लोकसभा निवडणुकांपूर्वी आरक्षणाच्या राजकारणावर जोरदार धुरळा उडाला होता. अशात शंभर वर्षांपूर्वीचे ‘आमची जात’  हे पुस्तक वाचनात आले. लेखक गणपतराव भिवाजी बैताडे ऊर्फ जी. बी. नाईक. पुस्तक १९१६ सालचे. हे पुस्तक का लिहिले, याचा खुलासा करताना ते म्हणतात, शाळेत असताना इतिहास हा आवडता विषय असल्याने आपल्या जातीसंबंधी माहिती समजून घेण्याची जिज्ञासा उत्पन्न झाली. १८७९ मध्ये त्यांनी या शोधाला सुरुवात केली. आपल्या जातीतल्या निरनिराळ्या प्रांतांतल्या लोकांना पत्रे पाठवून, वर्तमानपत्रात जाहिराती देऊन आपल्या जातीसंबंधी माहिती देण्याची विनंती केली. त्यांनी स्वत: अनेकांना भेटून, जुनी कागदपत्रे बघून, पुराणकथा/ दंतकथा पडताळून पाहिल्या. या खटाटोपात समाजाच्या चेष्टेचाही विषय व्हावे लागले. परंतु त्यांच्या या ‘हेतू’चे बऱ्याच नामवंतांनी कौतुक केले व पुस्तकावर अनुकूल अभिप्राय दिले. त्यांत न. चिं. केळकर, गो. स. सरदेसाई, करवीर पीठाचे शंकराचार्य आदींचा समावेश आहे. यापैकी केळकर आणि सरदेसाई यांचे अभिप्राय कौतुकपूर्ण, तर शंकराचार्याचाो४ल्लिंेील्ल३ं’्र२३  स्वरूपाचा होता. लेखकाची हा खटाटोप करण्यामागची भूमिका स्वत:ला हलक्या जातीचे गवंडी, सुतार इ. समजणाऱ्यांनी आपण मूळचे क्षत्रिय आहोत हे जाणून त्याला साजेसे स्थान पुन्हा मिळण्यासाठी विद्याध्ययन करावे, हे प्रतिपादन करणे, ही होती. अनेक कागदपत्रे, रीतिरिवाजांची छाननी, कुलदैवते आदी माहिती तपासून लेखकानं असा निष्कर्ष काढला की, ‘रजपूत व मराठे या दोन जातींचे मूळ स्थान एकच आहे. या दोन जातींची तुलना केली तर त्यांच्यातील बहुतेक चालीरीतींवरून त्यांच्यात पुष्कळ साम्य असल्याचे दिसून येते.’ रजपूत, मराठे हे मूळचे क्षत्रिय. मुस्लीम आक्रमणानंतर रजपूत दक्षिणेस (महाराष्ट्र व गुजरात) पसरले. त्यांच्यात व्यवसायानुसार अनेक जाती आल्या व व्यवसाय, तसेच क्वचित गावावरूनही त्यांना नावे पडली. गुजरातमधील मारू, वाघेला, सोळंकी हे मूळचे क्षत्रिय आहेत. आज ही आडनावे धारण करणारे स्वत:ला मागास अनुसूचित जातींचे मानतात. हे प्रतिपादन करताना लेखकाने पुराणकथांपासून सुरुवात केली आहे. परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय केली, इ.पासून ते रजपूतांच्या पुढे शंभर शाखा कशा झाल्या, त्याची कुलदैवते कोणती, त्यांना यज्ञोपवीताचा अधिकार होता की नाही, इ. तपशील त्यांनी दिला आहे.
पुस्तकातील विवेचनाचे मुद्दे अनुक्रमणिकेत आढळतात. जगद्उत्पत्ती, क्षत्रिय वंश,  क्षत्रिय कुळे, राज्यक्रांतीमुळे होणारे फेरफार, मुसलमानांच्या अमदानीत रजपुतांचा छळ, अत्याचाराचा परिणाम,  रजपूत ही एक जात,  राजकुमार, कुमार आणि कुमावत,  दक्षिणेत आलेले रजपूत,  पुनश्च ऐक्य,  समाजातील काही वहिवाटी, नथ का नाही, आम्ही रजपूत आहोत, कुले, कुलदेवी व आडनावे,  आमच्या चालीरीती, पाचवी षष्ठीपूजन, सोयरीक अथवा सगाई, विवाहपद्धती, ऋतुदर्शन, बारसे, पुनर्विवाह, चौधरी/ पटेल/ शेटे/ सरपंच/ पांडय़ा/ भाट/ न्हावी/ लोकसंख्या/  जातीपंचायतीचे साधारण स्वरूप सभा, इ.
प्रस्तावनेत लेखकांनी आपण फारसे शिक्षित नाही, असे म्हटले आहे. परंतु ग्रंथकर्त्यांचे कुलवृत्त शार्दूलविक्रीडित वृत्तात दिले आहे. आज शंभर वर्षांनी हे पुस्तक वाचताना मनात अनेक प्रश्न उपस्थित होतात. शंभराहून अधिक वर्षांपूर्वी जेव्हा दळणवळणाची, लेखनाची, संपर्क साधण्याची व वाचनाची साधने फार तुटपुंजी असताना पदरमोड करून स्वत:च्या जातीचा शोध घेण्याच्या या वृत्तीचे, धाडसाचे, चिकाटीचे कौतुक वाटते.
आपली जात हलकी नाही, तर आपण क्षत्रिय वर्णाचे आहोत, हे सिद्ध करण्यासाठी शंभर वर्षांपूर्वी एखाद्याने एवढे पैसे, वेळ खर्च करावा, हे जात कशी मूलभूत प्रेरणांपैकी आहे, हे दर्शविते.
गंमत म्हणजे आजही कुलवृत्तांत आणि कुलसदस्यांची स्नेहसंमेलने भरतात. म्हणजे एकीकडे आम्ही जातपात मानत नाही म्हणायचे आणि दुसरीकडे एकाच आडनावाच्या कुटुंबांची संमेलने भरवून कळत-नकळत आपल्या श्रेष्ठत्वाची भावना जोपासायची.. हे आज शंभर वर्षांनंतरही चालू का राहते?
सगळय़ात महत्त्वाचे असे की, बैताडे यांनी मांडलेल्या सिद्धांताची फेरतपासणी कुणी केली होती की नाही? समजा, बैताडेंनी जे प्रतिपादन केले त्याला पुष्टी मिळत असेल तर आज जी अनेक आडनावे अनुसूचित जाती-जमातींमध्ये समाविष्ट केलेली दिसतात, ती तशी काढून टाकावी का? आणि तसे झाले तर त्यांना मिळालेल्या सवलतींचे काय करायचे? आणि मराठे व रजपूत दोन्ही क्षत्रिय असतील तर मराठय़ांची आरक्षणाची मागणी कितपत ग्राह्य आहे? त्यावेळी झाले की नाही माहीत नाही, पण या पुस्तकातल्या सिद्धांतचे पुनर्मूल्यांकन आज तरी निश्चितपणे व्हायला हवे.       
‘आमची जात’- गणपतराव भिवाजी बैताडे (प्रकाशन- १९१६)
-मुकुं द वझे 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Forgotten books amchi jat
First published on: 01-02-2015 at 02:47 IST