डॉ. राधिका विंझे

शाळेतून घरी येताना रोहनने आजोबांना सांगितलं, ‘‘आज आम्हाला प्रकाशाचे गुणधर्म शिकवले.’’

‘‘अरे वा. काय काय शिकवलं?’’आजोबांनी विचारलं

रोहन म्हणाला, ‘‘हेच की, प्रकाश एका दिशेत प्रवास करतो, प्रकाशाचा एखाद्या कणासारखा (Particle) तसाच एखाद्या लाटेसारखा (wave) प्रवास होतो.’’

‘‘छान! नवीन माहिती मिळाली तुला.’’

‘‘हो आजोबा, पण त्यात एक इंटरेस्टिंग संकल्पना होती- प्रकाशाचे परिवर्तन. (रिफ्लेक्शन ऑफ लाइट). प्रकाश जेव्हा एखाद्या पृष्ठभागावर पडतो; तेव्हा तो पृष्ठभाग जसा असेल त्यानुसार प्रकाश त्यातून प्रवास करतो. जर तो पृष्ठभाग पारदर्शक असेल तर प्रकाश त्यातून आरपार जातो, तो जर अर्धपारदर्शक असेल तर त्यातून थोडासा प्रकाश पुढे जातो. पण पृष्ठभाग पारदर्शक नसेल तर प्रकाश त्यावर आदळतो आणि विरुद्ध दिशेने प्रवास करतो.

आजोबा विचार करत म्हणाले, ‘‘मला नीटसं समजलं नाही रे.’’

‘‘आजोबा, आपल्या घरची ट्युबलाइट बघा. त्यातून येणारा प्रकाश भिंतीवर पडतो. भिंत पारदर्शक नाही. त्यामुळे तो प्रकाश भिंतीवर आदळून विरुद्ध दिशेने प्रवास करतो, म्हणजेच परावर्तीत होतो ना! माझ्या खेळण्याचा पृष्ठभाग पारदर्शी नाही म्हणूनच त्यावर पडणारा सूर्यप्रकाश किंवा ट्युबलाइट वा बल्बचा प्रकाश परावर्तीत होऊन आपल्या डोळ्यांत जातो.’’ आजोबांना हे सगळं ऐकायला मजा येत होती.

‘‘आजोबा, आपण एकदम सोप्पं उदाहरण घेऊ. तुमचा काचेचा चष्मा घ्या. काच पारदर्शक असते, त्यामुळे काचेतून प्रकाश आरपार जातो.’’

आजोबा म्हणाले, ‘‘अरे हो खरंच की!’’ मग आजोबांनी रोहनला सांगितलं, ‘‘म्हणूनच आरसा बनवताना काचेतून प्रकाश आरपार जाऊ नये यासाठी एका बाजूला प्रकाश परावर्तीत करणारं आवरण (कोटिंग) लावतात.’’

रोहनला हे फार इंटरेस्टिंग वाटलं. ‘‘आजोबा, यावरून मला आठवलं की आपण मॉलमध्ये किंवा सिनेमागृहात जातो तिथे अनेक आरसे असतात. आपण एका विशिष्ट जागी उभं राहिलं की आपल्याला आरशात स्वत:च्या अनेक प्रतिमा दिसतात. त्याला काय म्हणायचं?’’ रोहनचं हे निरीक्षण पाहून आजोबांनी त्याची पाठ थोपटली आणि म्हणाले, ‘‘त्याला अनेक वेळा होणारे परावर्तन म्हणतात. आता ते कसं ते तू शोधून काढ.’’ बोलता बोलता घर आलं, पण रोहन मात्र परावर्तनाच्या विचारातच गुंतला होता.

radhikavinze94@gmail.com