या अनावृत पत्रात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे ‘साधना’तील सहकारी म्हणून त्यांच्या खांद्याला खांदा लावून गेली काही वर्षे ‘साधना’ची धुरा वाहत असलेले विनोद शिरसाठ यांना त्यांच्या दीर्घ सहवासात जाणवलेले, आकळलेले ‘डॉक्टर’..
प्रिय डॉक्टर,
दर मंगळवार आपल्यासाठी समाधान व असमाधान अशा संमिश्र भावनांचा असतो. कारण त्या दिवशी ‘साधना’चा अंक छापायला जातो. अंक मार्गी लागल्याचे समाधान आणि त्यात काय काय करायचे राहून गेले, याचे असमाधान. पण कालचा मंगळवार तसा नव्हता. सकाळी साडेआठला ‘क्लास आणि मास’ या शीर्षकाचे संपादकीय घेऊन ऑफिसला निघण्याच्या तयारीत होतो.. आणि हमीदने बातमी दिली, ‘‘डॉक्टरांना गोळी घातली आहे आणि ‘ससून’मध्ये दाखल केले आहे. तू पुढे जा, मी निघालोय.’’ पाठोपाठ वृत्तवाहिन्यांचे फोन- ‘डॉक्टरांची हत्या झाली आहे..’ तेव्हापासून रात्री अडीच वाजेपर्यंत मी त्या गर्दीत असूनही एकटा होतो. भेटणारे लोक केवळ स्पर्शाने बोलत होते. फोन, एस.एम.एस. करणारे लोकही जास्त शब्द वापरत नव्हते. ‘धक्कादायक’, ‘भयानक’ या आशयाचेच ते शब्द होते. माध्यमांचे प्रतिनिधी प्रतिक्रिया विचारत होते आणि ‘माझ्याकडे काहीही प्रतिक्रिया नाही,’ एवढे एकच वाक्य मी उच्चारत होतो. तेही समजून घेत होते. अजिबात आग्रह करीत नव्हते. पण खरं सांगू का? सर्व काही समोर दिसत असूनही, तुम्ही आता राहिला नाहीत- हे माझ्या मनाने स्वीकारले नव्हते. किंबहुना, तो धक्काही मनाला बसलेला नव्हता. पण एक जाणीव मात्र होती, की जोराचा मुका मार लागल्यावर किंवा पोळल्यावर वा भाजल्यावर त्या दिवशी फारशी जाणीव होत नाही; दुसऱ्या दिवशी मात्र त्याच्या वेदना असह्य होतात, तसे आपले बहुधा होणार. साताऱ्याहून पुण्यात पोहोचल्यावर रात्री अडीचला पाठ टेकली तेव्हा मला लगेचच झोप येईल असे वाटत होते. पण तासभर तरी तुमच्यासोबतच्या साध्या-साध्या आठवणी यायला लागल्या की मी स्वत:ला रोखत होतो. मला बांध फुटू द्यायचा नव्हता. मी त्या आठवणी जागवायला भीत होतो. कारण सकाळी लवकर उठून तुमच्यावर संपादकीय लिहायचे होते आणि अंक छापायला पाठवायचा होता. संध्याकाळी साताऱ्यात शैलाताईंना भेटलो तेव्हा त्या म्हणाल्या होत्या, ‘‘अंक आजच गेला असता तर डॉक्टरांना आवडलं असतं. आम्हाला कोणालाही काहीही झालं तरी ते काम थांबवत नसत.’’ मलाही ते माहीत होतं. पण इतकी कर्तव्यकठोरता माझ्यात अजून आलेली नाही. होय.. साडेनऊ वष्रे तुमच्या सहवासात होतो, तरीही!… (उर्वरित लेख वाचण्यासाठी खालील आकड्यांवर क्लिक करा)
डॉक्टर, मला आठवतोय तो दिवस- जेव्हा मी तुम्हाला पहिल्यांदा भेटलो होतो. ५ जानेवारी २००४ चा तो दिवस. तो दिवस पक्का आठवणीत राहण्याचे कारण- आपण बोलत होतो तेव्हा भांडारकर संस्थेची तोडफोड होत होती. ‘साधना’तून बाहेर पडल्यावर ती बातमी मला कळली होती. तुमच्याशी झालेली ती भेट माझ्यासाठी ऐतिहासिक होती. त्या आठवडय़ाच्या अंकात ‘विजय तेंडुलकर यांना एका तरुणाचे अनावृत पत्र’ हा माझा लेख तुम्ही कव्हरस्टोरी म्हणून छापला होता. तो लेख मी लिहिला आहे, हे कळल्यावर तुम्ही अगदी नेमक्या व मोजक्या शब्दांत तारीफ केली होती. ‘‘मोठय़ा माणसांविषयी आदर ठेवूनही किती स्पष्टपणे मतभेद नोंदवता येतात याचा उत्कृष्ट नमुना म्हणून तो लेख दाखवता येईल,’’ असे तुम्ही म्हणाला होता. ‘‘काही माणसांना जगण्याचा अजिबात हक्क असता कामा नये. पुढच्या जन्मात मला लेखणी नको, शस्त्र हवे. आणि मला कोणी पिस्तुल दिले तर मी पहिली गोळी नरेंद्र मोदींना घालेन..’’ अशा विधानांचे तेंडुलकरांचे ते भाषण त्यावेळी मोठय़ा वादाचा विषय ठरले होते. त्यानिमित्ताने लिहिलेल्या दीर्घ अनावृत पत्रात- ‘तेंडुलकर, तुमच्या भावना मी समजू शकतो, पण तुमच्या विचारांशी मला सहमत होता येत नाही..’ असे मी लिहिले होते. त्याची कारणमीमांसा करताना, ‘गांधींच्या हत्येचे समर्थन करणारे खूप लोक या देशात आहेत. त्यामुळे तेंडुलकर कसे समाजद्रोही आहेत, असे म्हणून तुमच्या हत्येचेही समर्थन होऊ शकते,’ असे लिहिले होते.
डॉक्टर, आता तर तुमचीच हत्या झाली आहे. तुमची हत्या घडवून आणणाऱ्या मूलतत्त्ववादी शक्तींना शिव्या घालाव्यात, की असंवेदनशील राज्यकर्त्यांना शिव्या घालाव्यात, की प्रशासन व पोलीस यांच्या अकार्यक्षमतेबद्दल संताप व्यक्त करावा, असा विचार तुमच्या अनेक चाहत्यांप्रमाणे माझ्याही मनात आला होता. पण ‘साधना’ची भाषा नेहमीच सभ्य व संयत राहिली आहे. आणि माझाही तोच स्वाभाविक िपड आहे. त्यामुळे आज तरी त्याविषयी लिहिण्यात अर्थ नाही. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे व कार्याचे विश्लेषण करण्यासाठीही ही योग्य वेळ नाही आणि तितकी उसंतही नाही. मला काल-परवा घडल्याप्रमाणे आठवतंय.. प्रधानसर गेले तेव्हा हडपसरच्या साने गुरुजी रुग्णालयात गर्दी जमलेली असताना तुम्ही हळूच मला बाजूला घेऊन- ‘प्रधानसरांवरचा पूर्ण अंक लगेच काढायचा की पुढच्या आठवडय़ात?’ असे विचारले होते. आणि आपण झटकन् निर्णय घेऊन पटापट नावे निश्चित करून पुढील दीड दिवसात तो अंक काढला होता. आता तुमच्यावर पुढचा अंक काढायचाय, पण माझे अवसानच गळून पडले आहे. त्याचे मुख्य कारण- तुमच्यावर काढलेला अंक वाचायला तुम्ही नाहीत. मला कोणताही अंक चांगला झालाय की नाही, यासाठी स्वतचे समाधान व्हावे लागायचे; किमान तुमचे! पण आता माझे समाधान होणार नाही, आणि तुमचेही कळणार नाही. आपल्या दोघांमध्ये ३१ वर्षांचे अंतर होते; पण नाते कसे तयार झाले होते! काल शवागारात हमीद आणि मी भेटलो तेव्हा त्याच्या शेजारी उभी असलेली मुग्धा म्हणाली, ‘विनोद, तुझे पण ते वडीलच होते.’ गेल्या सात वर्षांत आपण दर सोमवारी-मंगळवारी जवळपास दिवसभर बरोबर असू आणि काही वेळा रात्री उशिरापर्यंतही. म्हणजे दर वर्षी शंभर दिवस आपण बरोबर घालवलेत. कितीतरी कल्पना आपण लढवल्या. त्यांतल्या अनेक यशस्वी झाल्या, कित्येक अयशस्वी झाल्या. कल्पनांचे तुम्हाला भारी आकर्षण! भल्या त्या फेल जाणार असतील, तरीही! पण आपल्या अंमलबजावणीत सावधपणा होता. त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता असणाऱ्या कल्पनांचे आकर्षण तुमच्याप्रमाणेच मलाही कधीच वाटले नाही. त्यातून झाले एवढेच, की तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे असे फारच थोडे अंतरंग असतील, जे मला पाहायला मिळाले नसतील. आणि गेल्या साडेनऊ वर्षांतील माझे सर्व लेखन वाचणारी तुम्ही एकमेव व्यक्ती होता. त्यामुळे मला काय म्हणायचे आहे, याचा परफेक्ट अंदाज तुमच्याइतका अन्य कोणीच बांधू शकत नव्हते. पण माझ्यासाठी तुमचे सर्वात मोठे योगदान वेगळे होते. मला निर्भयपणे विचार करायला व ते मांडायला तुमचे भक्कम संरक्षणकवच होते. आता ते कवच निसटले आहे, या भावनेने मी कालपासून बेचन आहे. शिवाय माझ्या वाढीचे, विकासाचे महत्त्वाचे टप्पे तुम्ही पाहत होतात. त्यामुळे माझ्या प्रत्येक छोटय़ा-मोठय़ा आविष्काराचा तुम्हाला होणारा आनंद इतरांच्यापेक्षा वेगळा होता आणि त्यामुळे मला मिळणाऱ्या आनंदाची प्रतवारीही वेगळी होती. तो आनंद आता मला मिळणार नाही, म्हणून ‘साधना’चे अंक काढताना माझा उत्साह टिकेल की नाही, याबद्दल माझ्या मनात जबरदस्त शंका आहे.आठवणी तर तशा कितीतरी आहेत. आणि पुढे बराच काळ मी त्या जागवीत राहीनही. पण काल दिवसभर एक आठवण माझ्या मनात सारखी घोळत होती आणि तिचा अर्थ लावण्याचा मी प्रयत्न करीत होतो…(उर्वरित लेख वाचण्यासाठी खालील आकड्यांवर क्लिक करा)
पाच-सहा वर्षांपूर्वी बाल-कुमार दिवाळी अंकात प्राण्यांची एक तरी गोष्ट असली पाहिजे, याबाबत मी सांगत होतो आणि त्याचवेळी मी तुम्हाला विचारले होते, ‘तुम्ही कधी कुत्रा-मांजर असा एखादा प्राणी पाळला होता का?’ तुम्ही त्यावेळी म्हणालात, ‘नाही. पण मला हत्ती पाळायची फार इच्छा होती, ती राहून गेली.’ मी म्हणालो, ‘अरे वा! मग हत्ती का पाळावासा वाटला होता, यावर लिहा. आपण तो लेख बाल-कुमार दिवाळी अंकात छापू.’ तुम्ही केवळ हसून तो प्रश्न सोडून दिला होता. नंतर दोन-तीन वेळा मनात येऊनही तो पाठपुरावा मी केला नव्हता. काल मी विचार करीत होतो- हत्ती का पाळावासा वाटला असेल तुम्हाला..? हत्तीचे भव्य रूप, त्याची डौलदार चाल (हाथी की चाल) आणि त्याचे बळही.. त्याचवेळी असेही वाटले की, प्रचंड शक्तिशाली असूनही हत्तीचे शाकाहारी असणे व िहसक नसणे तुम्हाला विशेष भावले असावे. तुमचे एकूण कार्य पाहिले आणि एकाच वेळी अनेक आघाडय़ांवर शांत व संयतपणे काम करण्याची तुमची तडफ पाहिली तर त्याला हत्तीचेच बळ लागते- असा साक्षात्कार मला काल झालाय.
काल दिवसभरात अनेकांनी फोनद्वारे वा प्रत्यक्ष भेटीत- जी काही मदत लागेल ती आम्ही करू, असे सांगितले आहे. त्यात ‘साधना’ला व दाभोलकरांना मदत केली पाहिजे, असाच भाव होता. मला खात्री आहे, ते सर्व लोक आवश्यक ती मदत करतीलही; पण तुमचा आवडता शब्द वापरायचा ठरला तर तुम्हाला साधना ‘वíधष्णू’ राहावी असे वाटत होते आणि त्यासाठी हत्तीचेच बळ लागेल याची तीव्र जाणीव मला आहे. त्यामुळे लोकांची मदत व सदिच्छा राहतील; पण हत्तीचे बळ आणायचे कुठून, हा माझ्यापुढे प्रश्न आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr narendra dabholkar was a strong man
First published on: 25-08-2013 at 01:03 IST