समीर गायकवाड

जालिंदरचे एकेक शब्द दादूच्या कानात तापलेलं शिसं ओतत होते. भट्टीतला त्याचा हात थरथरू लागलेला. तापून लालबुंद झालेलं लोखंड बाहेर काढून त्यानं ऐरणीवर घेतलं. तशी इतका वेळ मुकाट भांडण ऐकत बसलेली गोदू पुढे झाली. तापलेलं लोखंड सांडशीत घट्ट धरून वाकून उभी राहिली. नाही तरी तीही कंबरेत वाकून गेली होती. ‘बाप हायसा की दुश्मन?’ असं वाक्य जालिंदरच्या तोंडून बाहेर पडलं आणि कोपऱ्यात ठेवलेला घण उचलायला गेलेला दादू एक क्षण जागेवरच होलपडला. गोदूच्या काळजात धस्स झालं. अंगारभरल्या डोळ्यांनी दादूनं जालिंदरकडं कटाक्ष टाकला अन् पुढच्याच क्षणाला घण उचलून तो ऐरणीजवळ आला. त्यानं गोदूला खुणावलं, तसं तिनं विटक्या साडीचा पदर कंबरेला खोचत ताकदीनिशी सांडस घट्ट पकडली. एकटक जालिंदरकडे बघत दादू घणाचे घाव घालू लागला. गोदूच्या काळजाचं पाणी पाणी झालेलं. एक जरी घाव चुकला तरी अनर्थ ठरलेला. भ्रताराचं सगळं लक्ष तर पोराकडं होतं! आपला बाप म्हाताऱ्या आईला याही वयात काम लावतोय हे पाहून जालिंदरच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तिचा हात थरथरतोय आणि हा आपल्याकडं बघत तिकडं घाव घालतोय यानं तो कासावीस झाला. पुढच्याच घटकेस तो आत होत ओरडला, ‘‘आये, बस्स कर आता. तू तरी चल. तू आली न्हाईस तर फरफटत ओढत न्हेईन. इथं कुणाला घाव घालत बसायचंय त्यास्नी बसू दे!’’

जालिंदरचं वाक्य पुरं ऐकायच्या आधीच चवताळलेला दादू त्याच्या अंगावर चालून गेला. हातातला घण त्यानं आडवा चालवला. जालूनं तो घाव चुकवला; तसा घण खाली टाकून हाती येईल त्या कांबेनं त्यानं जालूला मारायला सुरुवात केली. त्यानं सगळे घाव सोसले, पण हात आडवा केला नाही. त्या मारानं कळवळलेली गोदू त्याच्या अंगावर पडली तरी बेभान झालेला दादू कितीतरी वेळ हात चालवत होता. गोदूचा आक्रोश धुळीच्या लोटात एकजीव झाला, तसे गावकीतले घाबरलेले म्होरके पुढं झाले आणि जिवाची पर्वा न करता त्यांनी दादूला अडवलं.

त्या घटनेनंतर दादू आणि जालिंदरमधून विस्तव गेला नाही. पोरानं आपल्याला खाली बघायला लावलं असा दादूचा भ्रम झाला. जालिंदरला आपल्या बापानं निर्दयी पद्धतीनं सर्वासमक्ष मारलं, याहून मोठं दु:ख आपल्या वृद्ध आईला आपल्यामुळं हकनाक मार खावा लागला याचं झालं. तो पुन्हा परतून गावात कधीच आला नाही. या घटनेनं गोदूनं अंथरूण धरलं. तिची अवस्था पाण्याबाहेर काढलेल्या माशासारखी झाली. गोधडीत ओळखू येईनाशी झाली ती! गावात चर्चा सुरू झाली, की आता तरी दादूनं पोराशी मिळतं घ्यावं. पण मध्यस्थीची हिंमत कुणीच केली नाही. गोदूलाही आता पोराची ओढ लागून राहिलेली. आपली सून यावी, नातवंडं यावीत, आपल्या पोराच्या मांडीवर डोकं टेकवून अखेरचा श्वास घ्यावा, इतकीच तिची इच्छा उरली. तिला बघायला गावातल्या बायका येऊ लागल्या. पण नवऱ्याला वाईट वाटेल म्हणून ती मनातले बोल कुणापाशीच बोलून दाखवीत नव्हती. आपल्या बायकोला झुरताना पाहून दादू स्वत:च्या जीवाला खाऊ  लागला. एका मनात त्याला वाटायचं, की पोरानं आता अधिक ताणून न धरता झालं-गेलं सगळं विसरून आईला भेटायला यावं. गावातली माणसं जालूला भेटून त्याला गोदूच्या ढासळत्या तब्येतीविषयी सांगू लागली. त्याच्या मनाची चलबिचल होऊ  लागली.

एके दिवशी त्याची बायको लहानग्या पोरांना संगे घेऊन गुपचूप गोदूला भेटून आली. त्या दिवशी गोदूचा जीव आभाळाएवढा झाला. तिचा धीर सुटला. तिनं मनमोकळं रडून घेतलं. नेमक्या त्याचवेळी दादू झाडपाला आणायला गेला होता. आपल्या हातानं करून आणलेले दोन घास सुनेनं गोदूला खाऊ  घातले. क्षीण आवाजात ती तिच्या कानात पुटपुटली. कानात हलकेच हवा गेल्यासारखी वाटली. गोदू काय सांगत होती ते तिला कळत नव्हतं, पण ती आपल्या नवऱ्याचं नाव घेतेय, इतकं मात्र तिनं ओळखलं.

दिवस मावळायच्या आत ती आपल्या घरी परतली. रात्री उशिरा तिनं आपण सासूबाईस्नी भेटून आल्याचं भीत भीत सांगितलं. आधी जालिंदर दिग्मूढ झाला, पण पुढच्याच क्षणी त्याचं अवसान गळून पडलं. आईच्या नावानं हाका मारत तो लहान लेकरागत धाय मोकलून रडू लागला. पत्नीनं त्याला जवळ घेत थापटलं. बऱ्याच दिवसांपासून त्याच्या मनात साचलेलं मळभ तिच्या पदरात रितं झालं. आता रात्र खूप झाल्यानं दिवस उजाडताच आईकडं जायचंच असं त्यानं ठरवलं. त्या रात्री त्याला झोप कसली ती आलीच नाही. नुसता कूस बदलत तो या अंगावरून त्या अंगावर होत होता.

त्या संध्याकाळी आपली नातवंडं, सून भेटून गेल्यामुळं गोदूला आनंद झाला होता. ही बातमी तिनं दादूच्या कानावर घातली नाही. उद्या आपला पोरगा आल्यावर सगळं ठीकठाक होईल असा तिला विश्वास वाटू लागला. बस्स.. एक रात्र गेली की आपण सगळे एकत्र असू, या विचारानं तिला हर्षवायू होणं बाकी होतं. याच आनंदानं तिचा घात केला. अति ताणामुळे त्या रात्री तिचा जीव एकदम कापूस झाला. हळूहळू तिची घरघर वाढत गेली. दादूनं तिचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं आणि तिच्या मलूल केसाच्या चांदीतून तो अलगद हात फिरवू लागला. आपण तिला कुठलंच सुख दिलं नाही. तिनंही कधी काही मागितलं नाही. आपल्यामुळे मुलगा, सून यांच्या प्रेमास तिला मुकावं लागलं. तिला कधी धड लुगडंही आपण घेतलं नाही. कुठली हौसमौज केली नाही. फक्त तिची फरफट केली. या अपराधाची टोचणी त्याला लागून राहिली. त्याच्या डोळ्यांतून संततधार वाहू लागली. ती ओघळून गोदूच्या मस्तकावर पडू लागली. त्याच्या अश्रूंच्या धारेत तिच्या कपाळावरचं कुंकू कधी वाहून गेलं, कळलंच नाही. तिचे श्वास कधी थांबले हेही उमगलं नाही. तिचे कष्टलेले अचेतन हात हाती धरून तो रडतच राहिला. तिचं अंग ताठरत गेलं.

झुंजूमुंजू होताच वणव्यासारखी बातमी पसरली. आपल्या आईला बघायला निघालेल्या जालिंदरच्या पायाखालची मातीच सरकली. तो जागेवरच कोसळला. त्याच्या मुखातून निघालेली किंकाळी देवळाच्या शिखरावरून गावशिवारातल्या शेताशेतांतून बांधावर जाऊन थडकली. मशिदीच्या मीनारांना थडकून वेशीतल्या निष्पर्ण पिंपळास तिनं आर्त मिठी मारली. गावजीवनाच्या सर्व खुणांना तिनं साद दिली आणि अखेरीस मोडकळीस आलेल्या भात्यात येऊन विरली.

गोदूच्या चितेस जालूनं अग्नी दिला तेव्हा आकाशात पाखरांनी एकच गलका केला. मयताचं वर्तमान कळताच एरव्ही अंगात ऊर्जा संचारणारा भानातात्यादेखील मंतरल्यागत शांत उभा होता. पाणक्या दत्तूनं जवळ येत जालूला मिठी मारली तेव्हा सगळं गाव रडत होतं. दादूच्या डोळ्याचं पाणी तर अखंड वाहत होतं.

गोदूचे क्रियाकर्म उरकल्यानंतर काही दिवसांनी गावातल्या लोकांनी दादूची मनधरणी केली, तेव्हा कुठं दादू आपल्या पोराच्या घरी राहायला गेला. पण त्याचं गावात येणं खुंटलं. आधी गोदू गेली आणि आता तो गेला, त्यामुळं त्याचं अंगण ओस पडलं. तिथं उरली फक्त भकास उदासीनता. एके दिवशी जालूनं भाता काढून सगळ्या भंगाराची वाट लावली. ही बातमी कुठून तरी दादूला कळली. त्याच्या काळजात अनामिक कळ आली. कितीतरी दिवसांनी तो गावात आला. लहान मुलासारखा तो आपल्या अंगणात बसून रडला. गावातल्या तरण्या पोरांनी त्याला जालूच्या घरी नेऊन सोडलं. पण या दिवसानंतर तोच त्याचा दिनक्रम झाला. कुणासोबत तरी तो गावात यायचा. कधी घरासमोर, तर कधी पिंपळाखाली गुडघ्यात मान खुपसून, शून्यात डोळे लावून खिन्न बसून राहायचा. यानंतर अवघ्या काही महिन्यांनी दादूचं निधन झालं. गाव खूप हळहळला.

दादू जिथं बसून राहायचा, त्या पिंपळाला पुढच्या वर्षी नवी पालवी फुटली. पिंपळाच्या या पानांना तापलेल्या लोखंडाचा तोच गंध येतो, जो दादूच्या अंगाला यायचा!

(उत्तरार्ध)

sameerbapu@gmail.com