राष्ट्रीय नाटय़ विद्यालयाला (N. S. D.) रामराम ठोकून मी पुण्याला परतले. दिल्लीला अरुणचे नाटय़शिक्षण चालूच राहिले; कारण शिक्षणक्रम आता तीन वर्षांचा झाला होता. आता मी अगदी एका वेगळ्या निर्मितीमध्ये गुंतले होते. ताईच्या (मधुमालती गुणे) दवाखान्यात मी अश्विनीला- विनीला जन्म दिला. ‘इंदिरा मॅटर्निटी होम’ हे माझे दुसरे माहेरच होते.
विनीच्या संगोपनात दंग असताना एक छानशी संधी चालून आली. फिल्म इन्स्टिटय़ूटमध्ये प्रथमवर्षीय विद्यार्थ्यांना अभिनयतंत्र आणि प्रात्यक्षिक आणि आवाज व शब्दोच्चारण नियंत्रण (speech and voice training) शिकवण्याची नोकरी! विषय माझ्या आवडीचे.. आणि ‘चित्रपट विद्यापीठ’ ही कर्मभूमी! आणखी काय पाहिजे? दिवसाचे दोन तास काय ते वर्ग घ्यायचे होते, तेव्हा विनीवर फारसा अन्याय होणार नव्हता. शिवाय मी नसताना तिचा ‘चार्ज’ घ्यायला आई आणि काकू या तिच्या दोन खंबीर आणि अनुभवी आज्या सज्ज होत्या. तेव्हा मी आनंदाने नोकरी पत्करली.
अभ्यासाची रूपरेषा ठरविण्याचे स्वातंत्र्य मला दिले होते. आकाशवाणी, बालरंगभूमी आणि विशेषत: नाटय़ विद्यालयामधील अनुभवाचा लाभ घेऊन मी अभ्यासक्रम बेतला. एन.एस.डी.मध्ये स्तानिस्लाव्हस्की या नाटय़धुरंधराचे तत्त्वसूत्र आम्ही विद्यार्थी कोळून प्यायलो होतो. समर्थ भूमिका वठवण्यासाठी ती भूमिका ‘जगली’ पाहिजे, हा त्याचा साधा मंत्र होता. त्या मंत्राचा आधार घेऊन मी एक सुलभ, पण विस्तृत असा अभ्यासक्रम योजला. त्यात तऱ्हेतऱ्हेच्या वैयक्तिक आणि सांघिक प्रात्यक्षिकांचा समावेश केला. तरल मुद्राभिनयाइतकेच भावपूर्ण आवाजाला महत्त्व आहे, हे होतकरू नटाने जाणून घेणे अगत्याचे आहे. संवाद पेश करताना स्वच्छ उच्चार, स्वरातील चढउतार, योग्य शब्दांवर आघात इ. गोष्टींचे त्याने भान ठेवले पाहिजे. कमावलेला आवाज हे नटाचे शस्त्र आहे.. आणि शब्द हे चलनी नाणे! जिभेला उत्तम व्यायाम म्हणून अधूनमधून संस्कृत सुभाषिते त्यांच्या गळी उतरवावीत का, असा विचार एकदा डोक्यात आला; पण सुरुवातीलाच त्यांना घाबरवायला नको म्हणून तो मी तात्पुरता स्थगित केला.
माझ्या वर्गात आठ-दहा विद्यार्थी होते. मी त्यांची ‘दीदी’ बनले. ‘ताई’ची ‘दीदी’ झाले.
माझे काही होनहार विद्यार्थी आठवतात. जलाल आगा. सुप्रसिद्ध विनोदी नट आगा यांचा मुलगा. उच्च शिक्षण झालेला, हुशार, मिश्किल आणि महाद्वाड. एकसारखे काही ना काहीतरी करून वर्गाला आणि मलाही तो हसवायचा. एकदा मी मुलांना एक उतारा लिहून घ्यायला सांगत होते. मधला मजकूर गाळायचा होता. तेव्हा मी म्हटलं, ‘या वाक्यानंतर काही टिंबे टाका. म्हणजे काही भाग गाळला आहे, हे लक्षात येईल.’ हात वर करून जलाल उभा राहिला. गंभीर चेहरा करून त्याने विचारले, ‘दीदी, किती टिंबं टाकायची?’ एकदा मी त्याच्यावर फारच रागावले. त्याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्याचे ठरवून त्याच्याकडे अजिबात न पाहता मी वर्ग घेऊ लागले. दोन दिवसांच्या या उताऱ्यानंतर तो मला भेटला आणि म्हणाला, ‘मला रागवा, उभे करा; पण प्लीज, माझ्याकडे दुर्लक्ष करू नका. नटाला ती फार कठोर शिक्षा आहे. मी यापुढे शिस्त पाळीन.’ त्यानंतर दोन-चार दिवस तो बरा वागला.
साधू मेहेर हा उडिसाचा विद्यार्थी अतिशय सालस आणि अभ्यासू होता. त्याचा चेहरा हसरा आणि बोलका होता. पण त्याची वाणी जन्मत:च सदोष होती. जीभ जड आणि ओठ जाड असल्यामुळे त्याचे शब्द ओठांपाशी अडखळत. त्याच्यावर मी खूप मेहनत घेतली, पण फारसा उपयोग झाला नाही. साधूने पुढे श्याम बेनेगलच्या ‘अंकुर’ सिनेमात शबानाच्या नवऱ्याची भूमिका केली. शूटिंगचे पहिले दोन दिवस त्याच्या संवादापायी खूप झटापट चालली. अखेर त्याला मुकाच दाखवावा अशी नामी युक्ती निघाली. आणि गंमत म्हणजे साधूला त्यावर्षीचा ‘सर्वोत्तम नट’ म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
महापात्रा हा उडिसाचा दुसरा विद्यार्थी. अभिजात विनोदमूर्ती. त्याला अभ्यासात फारसा रस नव्हता. हिंदी रजतपटावर विनोदी नट म्हणून नाम कमवायचे, एवढीच त्याची महत्त्वाकांक्षा होती. त्याप्रमाणे तो चित्रपट, टेलिव्हिजन आणि जाहिरातपटांमध्ये पुढे पुष्कळदा दिसला. पण त्याचा कल अतिरेकाकडे असल्यामुळे म्हणावे तितके त्याचे नाव झाले नाही. त्याचे नैपुण्य आणि योग्यता यांचे माझ्या मते चीज झाले नाही.
रेहाना सुलतान ही वर्गातली एक गुणी मुलगी होती. दिलेला पाठ ती चोख करीत असे. पण मला तिच्यात कधी खास अशी चमक आढळली नाही. ती चमक पुढे दिसली तिच्या ‘दस्तक’मधल्या नायिकेच्या भूमिकेत! फारच समजूत आणि संयमाने तिने ती भूमिका केली. दिग्दर्शक इशारा यांच्याशी निकाह लावून तिने आपल्या कलाजीवनाला अलविदा केले.
दुसरी वर्गात मुलगी होती आभा धूलिया. आसामची. हिंदी फार कमी आणि इंग्रजी अजिबात येत नाही- अशी तिची अडचण असल्यामुळे ती दबून दबून असे. पण तिचा प्रयत्न अखंड चालू असायचा. तिने पुढे पुष्कळ आसामी चित्रपटांतून काम केले.
राकेश पांडे हा गुणी, सालस मुलगा वर्गात उठून दिसायचा. त्याचा अभिनय सहजसुलभ असे. याची साक्ष बासू चटर्जीच्या ‘सारा आकाश’मध्ये त्याच्या नायकाच्या भूमिकेत पटते. तो सध्या भोजपुरी सिनेमांत ‘सुपरस्टार’ आहे. मध्यंतरी राकेश माझ्याबरोबर एका चित्रपट ज्यूरीवर होता.
अरुण चढ्ढा हा पुणेरी पंजाबी विद्यार्थी आठवतो. त्याने पुढे अगदी वेगळ्याच क्षेत्रात काम केले आणि चांगला जम बसवला. आणखीही एक-दोनजण माझ्या वर्गात होते; पण त्यांची नावे आता आठवत नाहीत. दहापैकी माझ्या सहा विद्यार्थ्यांनी नाव कमावले याचा मला अभिमान वाटतो. त्यांच्यात उपजतच कलागुण असल्यामुळे त्यांना यश मिळाले. त्यात माझा काही हातभार होता असा दावा मी करीत नाही.
वर्गामधल्या साऱ्या मुलांशी माझे छान दोस्तीचे, मायेचे संबंध होते. एक तर आमच्या वयामध्ये तसे फारसे अंतर नसल्यामुळे एखाद्या बुजुर्ग शिक्षिकेपेक्षा त्यांना मी खरोखरच त्यांची ‘दीदी’ वाटत असे. विनीच्या पहिल्या वाढदिवसाला सगळ्यांनी मिळून तिला एक भलीथोरली (तिच्यापेक्षा मोठी) बाहुली भेट दिली. मी त्यांना शानदार पार्टी दिली.
इन्स्टिटय़ूटमधल्या पुष्कळजणांनी शिकत असतानाच पुढची वर्णी लावली- किंवा त्यांची वर्णी लागली, असेही म्हणता येईल. राज कपूर एकदा आमच्याकडे पाहुणे म्हणून आले होते. त्यांनी शैलेन्द्र सिंहचा काही कार्यक्रम पाहिला आणि सरळ त्याला ‘बॉबी’साठी ऋषी कपूरची गाणी म्हणायला निवडले. हृषिकेश मुखर्जीना त्यांची गुड्डी इथेच सापडली. जया भादुरी. श्याम बेनेगलनी शबाना, नसीर आणि ओम पुरीला इन्स्टिटय़ूटमधूनच उचलले. नटांच्या खेरीज या संस्थेने भारतीय सिनेसृष्टीला किती दिग्दर्शक व तंत्रज्ञ दिले आहेत, त्याची मोजदाद नाही. मणी कौल, कुमार शाहनी, अडुर गोपालकृष्णन, सईद मिर्झा, सुभाष घई, केतन मेहता, विदू विनोद चोप्रा, गिरीश कासारवल्ली या आघाडीच्या दिग्दर्शकांनी आपल्या ‘अ‍ॅल्मा मेटर’चे नाव उंचावले. कॅमेरा विभागाने पण असंख्य तंत्रनिपुण छायाकार इंडस्ट्रीला दिले. के. के. महाजन, संतोष शिवन, अनिल मेहता, महेश अणे, वीरेन्द्र सैनी अशी काही नावे घेता येतील. संकलनाची (एडिटिंग) दीक्षा घेतलेले विद्यार्थी बाहेर पडल्यावर दिग्दर्शनाकडे वळल्याची काही उदाहरणे आहेत. संजय लीला भन्साळी, डेव्हिड धवन, ‘थ्री इडियट्स’ प्रसिद्ध राजकुमार हिरानी ही नावे आठवतात. एडिटर म्हणून गाजलेली एक महिला रेणू सलुजा आपल्या अल्प जीवनकाळात खूप काम करून गेली. ध्वनिनियंत्रणाचा अभ्यासक्रम पार केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये रसूल पुकुट्टीने ‘स्लम डॉग’साठी थेट ऑस्कर पटकावून विक्रम नोंदवला. हितेन घोष, सुधांशु श्रीवास्तव आणि नरेंद्र सिंह ही आणखी काही मातब्बर नावे. सुधांशु आणि नरेंद्र सिंह यांनी माझ्या सर्व चित्रपटांचा ‘आवाज’ सांभाळला. अशा अनेक तंत्रज्ञ मंडळींनी फिल्म इन्स्टिटय़ूटचा झेंडा उंच फडकवला. संस्थेची कीर्ती ऐकून चित्रपटसृष्टीमधल्या अनेकांनी आपापली मुले शिकायला तिकडे धाडली. मोहन सहगल, प्रसिद्ध चरित्र अभिनेते मुराद आणि प्रसिद्ध (की कुप्रसिद्ध?) खलनायक जीवन ही काही नावे सांगता येतील.
फिल्म इन्स्टिटय़ूटमध्ये आता दूरदर्शनचेसुद्धा शिक्षण सुरू झाले. त्याची तयारी म्हणून आधीपासूनच संस्थेचे नाव बदलून ‘फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’ करण्यात आले होते. ‘भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन संस्थान’! दुर्दैवाने आता गुणी, मेहनती आणि ध्येयप्रेरित मुलांच्या जोडीने काही थोडी टवाळखोर मुले संस्थेत शिरलीत. विद्यार्जन करण्यासाठी नाही, तर एक अखंड पिकनिक मनवण्यासाठी ती येऊन ठेपली आहेत की काय, असा प्रश्न पडावा. होस्टेलमध्ये अमली पदार्थ, दारू यांचा रतीब सुरू झाला. तासांना सतत गैरहजेरी, वरिष्ठांशी उद्दामपणा हा नित्यक्रम होऊन बसला. गंमत म्हणजे आजमितीला अद्याप  सात-सात वर्षे जागा अडवून बसलेले काही महाभाग विद्यार्थी आहेत. उत्तीर्ण होण्यासाठी सादर करण्याचा प्रोजेक्ट देण्यासच ते राजी नाहीत. कदाचित या प्रवृत्तीच्या समर्थनासाठी काही मनोवैज्ञानिक कारणे सांगता येतील. भविष्याबद्दल अनिश्चिती, स्वच्छंद, बेजबाबदार, मुक्त जीवनाची जडलेली सवय किंवा निव्वळ व्यावहारिक सोय. मामला गुंतागुंतीचा आहे. सईद मिर्झा हे सध्याचे एफ. टी. आय. आय.चे चेअरमन. ते स्वत: या संस्थेचे पदवीधर आहेत. या ‘हात-पाय पसरलेल्या’ घोडस्नातकांबाबत ते काही तोडगा काढू शकतात का, ते पाह्य़चे. असो. हे थोडेसे विषयांतर.. संस्थेबद्दल मला वाटत असलेल्या पोटतिडकीमुळे केले.
पुन्हा ‘फ्लॅशबॅक’मध्ये जाऊ या. ज्या परिसरात प्रभात चित्रचा सुवर्ण-इतिहास घडला, त्या ‘जादूई चित्रनगरी’मध्ये मला घडवण्याची आणि स्वत: घडण्याची संधी मिळाली, हे मी एक वरदानच मानते. माझे दिवसाचे काम संपले की मी त्या वातावरणात हरवून जात असे. फिल्म इन्स्टिटय़ूटच्या फाटकातून आत शिरले की एका वेगळ्याच दुनियेत प्रवेश केल्याचा प्रत्यय येतो. समोरच दिसतो तो भोवताली छानसा पार असलेला बोधीवृक्ष- विझडम ट्री! या झाडाची एवढी कीर्ती झाली आहे, की आलेला पाहुणा ‘आधी विझडम ट्री दाखवा!’ अशी मागणी करतो. या झाडाच्या आसऱ्याने कितीएक बौद्धिके, चर्चा, वादविवाद, गप्पाटप्पा आणि प्रेमालापसुद्धा घडले असतील! रस्त्याने पुढे चढ चढून गेले की अगदी मागच्या बाजूला एक छोटेखानी जंगल आणि त्याला लागून एक प्रचंड पडिक हौद दिसतो. या हौदाला विद्यार्थ्यांनी नाव दिले आहे- ‘शांताराम पॉण्ड.’ कंपाऊंडला लागूनच लॉ कॉलेज टेकडी सुरू होते. इन्स्टिटय़ूटमध्ये घडणाऱ्या गूढरम्य इतिहासाला ती वर्षांनुवर्षे साक्ष म्हणून उभी आहे.
माझी प्रा. सतीश बहादूर यांच्याशी ओळख होणे, ही एक पर्वणी होती. चित्रपट हा त्यांच्या अभ्यासाचा व ध्यासाचा विषय होता. रंजक माहिती आणि समर्पक दाखले यांनी ओतप्रोत भरलेली त्यांची व्याख्याने म्हणजे एक ओघवती ज्ञानगंगा असे. कितीतरी वेळा त्यांच्या व्याख्यानांचा तुडुंब आनंद मी अनुभवला आहे. सत्यजित रे हे त्यांचे श्रद्धास्थान होते. आपल्या मुलाचे नाव त्यांनी ‘अपूर संसार’वरून ‘अपूर्व’ ठेवले. पी. के. नायर हे दुसरे ज्ञानी पुरुष! सिनेमाचा चालता-बोलता ज्ञानकोश! त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि प्रयत्नांमुळेच ‘राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय’ (National film Archives of India) उभे राहिले आणि पुढे भरभराटीला आले.
इन्स्टिटय़ूटच्या ग्रंथालयात वेळ कसा जातो, ते कळत नसे. ‘सिनेमा- तंत्र आणि इतिहास’ यावर मी तिथे खूप वाचून काढले. मुख्य म्हणजे एकसे एक सरस अशा संहिता, पटकथा मला तिथे वाचायला मिळाल्या. या पटकथांचे वाचन आणि त्यांच्यावर मनन हा एक मोठा अभ्यासच होता. तो माझ्या पुढच्या कारकीर्दीत फार मोलाचा ठरला. माझी पटकथा ही माझ्या सिनेमाची जमेची बाजू आहे, हे मी नेहमीच म्हणते.
वाचनाखेरीज प्रत्यक्ष दिग्गज दिग्दर्शकांचे चित्रपट पाहणे, हाही अनुभव रोमांचकारी होता. विद्यार्थ्यांसाठी सतत निवडक सिनेमे दाखवले जात. जवळजवळ रोज असे जगभर गाजलेले मास्टरपीसेस पाहण्याच्या परिपाठामुळे अंतोनियोनी, फेलिनी, बर्गमन, कुरुसावा ही मंडळी ओळखीची वाटू लागली.
अशा समृद्ध, उत्तेजक आणि सळसळत्या वातावरणात कोरडे राहणे शक्यच नव्हते. मला सिनेमाची लागण झाली. पुढे-मागे त्या क्षेत्रात काहीबाही करण्याची तमन्ना मनात उभारली. पुढे अनेक वर्षांनी ती तमन्ना पुरी झाली. मी ‘स्पर्श’, ‘चष्मेबद्दूर’, ‘कथा’, ‘पपीहा’, ‘दिशा’, ‘साज’ असे चित्रपट बनवले. मला नेहमी हटकून विचारले जाई-
‘तुम्ही चित्रपट शिक्षण कुठे घेतले?’
‘फिल्म इन्स्टिटय़ूटमध्ये.’
‘अच्छा ऽऽ! तिथे शिकत होता?’
‘नाही, शिकवत होते!’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Film institute of india
First published on: 02-02-2014 at 01:01 IST