पहिल्या बायकोच्या हयातीत दुसरे लग्न करावे की नाही, यासंदर्भात चर्चा घडविणाऱ्या ‘समाजस्वास्थ्य’च्या विशेषांकात या विषयाची समाजशास्त्रीयदृष्टय़ा चिकित्सा करणारा इरावती कर्वे यांचा लेख-
पुरुषांनी पहिली स्त्री जिवंत असता द्वितीय विवाह करावा की नाही, या प्रश्नाचे उत्तर ताबडतोब होय किंवा नाही असे देणे शक्य नाही. मनुष्याच्या बहुतेक सर्वच व्यापारांबद्दल असेच म्हणावे लागेल. कोणत्याही कृत्याची इष्टानिष्टता व न्याय-अन्याय्यता ती क्रिया कोणत्या परिस्थितीत केली जाते, त्यावर अवलंबून असते. मनुष्याची कोणतीही क्रिया त्याच्या सामाजिक परिस्थितीच्या संदर्भापासून तोडून अलग करता येत नाही. वैवाहिक जीवनात एक पुरुष व एक स्त्री, एक पुरुष व अनेक स्त्रिया, आणि एक स्त्री व अनेक पुरुष अशी निरनिराळ्या तऱ्हेची कुटुंबव्यवस्था संभवते व निरनिराळ्या काळी व निरनिराळ्या देशांत दृष्टोत्पत्तीस येते. या तिन्हींपैकी कोणतीही एक सांस्कृतिकदृष्टय़ा किंवा नीतिशास्त्रदृष्टय़ा इतर दोहोंपेक्षा श्रेष्ठ आहे, असे म्हणता यावयाचे नाही. इतर कोणावरही अन्याय न होता सुखाने व एकोप्याने राहून ज्या ठिकाणी समाजाला पोषक अशा गृहस्थाश्रमाचे पालन केले जाते, ती कुटुंबव्यवस्था उत्तम व अशी आदर्श कुटुंबे तीनही तऱ्हेच्या विवाहव्यवस्थेत आढळून येतात.
ही झाली केवळ तात्त्विक भूमिका. आज आपल्या समाजात अशा तऱ्हेचे जे विवाह होतात, ते इष्ट की अनिष्ट, हे पाहणे आहे. अशा विवाहाने प्रथम पत्नीवर अन्याय होतो व असे विवाह कायद्याने बंद करावे, असे बऱ्याच समाजसुधारकांचे म्हणणे आहे. प्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की, सर्वच द्वितीय विवाह प्रथम पत्नीच्या मनाविरुद्ध नसतात. प्रथम पत्नीने आग्रह केल्यामुळे संतत्युत्पादनासाठी किंवा इतर कारणांमुळे पुरुष कधी कधी द्वितीय विवाह करतात व असे कुटुंब सुखीही असते. तेव्हा त्याविरुद्ध कोणी आक्षेप घेण्याचे कारण नाही. तसेच साळी, कोष्टी व काही शेतकरीवर्गात बहुपत्नीत्वाची चाल दिसून येते. पुरुषाला जितक्या बायका जास्त, तितकी कामात मदत जास्त व मिळकत जास्त असे होते व त्यामुळे प्रथम पत्नीचा अशा विवाहास बहुधा विरोध नसतो. उलट, तिला कामाधामांत मदतनीस मिळते म्हणून तीच पुष्कळदा आपल्या धाकटय़ा बहिणीस सवत म्हणून आणते. येथेही कोणी आक्षेप घेण्याचे कारण नाही. त्याचप्रमाणे प्रथम पत्नी वेडी असल्यास किंवा कजाग आणि भांडकुदळ किंवा अतिशय कुस्वभावी असल्यास एखाद्या पुरुषाने दुसरे लग्न केल्यास फार तर एका लग्नापासूनही त्याने धडा घेतला नाही म्हणून त्याला वेडा म्हणता येईल; पण त्याचे करणे अनैतिक आहे असा आरोप त्यावर करता येणार नाही. उलट, अशा परिस्थितीतसुद्धा त्याला पहिल्या स्त्रीला काडीमोड देता येत नाही व कायद्याने तिचे पालन करण्याचे बंधन त्यावर असते, ही गोष्ट स्त्रियांच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे व त्यांच्या स्वातंत्र्याला बाधा येईल असे कायदे समाजसुधारकांना स्त्रियांनी करू देऊ नयेत.
जर प्रथम पत्नी सुशील, रूपवती व पुत्रवती असेल, तर पुरुषाच्या द्वितीय विवाहाला कायद्याने पायबंद असावा का, हा प्रश्न राहतो. ज्यावेळी पुरुष द्वितीय विवाहोत्सुक असतो, त्यावेळी त्याचे पहिल्या बायकोवरील प्रेम अगोदरच उडालेले असते. जिव्हाळ्याचे संबंध गेले की कुटुंबात तेढीचे वातावरण सुरू होते. अशा परिस्थितीत स्त्रियांना सोडचिठ्ठी घेऊन स्वत:ला व नवऱ्याला लग्नबंधनातून मोकळे करता येईल, किंवा नवऱ्याच्या द्वितीय विवाहास, असंतोषाने का होईना, पण मान तुकवावी लागेल, असे दोन मार्ग तात्त्विकदृष्टय़ा संभवतात. त्यांना नवऱ्याकडून पोटगी, मुलांचा ताबा व त्यांच्या पोटापाण्यासाठी लागणारा खर्च या गोष्टी मागण्याचा हक्क असावा, हे योग्य आहे. पण ज्या नवऱ्याचे आपल्यावर प्रेम नाही, तो मला नाही तर नाही, पण दुसरीलाही मिळता कामा नये, अशा वृत्तीने सर्वाचाच तोटा होईल. आपल्या स्वत:चे आयुष्य तर निष्प्रेम आहेच, पण नवऱ्याला इच्छित वस्तू न मिळू दिल्यामुळे घरात कायम धुसफूस मात्र सुरू असते. दुसऱ्या बाईबरोबरच्या सहवासाला पायबंद बसत नाहीच, पण तिच्यावर होणारा खर्चही यथास्थित होत असतो. पुष्कळदा ती दुसरी स्त्री नवऱ्याची मानलेली बहीण म्हणून घरात येत-जात असते व मानीव आत्याबाईच्या वर्चस्वाखाली स्वत:ला व मुलांना राहावे लागते व घरातील वातावरण कुढे व दांभिक होते. असल्या वातावरणाचा परिणाम वाढत्या मुलामुलींवर होतो. त्यापेक्षा उघड सवत आल्याने घरातले प्रेमाचे वा दुराव्याचे संबंध उघड होतात.
आता जी बाई विवाहित पुरुषाच्या प्रेमपाशात सापडते, तिच्या दृष्टीने विचार केल्यास असे दिसून येईल की, तिची स्थिती अत्यंत अनुकंपनीय असते. जाणूनबुजून एखादीच्या संसाराचा विचका करण्याच्या उद्देशाने काही अशी स्त्री विवाहित पुरुषावर प्रेम करीत नाही. ती प्रेमात सापडते असेच म्हणणे जास्त योग्य होईल. अशा कित्येक स्त्रिया आजन्म अविवाहित राहून मावशी वा आत्याबाई या नात्याने आपले प्रेम असलेल्या पुरुषाच्या संसाराला पैशाची व कष्टाची मदत करतात. बाहेरील समाज त्यांच्या नावाने नाही नाही त्या कंडय़ा पिकवण्यास तयार असतो. ज्या घरात त्या राबतात, त्या घरातही त्यांना बेताचाच मान असतो. जोपर्यंत कष्ट किंवा पैसा अशा मानीव आत्याबाईंकडून मिळतो, तोपर्यंतच त्यांचे प्रस्थ असते. काही स्त्रिया लग्नाशिवाय विवाहित पुरुषांबरेाबर राहतात, तेव्हा तर समाज त्यांच्यावर आग पाखडतो व त्यांना व त्यांच्या मुलांना समाजात रखेलीच्या मुलांपेक्षा जास्त दर्जा मिळत नाही. काही स्त्रिया अशा पुरुषाबरोबर समाजात वागून हल्लीच्या वर्तमानपत्रांच्या निर्दय युगात आपल्या अब्रूचे यथेच्छ धिंडवडे झाल्यावर दुसरे लग्न करतात, आणि तेही तो पुरुष अगदीच नादान नसेल तरच शक्य आहे. तेव्हा पहिल्या बायकोच्या दृष्टीने विचार केला तरी, किंवा दुसरीच्या दृष्टीने विचार केला तरी, पुरुषाची पहिली पत्नी जिवंत असता त्याने दुसरी करू नये, असा कायदा केल्याने कोडे खचितच सुटणार नाही. उलट, अशा कायद्याने नवीन न सुटणारी कोडी मात्र निर्माण होतील. उदा. युरोपात गेल्या युद्धानंतर स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा कितीतरी जास्त होती; पण ख्रिस्ती धर्मामुळे व त्यावर आधारलेल्या कायद्यामुळे पुरुषांना एकच विवाह करण्याची मोकळीक होती. त्यामुळे हजारो स्त्रिया वैवाहिक कौटुंबिक जीवनास मुकल्या, मातृत्वाला आचवल्या. हजारोंना विवाहबाह्य़ संबंधाने मुले झाली व त्यांना समाजात योग्य स्थान देण्यासाठी कायदे करावे लागले. माझी खात्री आहे की, अशा बायकांनी खुशीने दोघी-तिघींनी मिळून एका पुरुषाबरोबर संसार केला असता. अशा संसारात त्यांना कौटुंबिक जीवन व कायदेशीर संतती यांचा लाभ झाला असता.
सामाजिक व्यापारांचे व त्यातल्या त्यात वैवाहिक जीवनासारख्या नाजूक व गुंतागुंतीच्या संबंधाचे नियंत्रण होता होईतो कायद्याच्या द्वारे होऊ नये. लोकमतावर शक्य तोवर हे नियंत्रण सोपवावे. फक्त एखाद्या व्यक्तीवर अन्याय होऊ न देण्याची खबरदारी कायद्याने घ्यावी व त्यादृष्टीने स्त्रियांस पोटगी, मुलांचा ताबा व वाटल्यास नवऱ्यापासून फारकत मिळावी. या गोष्टी कायद्याने मिळविता येतील, प्रेम कायद्याने मिळविता येणार नाही. पण पुरुषाने पहिली बायको जिवंत असता दुसरे लग्न करू नये, असा कायदा केल्यास प्रथम पत्नीवर होणाऱ्या अन्यायाखेरीज तिच्या नवऱ्यावर व दुसऱ्या स्त्रीवर मात्र अन्याय होईल. एका सामाजिक अन्यायाचे परिमार्जन दुसऱ्या सामाजिक अन्यायाने कसे होणार?
(प्रसिद्धी : मार्च १९४३ )
‘शेष समाजस्वास्थ्य’मधून साभार