गाण्याच्या चाहत्यांमध्ये लता मंगेशकर आणि सुमन कल्याणपूर यांची अनेकदा तुलना केली गेली. अर्थातच ती अस्थानी होती. सुमनताईंना लतादीदींबद्दल कमालीचा आदर होता. त्यांचं एकत्र गाणं वा भेटीगाठी फार झाल्या नसल्या तरीही परस्परांबद्दल दोघींनाही जिव्हाळा होता. लतादीदींच्या साठवणीतल्या आठवणी सांगताहेत.. सुमन कल्याणपूर!
विशेषण लावल्याशिवाय ज्यांच्या संदर्भात काहीही बोलणं अपुरं वाटतं आणि अनेक विशेषणं लावूनही वर्णनात अपूर्णता जाणवत राहते असं एक व्यक्तिमत्त्व ६ फेब्रुवारी रोजी अनंताच्या प्रवासाला निघून गेलं. ‘लता मंगेशकर’ हा सप्ताक्षरी महामंत्र परमात्वतत्वात विलीन झाला आणि धर्म, जात, भाषा यापलीकडे पोरकेपणाची सार्वत्रिक भावना समाजात दिसून आली. आपल्याच घरातील वडीलधारं माणूस जावं तशी अनेक रसिकांची अवस्था झाली. संपूर्ण निर्दोष, प्रासादयुक्त स्वर, तिन्ही सप्तकांत लीलया संचार करणारा, नादमाधुर्याची परिसीमा गाठणारा तेजमधुर गळा आणि त्यातली नैसर्गिक भावप्रवणता म्हणजे लता मंगेशकरांचं स्वर्गीय गाणं.. जे दिवसाच्या प्रत्येक प्रहरात आपल्या सोबत असतं.. असणार आहे.
लतादीदींच्या निधनाचं वृत्त कळताच सर्वप्रथम सुमनताईंची भेट घ्यावी असं वाटलं. चेहऱ्यावर विषाद घेऊन त्या सुन्न होऊन बराच वेळ टीव्हीवर दिसणारी क्षणचित्रं पाहत होत्या. मनात अनेक विचार येत होते. लतादीदींचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ चा. आणि दैवलीला अशी की, सुमनताईंचा जन्मही २८ तारखेचाच.. फक्त १९३७ च्या जानेवारी महिन्यातला. हा दैवयोग जाणवून देताच सुमनताई उद्गारल्या, ‘‘मीच नव्हे, तर हरपिढीतील कोणत्याही गायिकेसाठी लताताईंचा आवाज श्रेष्ठ, दैवी आणि आदर्शच होता. माझ्या मनात त्यांच्याबद्दल कायम आदरभावच राहिला. त्यांचा आवाज गोड, सुस्पष्ट, कोमल, तितकाच तेज:पुंज होता. त्यांच्या गाण्यात मास्टर दीनानाथांचा वारसा दृग्गोचर होई. मला नेहमी वाटतं, आपल्या गाण्यात आपली स्वभाववैशिष्टय़ं उमटून येतात.’’ इथे बोलता बोलता थोडंसं थांबून सुमनताई दीदींचं ‘दिल एक मंदिर’ चित्रपटासाठी गायलेलं गीत गुणगुणू लागतात.. ‘रुक जा रात, ठहर जा रे चंदा!’
‘मग तुमची स्टुडिओत भेट झाली असेल अनेकदा..’
सुमनताईंचं उत्तर- ‘‘नाही. एक-दोन वेळा सोडून आम्ही फारशा स्टुडिओत भेटलो नाही. शंकर जयकिशनजींची रिहर्सल रूम फेमस लॅबच्या वरच्या मजल्यावर होती. रेकॉर्डिगच्या आधी त्यांना दोन तालमी तरी अपेक्षित असायच्या. पण प्रत्येक कलाकाराची तालीम आणि रेकॉर्डिगची वेळ वेगवेगळी असे. प्रत्येक कलाकार नियोजित वेळी येऊन गाऊन जायचा. लताताईंचं रेकॉर्डिग बहुतेक वेळा आधी होऊन जाई. तंत्रज्ञांशी थोडा वेळ त्या गप्पागोष्टी करत; पण तेव्हा माझ्या रेकॉर्डिगची तयारी सुरू होई. तुम्हाला एक सांगते, लताताईंच्या तिथे असण्याचं दडपण मात्र मला आलं नाही. मी आपल्याच तंद्रीत संगीतकाराच्या सूचनांबरहुकूम गाणं गात असे. मात्र, आदरभावनेमुळे असेल किंवा संकोची स्वभावामुळे, परंतु मुद्दाम भेटून त्यांच्या गप्पागोष्टींत व्यत्यय आणण्याचं धाडस मी कधी केलं नाही.’’
‘हिरवा चाफा’ हळूहळू उमलू लागला होता.. ‘‘लताबाईंचं गाणं पहिल्यांदा कधी कानावर पडलं तुमच्या?’’ या प्रश्नावर त्या थोडय़ा मोकळेपणाने सांगू लागल्या, ‘‘नूरजहाँ, राजकुमारी, सुरैया, अमीरबाई कर्नाटकी, जोहराबाई अंबालेवाली यांची गाणी कानांवर पडू लागली आणि त्या गाण्यांतली चित्ताकर्षकता मनाला मोहू लागली. ही गाणी मी गुणगुणत असे; पण तरीही ती काहीशी दूरस्थ वाटत. परंतु लताताईंनी गायलेलं ‘लाहोर’ या चित्रपटातलं (‘लाहोर’- १९४९, गीतकार- राजेंद्र कृष्ण, संगीतकार- श्याम सुंदर) ‘बहारें फिर भी आयेगी मगर हम तुम जुदा होंगे’ हे गाणं योगायोगाने कानावर पडलं आणि बारा-तेरा वर्षांच्या शाळकरी मुलगी असलेल्या माझं जगच बदलून गेलं.
‘‘त्यावेळी आम्ही मॉडेल हाऊसमध्ये राहत होतो आणि नाना चौकात ‘हरी निवास’मध्ये माझी लाडकी सुमित्रा अक्का.. मित्राक्का आणि मेहुणे (कोंकणीत ‘भाइया’ म्हणजे मेहुणे) भाइया राहत होते. शाळेला सुट्टी पडली की मित्राक्काकडे धुडगूस घातल्याशिवाय आम्हाला चैन पडत नसे. आमच्या नात्यात सावत्रपण कधी डोकावलंच नाही. असो. तर हरी निवासच्या शेजारच्या इमारतीत एक पंजाबी जोडपं आपल्या घरी ग्रामोफोनवर ‘लाहोर’ वगैरे चित्रपटातली गाणी दिवसभर ऐकत असे. ‘बहारें फिर भी आयेगी’ हे गाणं प्रत्येक वेळी ऐकताना त्या स्वरातला गोडवा आणि दर्द त्या अबोध वयातही मनाला भिडत असे. पुढे १९५२ साली मी गाण्याचं रीतसर शिक्षण घेत होते तेव्हा ‘निर्मोही’ चित्रपटातली गाणीही अशीच जिवाचा कान करून ऐकली. ‘अब गम को बना लेंगे जीने का सहारा’ आणि ‘दुखियारे नैना’ (‘निर्मोही’- १९५२. गीतकार- इन्दीवर, संगीतकार- मदनमोहन) हे गौड सारंग रागाधारित गीत- ही गाणी कितीही वेळा ऐकली तरी मन अतृप्त राही.
‘‘गंमत म्हणजे त्या गाण्यांमधली भावना, त्यातल्या नाजूक हरकती मी गाऊ, गुणगुणू शकत असे, हीच माझ्यासाठी आनंदाची बाब होती. सुरैया, नूरजहाँ, जोहराबाई यांच्या गाण्यातला ढंग मला आवडायचा; पण नातं नकळत जुळलं ते लतास्वराशीच!’’
आठवणींच्या संदुकीत जपून ठेवलेले काही क्षण सुमनताई उघड करत होत्या, हीच गोष्ट अप्रूपाची होती. ‘मँगू’ या चित्रपटापासून (१९५४) सुमनताईंचा पाश्र्वगायनातला प्रवास सुरू झाला. तेव्हा चित्रपटाच्या मुहूर्तप्रसंगी लताताई आणि हेमंतकुमार हे दोघेही उपस्थित होते. एवढंच नव्हे, तर चित्रपटातल्या लोरीचं (‘कोई पुकारे धीरेसे तुझे’, संगीत- मुहम्मद शफी) बॉम्बे लॅबमध्ये ध्वनिमुद्रण झालं तेव्हा त्याला लताताई हजर होत्या. ‘छान गायलीस..’ अशी त्यांची पदार्पणातच मिळालेली पावती सुमनताईंना मोलाची वाटते. या गोष्टीचा उल्लेख त्यांनी मुलाखतींमध्ये कृतज्ञतेने अनेकवार केला आहे.
‘‘चाँद’ या चित्रपटासाठी हेमंतकुमारजींनी लता-सुमन हे दोन्ही आवाज एका नृत्यगीतात वापरले. त्याबद्दल सांगा ना..’ यावर सुमनताई म्हणाल्या, ‘‘हा चित्रपट १९५९ चा. गीतकार होते शैलेंद्र. ‘कभी आज कभी कल कभी परसों’ हे अतिशय श्रुतिमधुर चालीचं द्वंद्वगीत होतं. बांद्य्राच्या मेहबूब स्टुडिओत या गाण्याचं रेकॉर्डिग झालं. रेकॉर्डिगआधी तालीम, चर्चा वगैरे काही प्रकार नव्हता. आम्हाला आमच्या ओळी सांगितल्या गेल्या होत्या. वादकांची रीतसर तालीम होऊन रेकॉर्डिगची सर्व सज्जता होती. शेजारी शेजारी असलेल्या माइकवरच आमची थोडीशी तालीम आणि आवाज चाचणी वगैरे झाली. आम्ही आपापल्या ओळी हेमंतदांच्या सूचनेनुसार गायलो. रेकॉर्डिग संपल्यावर आम्ही एकमेकींची ख्यालीखुशाली विचारली. बस एवढंच.’’
‘सुमनताई, १९६४ च्या ‘गजल’ चित्रपटातलं ‘उनसे नजरे मिली और हिजाब आ गया’ या मुजऱ्यामध्ये लतादीदींसोबत तुमचा आवाज आहे की मीनू पुरुषोत्तम यांचा?’
उत्तरादाखल या चित्रपटाच्या गाण्याची रेकॉर्ड त्यांनी लावली. ‘संगीतकार मदनमोहन, गीतकार साहिर’ यांच्या उल्लेखासोबत रेकॉर्डवर ‘लता- सुमन- कोरस’ असा स्पष्ट उल्लेख आहे आणि चित्रपटात लतादीदींसोबत मीनू पुरुषोत्तम यांचं नाव आहे. गाणं पुन:पुन्हा ऐकल्यावर सुमनताईंचा स्वर ओळखू आला. ‘‘गाणं गाऊन झालं की आपलं त्यात काय राहिलं, हा प्रश्न निर्थक असतो. ‘इदं न मम्’ एवढी अलिप्तता सहजी अंगी बाणवली जात नाही,’’ सुमनताई म्हणाल्या, ‘‘तुम्ही लताताईंच्या भेटीबद्दल विचारलंत ना? आणखी एक आठवलं. ‘लेकिन’ चित्रपटाच्या प्रीमियरला मला त्यांनी आमंत्रण पाठवलं होतं. मीही आवर्जून हजर राहिले होते. लताताईंना भेटून नमस्कार करताच त्यांनी प्रेमभराने माझे दोन्ही हात हाती घेऊन म्हटलं, ‘बरं झालं तुम्ही आलात.’ मध्यंतरात आशाताईही भेटल्या. आपल्या नेहमीच्या ठाशीव शैलीत म्हणाल्या, ‘आजकाल आपली गाणी दुसरी मंडळी गात आहेत. आता आपणच आपली गाणी पुन्हा गायली पाहिजेत..’ असं काहीतरी. दोघींना भेटून प्रसन्न वाटलं. हो, आणखी एक आठवलं, १९५४ सालच्या ‘दरवाजा’ (संगीतकार- नाशाद, गीतकार- खुमार बाराबंकवी) या चित्रपटात तलत मेहमूद यांच्यासोबत एक द्वंद्वगीत मी गायले होते.. ‘एक दिल दो है तलबगार.’ त्या रेकॉर्डिगच्या वेळी लताताई उपस्थित होत्या.. तो एक क्षण आठवतो.
‘‘गाण्यांच्या रॉयल्टीचा वाद झाला तेव्हा इतर गायक-गायिकांच्या तुलनेत मी नवी होते. अशावेळी रॉयल्टी या विषयावर अधिकारवाणीने मी काही मत मांडणं केवळ अशक्यच होतं. रफीसाहेबांसोबत तोवर मी अनेकदा द्वंद्वगीतं गायली होती. पुढेही अतिशय हळुवार, मोहक द्वंद्वगीतं गात राहिले, हेच माझ्यासाठी सत्य आहे.
‘‘आणखी एक सांगू? गाण्याचं रेकॉर्डिग झालं की मला घरचे वेध लागत. माझी मुलगी चारुल लहान होती. त्यामुळे लवकरात लवकर घर गाठणं हा माझा एककलमी कार्यक्रम असायचा. आणखी दुसरी गोष्ट.. लताताईंबद्दल आत्यंतिक आदरभाव आणि त्यांचं निर्विवाद श्रेष्ठ स्थान यामुळे आमच्यात कायम आदरयुक्त अंतरच राहिलं. त्यांचं असं निघून जाणं मात्र मनाला खूप लागून राहिलं आहे. एक पर्व संपलं.’’
मुलाखत : मंगला खाडिलकर
lokrang@expressindia.com