scorecardresearch

संज्ञा आणि संकल्पना : अतिपरिचयात अवज्ञा

‘हॅबिच्युएशन’ (Habituation) हे सवय होणं या संकल्पनेचं वैज्ञानिक नाव.

(संग्रहित छायाचित्र)
पराग कुलकर्णी

एका गावात एक प्रतिष्ठित भविष्य जाणणारा विद्वान राहत असतो. एके दिवशी तो आपल्या मुलांना बोलावतो आणि म्हणतो, ‘‘माझा शेवट आता जवळ आला आहे. येत्या काही दिवसातच माझा मृत्यू होईल. वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय, की माझा पुढचा जन्म हा गाढवाचा असणार आहे. समाजात मला, माझ्या विद्वत्तेला एवढा मान आहे, पण आता पुढच्या जन्मात मला उकिरडय़ावर राहावं लागणार आहे. देवाची हीच इच्छा आहे. पण तुम्ही एक काम करा- मी गेल्यानंतर बरोबर एका महिन्यानं मी आपल्या घराजवळच्या उकिरडय़ावर येईन. तेव्हा तुम्ही मला गोळी मारा आणि माझी त्या जन्मातून सुटका करा.’’

पुढे झालेही तसेच. तो विद्वान काही दिवसांतच मेला. बरोबर  महिन्याभरानं एक गाढव घराजवळच्या उकिरडय़ावर मुलांना दिसलं. ते बंदुकीचा चाप ओढून त्याला मारणार एवढय़ात ते गाढव म्हणालं, ‘‘अरे थांब, मला मारू नकोस. गाढवाचं आयुष्य खूपच छान आहे. डोक्याला काही ताप नाही. नुसतं खायचं, कुठंही लोळायचं, मस्त फिरायचं. मला आता हे आयुष्य जगू द्या.’’

आता या गोष्टीचं तात्पर्य म्हणजे कोणत्याही वाईट गोष्टींची, परिस्थितीची आपल्याला कशी लगेचच सवय होते, हे सांगणे. पण ‘सवय होते’ म्हणजे नेमकं काय होतं? आजच्या आपल्या संकल्पनेतून आपण हेच समजून घेण्याचा थोडा प्रयत्न करू.

‘हॅबिच्युएशन’ (Habituation) हे सवय होणं या संकल्पनेचं वैज्ञानिक नाव. एकच अनुभव जेव्हा मेंदूला वारंवार येऊ लागतो तेव्हा मेंदू त्या अनुभवाची आणि त्याला दिलेल्या प्रतिसादाची तीव्रता कमी करतो. यालाच ‘हॅबिच्युएशन’ म्हणतात. प्रत्येक क्षणी आपल्या मेंदूपर्यंत अनेक संदेश सतत पोहोचत असतात. आजूबाजूला ऐकू येणारे आवाज, दिसणाऱ्या गोष्टी, वास, त्वचेला होणारी जाणीव या सगळ्यांची माहिती मेंदूला सतत दिली जाते. पण या प्रत्येक माहितीचा स्वीकार करणं, तिचं विश्लेषण करणं आणि त्यानुसार कृती करण्यासाठी इतर भागांना संदेश पाठवणं मेंदूसाठी शक्य नाही आणि ते व्यवहार्यही  नाही. त्यामुळे या येणाऱ्या संदेशांना गाळणी लावून काही ठराविक संदेशांवर लक्ष केंद्रित करणं मेंदूला परवडतं. आपण आधी बघितल्याप्रमाणे ‘इनअटेंशनल ब्लाइंडनेस’ (Inattentional Blindness) अशीच एक गाळणी आहे, ज्याद्वारे काही संदेशांची जाणीव मेंदूला होत नाही आणि त्यामुळे काही अनुभव हे मेंदूपर्यंत पोहोचतच नाहीत. पण याचबरोबर अजून एक गाळणी मेंदूमध्ये असते, जी वारंवार येणाऱ्या अनुभवांना कसा प्रतिसाद द्यायचा, हे ठरवते. ही गाळणी म्हणजेच ‘हॅबिच्युएशन’! अशा वारंवार येणाऱ्या अनुभवाचा आपल्याला फार काही फायदा किंवा तोटा नाही असं जेव्हा मेंदूला जाणवतं तेव्हा मेंदू हळूहळू त्याला प्रतिसाद देणं कमी करतो आणि पुढे तर त्याची दखल घेणंही बंद करतो. यालाच आपण आपल्या भाषेत ‘गोष्टी सवयीच्या झाल्या’ असे म्हणतो.

‘हॅबिच्युएशन’ ही एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे आणि ती सगळ्या प्राण्यांमध्ये असते. खरं तर हा आपल्या शिकण्याचाच एक भाग आहे. चांगलं-वाईट किंवा फायदा-तोटा अशी लेबलं न लावताही जेव्हा आपल्या वागणुकीत बदल होतो (आपण ‘शिकतो’) त्याला  Non-Associative Learning म्हणतात. त्याचाच एक प्रकार म्हणजे ‘हॅबिच्युएशन’! पण सगळ्याच अनुभवांची आपल्याला सवय होते असं नाही. दोन अनुभवांमधलं वेळेचं अंतर, अनुभवांची वारंवारिता, त्यांची तीव्रता आणि त्यात होणारे बदल या घटकांवर सवय होणं वा न होणं अवलंबून असतं. त्याच त्याच गोष्टी, घटना, अनुभवांना मेंदू कंटाळतो आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करू लागतो. यासाठी सतत तो आपल्या आजूबाजूला जुनं काय आणि नवीन काय आहे, हे ठरवत असतो. जे जुनं, माहितीचं आहे त्यावर तो जास्त ऊर्जा घालवत नाही. नव्या गोष्टींना जास्त महत्त्व देऊन त्यांचं विश्लेषण करण्यावर त्याचा भर असतो. अर्थात हा प्रकार आपल्या उत्क्रांतीमधून विकसित झाला आहे; ज्याद्वारे हजारो बिनमहत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपला मेंदू सतत नवीन काही संकट तर येत नाहीये ना, हे तपासून बघू शकतो.

आपल्या रोजच्या आयुष्यात याची अनेक उदाहरणे आहेत. नवीन सुगंधी साबण, अगरबत्ती, अत्तर यांचा वास आपल्याला सुरुवातीचे काही दिवस येतो आणि नंतर तो वास येणं बंद होतं. शेजारच्या घरात काही काम चालू असेल तर त्याचा मोठा आवाज आपल्याला सुरुवातीला जाणवतो, पण जर ते काम दिवसभर तसंच चालत राहिलं तर थोडय़ा वेळात आपल्याला तो आवाज जाणवत नाही. लग्नानंतर नवऱ्याच्या किंवा बायकोच्या काही विशिष्ट गुण-अवगुणांचे कौतुक किंवा त्रास हा लग्न मुरल्यानंतर राहत नाही, हेदेखील याचेच उदाहरण. आयुष्यातल्या आनंदाची आणि दु:खाची तीव्रता काही काळाने कमी होते, यामागेही हेच कारण आहे. येणाऱ्या संदेशांना दिला गेलेला प्रतिसाद कमी होत जाणं म्हणजे ‘हॅबिच्युएशन’! तर याउलट, जेव्हा अशा संदेशांना दिलेला प्रतिसाद हा येणाऱ्या प्रत्येक नवीन संदेशासोबत वाढत जातो तेव्हा त्याला ‘सेन्सिटायझेशन’ (Sensitization) किंवा ‘संवेदीकरण’ म्हणतात. एखाद्या गोष्टीच्या अ‍ॅलर्जीमुळे दरवेळी होणारा आणि वाढणारा त्रास हे याचे एक उदाहरण. ‘अतिपरिचयात अवज्ञा’ म्हणजे हॅबिच्युएशन, तर ‘दुधाने तोंड पोळल्यावर ताकही फुंकून पिणे’ यामागची भावना म्हणजे ‘सेन्सिटायझेशन’!

पण ‘अतिपरिचयात अवज्ञा’ कधी कधी गंभीर स्वरूपाचे प्रश्नही उभे करते. एका गोष्टीत एका जिवंत बेडकाला उकळत्या पाण्यात टाकतात आणि तो उडी मारून पटकन् बाहेर येतो. नंतर त्याला सामान्य तापमानाच्या पाण्यात टाकतात, ज्यात तो आरामात पोहतो. मग तापमान हळूहळू वाढवत नेलं की तो बेडूक त्या पाण्यात राहूनच बदलणाऱ्या तापमानाशी जुळवून घेतो. पुढे या जुळवून घेण्यात आणि सहन करण्यात एक वेळ अशी येते, की त्या वाढलेल्या तापमानाशी जुळवून घेणं त्याला शक्य होत नाही आणि तिथून उडी मारून बाहेर पडण्याचं त्राणही आता त्याच्यात राहिलेलं नसतं. तो जिवंतपणीच पाण्यासोबत उकळला जातो आणि प्राण गमावतो. या काल्पनिक गोष्टीवरून अशा या जुळवून घेण्याला आणि सवय करून घेण्याला ‘बॉइिलग फ्रॉग सिन्ड्रोम’ (Boilog Frog Syndrome) म्हणतात. नवऱ्याकडून सतत शारीरिक आणि मानसिक अत्याचार होत असतानाही त्याच्या सोबतच संसार सुरू ठेवणाऱ्या बायका, एखाद्या क्रूर हुकूमशहाच्या पायाखाली चिरडली जाणारी आणि त्या अत्याचारांचं, अन्यायाचं विशेष काहीही न वाटणारी जनता आणि आपल्याला न आवडणाऱ्या नात्यात, नोकरीत किंवा इतर कोणत्याही परिस्थितीत अडकलेली माणसं म्हणजे ‘बॉइिलग फ्रॉग’च आहेत; ज्यांना त्या वाईट परिस्थितीशी जुळवून घेण्याची सवय लागलेली असते. अनेक सामाजिक प्रश्नांबद्दलची आपली अनास्था ही अशा प्रश्नांची सवय होण्यातूनच कदाचित येत असावी. हॅबिच्युएशन आणि सेन्सिटायझेशन हा आपल्या शिकण्याचा, स्वत:मध्ये बदल घडवण्याचा आणि जगण्याचाच एक भाग आहे. पण शेवटी कोणत्या गोष्टींसाठी आपण आपल्या संवेदनांची धार बोथट करतो आहोत (हॅबिच्युएशन) आणि कशासाठी वाढवतो आहोत (सेन्सिटायझेशन) याची जाणीव ठेवण्याची सवय आपल्याला स्वत:ला लावता आली म्हणजे झालं.

parag2211@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Extremely disobedient sadnya ani sankalpana article parag kulkarni abn

ताज्या बातम्या