आलो उल्लंघुनि, दु:खाचे पर्वत!

करोनाच्या प्रादुर्भावानंतर प्राणांतिक धडपड करीत याच मजुरांनी आपापला गाव गाठला आहे.

आलो उल्लंघुनि, दु:खाचे पर्वत!

आसाराम लोमटे aasaramlomte@gmail.com

त्यांनी गावाशी नाळ तोडून स्वत:चा मुलुख आधीच एकदा सोडलेला होता. तुटलेपणाची संवेदनाही अनुभवली होती. त्याचा व्रणही मिटत चालला होता. पुन्हा कितीतरी वर्षांनंतर जिवाच्या भीतीनं त्यांची पावलं निकरानं गावाकडे वळली. तुकोबाराय म्हणतात तसं.. आलो उल्लंघुनि, दु:खाचे पर्वत’! तीव्र अशा होरपळणाऱ्या धगीतही जगण्याचा लसलसता कोंभ त्यांना जपायचा होता. रहाटगाडगं सुरू होईल तेव्हा हाच कोंभ जपण्यासाठी आधीची पायपीट विसरून त्यांची पावलं पुन्हा शहरांकडे वळतील. जीव वाचवण्याच्या लढाईत जिंकलेल्यांना पोट भरण्याची दुसरी लढाई लढावी लागणार आहे.

प्रसिद्ध लोकगायिका मालिनी अवस्थी यांच्या आवाजातलं एक लोकगीत आहे.. ‘रेलिया बैरन पिया को लिये जाय रे..’! उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगढ या प्रांतांमधून मजुरांचे लोंढे मुंबई, कोलकाता अशा महानगरांमध्ये आदळत असतात. करोनाच्या प्रादुर्भावानंतर प्राणांतिक धडपड करीत याच मजुरांनी आपापला गाव गाठला आहे. अजूनही परप्रांतीय मजूर आपल्या गावी जातच आहेत. इकडे कामासाठी येताना काही मजुरांच्या सोबत कुटुंबकबिला असतो. पण सुरुवातीला ते जेव्हा येतात तेव्हा एकटेच असतात. नंतरही अनेकांचं कुटुंब गावाकडेच असतं. महानगरांमध्ये येताना या स्थलांतरित मजुरांची काही स्वप्नं असतात. कुणाला आपल्या बहिणीचे हात पिवळे करायचे असतात, तर कुणाला आपल्या घरावर छत टाकायचं असतं. मोडकळीला आलेल्या घराला नवेपण द्यायचं असतं. म्हाताऱ्या आई-वडिलांना गावी पैसे पाठवायचे असतात. शिकणाऱ्या भावाला मदत करायची असते. जे मजूर नव्यानं इकडे येतात त्या मजुरांच्या पत्नीच्या विरहाचं ते प्रसिद्ध गीत आहे. केवळ मालिनी अवस्थीच नव्हे, तर अनेक गायिकांनी ते गायलंय. जे भोजपुरी, अवधी या भाषा जाणतात त्यांना या गीताबद्दल नक्कीच माहिती आहे. ज्या रेल्वेद्वारे परप्रांतीय मजूर विस्थापित होतात, गावापासून तुटतात, त्या रेल्वेला या गीतातली नायिका ‘वैरीण’ असं संबोधते. ती माझ्या जोडीदाराला, प्रियकराला माझ्यापासून दूर घेऊन जात आहे. खूप पाऊस यावा. ज्या तिकिटावर तो जाणार आहे ते तिकीट त्यातच नष्ट व्हावं. ज्या शहरात तो मजुरीसाठी जातोय त्या शहराला आग लागावी. ज्या मालकाकडे तो कामाला आहे त्या मालकावर गंडांतर कोसळावं आणि आपल्या जोडीदाराचं जाणं रहित व्हावं.. असं काय काय या गाण्यातली नायिका कल्पित असते. पण असं काही होत नाही. आणि ‘रेल’ नावाची ‘बैरन’ तिच्या जोडीदाराला घेऊन जातेच. आता पुन्हा गावी परतत असताना परप्रांतीय मजुरांचे जे हाल झाले त्यावेळी सुरुवातीला त्यांच्यासाठी ही रेल धावून आली नाही. तेव्हा तर नक्कीच या सर्वाना ती वैरीण वाटली असणार.

ही वेदना केवळ परप्रांतांतील मजुरांचीच नाही. आपल्याकडे अण्णा भाऊ साठे यांच्या एका छक्कडमध्येही ही स्थलांतरितांची वेदना आहेच. ‘माझी मैना गावावर राहिली..’ या गीतातला नायक जेव्हा कामधंद्यासाठी मुंबईला जायला निघतो तेव्हा घरात भाकरतुकडय़ाची बांधाबांध होते. या गीतातल्या मैनेची कळी मात्र कोमेजते. नायक तिला हसवण्याची शिकस्त करतो, दागिन्यांनी मढवून काढण्याची बात करतो, पण तिची कळी काही उमलत नाही. छातीवर दगड ठेवून तो मुंबईची वाट धरतो. इकडे मैना खचते. डोळ्यात रुसते. अजिबात हसत नाही. मूकपणे ती निरोप देण्यासाठी हात उंचावून उभी राहते. पोटापाण्यासाठी कित्येक लोक आपला मुलुख सोडून नव्या शहरांत येतात. काही काळ स्थिरावतात. पण वणवण काही थांबत नाही. ज्यांनी रक्त ओकलंय, घाम गाळलाय अशी लक्षावधी माणसं स्वत:च्याच देशात निर्वासित झाल्याचं सध्या आपण पाहतो आहोत. अजूनही त्यांचे हाल पूर्णपणे थांबलेले नाहीत. श्रमिकांच्या वाटय़ाला आलेली जगण्याची ही फरफट त्यांच्या आयुष्यात सहजासहजी विसरली जाईल अशी नाही.

हे परप्रांतीय मजूर केवळ महानगरांमधील उद्योगधंद्यांमध्येच होते असे नाही. आपल्याकडे ग्रामीण भागातही त्यांची संख्या लक्षणीय आहे. त्या- त्या भागातल्या शेतीव्यवसायातील कामांचं कौशल्य त्यांनी आत्मसात केलं आहे. दूध डेअरीच्या प्रकल्पात, डाळिंबे-द्राक्षांच्या भागातल्या छाटणीत, मासेमारीत, बेदाणेनिर्मितीत.. कुठं म्हणून नाही, सगळीकडचे परप्रांतीय मजुरांनी शिरकाव केला आहे. सुरुवातीला मराठी अस्मितेच्या पताका फडफडवत राजकारण करणाऱ्यांनी त्यांना खलनायक ठरवलं तरीही हा टक्का वाढतच राहिला आणि या टक्क्य़ाचं केंद्रही विस्तारत राहिलं. त्याचबरोबर आपल्या ग्रामीण भागातून होणारं स्थलांतरही गेल्या दोन दशकांत वाढत राहिलं. जिथून ही माणसं स्थलांतरित होतात, त्या भागात त्यांच्या जगण्याची कोणतीही साधनं नाहीत. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या भागांत गेल्या ५०-६० वर्षांत आजवर कृषी-औद्योगिक समाजरचना उभी राहू नये हे ढळढळीत अपयश तिथल्या स्थानिक नेतृत्वाचं आहे. अनेक सहकारी प्रकल्पांचे, कृषीप्रक्रिया उद्योगांचे सांगाडे उभे करून केवळ अनुदानासाठी चटावलेल्या पुढाऱ्यांनी रोजगाराची कोणतीच साधनं निर्माण केली नाहीत. भूमिपूजन केलेल्या उद्योगांचे गंज चढलेले फलक आपल्याला आजही या भागांतून रस्त्याने जाताना दिसतील. हे आज साठीतल्या महाराष्ट्राचं चित्र आहे. आधीच बकाल झालेल्या आपल्या गावांमध्ये पुन्हा हे मजूर परतले आहेत. या सर्वाच्या हातांना इथं काम मिळण्याची शक्यताच नाही. गेल्या अनेक वर्षांपासून महानगरांमध्ये मिळेल ते काम करणाऱ्या मजुरांची गावाशी असलेली नाळ तुटलेली आहे. आता ही उखडलेली झाडं पुन्हा त्याच मातीत रुजतील असं नाही. यातल्या बहुतेकांना शेतातली कामंही येत नाहीत. दुसऱ्या बाजूनं विचार केला तर आज ना उद्या ही माणसं परततील आणि अनेक उद्योगांची चाकं फिरू लागतील अशी आस शहरांनाही आहे.

करोनाच्या धास्तीनं कधी एकदा या महानगरांमधून बाहेर पडतो असं वाटणाऱ्या लोकांची अस्वस्थता आणि खदखद सुरुवातीला काही काळ दबून राहिली, पण नंतर मात्र वाट फुटेल त्या दिशेनं ही माणसं निघाली. ‘आम्हाला तुमचं काहीच नको, फक्त आमच्या गावी जाऊ द्या,’ एवढंच त्यांचं म्हणणं होतं. व्यवस्थेनं, सरकारांनी तेही ऐकलं नाही. मरायचं तर गावी आपल्या माणसांमध्ये जाऊन मरू, हीच बहुतेकांची भावना होती. शेकडो किलोमीटरचं अंतर त्यासाठी पायी तुडवण्याची त्यांची तयारी होती. तरुण, प्रौढ, लहान मुलं, महिला, वृद्ध अशा सर्वाच्या पावलांनी शेकडो मैल तुडवत गावची वाट धरली होती. कुठे मिळतील ते चार घास पोटात ढकलत आणि कुठे दोन घोट पाणी पिऊन ही माणसं चालतच राहिली. लहान लेकरं खांद्यावर घेऊन, नेता येईल तेवढं सामान सोबतीला घेत ही माणसं जिथून आली त्या ठिकाणी परत जायला निघाली होती. यातल्या प्रत्येक माणसाची कथा वेगळी होती. सुरुवातीला त्यांच्या वाटा रोखल्या गेल्या. आणि बस, रेल्वे ही साधनं उपलब्ध नव्हती तेव्हा अवाच्या सवा पैसे देऊन ट्रकमध्ये शेळ्या-मेंढय़ा कोंबाव्यात तशी ही माणसं निघाली. त्यातही दलाली करणारे अनेक जण निर्माण झाले. बांधकामाचं सिमेंट कालवण्याच्या यंत्रातून प्रवास करणं ही किती जीव घुसमटून टाकणारी गोष्ट आहे याची कल्पनाच करवत नाही. पण मिळेल तो मार्ग पत्करण्याची या माणसांची तयारी होती. एकीकडे हे मजुरांचे लोंढे महानगरांमधून बाहेर पडले तेव्हा उन्हाळ्याचा दाह अक्षरश: घाम काढत होता. सूर्य आभाळातून आग ओकतोय आणि डांबरी सडकांवर चालणारी माणसं अशा रणरणत्या उन्हातही चालत आहेत. रस्त्यात कुणी काही दिलं तर तेवढय़ाच आधारावर पुढची वाटचाल करायची. मात्र, जेव्हा उन्हाची तीव्रता वाढली तेव्हा पायी अंतर पार करणं अशक्य झालं. मग सायंकाळी पायी चालण्याला सुरुवात करायची, रात्रभर चालत राहायचं आणि दिवसा तापलेल्या उन्हापासून वाचण्यासाठी कुठंतरी आडोसा शोधायचा असा प्रकार सुरू झाला. या लोकांचा दिवस कधी सुरू होई आणि कधी मावळे, हे तेही सांगू शकणार नाहीत. यातल्या काहींनी गावाच्या वेशीवर दम तोडला, काहींना गावाने स्वीकारलंच नाही. दररोज स्थलांतरित मजुरांच्या बातम्या येत होत्या. ज्या गावातून आपण बाहेर पडलो ते गाव आपल्याकडे संशयाने पाहतं आहे.. तिथल्या माणसांच्या नजरेत आपल्याविषयी अविश्वास आहे, हा अनुभव सर्वानाच येत होता. यातून माणसं एकमेकांच्या जीवावर उठल्याचे आणि मुडदा पाडण्याचे प्रकारही घडले. शेकडो किलोमीटर अंतर पायी कापल्यानंतरही त्यांचे हाल थांबले नाहीत. कधीकाळी गावाशी असलेला आपला धागा आता तुटला आहे, ही सल आत्यंतिक क्लेशकारक होती. याच काळात जणू दंतकथा वाटाव्यात अशा बातम्याही येत होत्या. सायकलवर आपल्या बापाला बसवून एका मुलीनं शेकडो किलोमीटर अंतर पार करत गाव गाठला.. एखादी बाई रस्त्यातच बाळंत झाली.. आपल्या मृत आईला उठवण्याचा प्रयत्न एक चिमुरडा जीव करतोय.. अशा असंख्य गोष्टींनी या काळाचा धागा विणला गेला. साऱ्या आयुष्यभराची गोठलेली वेदना जणू त्या डांबरी सडकांवरून चालणाऱ्या पावलांत साकळली आहे.

स्थलांतर हे बहुतांश वेळा वेदनादायीच असतं. पण काही स्थलांतरांनी या वेदनेवर मातही केली आहे. सामाजिक विषमतेचे दीर्घकाळ चटके सोसलेल्या आणि समाजाच्या तळाशी दडपलेल्या मोठय़ा समूहानं विषमतेच्या खातेऱ्यातून बाहेर पडत आपली वाट शोधली.. शोषणाचं केंद्र सोडलं.. शहरं जवळ केली. अशी स्थलांतरं मोकळा श्वास घ्यायला मदत करतात.

करोनाकाळात जे स्थलांतर झालं.. होतंय, त्याची तुलना अनेकांनी फाळणीशी केली आहे. फाळणीतल्या स्थलांतरितांची ती वेदना आपल्याकडे देशभरातल्या अनेक कलाकृतींमध्ये दिसेल. विशेषत: कुर्रतुल ऐन हैदर यांची ‘आग का दरिया’, भीष्म साहनी यांची ‘तमस’, कृष्णा सोबती यांची ‘जिंदगीनामा’, इंतजार हुसैन यांची ‘बस्ती’ या अभिजात कलाकृती, तसंच सआदत हसन मंटो यांच्या कथा फाळणीतील स्थलांतरितांचं दु:ख सांगतात. यात राही मासूम रझा यांची ‘आधा गॉंव’ ही कादंबरीही तेवढीच महत्त्वाची आहे. ती प्रसिद्ध होऊन ५० वर्षे लोटली. या कादंबरीमध्ये फाळणीने विस्थापित केलेल्या निर्वासितांच्या जगण्याचं सूत्र उलगडलेलं आहे. कादंबरीत सुरुवातीला कोलकाता वगैरे महानगरांमध्ये कामासाठी गेलेल्या माणसांचं उत्तर प्रदेशातल्या गाजीपूरचं भावविश्व येतं. अगदी तरुण वयात बेरोजगारीच्या घाण्याला इथली माणसं जुंपली जातात, की त्यांनी आपल्या स्वप्नांचं तेल काढावं. मुंबई, कोलकाता, कानपूर, ढाका या जणू गाजीपूरच्या हद्दी आहेत, दूरदूपर्यंत जाऊन पोहोचलेल्या.. इथून जाणारे जणू तिथलेच होऊन राहतात. पण आकाशात फुगा कितीही उंच उडाला तरी त्याचा आपल्या केंद्राशी असलेला संबंध तुटत नाही. एखाद्या लहान मुलाच्या हाती कमजोर धाग्याचं दुसरं टोक असावं, तसं. पण आता काही दिवसांनी असं झालंय, की बहुतांश लहान मुलांच्या हातातला दोरा निसटला आहे. हे सत्य ‘आधा गाँव’ कादंबरीच्या सुरुवातीलाच अधोरेखित होतं. राही मासूम रझा म्हणतात, ‘‘खरं विचाराल तर ही गोष्ट त्या फुग्यांची किंवा लहान मुलांची आहे, ज्यांच्या हाती फक्त तुटलेला दोरा उरलाय आणि ते आपल्या फुग्याच्या शोधात आहेत. ज्यांना हे माहीत नाही, की दोरा तुटल्याचा त्या फुग्यावर काय परिणाम होईल.’’

उत्तर प्रदेशातल्या गाजीपूर जिल्ह्यातील गंगौली या गावाचं चित्रण या कादंबरीत आहे. ज्या गावात हिंदूंसह मुस्लीमही मोठय़ा प्रमाणात आहेत. पाकिस्तानच्या निर्मितीवेळी तिथल्या मुस्लिमांची मन:स्थिती, गावातल्या हिंदू-मुस्लीम संबंधांचे ताणेबाणे आणि एकजिनसीपणसुद्धा या कादंबरीतल्या अनेक प्रसंगांमधून दृढ होतं. कादंबरी शेवटाकडे येते तेव्हा राही मासूम रझा यांनी दोन पानांची ‘भूमिका’ जोडली आहे. त्यात त्यांनी जे स्पष्ट केलंय ते पुन्हा मानवी जगण्याचंच एक सूत्र आहे. ‘जनसंघाचं म्हणणं असं आहे की, मुसलमान इथले नाहीत. माझी काय हिंमत आहे की मी त्यांना खोटं ठरवू. पण गंगौली या गावाशी माझा अतूट संबंध आहे. ते केवळ एक गाव नाही, तर माझं घर आहे. ‘घर’ हा शब्द दुनियेतल्या प्रत्येक बोलीत, प्रत्येक भाषेत आहे. आणि प्रत्येक बोली व भाषेतला तो सर्वात सुंदर शब्द आहे.’ या ‘भूमिके’त पुढं ते आणखी स्पष्टपणे लिहितात. ‘‘..क्योंकी वह केवल एक गाँव नहीं है, क्योंकी वह मेरा घर भी है. ‘क्योंकी’ यह शब्द कितना मजबूत है.. और इस तरह के हजारो हजार ‘क्योंकी’ और है. और कोई तलवार इतनी तेज नहीं हो सकती कि इस क्योंकी को काट दे.’’ स्वत:च्या गावाशी, घराशी.. घरच वाटणाऱ्या गावाशी असलेल्या अतूट नात्याचं हे विधान किती लखलखीत वाटतं.

करोनाचं संकट सुरुवातीला दाखल झालं तेव्हा आपल्या जीवनशैलीवर त्याने कसा परिणाम केला आहे हे ‘आम्हास आम्ही पुन्हा पाहावे’ या लेखात (लोकरंग, ५ एप्रिल) लिहिले होते. त्याचवेळी व्यक्ती म्हणून अत्यंत सुटय़ा सुटय़ा होत गेलेल्या आपल्या सर्वाच्या बाबतीत निर्माण झालेली परिस्थिती म्हणजे जणू आपण प्रत्येक जण एकेका बेटावर राहतो आहोत असं त्यात नमूद केलं होतं. गेल्या काही दिवसांत याचा प्रत्यय येत गेला. जे स्थलांतरित मजूर आहेत त्यांच्या जगाशी आपला काहीही संबंध नाही, अशाही काही प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर व्यक्त झाल्या. औरंगाबादनजीक घडलेल्या रेल्वे अपघातात १५ जणांचे बळी गेल्यानंतर काहींनी ज्या भावना व्यक्त केल्या त्यातून त्यांची संवेदनशीलता ठार मेली आहे की काय असं वाटलं. एकीकडे चार पावलं चालल्यानंतर धापा टाकत, घाम पुसत पंख्याखाली हवा घेणारी आणि अल्पस्वल्प दमवणुकीनं धास्तावलेली माणसं; मल्टीव्हिटामिन खाऊन प्रतिकारशक्ती कशी वाढवता येईल यासाठी चाललेले त्यांचे नाना तऱ्हेचे उद्योग आणि दुसरीकडे पायपीट करणारी ही माणसं.. हे चित्र चक्रावून टाकणारं होतं.

‘ट्रेन काही पटरी सोडून त्यांच्यामागे गेली नाही. चूक त्यांचीच आहे. रेल्वेरुळावर मेलो तर सरकार पैसे देतं हे त्यांना माहीत होतं. म्हणूनच मुद्दाम रेल्वेरुळांवर झोपलेल्यांना सरकारी तिजोरीतून एक रुपयाही देता कामा नये.’

‘स्वत:च्या कर्मानं गेले. त्यांच्या बुद्धीची कींव करावीशी वाटते. चक्क बिछान्यात घरी झोपावं तसं रुळावर झोपले होते.’

‘असं कसं शक्य आहे? एवढी गाढ झोप कितीही थकलं तरी येत नाही. ट्रेनचा आवाजच येऊ नये म्हणजे काय?’

‘हे असे लोक प्रशासनाला आणखी अडचणीत आणत असतात. माझ्या घरासमोरचा रस्ता निर्जन आणि मोकळा आहे, तरी मी माझ्या मुलाला खेळू देत नाही. ट्रॅकवर झोपणं या गोष्टीचं समर्थन होऊच शकत नाही.’

‘गरीब वगैरे ठीक आहे. रुळावर झोपायला कोणी सांगितलं? उद्या विजेच्या तारेवर कपडे टाकाल सुकायला!’

‘ रेल्वेरुळावर झोपणं- तेही आजूबाजूला एवढी मोकळी जागा असताना.. जवळच गाव असताना किती शहाणपणाचं? आता त्यासाठी नुकसानभरपाई द्यायची?’ अशा कैक प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर उमटत होत्या. हे केवळ बधिरीकरण नव्हतं, तर त्यात श्रमिक वर्गाबद्दलची एक क्रूर भावना होती. आपण आयुष्यात जे सगळं मिळवतो ते पैशाच्या जोरावर विकत घेतो.. कुणी आपल्यासाठी कष्टत असेल तर ते उपकार नाहीत.. अशा प्रकारचा माज होता तो.

ही माणसं खूप दमलेली आहेत. ज्या गोष्टी त्यांच्या गावीही नाहीत, त्या गोष्टींची सक्ती आधी त्यांना करण्यात आली आहे. त्यांनी ऑनलाइन फॉर्म भरायचा, वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवायचं, पोलीस ठाण्याला कळवायचं. आपल्या भ्रष्ट व्यवस्थेत अशी आवश्यक कागदपत्रं मिळवण्यात दलालांचा सुळसुळाट होतो, तिथं ही माणसं प्रत्येक पातळीवर लुटली गेली. त्याआधी मालकांनी ‘तुमचं तुम्ही बघा..’ असं म्हणत आधीच कडेलोट केलेला होता. अशावेळी या माणसांनी किमान रुळांवरून का होईना- पण चालण्याचं बळ कुठून मिळवलं असेल, असा प्रश्न त्यांच्याबद्दल या माणसांना पडत नाही.

..रस्त्याने चालत गेलं तर पुन्हा हजार चौकशा! त्यापेक्षा रेल्वेरूळावरून निर्धोकपणे जाऊ, असा विचार करून, सोबत भाकरतुकडा घेऊन निघालेली ही माणसं. केवळ रस्त्यावरून धावणाऱ्या बसच नाही, तर रेल्वेही बंद आहेत.. जगातली सगळी चाकं थांबली आहेत.. जणू जगरहाटी  थबकलीय असं या साऱ्यांना वाटलं. चालून दमल्यानंतर जरा थांबावंसं त्यांना वाटलं असणार. आणि बसल्यानंतर जमिनीला पाठ कधी टेकते असंही झालं असणार. जरा डोळा लागला आणि आयुष्यभराच्या भाकरीच्या चिंधडय़ा करत रेल्वे निघून गेली. ना टाहो, ना किंकाळी.. कशाचीच उसंत नाही. अशा या माणसांबद्दल ‘मुद्दाम रेल्वेरूळांवर झोपलेल्यांना सरकारी तिजोरीतून एक रुपयाही देता कामा नये..’ असं म्हणणारी माणसं नक्कीच या ग्रहावर राहणारी नाहीत.

सर्वच परप्रांतीय मजूर अडकलेल्या ठिकाणी गुदमरले जात असताना त्यांचं खेळणं केलं गेलं. मजुरांची व्यवस्था करण्याऐवजी मार्चअखेर त्यांच्या हालचालींवर निर्बंध लादण्यात आले. ही एक प्रकारची दडपशाहीच होती. ती न जुमानता अवघ्या देशभरातल्या रस्त्यांवर अशा मजुरांचे जथ्थेच्या जथ्थे ओसंडून वाहत होते. त्यांच्या असंख्य कहाण्या समाजमाध्यमांवर येत होत्या. तेव्हा ही दृश्यं न्यायालयाला दिसली नाहीत. सव्वीस हजार छावण्यांमध्ये स्थलांतरितांची सोय केली आहे, तेव्हा कुणीही रस्त्यावरून चालताना दिसणार नाही, असा खुलासा केंद्र सरकारने केला. तो सर्वोच्च न्यायालयानं ग्राही मानला. बहुतांश मजूर जेव्हा गावी परतले तेव्हा स्थलांतरितांबद्दल सर्वोच्च न्यायालयाने दोन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश सरकारला दिले. जी माणसं स्वत:च्या अस्तित्वासाठी झगडतात आणि आपल्याच देशात निर्वासित होतात अशी माणसं कुणाच्या खिजगणतीतही असत नाहीत.

..हे सर्व खरे आहे. पण गावातून फेकले गेलेल्यांना शहरांनी पोटात घेतलं होतं, हेही तितकंच खरं आहे. जे आता करोनाकाळात गावी

परतले आहेत त्यापैकी अनेकांचं आजही विलगीकरण सुरू आहे. गावाबाहेरच्या शाळेत, शेतात ही माणसं बसलेली आहेत. त्यांना गावही परकंच वाटणार. अशावेळी गुडघ्याभोवती हाताची मिठी करून ही माणसं फार काळ गावी राहतील असं वाटत नाही. आज ना उद्या त्यांची पावलं पुन्हा शहरांकडे वळू लागतील. गावाशी नाळ तोडून स्वत:चा मुलुख याआधीच एकदा सोडलेला होता. तुटलेपणाची संवेदनाही अनुभवली होती. त्याचा व्रणही मिटत चालला होता. पुन्हा कितीतरी वर्षांनंतर जिवाच्या भीतीनं त्यांची पावलं निकरानं गावाकडे वळली. तुकोबाराय म्हणतात तसं.. ‘आलो उल्लंघुनि, दु:खाचे पर्वत’! तीव्र अशा होरपळणाऱ्या धगीतही जगण्याचा लसलसता कोंभ त्यांना जपायचा होता. रहाटगाडगं सुरू होईल तेव्हा हाच कोंभ जपण्यासाठी आधीची पायपीट विसरून त्यांची पावलं पुन्हा शहरांकडे वळतील. जीव वाचवण्याच्या लढाईत जिंकलेल्यांना पोट भरण्याची दुसरी लढाई आणखी लढावी लागणार. अनेकदा विस्थापन निर्दयी असतं. त्यात जीवघेणी घुसमट होते. पण त्यातूनच अशा विस्थापितांच्या मनात एक जिजीविषा निर्माण होते.. एखाद्या चिरेबंदी भिंतीतूनही लालसर पानांचं पिंपळाचं कोवळं झाड सळसळावं तशी!

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
सूर्यास्तानंतरची धारावी..
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी