हे नाटक संपतं त्यावेळी प्रेक्षक भावव्याकूळ होत नाही. त्याला एका विलक्षण अनुभवाचा साक्षात्कार होतो. नायकासाठी खोटी सहानुभूती निर्माण करण्याचा नाटककार किंचितही प्रयत्न करीत नाही. आणि तरीदेखील लॅचीच्या व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षक झपाटला जातो. लॅचीला विसरता येत नाही. मार्गारेट-लॅचीचा प्रणयप्रसंग म्हणजे नाजूक प्रेमभावनेचा तितकाच तरल आविष्कार आहे. इतर पात्रं दुय्यम असली तरी त्यांना त्यांचा त्यांचा म्हणून एक हसता-खेळता अवकाश नाटककाराने निर्माण केला आहे. पाश्र्वभूमीवर वावरणारी ही दुय्यम पात्रं मूळ कथानकाला अधिकच धारदार करतात. कृष्णसुखात्मिकेचं स्वरूप देतात. आपल्या देशाचा अभिमान व अन्य देशांविषयीची तुच्छ भावना हा सार्वत्रिक मनुष्यस्वभाव विनोदी पद्धतीनं प्रकट केला आहे.
राज्य नाटय़स्पर्धेतली जी नाटकं ढोबळ होती, आघाती होती, गोष्ट सांगणारी होती नि व्यावसायिक रंगमंचावर आल्यावर तुफान यशस्वी झाली; अशा नाटकांचा परिणाम तीव्र असला तरी तो तात्पुरता असतो. काही कालावधीनंतर त्या प्रभावाचा निचरा होऊन जातो. पण काही नाटकं तरल असतात, आपल्या सुप्त संवेदनांना जाग आणणारी असतात. गोष्टीपेक्षा व्यक्तीच्या भावभावनांवर प्रकाश टाकणारी आणि उत्कट असतात. अशी नाटकं विसरता येत नाहीत. कालांतराने ती जशीच्या तशी आठवत नसली तरी त्यांचे काही कोपरे वेळोवेळी आस्वादकांना अस्वस्थ करीत राहतात. अशा काही स्पर्धेतील मोजक्याच नाटकांत ‘लोभ नसावा ही विनंती’ या विजय तेंडुलकर अनुवादित नाटकाचा समावेश करावा लागेल. ‘हेस्टी हार्ट’ या जॉन पॅटिक यांचा अनुवादित नाटकाचा प्रयोग ‘रंगायन’ या संस्थेने १९६९ साली स्पर्धेत सादर केला. सवरेत्कृष्ट नाटय़निर्मितीचे दुसरे पारितोषिक व दिग्दर्शनाचे (अरविंद देशपांडे) दुसरे पारितोषिक या नाटकाला मिळाले. अनुवादित नाटक असल्यामुळे की काय सर्वागाने अत्यंत प्रभावी प्रयोग होऊनसुद्धा या नाटय़ प्रयोगाचा पहिला क्रमांक हुकला. स्पर्धेच्या प्रयोगात दिलीप प्रभावळकर, बाळ कर्वे, नारायण पै, अरविंद कारखानीस, वृंदावन दंडवते, मधुकर नाईक, यशवंत भागवत, चित्रा पालेकर, त्या वेळची चित्रा मुर्डेश्वर या कलावंतांचा सहभाग होता. दिलीप प्रभावळकरांची ही बहुधा प्रौढ नाटकातली पहिली भूमिका. या नितांत अविस्मरणाीय प्रयोगाला दुसरे पारितोषिक मिळाल्याबद्दल मनस्वी हळहळ वाटणाऱ्या प्रेक्षकांत नाटककार प्र. ल. मयेकर होते. ते तर म्हणतात, ‘हे केवळ नाटक नव्हते. दृश्य रूपातली रंगमंचावरची ती कादंबरीच होती.’ मृत्यूच्या उंबरठय़ावर असलेला, तुसडय़ा स्वभावाचा नायक आणि त्याच्या भोवतालचे जगातल्या वेगवेगळ्या भागांतले लोक यांच्यामधील नाजूक धागे विणणारं हे नाटक कुठेही मेलोड्रॅमॅटिक होत नाही. सुभाषितवजा वाक्यांचाही आसरा घेत नाही. कुठेही भावविवश होत नाही. हसतखेळत, नर्मविनोदाचा शिडकावा करीत मानवी मनाच्या गुंत्यांचं जे प्रत्ययकारी दर्शन हे नाटक घडवतं त्याला तोडच नाही. पात्रे परदेशातली असूनही त्यांच्या पाश्चात्य नावांचा किंचितही अडथळा न होणारं एक कमालीचं संवेदनक्षम असं हे नाटक आहे. चार दशकांनंतर या विलक्षण नाटकाचा परिचय करून देताना आठवणींनी दगा देऊ नये म्हणून, प्रयासाने मिळवलेल्या मूळ पुस्तकाचा आधार घेतला आहे. (लोभ नसावा ही विनंती – ग. पां. परचुरे प्रकाशन विश्वसाहित्य २७) चित्रा मुर्डेश्वर (मार्गारेट) म्हणजेच नंतरची अनुया पालेकर आणि अरविंद कारखानीस (लॅची) यांचा अभिनय लक्षणीय होताच, पण त्याचबरोबर अन्य कलावंतांनीदेखील आपापल्या छोटय़ा भूमिकेपासून उत्तम दाद मिळवली. मार्गारेटचा व लॅचीचा छोटासा प्रणय प्रसंग रोमांचित करणारा होता. ‘आनंद’ या नाटकाची नेमकी दुसरी बाजू म्हणजे हे नाटक आणि ‘आनंद’पेक्षाही अप्रतिम. ‘लोभ नसावा’ हे नाटक आजही कुणीतरी करायला हवे. गेल्या दशकातील सर्वोत्तम मराठी नाटकांपेक्षाही उत्तम असे हे नाटक आजच्या प्रेक्षकांना पुन्हा अनुभवता आले तर अस्सल प्रभावी नाटक म्हणजे काय याचा एक छान नमुना प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
आग्नेय आशियात कुठेतरी एक तात्पुरत्या स्वरूपाचे ब्रिटिश जनरल हॉस्पिटल. त्यातला बऱ्या होत आलेल्या रुग्णांचा विभाग. एका झावळाच्या खोपटात तो वसला आहे.
पडदा वर जातो तेव्हा इस्पितळाच्या या विभागात अंधार आहे. बंद-खिडक्या-दारांवाटे येतो आहे तेवढाच प्रकाश. मधोमधचा कंदील तेवतो आहे. पाच कॉट्सवर रुग्ण असून त्यांच्याभोवती मच्छरदाण्या असल्याने ते दिसत नाहीत. एक कॉट रिकामी आहे. ती नीटकेटक्या अवस्थेत असून तिची मच्छरदाणी वर जुडी होऊन लोंबत आहे.
सगळे रुग्ण लष्करातल्या वेगवेगळ्या विभागांचे आहेत आणि वेगवेगळ्या प्रदेशांतले आहेत.
‘यॉक’ विशीतला आहे. तो थोडा तोतरा आहे. स्कॉटिश आहे. ‘डिगर’चं वय ३५ आहे. तो ऑस्ट्रेलियन आहे. धर्मगुरू होणार होता, पण मुष्टियोद्धावीर झाला. त्याला उठवण्याची व फिरवण्याची मनाई आहे. ‘टॉमी’ला घशाचं दुखणं आहे. अ‍ॅडनाइड्स. तो लठ्ठय़ा आहे. झोपाळू झोपेत जोरजोरात घोरतो. (झोपेत स्वत:च्याच गोंगाटाने तो जागा कसा होत नाही, याबद्दल बाकीच्या रुग्णांना कुतूहल आहे. स्वत:च्या प्रत्येक वाक्याला हसण्याची त्याला सवय आहे.) ‘किवी’ उंचा पुरा आहे. त्याच्या लांब तंगडय़ा नेहमी पांघरुणाबाहेर येतात. त्याचा डावा हात प्लॅस्टरमध्ये आहे. तो न्युझीलंडर आहे. (साध्या साध्या गोष्टीसाठी पैज मारायची त्याला सवय आहे.)  ‘ब्लॉसम’- काळाकभिन्न निग्रो आहे.
सकाळ झाली आहे. ऑर्डर्ली सगळ्यांना बोंबाबोंब करून उठवतो आहे. हे सगळे रुग्ण असले तरी ते बरे होण्याच्या मार्गावर आहेत. चिवट आहेत. एकमेकांची फिरकी घेण्यात, टोपी उडवण्यात पटाईत आहेत. रिकाम्या कॉटवर कोण येणार या विषयावर ते विनोद करण्यात मग्न आहेत. स्कॉटिश लोकांबद्दल बोलता बोलता त्यांना आठवतं की, आपली सिस्टर मार्गारेट ही स्कॉटिश आहे. तिच्याबद्दल मात्र सर्वाचंच चांगलं मत आहे. ती सुंदर आहे आणि वातावरण नेहमी प्रसन्न व हषरेत्फुल ठेवण्यात ती वाकबगार आहे. हे रुग्ण डास मारायच्या ख्ॉटरने आपसात इंद्रयुद्ध खेळतात तेव्हा ते थांबवणं तिलाच शक्य होतं.
कर्नल कॉव वेब सगळ्या रुग्णांशी बोलायला येतात. त्यांना सगळ्यांकडून मदतीची अपेक्षा आहे. एक रुग्ण या वॉर्डात ठेवणार आहेत. त्या रुग्णाच्या पोटातून शस्त्रक्रिया करून त्यांनी शार्पनेलचा तुकडा काढला होता. या प्रकरणांत त्याची एक किडनी काढून टाकावी लागली. उरलेली एकुलती एक किडनीही बरीचशी निकामी झाली आहे. फार थोडा वेळच ती काम करू शकेल. आता तो फक्त सहा आठवडय़ांचा सोबती आहे. पण ही गोष्ट त्याला कुणी कळू द्यायची नाही. त्याला कुणी नातेवाईक नाहीत. कसले पाश नाहीत. मरणसमयी त्याच्याजवळ कुणी ना कुणी असावं म्हणून तो बरा असतानाच त्याला या वॉर्डामध्ये आणलं जात आहे. भावी संकटाबद्दल काही कळू न देता त्याला सदैव आनंदी ठेवायची जबाबदारी या वॉर्डच्या रुग्णांवर आहे. खेळीमेळीत वावरणारे हे सगळे रुग्ण ही जबाबदारी
आनंदाने स्वीकारतात.
नवा रुग्ण येतो. त्याचं नाव लॅची आहे. तो स्कॉटिश आहे. त्याच्या हातात बॅगपाइप नावाचं वाद्य आहे. विशीचा हा तरुण सडपातळ आहे. भोवतालच्या गोष्टीत त्याला फारसा रस दिसत नाही.
‘कुणी आपणहून माझ्यासाठी काही केलेलं मला आवडत नाही,’ असं नर्सला तो सांगतो. यॉक त्याला सिगारेट देतो, पण तो ती घेत नाही. सगळे त्याच्याशी गप्पा मारायचा प्रयत्न करतात, पण ‘वायफळ गप्पा मारायची मला सवय नाही,’ असे तो म्हणतो. पुस्तकात त्याला काही अर्थ दिसत नाही. वाचन म्हणजे काळाचा अपव्यय, अशी त्याची धारणा आहे. कुठल्याच देशाबद्दल, लोकांबद्दल त्याचं चांगलं मत नाही. स्कॉटिश वापरतात तो खास पोशाख  त्याच्याकडे आहे का, अशी विचारपूस केली जाते. तेव्हा ‘तो फार महाग असतो. माझ्या शिलकीतून मी जमीन घेतलीय. मालकीचं एक घर बांधलंय. मला एकांत प्रिय आहे. मी कुणाचा बंधू नाही,’ असं तो आल्या आल्याच जाहीर करतो.
लॅचीला हवं नको ते बघण्याचं काम मार्गारेट अगदी निष्ठापूर्वक करीत असते. तर लॅचीला तिच्याबद्दल भलताच संशय येतो. ‘माझ्या भावी आयुष्यात विवाहाला स्थान नाही,’ असं तो तिला स्पष्टच सांगून टाकतो. त्यावर ती तितक्याच स्पष्टपणे त्याला सांगते, ‘तुम्हाला लग्नाच्या जाळ्यात अडकावयाचं माझ्याही मनात नाही’. १५ दिवस उलटतात. सगळे मजेत आहेत. सगळ्यांचे थट्टा विनोद चाललेले आहेत. लॅची मात्र त्या हसण्याखिदळण्यापासून अलिप्त आहे. लॅचीचा वाढदिवस आहे आणि स्कॉटिश लोक अभिमानाने मिरवातात, ते ‘किल्ट’ तिनं आणलेलं आहे. त्यातली प्रत्येक  वस्तू एक एक जण लॅचीला वाढदिवसानिमित्त भेट म्हणून देतो. सगळे जण मिळून त्याला ‘हॅप्पी बर्थ डे टू यू’ म्हणतात. पण त्याचा ढिम्मपणा तसाच राहतो. ‘त्या किल्टच्या खाली तुम्ही लोक काय घालता?’ असा प्रश्न विचारला जातो तेव्हा कुठलाही स्कॉटिश या प्रश्नाचं उत्तर देणार नाही, असं तो सांगतो.
या प्रसंगानंतर तो आपलं मनोगत व्यक्त करतो. ‘तुमचं हे मला काहीच कळलं नाही. माझा मेंदू सुन्न झालाय. उगीचच्या उगीच मला कुणी काही छदामदेखील आजपर्यंत दिलेला नाही. तुम्ही आठवण केली नसतीत तर माझा हा वाढदिवस मलाही कळला नसता. तुम्ही दिलेलं हे किल्ट घेण्याचा मला काय अधिकार? घेतलं तर ऋण चढतं आणि परतफेड करायला माझ्याकडे काहीच नाही. मला अशी चूक करून चालणार नाही.’ सिस्टर मार्गारेट त्याला पुढे बोलूच देत नाही. सगळेजण त्याला किल्ट घालायचा आग्रह करतात, तेव्हा रेजिमेंटमध्ये मी परत जाईन तेव्हाच मी ते किल्ट घालीन, असा तो ठणकावून सांगतो आणि सगळ्यांचे आभार मानतो. ‘मी विसरणार नाही हा दिवस’ असं म्हणत लॅची खिशातून सिगारेटचे पाकीट काढतो. डिगरला एक देतो. दोघेही एक मस्त झुरका घेतात.
लॅची आता बदलला आहे. एखादा माणूस कसलीही अपेक्षा न करता एखाद्याचा मित्र बनतो, राहतो हे त्याला अजूनपर्यंत कधीच कळलं नव्हतं. त्यासाठी त्याला युद्धांत जखमी होऊन या इस्पितळात यावं लागलं. त्याला आता इतरांसाठी काही करायचं आहे. आपल्या स्कॉटलंडच्या बंगल्यात येऊन कितीही दिवस विनामोबदला राहण्या-जेवणासाठी तो सगळ्यांना आमंत्रण देतो. प्रत्येकालाच आपापल्या बायकोची ओढ लागलेली असते. ते त्याला पत्र पाठवायचं आश्वासन देतात. जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून आपल्याला पत्र येणार याचंही त्याला किती अप्रूप वाटतं! यॉक दुसऱ्या दिवशीच आपल्या घरी जाणार आहे. त्याच्यासाठी, आपला निर्धार मोडून किल्ट घालून फोटो काढायला लॅची तयार आहे. मार्गारेट लॅचीला, ‘तुमच्या सहवासाने मला फायदा झाला आहे’ असं म्हणते तेव्हा त्याला आश्चर्य वाटतं. तो तिला म्हणतो, ‘तुमच्याही नकळत तुम्ही मला खूप काही दिलं आहे. ते नक्की काय, ते मला सांगता यायचे नाही. पण काहीतरी नवीन. पूर्वी कधी अनुभवलं नाही असं. त्यामुळे तुम्ही दिसला नाही तरी तुम्ही खोलीबाहेर गेला, हे समजतं मला आपोआप. फार बरं वाटतं मला (तिचा हात हाती घेतो, ओठावर घट्ट ठेवतो. मग सोडून देतो.)’
मार्गारेट- (गोंधळून) ‘का केलंत हे?’
लॅची- ‘खरंच, हक्क नव्हता मला’ (क्षणभर मार्गारेट त्याला न्याहाळते. तो फारच पोरगेलासा दिसतो आहे. मार्गारेट त्याचा चेहरा दोन्ही पंजात धरते आणि त्याचं चुंबन घेते.)
मार्गारेट- ‘खरंच हक्क नव्हता.’ (पळून जाते) लॅच बॅगपाइप वाजवायला जातो, पण सगळे झोपलेले पाहून तो हळूच बॅगपाइप खुंटीला लावतो.
लॅची किल्ट, कॅप वगैरे घालून फोटो काढायला तयार आहे. टॉमी, यॉक वगैरे मंडळी किल्टच्या आत काय परिधान केलं जातं की नाही, याचा शोध लावण्याच्या खटपटीत आहेत. पण लॅची त्यांचा डाव यशस्वी होऊ देत नाही.
कुणी नाही, असं बघून लॅची तिला लग्नाची मागणी घालतो. ती होकारार्थी उत्तर देते. लॅचीला स्वर्ग दोनच बोटं उरतो. तो तिचा हात हाती घेतो आणि म्हणतो, ‘लग्न करणार तुम्ही माझ्याशी?’ मार्गारेट म्हणते, ‘तुम्हाला जरूर आहे ना माझी? नेहमीच पुढाकार घेतला पाहिजे का?’ लॅची किंचित नवखेपणानं तिचं चुंबन घेतो. मग एकदम तिला कवटाळून उचंबळत्या भावनांना वाट देतो. मग तिला दूर करतो आणि हाताच्या अंतरावर जाऊन म्हणतो, ‘माझी मॅगी.’
कर्नल कॉव वेब येतात. एकटय़ा लॅचीशीच बोलतात. त्याच्या मरणाविषयी त्याला खरं खरं सांगून टाकतात. वरिष्ठांची तशी आज्ञाच असते त्यांना. वॉर्डमधल्या सगळ्यांना आणि सिस्टर मार्गारेटलाही हे पूर्वीपासून ठाऊक असल्याचंही सांगतात. कर्नलनीच सगळ्यांना त्याच्याशी चांगलं वागायला सांगितल्याचं त्याला कळतं.
लॅची इस्पितळाचे कपडे घडी करून ठेवतोय. तो आता घरी चाललाय. सर्वावर तो कमालीचा चिडला आहे. आपल्यावरील दयेपोटी सर्वानी आपल्याशी मैत्री केली, अशी त्याची ठाम समजूत झाली आहे. ‘थोडा वेळच का होईना, इथं मैत्रीचा खरा अर्थ अनुभवायला मिळाला तुम्हाला’ असं मार्गारेट त्याला म्हणते, त्यावर तो उत्तरतो, ‘बरोबरीच्या माणसांवर प्रेम करण्यासाठी मरावं लागणार असेल मला तर कुणावर प्रेम न करता आणि कुणाच्या प्रेमाची अपेक्षा न ठेवताच मरेन मी. प्रेमाची फार जबर किंमत पडते आहे मला.’
मार्गारेट- ‘मी म्हणते लोक चांगले वागतात, याची कारणं कशाला हवीत कुणाला?.. निरोपाच्या या वेळी तुमचं चुंबन घेतलं मी- तर राग येईल तुम्हाला?.. मी तुमच्याशी लग्न करते म्हणाले, तेही तुमच्याविषयीच्या दयेपायी, असं वाटतं तुम्हाला?.. आता तुम्ही निघण्याच्या आत तुमच्याशी लग्न केलं मी, तर बदलेल तुमचं मन?’
लॅची- ‘नाही.’
लॅची चाललाय. जाण्यापूर्वी सगळ्यांबरोबर त्याचा फोटो काढायच्या गडबडीत सगळे आहेत. ब्लॉसम लॅचीला आपण तयार केलेली मण्यांची माळ देतो. लॅची रागाने ती माळ त्याच्याच अंगावर मारतो. लॅचीकडून निरागस ब्लॉसमचा असा अपमान झालेला पाहून यॉक चवताळतो. तो लॅचीला ताड ताड बोलतो. त्याला ऐकवतो, ‘तू कधी मरणार हे तुला आगाऊ कळलं नाही म्हणून तू भडकलास पण कुणाला कधी त्याचं मरण आगाऊ कळलं आहे? या ब्लॉसमला तर तुझ्याबद्दल काहीच माहीत नव्हतं आणि तू त्या भाबडय़ा जीवाची दोस्ती त्याच्या अंगावर भिरकावलीस! तू ऐक, तू मरणार हे फार उत्तम आहे. तुझ्या जातीची माणसं या जगात फार दु:खाला कारणीभूत होतात.’
लॅची म्हणतो, ‘तुम्ही माझा अपराध केलात हे कबूल केलंत तर इथं राहण्याचा विचार करीन मी.’
यॉक- ‘तुझ्या राहण्याची भीक नकोय आम्हाला जा. चालू लाग!’
त्याच्याकडे दुर्लक्ष करून सगळे फोटो काढायच्या तयारीला लागतात. लॅचीला हुंदका आवरता येत नाही. तो म्हणतो, ‘मला असं मरायचं नव्हतं.. मला इथं राहायचंय. त्यासाठी भीक मागायची असेल तर मागतो मी. याचना करतो.’
यॉक, मार्गारेट त्याला कपडे बदलून यायला सांगतात.
सगळे फोटो काढायला मार्गारेट सूचनेप्रमाणे उभे राहतात. वन, टू आणि तितक्यात लॅची संपूर्ण किल्ट परिधान करून येतो. ‘कुणाची हरकत नसेल तर राहू का मी फोटोत?’ सर्व स्तब्ध. यॉक त्याला मधोमध उभा करतो.
मार्गारेट कॅमेरात बघत असताना यॉक आपला बाहू लॅचीभोवती वेढतो. लॅची यॉककडे मान वळवतो. कुणी हसत नाही. पण हळूच आणि अगदी सहज लॅची हसू लागतो. तृप्तीचा एक उसासा टाकून ‘पोज’ घेतो. ‘वन, टू, थ्री दॅट्स इट’ टॉमीचं डोकं एकाएकी दिसेनासं होतं. तोखाली वाकला आहे. यॉककडे पाहून लॅची पुन्हा हसतो. आणि एकदम मोठी उडी मारून दोन्ही हातांनी किल्टचा मागचा भाग खाली ताणून धरतो.
लॅची- थांबा. कोण हा चावटपणा करतोय? (वळून टॉमीला सामोरा जातो. इतर पांगतात. टॉमी कॉटवर वाकलेला दिसतो.)
टॉमी- (मोठय़ाने खिदळत) मला सापडलं! मी पाहिलं! मला समजलं!    
असं हे नाटक संपतं, त्यावेळी प्रेक्षक भावव्याकूळ होत नाही. त्याला एका विलक्षण अनुभवाचा साक्षात्कार होतो. नायकांसाठी खोटी सहानुभूती निर्माण करण्याचा नाटककार किंचितही प्रयत्न करीत नाही. आणि तरीदेखील लॅचीच्या व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षक झपाटला जातो. लॅचीला विसरता येत नाही. मार्गारेट-लॅचीचा प्रणय प्रसंग म्हणजे नाजूक प्रेमभावनेचा तितकाच तरल आविष्कार आहे. इतर पात्रं दुय्यम असली तरी त्यांना त्यांचा-त्यांचा म्हणून एक हसता खेळता अवकाश नाटककराने निर्माण केला आहे. पाश्र्वभूमीवर वावरणारी ही दुय्यम पात्रं मूळ कथानकाला अधिकच धारदार करतात. कृष्ण सुखात्मिकेचं स्वरूप देतात. आपल्या देशाचा अभिमान व अन्य देशांविषयीची तुच्छ भावना हा सार्वत्रिक मनुष्यस्वभाव विनोदी पद्धतीनं प्रकट केला आहे. बॅगपाइपचे वादन, सिगारेटची देवाणघेवाण, नायक-नायिकेचे होकार-नकार नाटय़ात्मकतेला एक वेगळंच परिमाण बहाल करतात.
हे नाटक म्हणजे रंगसूचनांच्या अनुभवाचा एक अप्रतिम नमुना आहे. नाटकाचं पुस्तक वाचताना प्रत्यक्ष प्रयोगच मन:चक्षूपुढे उभा राहतो, तो त्या रंगसूचनांमुळेच. या रंगसूचना तेंडुलकरांच्या नाटकातील रंगसूचनांशी आपलं नातं जोडतात.
राज्य नाटय़स्पर्धा प्रारंभीच्या काळात आपल्या प्रेक्षकांत कुठल्या प्रकारची कलात्मक जाण निर्माण करीत होती, त्याचं हे नाटक उत्तम उदाहरण आहे. कुणीतरी आजची नाटय़संस्था या नाटकावरचा लोभ रंगमंचावर प्रकट करील काय?                    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नाटकबिटक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drama review new way of friendship
First published on: 10-11-2013 at 12:09 IST