रणजित धर्मापुरीकर

उच्च शिक्षण क्षेत्रात म्हणजे विद्यापीठ किंवा संशोधन संस्थेत संशोधन कार्यात गेल्या काही वर्षांपासून वाढ झालेली आढळून येत आहे. मानव संसाधन मंत्रालय, भारत सरकार संशोधनाच्या गुणवत्तेत वाढ व्हावी याकरिता संशोधन प्रकियेच्या नियम व अटीत सतत बदल सूचवत असते. नवीन संशोधकांना या नियम व अटीचे पालन करताना मूळ संशोधन कार्यात दुर्लक्ष होत आहे अशी भावना निर्माण होत आहे. पण आता माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात संशोधन प्रक्रियेस वेग व नवी दिशा प्राप्त झाली आहे.

संशोधन पद्धतीवर आधारित, पारंपरिक संशोधन प्रक्रियेवर माहिती देणारी अनेक पुस्तके विविध भाषेत आज उपलब्ध आहेत. पण आधुनिक युगात माहिती तंत्रज्ञानामुळे संशोधन कार्यात आमूलाग्र बदल झालेला आहे, याची माहिती फार कमी संशोधकांना आहे. याविषयावर लिखित स्वरूपात सखोल मार्गदर्शन करणारे पुस्तक मराठी भाषेत उपलब्ध नव्हते. ती गरज मराठी विज्ञान परिषद मुंबईतर्फे प्रकाशित व डॉ. मुरारी तपस्वी लिखित ‘संशोधन व माहिती साधने’ या पुस्तकाने पूर्ण केली आहे.

आधुनिक संशोधन प्रक्रिया व बदलत्या कालानुरूप संशोधनास आवश्यक साधनांचा परिचय करून देणारी माहिती मराठीत वाचावयास मिळत नाही ती या पुस्तकात मिळते. लेखकाने पुस्तकाची सुरुवात व शेवट सूत्रबद्ध पद्धतीने स्थूल ते सूक्ष्म या संशोधनाच्या रीतीनुसार केली आहे. सदर पुस्तक नव संशोधकांना पहिल्या प्रकरणात संशोधनात माहितीचे स्थान समजावून घेण्यात मदत करते. हे स्पष्ट करत असताना तंत्रज्ञानामुळे मानवी साधनांचे महत्त्व कमी व इंटरनेट जगताचा वाढत्या प्रभावामुळे संशोधकाला महितीचा शोध घेणे किती सुकर झाले आहे हे यात पटवून दिले आहे. दुसऱ्या प्रकरणात आधुनिक संशोधन प्रक्रियेवर चर्चा केली आहे. यामध्ये तांत्रिक प्रक्रियेबरोबरच गेल्या अनेक वर्षांपासून संशोधन प्रक्रियेचा कल कसा बदलत गेला, संशोधन अधिक प्रमाणात लोकांनी करावे याकरिता व्यक्ती आणि संस्था यांचा दर्जा ठरवण्याची सोय केली गेली. त्यामुळे स्पर्धा वाढली आणि मग संशोधन उच्च शैक्षणिक संस्थेच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले हे वास्तव छान पद्धतीने यात नमूद केले आहे.

संशोधनास उपयुक्त माहितीचा शोध नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने कसा करावा, माहिती उपलब्धतेचे स्रोत कोणते याची माहिती मिळते. प्रकरण तिसरे आहे मुक्तद्वार साहित्यावर. नव संशोधकांना या प्रकारच्या साहित्यातून बरेच काही शिकायला मिळते. शेवटच्या प्रकरणात संशोधनाचा भविष्य वेध घेतला आहे. यात उल्लेखित अनुमान सत्यात उतरण्याचे संकेत येण्यास सुरुवात झालेली दिसते आहे. सर्व विषयाच्या संशोधकांनी विशेष करून नव संशोधकांनी, मार्गदर्शकांनी, प्राध्यापकांनी, विद्यार्थ्यांनी हे पुस्तक वाचावे व बदलत्या संशोधन प्रक्रियेशी अवगत व्हावे. हे पुस्तक ई-बुक्स स्वरूपात मराठी विज्ञान परिषदेच्या संकेत स्थळावर विनामूल्य उपलब्ध आहे.
‘संशोधन आणि माहिती साधने’,

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. मुरारी तपस्वी,
प्रकाशक- मराठी विज्ञान परिषद, मुंबई,