सुयोग देशपांडे
नाटकासाठी २०१२ साली अकोल्याहून पुण्यात आलो. आल्या आल्या मी इथे ‘आसक्त’ संस्थेचं ‘नेक्रोपोलीस’ हे नाटक पाहिलं. नाटक जिथे सादर होत होतं ती जागा मी याआधी पाहिलेल्या नाट्यगृहांपेक्षा वेगळी जाणवली. सगळ्या भिंती काळ्या. खालचा स्टेजदेखील. मागे काळा पडदा, वर लाइट झाकायला काळ्या झालरी आणि बाजूच्या विंग्ससुद्धा काळ्या. समोर एक सेटी ठेवलेली. त्यावर आणि आजूबाजूला वाळलेली पानं अंथरलेली, त्यावर प्रकाश सोडलेला. मधे पडदा नव्हता. मी खाली सतरंजीवर एकदम पहिल्या रांगेत बसलेलो. हे छोटेखानी थिएटर प्रेक्षकांनी गच्च भरलेलं. नाटक सुरू झालं तेव्हा माझ्यापासून अगदी दोन फुटांवर नट अभिनय करीत होते. नाटक हळूहळू पुढे सरकत होतं. मी त्याआधी पाहिलेल्या कुठल्याही नाटकापेक्षा हा अनुभव वेगळा होता.

त्यांचा सगळा अकृत्रिम अभिनय इतक्या जवळून पाहणं आणि आपल्या नकळत आपण अनोख्या जगाचा प्रवास करणं, हा माझ्यासाठी दृश्यिक पातळीवर धक्का होता. ती जागा होती सुदर्शन रंगमंच. नंतर मी त्या जागेत भरपूर नाटकं पाहिली. हळूहळू मला कळायला लागलं की, या जागेला ‘ब्लॅक बॉक्स थिएटर’ किंवा ‘इंटिमेट थिएटर’ म्हणतात.

नक्की काय आहे हे?

‘ब्लॅक बॉक्स थिएटर’ म्हणजे काय? तर सोप्या भाषेत एक आयाताकृती/ चौकोनी हॉल किंवा खोली. काळ्या भिंती, काळे पडदे, काळा रंगमंच, अगदी वरचं छतसुद्धा काळं. हे त्याचं मूर्त स्वरूप. पण थिएटर ही एक जादूई जागा असते. नाटक जितकं समोर रंगमचावर घडतं, तेवढंच ते समोर बसलेल्या प्रेक्षकांच्या मनातसुद्धा घडत असतं. ‘ब्लॅक बॉक्स’मध्ये जितके नट केंद्रस्थानी असतात, तितकेच प्रेक्षकही.

सुदर्शनमध्ये चालणारे नाटक, अभिवाचन, एकपात्री प्रयोग आणि वैविध्यपूर्ण सादरीकरण व्यापक पातळीवर ‘द बॉक्स’ या मिनी थिएटरमध्ये होते. पुण्यातल्या ‘बॉक्स’ आणि ‘महाराष्ट्र कल्चरल सेंटर’ या अशा जागा आहेत जिथे नृत्य, संगीत, चित्रकला, चित्रपट प्रदर्शन, स्टॅण्ड अप कॉमेडी, आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा, विविध प्रकारच्या कार्यशाळा होतात. नुसतं मराठी नाही, तर पुण्यातल्या आणि संपूर्ण देशभरातून विविध भाषांमधले कलाकार या मिनी थिएटरला सध्या पसंती देतात. या सगळ्या माध्यमातून या जागांचासुद्धा खास असा प्रेक्षकवर्ग तयार होतोय. हा प्रेक्षक सातत्याने विविध कलांचा आनंद घेणारा आहे. त्यांचा विशिष्ट आस्वादकवर्ग तयार होतेय.

दोन प्रमुख आकर्षण केंद्रांसह पुण्यात श्रीराम लागू रंग-अवकाश हेदेखील ‘ब्लॅक बॉक्स थिएटर’ आहे. मुंबईत ‘जीफाइव्ह ए’ (G5 A), वेदा फॅक्टरी, एनसीपीए अशा या प्रकारांतील कलासंस्था. दिल्लीतील ब्लॅक बॉक्स ओखला, अल्केमी ब्लॅक बॉक्स, स्टुडियो सफदर, तसेच शून्य सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स बंगलोर… ही सध्या भारतात कार्यरत असलेली लघु थिएटर्स. याशिवाय राष्ट्रीय नाट्य विद्यालय दिल्ली, केरळ नाट्य / संगीत अकादमी असे मुक्त रंगमंच फक्त मोठ्या शहरांमध्येच नाहीत तर काही छोट्या छोट्या गावांमध्येसुद्धा सुरू झाले आहेत. त्यात कणकवली येथे निलायम थिएटर, वाघळवाडी येथे परेश मनोहर आणि समीक्षा यांनी आपल्या घराला सादरीकरणाच्या अवकाशात रूपांतरित केलंय.

हजारो शक्यतांचे माध्यम…

मला दिग्दर्शक म्हणून ब्लॅक बॉक्स थिएटर हे हजारो शक्यतांना वाट मोकळी करणारं सशक्त आणि तितकंच आव्हानात्मक माध्यम वाटतं. मी आतापर्यंत दिग्दर्शित केलेली नाटकं बऱ्यापैकी ब्लॅक बॉक्स पैसाचा विचार करून केली. प्रायोगिकता ही इथे सादर होणाऱ्या नाटकांच्या केंद्रस्थानी राहते. जी नेहमीच्या व्यावसायिक नाटकांच्या विषयांपेक्षा वेगळी असते.

ब्लॅक बॉक्स थिएटरमध्ये नट आणि प्रेक्षक यांच्यातली जवळीक (proximity) हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग. याचा थेट परिणाम नटांच्या अभिनय पद्धतींमध्ये आणि प्रेक्षकांच्या अनुभवावर होतो. ‘प्रोसेनियम थिएटर’मध्ये अंतर दूर असल्यामुळे प्रत्येक प्रेक्षकाला नट दिसेलच असं होत नाही. पण इंटिमेट थिएटरमध्ये नट-प्रेक्षक हे अंतर कमी असल्यामुळे प्रेक्षकाला आपण त्या वातावरणाचा एक भाग आहोत ही अनुभूती मिळते.

‘सिझन एक्स – एपिसोड वाय’ हे नाटक जगभरातल्या वेगवेगळ्या लघु नाटकांचं ( short plays) एकत्रीकरण होतं. ज्यात आम्ही ‘कॅलिडोस्कोपिक फॉर्म’ वापरला . म्हणजे प्रेक्षकांना आपण हे नाटक ‘कॅलिडोस्कोप’मधून बघतो आहोत हा अनुभव आम्हाला त्यांना द्यायचा होता. त्यासाठी ते जवळ असणं गरजेचं होतं. ज्यात काही प्रसंगांमध्ये कलाकार थेट प्रेक्षकांमध्ये जाऊन त्यांच्यासोबत संवाद साधत असत.

‘व्हाया सावरगाव खुर्द’ नाटकामध्ये स्टँड अप कॉमेडीचा फॉर्म आम्ही वापरला. ज्यात प्रत्येक नट थेट प्रेक्षकांसोबत संवाद साधतात आणि प्रेक्षकसुद्धा त्यांना रिस्पॉन्स देतात. ‘जॉयराइड’ या नाटकात आम्ही डॉक्युमेंट्री हा फॉर्म वापरला. इथेसुद्धा प्रेक्षक कॅमेऱ्याच्या मागे बसून हे नाटक बघत आहेत हा अनुभव आम्ही प्रेक्षकांना देतो.

मिनिमलिझम हा ब्लॅक बॉक्स थिएटरचा महत्त्वाचा घटक. मगाशी म्हटल्याप्रमाणे, इथे सादरीकरणासाठी तुम्हाला मोठ मोठे सेट किंवा खूप सायास करायची गरज नाही. तुम्ही सगळ्या गोष्टी अल्प ठेवूनसुद्धा पाहिजे तो आशय जास्त सकसपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकता. घटक अल्प असणे तुमच्या सर्जनशीलतेला आव्हान देतं. संहिता आणि नटांच्या बरोबर प्रकाशयोजना, ध्वनी योजना, नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा यांचा वापर करूनसुद्धा आशय सुसंगत रूपक निर्मितीला मिनिमलिझमचा फायदा होतो.

या थिएटरची रचना मुक्त असल्यामुळे नुसता सादरीकरणाचा नाही तर प्रेक्षक कुठे बसून आपलं नाटक बघतील याचासुद्धा विचार दिग्दर्शक करताना दिसतात. ‘आसक्त’च्या मोहित टाकळकर दिग्दर्शित ‘मात्र- रात्र’ या नाटकात थिएटरच्या मधोमध एक मोठा बेड ठेवण्यात आला होता आणि प्रेक्षक त्याच्या आजूबाजूला बसून नाटक पाहत होते. अगदी उलट ‘गजब कहानी’ या हिंदी नाटकात प्रेक्षकांमध्ये होते. त्यांना फिरणाऱ्या खुर्च्या दिल्या होत्या आणि संपूर्ण नाट्यगृहात चारही बाजूंनी नाटक घडत होतं आणि प्रेक्षक जिकडे प्रसंग असेल तिकडे आपली खुर्ची फिरवत होते.

इंटिमेट थिएटरमध्ये माणसांच्या गोष्टी केंद्रस्थानी येतात आणि नाटक हे संवादाचं सशक्त माध्यम आहे याची आठवण करून देतात. मला स्वत:ला ब्लॅक बॉक्स थिएटर ही अशी जादुई जागा वाटते- जिथे मी मला हवं तसं नाटक करू शकतो, कुठल्याही प्रकारचे धोके घेऊ शकतो आणि सादरीकरणाच्या असंख्य प्रकारांना आजमावू शकतो.

गरज का वाढली? ब्लॅक बॉक्स थिएटर हा प्रायोगिक नाटकवाल्यांचा प्रांत. त्या मागे बरीच कारणं आहेत. त्यात आर्थिक बाजू हा एक महत्त्वाचा भाग. नवनिर्मिती करणाऱ्या लोकांना प्रेक्षक नसतो. त्याना ‘प्रोसेनियम थिएटर’ची आर्थिक गणितं झेपणं कठीण होऊन बसतं. प्रत्येक प्रयोगाला ५०० ते ७०० प्रेक्षक कुठून आणायचे, हा प्रश्न नाटकवाल्यांसमोर असतोच असतो. ‘ब्लॅक बॉक्स’मध्ये या दोन्ही गोष्टी तुमच्या हातात राहतात.

या पद्धतीच्या जागा देशभरात कार्यरत आहेत. या शिवाय काही जागा ज्यांना ब्लॅक बॉक्स नाही म्हणता येणार, पण त्यांची रचना मुक्त असते. उदा. आम्ही ‘व्हाया सावरगाव खुर्द’ या नाटकाचे सलग दोन प्रयोग नागपूरच्या मिराकी थिएटरमध्ये केले होते. खरं तर हा त्यांचा तालिमीचा हॉल. पण तरीही खाली सतरंजी आणि मागे खुर्च्या टाकून १०० लोक बसतील एवढी जागा नक्की आहे. मग सगळ्या हॉलमध्ये काळे पडदे लावून ब्लॅक बॉक्ससारखी वातावरण निर्मिती झाली आणि ते प्रयोग प्रचंड रंगले. इथेसुद्धा प्रेक्षक आणि कलाकार यांच्यात जवळीक निर्माण झाली.

आणखी एक प्रयोग आम्ही कुर्ला येथील ‘प्रबोधन प्रयोगघर’ येथे केला. हे सुद्धा ६० लोक बसतील असं छोटेखानी थिएटर. इथे रंगमंच थोडा उंच केला आहे. जिथून रंगमंच संपतो अगदी अर्ध्या फुटावर खुर्च्यांची पहिली रांग. तसं व्हाया सावरगाव खुर्दच्या स्टँड अप कॉमेडीच्या फॉर्ममुळे कलाकारांना नेहमीचा नाटकातला अभिनय नाही करावा लागत. त्यांना खूप जिवंत, सहज वावरावे लागते. तेव्हा अशा प्रकारच्या जागा या प्रयोगांना खूप फायद्याच्या ठरतात.

प्रायोगिक नाटकांना संजीवनी…

मला ब्लॅक बॉक्स थिएटरची अजून एक जमेची बाजू वाटते, ती म्हणजे नव्या लोकांना मिळणारं व्यासपीठ. तुमच्याकडे संहिता आहेत. तुम्ही अल्पशा सामग्रीमध्ये नाटक तयार करा, जागा नोंदणी करा आणि प्रयोग करा… ब्लॅक बॉक्समुळे प्रायोगिक नाटकांची संख्या या दशकात वाढली. त्यामुळे प्रयोगांची संख्यासुद्धा वाढली आहे. पूर्वी मोठ्या थिएटरमध्ये पाचेक प्रयोग करून बंद होणाऱ्या नाटकांचे आता वर्षभरात २०-२५ प्रयोग होत आहेत.

भारतात प्रयोगिक नाटकाचा व्यवहार दिसतो तितका सोपा नाहीये. मोठमोठाल्या सरकारी खासगी नाट्यगृहात प्रयोग सादर करणं हे उदयास येणाऱ्या संस्थांना परवडणारं नाही. त्यामुळेच देशभरात अशा छोटेखानी जागा निर्माण झाल्या आणि पुुढेदेखील होत राहतील.

ब्लॅक बॉक्स किंवा इंटिमेट थिएटर ही आज पारंपरिक नाट्यगृहांना पर्याय जरी असले तरी ती पुढील काळात फायदेशीर ठरू शकतात. कारण मोठी नाट्यगृहं किंवा सिनेमा थिएटरर्स उभी करणं ही आता आर्थिकदृष्ट्या आणि जागेच्या अभावी फार आव्हानात्मक गोष्ट बनलीय. पण आपण जर ब्लॅक बॉक्स थिएटर सुरू करायचं ठरवलं तर आगदी उपलब्ध जागेत ती निर्माण करून तिथे नवा प्रेक्षक उभारू शकतो. एकदा प्रेक्षकाला इथल्या वातावरणाशी एकरूप होता आले की तोच प्रेक्षक मोठ्या प्रयोगांसाठी पारंपरिक नाट्यगृहांना किंवा सिनेमा थिएटरला वळवता येऊ शकतो. काही मराठी व्यावसायिक नाटकं ही पहिले प्रायोगिक पद्धतीनं अशा थिएटरमध्ये केली गेल्याची उदाहरणेदेखील आहेत. पुढे मग ती व्यावसायिक रंगभूमीवर गाजली. ‘माकडाच्या हाती शॅम्पेन’ या नाटकाचे प्रयोग आधी पुण्याच्या सुदर्शन रंगमंच येथे झाले. नंतर ते व्यावसायिक रंगभूमीवर सादर झालं. अशा प्रकारे ब्लॅक बॉक्स हे सादरीकरणासाठी चाचणी व्यासपीठ ठरू शकतं.

ब्लॅक बॉक्सची प्रेक्षक क्षमता ही मुख्यत: ५० ते २०० पर्यंत असते. इथे बऱ्याचदा कार्यक्रमानंतर कलाकारांसोबत होणाऱ्या चर्चा हासुद्धा प्रेक्षकांना त्या सादरीकरणात सामावून घेणारा घटक असतो. खूप साऱ्या कलाकारांकरिता ब्लॅक बॉक्स ही फक्त जागा नसून अस्तित्वाची लढाई लढण्याची प्रयोगशाळा आहे. या अशा जागा आहेत जिथे एक लेखक पहिल्यांदा त्याने लिहिलेले शब्द नटांच्या तोंडून ऐकतो, नट पहिल्यांदा आपले संवाद सादर करतो. जिथे शांततेतून संवाद साधला जातो. जिथे नट आणि प्रेक्षक एका लयीत श्वास घेतात… नटांचे पाणावणारे डोळे, त्यांच्या शरीरातून निथळणारा घाम, त्यांच्या डोळ्यांची उघडझाप हे सगळं कुठल्याही बेतीवपणाशिवाय प्रेक्षक अनुभवतात.

ब्लॅक बॉक्समुळे नुसतं पूर्णवेळ कलाकार म्हणून काम करणारे शहरी आणि एक ठरावीक सामाजिक आणि आर्थिक गटांमधले नाटकवालेच नाहीत एलजीबीटीक्यू समुदाय, दलित कलावंत आणि छोट्या गावांमधील रंगकर्मींना आपल्या कहाण्या सांगण्याची संधी मिळत आहे. कलेच्या सादरीकरणाच्या पलीकडे जाऊन या जागा कलावंतांसाठी हक्काचा कट्टा म्हणून उदयास येत आहेत.

एकीकडे मुख्य धारेतील थिएटरला पर्याय म्हणून ब्लॅक बॉक्स संस्कृती अनेक आव्हानांवर मात करीत पुढे सरकतेय. प्रेक्षक मर्यादा कमी असल्याने यांतून मिळणारे पैसे पुरेसे नसतात. प्रेक्षक घडविण्यासाठी लागणारा कालावधी आणि अशा जागा चालवण्यासाठी लागणारी आर्थिक बाजू सक्षम नसेल तर ही यंत्रणा कोलमडू शकते. कलात्मक आणि सांस्कृतिकदृष्ट्या वैविधता असली तरी ब्लॅक बॉक्स थिएटर आज फक्त विशिष्ट प्रेक्षकपुरतीच मर्यादित आहे. उद्याचे मात्र चित्र वेगळे असेल. कारण करोनानंतर जगभरातील प्रेक्षकांच्या, दर्शकांच्या सवयी बदलल्या. पारंपरिक चित्रगृह, नाट्यगृहांतकडे जाण्याचा कल आटला. अशा स्थितीत कला तगवून ठेवत प्रेक्षक तयार करण्याची जबाबदारी ही ब्लॅक बॉक्स थिएटरकडेच आलेली दिसते.

माणूस हा गोष्टींवर जगणारा प्राणी. प्रत्येकाकडे एक गोष्ट असते. त्याच्या आत ती दडलेली असते. अशी ब्लॅक बॉक्स थिएटर प्रत्येक मोठ्या शहरात, तालुक्यात आणि छोट्या गावांमध्ये तयार झाली तर कितीतरी नव्या कहाण्या आपल्याला बघायला मिळू शकतील, यात वादच नाही.

suyogdesh88@gmail.com