scorecardresearch

अफसाना लिख रही हूँ.. : ‘दिखाई दिये यू..’

शाकीरची वासनेने बरबटलेली नजर शबनमवर पडते. शबनम गात असते..

अफसाना लिख रही हूँ.. : ‘दिखाई दिये यू..’
काही काव्यं आपल्याला सहज समजतात, आपल्या आयुष्याशी पटकन् जोडली जातात. हे काव्य मात्र इतकं भारदस्त, की एखादं भरजरी राजवस्त्र पेलायला तसं व्यक्तिमत्त्व असावं लागतं, तसंच काहीसं. हे काव्य आणि संगीत समजून घेण्यासाठी स्वत:ची पात्रता वाढवावी लागते.

मृदुला दाढे- जोशी – mrudulasjoshi@gmail.com

हैदराबादला पोहोचल्यावर ‘वधू’संशोधन सुरू होतं. यात समाजाचा एक अतिशय घृणास्पद चेहरा समोर येतो. नजमासमोर अक्षरश: ‘बाजार’ भरवला जातो. अनेक गरीब, कोवळ्या मुली, बायका उभ्या असतात.. विक्रीस तयार माल! त्यांचे आई-बाप अजिजीनं सांगत असतात की, ‘कृपा करून यांना स्वीकारा, घेऊन जा, पोसा, पुन्हा विका.. काय वाट्टेल ते करा, पण आमच्यावरचा बोझ हटवा!’ नजमा अतिशय व्यथित होते. हे आपण काय करतो आहोत, या भावनेनं तिला प्रचंड वाईट वाटतं. तिच्या आईलाही ती भेटते. सरजूला भेटते. आणि इथेच सरजू नसरीनच्या (निशा सिंग) प्रेमात आहे असा गैरसमजही करून घेते. खरं तर नसरीनचं एकतर्फी प्रेम असतं सरजूवर. मुद्दाम घरात एक छोटेखानी पार्टीचं निमित्त केलं जातं. तिथे सरजू, शबनमसह सगळे जमतात. शाकीरची वासनेने बरबटलेली नजर शबनमवर पडते. शबनम गात असते..

‘दिखाई दिये यू के बेखुद किया

हमे आपसे भी जुदा कर चले..’

(मीर तकी मीर, लता मंगेशकर )

काही काव्यं आपल्याला सहज समजतात, आपल्या आयुष्याशी पटकन् जोडली जातात. हे काव्य मात्र इतकं भारदस्त, की एखादं भरजरी राजवस्त्र पेलायला तसं व्यक्तिमत्त्व असावं लागतं, तसंच काहीसं. हे काव्य आणि संगीत समजून घेण्यासाठी स्वत:ची पात्रता वाढवावी लागते. जाता जाता ऐकण्याचं गाणंच नव्हे हे.

प्रियकराला देवत्व बहाल करणारं गाणं!

‘तुझं दर्शन झालं.. मी स्वत:ला विसरले.. माझं देहभान हरपलं..’

‘जबी सजदा करतेही करते गयी,

हक ए बंदगी हम अदा कर चले!’

‘कैकदा तुझ्या दारी माथा टेकला.. आता तुझ्या इबादतीचा माझा अधिकारही तुलाच वाहून जाते!’

‘परस्तीश किया तक के ए बुत तुझे

नजर में सभों की खुदा कर चले!’

‘तुझी इतकी इबादत केली, की सगळ्यांच्या नजरेत तू खुदा झालास..!’

‘बहोत आरजू थी गली की तेरी

सो यास ए लहू में नहा कर चले!’

‘तुझ्याकडे यायचं होतं.. नाही येऊ दिलं नियतीनं. त्याऐवजी जखमी करून, रक्तबंबाळ करून टाकलं मला.’

‘जबी’, ‘परस्तीश’ असे ऐटबाज शब्द त्या वेदनेला विलक्षण देखणं करून जातात. मग हा शृंगारसुद्धा दुर्बलांचा उरत नाही. तो जरी सामान्य प्रेमिकांचा असला तरी त्याची धग जाणवल्याशिवाय राहत नाही.

खय्यामसाहेबांनी सांगितलं, की त्यांनी मुद्दाम सव्वाशे वर्षांपूर्वीचं हे काव्य निवडलं. त्याचं वजन, भाषेचा डौल या चित्रपटाला साजेसा होता. शबनम सहज म्हणून गातेय. पण नवाबी संस्कृतीतली तरुणी काय गाईल याचा विचार इथे दिसतो. एखादं हलकंफुलकं, उडतं गाणंही करता आलं असतं इथे. पण गाण्याची लय निवडण्यापासूनच इथे वेगळेपणा दिसतो. ‘दिखाई दिये यू’ हा एक ‘स्वरशब्दमहाल’ आहे. एकेक स्वरशब्द म्हणजे संगमरवरी चिराच. ‘हमे आप से भी..’ हे ग, म, प, ध या स्वरांवरचे मकाम! किती ठाम, स्थिर ठेवलेत. खय्यामसाहेबांची शैली अशी की, पहिली ओळ ज्या स्वरावर संपते तिथेच दुसरी सुरू होते. याही गाण्यात हे आढळतं. ‘बेखुद किया’चा स्वर गंधार आणि ‘हमे आपसे भी जुदा कर चले’चाही तोच प्रारंभस्वर. पुन्हा ‘दिखाई’ची सुरुवात त्याच गंधाराने.. किती सुंदर हा स्वरतर्क! पहिल्या दोन अंतऱ्यांपेक्षा ‘बहोत आरजू थी’ हा तिसरा अंतरा अधिक आर्त, वरच्या सुरावर, तार रिषभावर जाणारा. आणि खाली येणारी ओळ ‘सो यास ए लहू में नहा कर चले’ एक पॅटर्न घेऊन येते. निसानी धनिध पधप असा.. त्याला एक सुरेख टप्पेदार उतार मिळतो. ‘नहा कर चले’चा स्वर पुन्हा गंधार! म्हणजे गंधार ते पुन्हा गंधार असा हा सांगीतिक प्रवास. ‘जुदा कर चले’मध्ये ‘जुदा’ची ती पुकार. किती आवेग आहे त्यात! तो ज्याला ऐकू येत नाही त्यानं या गाण्याच्या वाटेला जाऊ नये. ‘दिखाई दिये यू’नंतर आतून सुरू होणारा मेंडोलीनचा फिलर हीसुद्धा खास खय्याम शैली. लताबाईंनी लावलेल्या टोनपासून उच्चारापर्यंत सगळीकडे वेगळेपणा आहे. लाखो पुष्कराज रत्नं एकाच वेळी चमकावीत तसा झगझगीत आवाज लावलाय यात. प्रत्येक अक्षर जणू वितळलेल्या सोन्यात चिंब भिजून येतं. ‘आपसे भी’ हे आकार-एकार-इकार किती स्वच्छ! ‘दिखाई’चा उच्चार त्या ‘दिख्खाई’ असा करतात. कारण हे नुसतं ‘बघणं’ नाही, तर ‘दर्शन’ आहे! मीर तकी मीर यांना त्यांच्या हयातीत हे ऐकायला मिळालं असतं तर? असं वाटून जातं.

शाकीरला आता शबनम हवी असते. ‘मुझे शबनम चाहिये’ असं वासनांध नजरेनं तो सांगत राहतो. नजमाला हे पटत नाही. पण अख्तर तिला समजावतो, की हे करावंच लागेल. ‘हम खरीद थोडे रहे है? शादी कर रहे है..’ असं गोंडस नाव या सौद्याला दिलं जातं. शेवटी शबनमच्या मोठय़ा बहिणीच्या लग्नाला पैसे हवेत म्हणून हा व्यवहार पार पाडला जातो. घोडे-जोडे का खर्च म्हणजे देणीघेणी इत्यादी ठरतं. ‘लग्न’ ठरवणारे ‘दलाल’, हरचनबी आणि मामाजी आपसात सौदाही पक्का करतात. शबनम आणि सरजू उद्ध्वस्त होतात. त्यात दुल्हनच्या पायाचं माप घ्यायला गेल्यावर शबनमचा आक्रोश काळीज कापत जातो. सरजू तिच्या आई-वडिलांना भेटतो, पण त्याचा काहीही उपयोग होत नाही. शेवटी तो शाकीरलाही जाऊन विनवतो, की शबनम माझं सर्वस्व आहे. तिला सोडा.. सरजूला बेदम मारहाण करून शाकीर हाकलून देतो.

नजमा आणि सलीम यांच्यातला एक संवाद फार दाहक, नको इतका खरा आहे. सलीम म्हणतो की, ‘‘लग्न म्हणजे पुरुषांनी शोधलेला एक साळसूद, समाजमान्य पर्याय आहे- स्त्रीला कह्यत ठेवायचा. तू तरी काय केलंयस? वेश्या बनायचं नाकारलंस, पण अख्तरच्या हातातलं बाहुलं झालीसच ना? जोपर्यंत तुला कुणीतरी अख्तर, एखादा सलीम यांची गरज आहे तोपर्यंत तू अशीच वापरली जाणार. तू खरेदीदार नाहीस, विकली गेलेली एक वस्तू आहेस. ज्या दिवशी कुणाच्याही आधाराशिवाय जगायला शिकशील तेव्हा तुला तुझी ‘शख्सियत’, व्यक्तिमत्त्व सापडेल.’’

हे पचवणं नजमाला अशक्य होतं. तिची घुसमट होते. त्यातच सरजूचं शबनमवर प्रेम होतं हे समजल्यावर नजमा हादरते.. आपल्या हातून काय महाप्रचंड पातक घडलंय, या जाणिवेनं धावत जाऊन शबनमच्या आई-वडिलांना, मामाजींना ती विनवते. पण सगळा सौदा पक्का झालेला असतो. आता काहीही होऊ शकणार नसतं. सरजू शबनमला एकदा तरी भेटता यावं म्हणून नसरीनला विनवतो. शादीच्या लाल जोडय़ात सजलेली शबनम भेटीला येते. दोघांची नजरानजर होते. शादीचं खोटं अवसान आणलेली शबनम आणि पूर्णपणे विझलेला सरजू. निस्तेज डोळ्यांचा. कोवळ्या वयातलं ते निरागस प्रेम! ‘अगर हम गरीब न होते तो हमको कोई भी जुदा नहीं कर सकता था..’ हे तिचे उद्गार. ‘मैंने तुमको बरबाद कर डाला ना?’ हा जिव्हारी लागणारा प्रश्न काळीज कापत जातो. सुप्रिया आणि फारूखचा अभिनय केवळ अप्रतिम. त्यांची ती हैदराबादी हिंदी.. ‘हो’, ‘नको’ या शब्दांचा वापर फार निरागस वाटतो. त्या प्रेमाचं थडगं बांधतायत दोघं.. असं वाटून जातं. शबनमच्या मनातलेच हे विचार.

‘देख लो आज हमको जी भर के’

(मिर्झा शौक, जगजीत कौर)

मिर्झा शौक लखनवी हेसुद्धा अठराव्या शतकातले शायर. त्यांची शायरी या प्रसंगाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन गेली.

‘देख लो आज हमको जी भर के

कोई आता नहीं है फिर मर के

आओ अच्छी तरह से कर लो प्यार

के निकाल जाये कुछ दिल का बुखार!’

‘ही शेवटचीच भेट. मला एकदा नखशिखांत बघून घे. पुन्हा दृष्टीस पडणं कठीण! एकदा घट्ट मिठीत घे. काळजातली आग जरा तरी शांतव..’

एक संथ, कातर चाल खय्यामजींनी दिलीय. ‘देख लो..’ ही खूप आतून आलेली आर्त पुकार आहे. जगजीतजींचा आवाज इथे विलक्षण शोभून दिसला. मागे वाजणारी शहनाई केवळ मूक रुदन करतेय, अश्रू ढाळतेय असंच वाटतं.

शबनमनं दग्र्यात बांधलेला धागा तोडून आणलेला असतो.. ‘मैं आपसे जिंदगी मांगी थी. अब अपने अरमानों की लाश वापस लिये जा रही हूं’ हे सांगून!

कुणालाही न जुमानता त्या शादीच्या रस्म पूर्ण केल्या जातात आणि शबनम नावाचा एक अनाघ्रात दंवबिंदू एका गिधाडाच्या हाती सोपवला जातो. अगदी विधीपूर्वक. नाचगाणी करत. ‘अगर हम आपके न हो सके तो..’ हे शबनमनं अर्धवट सोडलेलं वाक्य अशुभाची चाहूल देत असतं.

इकडे नजमा एका वेगळ्याच मन:स्थितीत असते. ‘लग्न’ या एका घटनेचा किती खोल पगडा असतो स्त्रियांवर! स्वत:च्या तथाकथित लग्नासाठी नजमा हा बळी द्यायला तयार झालेली असते. मनाचा दगड करून. एखाद्या कसलेल्या, थंड डोक्याच्या खुन्यासारखी मानसिकता ठेवून. पण या घटनांमुळे ती पूर्णपणे अंतर्बा बदलून जाते. तिच्यात एक उलथापालथ होते. सर्व काही आलबेल झाल्यावर आता शादीची ‘तयारी’ करणाऱ्या अख्तरला ती स्वच्छ शब्दांत नकार देते. ‘एका नरकातून मला तू दुसऱ्या नरकात आणलंस. माझी ‘किरदार’ माझ्यापासून हिरावलीस..’ हे ती ठणकावते. काय असते ही किरदार? ‘स्व’ सापडणं, ‘आत्मभान’ असणं. स्वत:च्या शैलीत जगणं! हेच तर ‘मालकां’ना नको असतं. पक्ष्याचे पंख छाटून टाकायचे आणि त्या बिनपंखाच्या, उडू न शकणाऱ्या पक्ष्यांना हवं तसं गोंजारत राहायचं. एका मर्यादेत, कमी उंचीवर, घरातल्या घरात उडू द्यायचं.. हा तर आवडता छंद. हे पंख म्हणजेच ‘किरदार’! नको असते ती ‘किरदार’ कुणाला. कारण ती ‘झेपत’ नाही. तिच्या सगळ्या टोकदार, धारदार कडा घासून तिला बुळबुळीत केली, असहाय केली की पुरुषार्थ साजरा होतो!

‘‘तू एक ‘एजंट’ आहेस. शाकीरनं तुला मूठभर हिरे देऊ केले तर तू मलासुद्धा विकशील! माझ्या आयुष्यातून तू वजा झालास अख्तर!’’ असं म्हणून नजमा अख्तरला अक्षरश: हाकलून देते.

दारू ढोसून, कोवळ्या वयाच्या शबनमचा घास घ्यायला तयार असलेला शाकीर पहिल्या रात्रीसाठी शृंगारलेल्या खोलीत प्रवेश करतो मात्र.. त्या गिधाडाच्या वासनेला बळी पडण्याआधीच शबनम हातात धागा घट्ट धरून केव्हाच दूरच्या प्रवासाला निघून गेलेली असते.. अल्लाकडे कैफियत मांडण्यासाठी! ‘बहुत आरजू थी गली की तेरी, सो यास ए लहू में नहाकर चले’ हे शब्द तिनं खरे केलेले असतात..

वधूवेशातल्या शबनमचं कलेवर रक्तात न्हातं. एक हसतंखेळतं, निरागस यौवन विझतं. सरजू दु:खानं बेभान होतो.

मुंबईला निघालेल्या सलीमला धावत धावत नजमा गाठते. गाडीत चढते. आणि या घडलेल्या गुन्ह्यची ‘नाइन्साफी की मैं बराबर की हिस्सेदार हूं..’असं कबूल करते.

अनेक प्रश्न मनात ठेवून हा चित्रपट  संपतो. कारण हे प्रश्न आजही तितकेच अस्वस्थ करणारे आहेत. तपशील बदलले, स्वरूप बदललं; पण अदृश्य बाजार, विक्रेते, खरेदीदार कायम राहिले. या बाजारातून स्त्रिया कधी वजा होतील? की त्या यात स्वत:च्या ‘किरदार’चा बळी देऊन शरीक होतच राहतील?

‘कुणी नसलं तरी चालेल, तुझी तू राहा

फक्त तुझ्या डोळ्यांनी तुझं जग पाहा

मुसळधार सरी येतील

तुझा अंगार विझवू बघतील

विझणाऱ्या ठिणगीवर फुंकर घालीत रहा

तुझी तू रहा.. तुझी तू रहा!’

– संजीवनी बोकील

..असं खरंच घडेल?   (उत्तरार्ध )

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-08-2020 at 07:14 IST

संबंधित बातम्या