संजय पवार
‘मुक्ता’, ‘फॅन्ड्री’, ‘सैराट’, ‘झुंड’, ‘मसान’, ‘जय भीम’, ‘आर्टिकल १५’, ‘काला’, ‘जयंती’, ‘जोशी की कांबळे’.. अशी आंबेडकरी विचारांची पेरणी करणाऱ्या चित्रपटांची संख्या एकीकडे वाढते आहे, तर दुसरीकडे उजव्या विचारसरणीच्या उन्मादी चित्रपटांचंही पेव फुटताना दिसतंय. ही ‘सांस्कृतिक लढाई’ सहिष्णुतेनं लढवली जाणार की टोळीयुद्धसदृश्य? हाच खरा प्रश्न आहे!
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर.. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि दलितांचे नेते!’
सर्वसामान्य (प्रसंगी असामान्य) भारतीयांना डॉ. आंबेडकरांची एवढीच ओळख असते.. जी शालेय पातळीवरच झालेली असते. त्यात शालेय वा महाविद्यालयीन शिक्षण फार काही भर घालते असं नाही. उलट, या माणसाने ‘रिझव्‍‌र्हेशन’ सुरू केलं आणि ‘मेरिट’ मातीत घातलं, असा एक सांस्कृतिक राग मनात साचलेला असतो. एकुणात सर्वसामान्य भारतीयांच्या आयुष्यात हा निळा कोटवाला बाबा ठरावीक वस्त्यांमध्ये दिसणाऱ्या अर्धपुतळ्याच्या आकाराइतकाच माहीत असतो. तेही ‘घटनेचे शिल्पकार कोण?’ या दोन मार्काच्या प्रश्नानिमित्त लक्षात ठेवावे लागल्याने!
असे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर गेल्या काही दिवसांपासून निवडणुकांपासून रूपेरी पडद्यापर्यंत सर्वत्र चर्चेचा विषय का बरं ठरू लागले आहेत? आणि ज्या व्यक्ती, समूह, पक्ष, संघटना हे नाव अग्रक्रमाने घेतील असं अपेक्षिलं नव्हतं, तेही यांचं नाव घेताहेत,आदरपूर्वक बोलताहेत!
सुरुवात ‘झुंड’ने केली. ‘झुंड’ सिनेमा प्रदर्शित होण्याआधी सोशल मीडियावर या सिनेमाच्या असंख्य लघु जाहिराती (टीझर्स) प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यातील एका जाहिरातीत आंबेडकर जयंतीचा देखावा आणि दस्तुरखुद्द अमिताभ बच्चन यांनी बाबासाहेबांना वंदन केल्याचे दृश्य होते. ‘झुंड’ची उत्सुकता होतीच. नागराज आणि अमिताभ बच्चन हे कॉम्बिनेशन, नागराजचा पहिलाच हिंदी चित्रपट, ‘झुंड’सारखं शीर्षक आणि रस्टिक संगीत यामुळे एक चैतन्य सर्वत्र पसरलेलं असतानाच आंबेडकर जयंतीचा हा प्रोमो व्हायरल झाला व तमाम आंबेडकरी जनतेत हर्षोल्हास पसरला. प्रतिक्रियांचा पाऊस पडू लागला. भारतीय सिनेमात प्रथमच आंबेडकर जयंतीचं चित्रण! अभिनेता जितेंद्र जोशीने तर महामानव व महानायक यांना एकाच फ्रेममध्ये आणल्याबद्दल नागराजचं जाहीर कौतुक केलं. ‘झुंड’च्या चर्चेत नागराज, अमिताभ यांच्या जोडीने आंबेडकर जयंतीही समाविष्ट झाली. सोशल मीडियावर तर उधाण आलं. बेलगाम सोशल मीडियावरच शेफारलेल्या कुणी म्हणू लागलं, ‘एवढं जर मागासवर्गाचं कौतुक होतं तर सवर्ण अमिताभला सिनेमात का घेतला?’ यावर हसावं की रडावं असा विचार करेपर्यंत याच माध्यमात किमान विवेक गुंडाळून बसलेले आणि आंबेडकरी विचारांची ठेकेदारी करणारे गल्लीबोळातले सुपारीबाज तर नागराजला कुठे ठेवू आणि कुठे नको म्हणत सरपटायलाच लागले. शेवटी नागराजलाच सांगावं लागलं की, ‘कलाकृती कलाकृती असते. ती तशीच पहा. तिला लेबल लावू नका. माझी स्तुती करत दुसऱ्याची निंदा करू नका. तेढ निर्माण होईल असं काहीही करू नका.’ नागराजला हे म्हणावं लागलं कारण तोवर ‘झुंड’, ‘पावनिखड’ आणि ‘काश्मीर फाईल्स’वरून टोळ्या तयार झाल्या होत्या आणि सिनेमाबा गोष्टींना ऊत यायला लागला होता. देशाच्या व विशेषत: महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक जीवनात प्रथमच हे असं विलगीकरण, ध्रुवीकरण दिसत होतं.
‘पावनिखड’च्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण व स्फुरण अपेक्षितच होते. पण या तापत्या तव्यावर काही संघटनांनी आपल्या विचारांची पोळी भाजून घेतली. हिंदूवी स्वराज्याची तुतारी फुंकताना यवनांच्या निंदानालस्तीनिमित्ताने योग्य तो संदेश योग्य ठिकाणी पोहोचवला गेला.
चित्रपटाच्या प्रदर्शनोत्तर प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांवर निर्माता, दिग्दर्शकाचा अंकुश नसतो, हे ‘झुंड’ व ‘पावनिखड’बाबत दिसून आलं. मात्र, ‘काश्मीर फाईल्स’बद्दल असं म्हणता येत नाही. तिथे निर्मितीपासून प्रदर्शनापर्यंत व त्यानंतरही प्रचाराचे विशिष्ट तंत्र वापरले गेले. आणि मग त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया यायला लागताच देशाचं लोकप्रिय नेतृत्वच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा घेऊन मैदानात उतरलं आणि थेट संसदेतच चर्चा छेडली गेली. आता अशा चर्चेत संविधानाचा उल्लेख अपरिहार्यच. आणि संविधानाच्या कुठल्याही कलमावर बोलताना ‘परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर..’ अशा सुरुवातीशिवाय चर्चा पुढे जाईलच कशी? आणि मग डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जणू ओलीस ठेवून दोन्ही बाजू एकमेकांना संविधान समजावताना आंबेडकरही समजवायला लागले!
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना स्पर्श करत त्यांच्या विचारांना अस्पर्शित ठेवायचं कसब सर्वपक्षीय राजकारण्यांना उत्तम साधतं. सध्या त्यात इतकी चढाओढ चाललीय, की काही दिवसांनी कुणाच्याही डोक्यावर ‘जय भीम’ लिहिलेल्या निळ्या टोप्या दिसायला लागल्या तर आश्चर्य वाटायला नको.
आता परवाचंच उदाहरण घ्या. मनसेच्या पाडवा मेळाव्यात राज ठाकरे भाषणाचा शेवट करताना म्हणाले, ‘यंदा १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती शिवजयंतीसारखीच जोरात साजरी करायची!’
का बरं करायची? मग इतकी र्वष का नाही केली? राज ठाकरे व मनसेचा कुठला विचार बाबासाहेबांशी जुळतो? बाबासाहेब महात्मा फुल्यांचा कुळवाडी भूषण शिवाजी मानायचे. त्यांना पुरंदरेंचे गोब्राह्मणप्रतिपालक शिवाजी महाराज कसे चालतील? महाराज गोब्राह्मणप्रतिपालक होते, तर ब्राह्मणांनी त्यांना राज्याभिषेकास का नकार दिला? बाबासाहेबांनी ब्राह्मणी जातीव्यवस्थेला नाकारत थेट हिंदू धर्माचाच त्याग केला. असे बाबासाहेब राज ठाकरे आणि मनसे कुठल्या विचारांवर स्वीकारणार? बाबासाहेबांची जयंती का साजरी करायची, याचे ठोस कारण राज यांनी जाहीरपणे दिलं असतं तर बरं झालं असतं.
तिकडे दिल्ली आणि पंजाबात सरकारी कार्यालयांत भगतसिंग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तसबिरी सर्व सरकारी कार्यालयांत लावणे बंधनकारक केले! भगतसिंग हे नास्तिक.. तर ‘रिडल्स’ लिहिणाऱ्या बाबासाहेबांना वंदन करून केजरीवाल ‘हनुमान चालीसा’ म्हणणार! काय चाललंय काय? प्रतीकांच्या लढाईतलं अपरिहार्य पात्र झालंय का डॉ. बाबासाहेब आंबेडकर?
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर हा एकेकाळचा ‘मूकनायक’ अचानक ‘महानायक’ म्हणून आमच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक जगतात एकदम धमाकेदार एन्ट्री करतो आणि परवलीचा शब्द बनून जातो! हे आत्ताच का घडतंय?
राजकीय अपरिहार्यता एक वेळ आपण समजू शकतो. आणि तसेही राजकीय पक्षांनी सर्व नेते, महात्मे वाटून घेतलेत. त्यांची पळवापळवीही चालू आहे. पण नाटय़-चित्रपट क्षेत्रातही आता उघड उघड ‘तुमचे आंबेडकर, तर आमचे सावरकर’, ‘तुमचे गांधी, तर आमचा नथुराम’! ‘तुमचा रामदास, तर आमचा तुकाराम’, ‘तुमचे नेहरू, तर आमचे पटेल’.. अशा छावण्या पडल्यात! त्यातही गंमत अशी की कलाकारांची होते गोची. छत्रपती शिवाजी व संभाजी या भूमिका करणारे डॉ. अमोल कोल्हे शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश करून थेट खासदार झाले. आणि आता त्यांनी नथुराम गोडसेची भूमिका केलेला चित्रपट येतोय म्हटल्यावर गदारोळच झाला. पक्षनेतृत्व पाठीशी उभं राहिलं खरं, पण खुलासे करून कोल्हेंची दमछाक झाली! त्यांना पार पापक्षालनसदृश्य कृती करावी लागली. समजा, डॉ. कोल्हे कुठल्याच राजकीय पक्षात नसते तर हा गदारोळ उठला असता का? नक्कीच झाला नसता! कारण सलग तीन सिनेमांत छत्रपती शिवाजी महाराज साकारणाऱ्या चिन्मय मांडलेकरने ‘काश्मीर फाईल्स’मध्ये थेट काश्मिरी पंडितांचा नरसंहार करणाऱ्या अतिरेकी बिट्टाची भूमिका साकारलीय. विशेष म्हणजे ‘पावनिखड’ आणि ‘काश्मीर फाईल्स’ एकाच वेळी चित्रपटगृहांत दाखवले जात होते. पण कुठेही निषेधाचा सूर नाही! कदाचित हे दोन्ही चित्रपट एकाच छावणीतून आले असल्याने त्यांनी लक्ष्य भरकटणार नाही याची काळजी घेतली असावी!
खरं तर ‘झुंड’च्या आधी ‘जय भीम’ या तेलगू सिनेमाने देशभरच्या आंबेडकर अनुयायी तसेच परिवर्तनाच्या लढाईतील सर्वाचे लक्ष वेधून घेतलं होतं. या संपूर्ण चित्रपटात कुणीच कुणाला ‘जय भीम’ म्हणत नाही की तशा घोषणा होत नाहीत. पण चित्रपट ज्या वकिलाची गोष्ट सांगतो, तो पडद्यामागचा वकील कम्युनिस्ट आहे, तरी ‘जय भीम’ हे त्याचं प्रेरक संबोधन आहे. चित्रपटाच्या शीर्षकात ते येणं ही सांस्कृतिक क्रांतीच ठरली.
कारण भारतीय चित्रपटांत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दखल मुख्य धारेतील चित्रपटांत, कथानकात वा पडद्यावरील दृश्यात पाश्र्वभागीही क्वचितच घेतली गेलीय. याची तपशीलवार माहिती राम शिंदे या दिल्लीस्थित मुक्त चित्रपट पत्रकार यांनी ‘द पिंट्र’ या वेब पोर्टलवर एक लेख लिहूनच दिलीय. जिज्ञासूंनी वाचावाच असा तो लेख आहे. ( https:// theprint. in/ opinion/lights-camera-caste-an ambedkar-photo-made-it-to-bollywood-after-38-yrs-of- independence/478068) आमचे मित्र व सामाजिक कार्यकर्ते आनंद भंडारे यांनी हा लेख निदर्शनास आणला आणि ते याच विषयावर एक चित्रप्रदर्शन वरळी बीडीडी चाळीत आंबेडकर जयंतीनिमित्त भरवत आहेत.
एका राष्ट्रीय महामानवाची कलामाध्यम कशी उपेक्षा करते यावर राम शिंदे प्रकाश टाकतात. आणि मग आपल्याला ‘जय भीम’ अथवा ‘झुंड’ चित्रपटाने नेमकं काय केलं हे समजून घेता येतं. ‘जय भीम’, ‘झुंड’च्याही आधी पा रनजिथ- ज्याने ‘काला’ दिग्दर्शित केला, त्याने जाणीवपूर्वक ‘काला’मध्ये बाबासाहेबांचा पुतळा आणि बुद्ध विहार हे कथानकाचे भाग केले. त्याचे म्हणणे, ‘हा बॅकलॉग भरून काढायलाच हवा.’ तो स्वत:ला प्रखर आंबेडकरवादी दिग्दर्शक म्हणवून घेतानाच ‘काला’सारख्या चित्रपटातून रजनीकांतला घेऊन योग्य तो मेसेज देतो.
चित्रपट माध्यमात या मूकनायकाची धमाकेदार एन्ट्री आज ठळकपणे चर्चिली जात असली तरी याची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची संपूर्ण चळवळ, कार्य, धर्मातर, वैचारिक लिखाण, आरक्षण, आत्मसन्मान यासाठीचा संघर्ष, लढाया, वैचारिक सामना यातूनच झाली. ६० च्या दशकातील दलित साहित्य, बौद्ध साहित्य, नंतरची दलित पॅंथर, दलित रंगभूमी यांतून या मूकनायकाचे बीजारोपण झाले. दक्षिणेत आधी पेरियार यांनी द्रविड चळवळीची पायाभरणी केली, तर उत्तर भारतात नंतर कांशीराम यांनी हा निळा कोटवाला बाबा ९० नंतरच्या दशकात विद्रोहासह सर्वदूर पेरला. मात्र, या सर्व काळात आजच्यासारख्या छावण्या नसल्याने तो विचारांच्या पातळीवरला सांस्कृतिक संघर्ष म्हणून स्वीकारला गेला.
विसावं शतक संपताना माध्यम क्रांतीने बाबासाहेब महाराष्ट्रापुरते सीमित न राहता भारतभर पोहोचले. आणि मग बाबासाहेब फक्त घटनेचे शिल्पकार, दलितांचे नेते एवढेच नाही राहिले. ते राजकीय, सामाजिक परिघातून बाहेर येत कला, साहित्य, नाटय़, चित्रपट या क्षेत्रांतही प्रेरक बनले. ‘जय भीम’ उघडपणे बोलले जाऊ लागले.
मूकनायकाने ज्यांना आवाज दिला, ते आता बोलू लागलेत. नायक बदलू लागलेत. विषय मांडू लागलेत. ‘मुक्ता’, ‘फॅन्ड्री’, ‘सैराट’, ‘झुंड’, ‘मसान’, ‘जय भीम’, ‘आर्टिकल १५’, ‘काला’, ‘जयंती’, ‘जोशी की कांबळे’, ‘रमाई’.. यादी वाढतेय. मात्र, वाढत्या छावण्या हा संघर्ष सहिष्णुतेनं न घेता ज्या पद्धतीने टोळ्यांनी अंगावर येतात ते पाहता देशाचं सोडा, पण महाराष्ट्राची सुधारकी परंपरा विसरून हा नवा सांस्कृतिक संघर्ष आम्ही सहिष्णुतेनं स्वीकारणार की सोशल मीडियासह समाजातही जल्पक टोळ्या तयार करून आम्ही पुन्हा मंबाजी आणि सावित्रीबाईंवर शेणगोटे मारणारेच पुनस्र्थापित करणार काय, हा प्रश्न आहे.
writingwala@gmail.com

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
narendra modi
बहुसंख्य हिंदू तर मांसाहारीच!
The Kerala Story triggering political drama in Kerala In Loksabha Polls 2024
‘द केरला स्टोरी’चा राजकीय आखाड्यात प्रवेश; केरळमधील वातावरण तापले; वाचा नक्की काय आहे प्रकरण!
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’