समीर गायकवाड

गावात पूर्वी कुणाच्याही दारापुढं लग्नाचा मंडप असला, की त्यात ठरावीक दृश्यं दिसायची.. लग्नघराच्या दरवाजाच्या दोन बाजूस रंगवलेले भालदार-चोपदार, घडय़ा पडलेल्या, अधूनमधून बारीक ठिगळे लावलेल्या चकाकत्या कापडाच्या कनाती, गोंगाटसदृश आवाज करणारे भोंगे, मंडपाच्या छतातून डोकं वर काढणारे ओबडधोबड वासे, त्यातल्याच एखाद्या वाशाला बांधलेलं देवक ठरलेलं. मांडवात याखेरीज गलका करणारी खंडीभर पोरं असत, ज्यातल्या कैकांच्या अंगावरचे कपडे ‘अंगापेक्षा बोंगा मोठा’ या छापाचे असत. पोरांच्या कालव्यात कुलवऱ्यांचा कलकलाट भर टाकी. लालगुलाबी शालवजा चादर अंगावर पांघरलेला, कुंकवावर चमकीचा मळवट भाळी भरलेला नवरदेव हाती कटय़ार घेऊन दिसे. तर लग्नघरातल्या एखाद्या अंधारलेल्या खोलीत हिरव्यापिवळ्या साडीवर पांढरं शुभ्र व्हलगट पांघरून बसलेली नवरी दिसे. परसदार मोठं नसलं, तर अंगणातच एखादा सारवलेला कोपरा बळकावून अख्खा मुदपाकखाना थाटला जाई. तिथली पातेली इतकी मोठी असत, की त्यात बसून राखुंडी लावून घासली जावीत! दगडांच्या चुलीवरच्या कढया, वगराळे, पंचपाळे, वावभर लांबीचे उलथणे, पळ्या, भातवाडय़ा अशी सामग्री पडलेली असे. गावातलाच कुणीतरी पाककलाप्रवीण पुरुष आचारी म्हणून तिथं असे, जो तेलकट झाक असलेला लाल-काळ्या रंगाचा लोखंडी झाऱ्या हातात घेऊन बुंदी पाडताना दिसे.

lokjagar bjp forgets promise of creating separate vidarbha state
लोकजागर : एका ‘मागणी’चा मृत्यू!
survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
Martand Sun Temple, Kashmir
विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?

याशिवाय आणखी काही साचेबंद गोष्टी सर्वत्र होत्या. त्या म्हणजे वरमाईचा ताठा, वधूपित्याचा दीनवाणा अवतार, अकारण गुर्मी दाखवणारे नवरदेवाचे ‘मतर’, निळ्या शाईच्या मार्किंगसह कंपनीचा जाहिरातवजा मजकूर स्पष्ट दिसणारं नवंकोरं धोतर-सदरा नेसलेले सोयरे धायरे, इकडून तिकडं ये – जा करत आपल्या दागिन्यांचा अन् चकाकत्या शालूचा टेगार मिरवणाऱ्या ढालगज नटव्या, ‘नवऱ्यामुलीस मामाने लवकर मांडवात आणावं’ याचा एकसारखा हाकारा करणारे तुंदिलतनु भटजीबुवा आणि आपल्याच घरचं लग्न असल्यागत गावगन्ना येईल त्याच्यावर आपली छाप पाडण्यात व्यग्र असलेले काही फुकटचंबू आप्तेष्ट हे ठरलेले असत. या सर्वाशिवाय आणखी एक समान धागा गावाकडच्या लग्नात असे तो म्हणजे- नारायण धडे!

लग्नमंडपाच्या कोपऱ्यात कुठेतरी एखादी सतरंजी, नाही तर जाजम अंथरलेलं असे. लग्न मोठय़ाघरचं असलं, की सतरंजीऐवजी खुच्र्या असत. जेवणावळी उरकल्या, की इथं बैठक बसलेली दिसे. आजूबाजूची प्रतिष्ठित म्हातारीकोतारी माणसं गराडा घालून बसलेली दिसत. गप्पांचा फड जसजसा रंगत जाई तसतशी भोवतीची गर्दी वाढे. या गर्दीच्या मधोमध धडे मास्तर असत. त्यांच्या एका हातात अडकित्ता अन् दुसऱ्या हातात सुपारीची खांडे. सुपारी कातरत तिचं वाटप करत त्यांच्या तोंडाचा पट्टा सुरू असे. गप्पांचा विषय अर्थातच गावकी आणि भावकीचा! कुणाच्या घरी काय भानगड झाली इथपासून कुणी दुसरी बायको केली, कुणी बायकोला माहेरी सोडलं, कुणी काडीमोड घेतला, कुणाच्या घरची पोर न्हातीधुती झाली, कोण हुंडय़ासाठी अडून बसलं, कुणी कुणाचे पाय धरले, कुणाची फजिती झाली, कुणाचा बेंडबाजा वाजला, कुणाच्या बायकोनं नांदणं सोडलं.. अशा सगळ्या गप्पा असत. मध्येच ‘दे टाळी’चा गजर होई, ‘ये बाब्बाव’चा पडघमही घुमे.

धडे मास्तर म्हणजे अवलिया माणूस. एक चालते-बोलते वधू-वर सूचक केंद्रच! सोयरिकी जमवणे हा त्यांचा छंद नव्हे, ध्यास होता. त्यामुळंच गावात लग्न होतंय अन् त्याची पत्रिका नारायण मास्तरांना दिली नाही असं कधी होत नसे. गावातल्या झेडपीच्या शाळेत गेली दोन दशकं टिकून असलेले ते एकमेव मास्तर होते. त्यांच्या बदलीची कुणकुण जरी लागली तरी बेरकी मंडळी पुढाऱ्यांच्या धोतराचा कासोटा धरून बसत आणि ‘अजून अमक्या तमक्याच्या अंगाला हळद लागेपर्यंत तरी मास्तरांना राहू द्यावं’ यासाठी गळ घातली जाई. तेव्हा नियमांची अंमलबजावणीही कठोर होत नव्हती. धडे शिक्षक म्हणून गावात रुजू झालेले आणि गावाचे जावई झालेले. यामुळे गावाचा त्यांच्यावर विशेष जीव. शाळेतली पोरंटोरंदेखील त्यांच्यावर फिदा असत. मराठीचे हे मास्तर प्रसंगी गणितापासून इतिहासापर्यंत सगळे विषय शिकवत. कधी शिपाई आला नाही, तर त्याचीही कामं करताना शाळेच्या भोवताली लावलेल्या झाडाझुडपांना पाणी घालण्यात कमीपणा मानत नसत. डबा न आणलेल्या एखाद्या कास्तकाराच्या पोरास आपल्या तीनताळी डब्यातलं धिरडं, पिठलं देत. हे रोजच होई. त्यासाठीच जास्तीचा डबा आणणारे धडे मास्तर जितके हळवे होते, तितकेच वेळप्रसंगी कठोरही होत. गोष्टी सांगणारे, डोक्यावरून मायेचा हात फिरवणारे धडे मास्तर पोरांचेही लाडके होते.

पंचक्रोशीतली सगळी गावंही त्यांना ‘धडे मास्तर’च म्हणत. त्यांचं व्यक्तिमत्त्व थोडं हटके होतं. त्यांची देहबोली, त्यांची भाषा, त्यांचं विशेष ‘कर्तृत्व’ सगळं एकजिनसी होतं. मातीच्या ढेकळात पावसाचे थेंब जिरावेत इतक्या सहजतेने ते कुणातही मिसळत. त्यांची वेशभूषा काही खास नव्हती. अंगात काहीसा ढगळ पायजमा, नेहरूशर्ट, डोईवर गांधी टोपी. सगळं साधंच, पण स्वच्छ धवलशुभ्र असे. किंचित फेंदारलेलं नाक, वर आलेली गालफाडे, जाड भुवया, मिचमिचित डोळे, जाडजूड काळे-जांभळे राठ ओठ, चपटी हनुवटी, सरळ रेषेतल्या चार आठय़ा कपाळावर कोरलेल्या, त्यावर गोपीचंद अष्टगंधाचा टिळा, बोलताना लकालका हलणाऱ्या कानाच्या पातळ लंबुळक्या पाळ्या.. असं सगळं रूपडं! उजव्या हाताच्या करंगळीत नागाच्या आकाराची तांब्याची अंगठी अन् तर्जनीत एक चांदीची अंगठी- त्यातला मोती काळपट झालेला, कधीकाळी तो चमकदार असावा.

धडेंचे ओठ पाहावे तेव्हा पानाने रंगलेले. पानाचा तोबरा डाव्या गालफडात ठेवून त्याला जिभेचे टेकण लावत दिवसभराच्या पानविडय़ांची बांधणी करणे हा त्यांचा आवडता उद्योग. घरात आलेला माणूसदेखील त्यांचं ते ‘महत्कार्य’ होईपर्यंत बसून राही. दाबून तेल पिलेली, कराकरा वाजणारी अस्सल चामडीची कोल्हापुरी पायताणं पायात असत. भरभक्कम देहयष्टी असलेल्या धडेंचा पाय कुणाच्या पायावर पडला तरी त्याची बोटे जायबंदी व्हावीत, इतक्या त्या वाहणा वजनदार होत्या.

धडे कुठेही बाहेर पडले, की त्यांच्या बगलेत एक लेदरची हँडबॅग असे. यात स्टीलचा पानपुडा असे. त्यातलंच पान काढून बेताने देठ खुडत त्याला मांडीवर पालथे-उताणे करत ते समोरच्या व्यक्तीकडून सोयरीकीची माहिती घेत. पानावर असलेल्या शिरांच्या नेमक्या मधोमध अंगठय़ाने चुना लावत त्याच्या घरादाराची माहिती घेत. काताची भुकटी, कातरलेल्या सुपारीच्या वळ्या पानात टाकत डाव्या हाताने खिशातली डायरी काढत. घडी घालून दुमडलेलं पान तोंडात कोंबलं, की मोठय़ाने जबडा हलवत खिशाला लावलेलं पेन काढून सुबक अक्षरात ते त्या माहितीचं टिपण करीत. धडेंच्या खिशात अशा बारकाल्या चार-पाच डायऱ्या सहज राहत. त्यातली सगळी माहिती अशीच. नावगाव, पत्ता, नाकनक्षा, वय, कामकाज, अपेक्षा, गोतावळा, सोयरेधायरे याची जंत्री त्यांत असे. विशेष गोष्ट अशी की, डायरीतली सगळी माहिती त्यांना तोंडपाठ राही, कुणाचा कोण हे सगळं ध्यानात ठेवत ते अचूक विषय काढीत.

म्हणूनच लग्नाच्या मांडवात बसलेले धडे मास्तर सगळ्यांच्या उत्सुकतेचा, जिव्हाळ्याचा विषय असत. त्यांनी दिलेली सोयरिक डोळे झाकून केली जाई. तेदेखील छाती ठोकून सांगत, ‘‘अरे, मी मध्यस्थ आहे बाबा. पॉर नव्हं काळजाचा दिवा देताय, हा धडे मास्तर पोराची हमी देतो बाबा. तुम्ही नुसतं होय म्हणा, देण्याघेण्याचं मी बघून घेतो!’’ आणि धडे मास्तर तिकडे जाऊन वरपक्षाला देण्याघेण्याच्या मागणीवरून खरेच वाकवत. दोन्ही बाजूची माणसं त्यांचा शब्द प्रमाण मानत. लोक लांबून लांबून त्यांच्याकडं येत. ‘आपल्या घरी यंदा कर्तव्य आहे, तेव्हा तुम्ही जरा मनाजोगतं स्थळ शोधून द्या’ अशी गळ घालत. मिठास वाणीचे धडे कुणाला नाराज करत नसत. प्रत्येकासाठी त्यांच्याकडं काहीतरी पर्याय निघे. मुलगी बघायला जाण्याच्या दिवसापासून बैठक बसताना, याद्या करताना, सुपारी फोडताना, साखर वाटताना आणि मांडवात अक्षता पाडताना धडेंना विशेष मान राही. दोन्हीकडची माणसं इकडून तिकडं निरोप पाठवताना वा काही मागणी मांडताना त्यांना मध्ये घेत. तेदेखील चुटकीसरशी ही कामं करत. या सगळ्याच्या मोबदल्यात त्यांना मांडवात भर आहेर होई, काहीजण जबरदस्तीनं खुशी म्हणून रोख रक्कम देत.

धडेंच्या अशा लौकिकामुळे त्यांच्या भवतीनं लालपिवळ्या रेशमी फेटेवाल्यांचा, परिटघडीच्या टोप्यांचा सुकाळ असे. असं असलं तरी धडेंचं खासगी आयुष्य मात्र आलबेल नव्हतं. बायको सतत हुज्जत घालायची, संसारात लक्ष द्या म्हणून कानीकपाळी ओरडायची. दोन मुलं होती. पण त्यांना शिक्षणात रुची नव्हती. स्वभावाने घुमी असणारी मुलगी घरकामात हुशार होती, पण तिच्यात अंगभूत तुसडेपण होतं. कैकांचा संसार मांडणाऱ्या धडेंना आपल्या संसाराच्या मखमली शेल्यावर भरजरी नक्षी जमली नाही. त्या शेल्याची गोधडी कधी झाली, हेदेखील कळलं नाही.

निवृत्त झालेले धडे आता घराबाहेर पडत नाहीत. ज्यांच्याशी त्यांच्या घराण्याचा सवतासुभा होता, त्यांच्या मुलाशी धडेंच्या मुलीनं हट्टानं लग्न केलंय. पोरीनं भावकीत नाक कापलं म्हणून त्यांनी घरात कोंडून घेतलंय. लोकही त्यांना काहीसे विसरलेत. कारण कुणाच्याही पोरापोरीची कुणी छाती ठोकून हमी घ्यावी, असा काळ आता मागे सरलाय. मध्यस्थच जणू अस्त पावलाय.

sameerbapu@gmail.com