, तर मग आम्ही राजकारणग्रस्तांनी जगायचे तरी कसे म्हणतो मी?
संग्रहित लेख, दिनांक 11th Nov 2012 रोजी प्रकाशित
फटाके
सक्काळी सक्काळी उठावे. स्वत:स साबूने स्वच्छ धुवावे. शुचिर्भूत व्हावे. नवी कापडे चढवावीत. दोन लाडू हाणावेत. कोपभर चहा प्यावा. मग दारी यावे. तेथे लयदार रंगावलीवर लवलवत असलेल्या इवल्याशा पणतीवर हातातला फुलबाजा पेटवावा.

First published on: 11-11-2012 at 11:50 IST
मराठीतील सर्व 'ध' चा 'मा' बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dha cha ma phatake