भारतातील अस्सल गुलाब, हिना, वाळा यांसारखी लोकप्रिय अत्तरे सोडली तर बहुतेक सुगंध एका अर्थी कृत्रिम सुगंधाच्याच वर्गात येतील. अत्तर ही ताजी फुले व इतर सुगंधी मालापासून तयार केली जातात. उत्तर प्रदेशातील कन्नोज हे अत्तरनिर्मितीचं केंद्र समजलं जातं. कन्नोजबाबत असं म्हटलं जातं की, येथील सांडपाण्यालासुद्धा सुगंध येत असतो..
सुगंधनिर्मिती म्हणजे अत्तरनिर्मिती अशी अनेकांची समजूत असते. भारतातील अस्सल गुलाब, हिना, वाळा यांसारखी लोकप्रिय अत्तरे सोडली तर बहुतेक सुगंध एका अर्थी कृत्रिम सुगंधाच्याच वर्गात येतील. हे कृत्रिम सुगंध वेगवेगळी अर्कमय तेले व रासायनिक सुगंधी द्रव्ये वापरून तयार केलेले असतात. यांना ‘सुगंधी मिश्रणे’ (ब्लेण्ड्स) किंवा ‘औद्योगिक सुगंध’ (इंडस्ट्रियल पफ्र्युम्स) म्हणणे योग्य ठरेल. या सुगंधांचा वापर अल्कोहोलिक पफ्र्युम्स, अगरबत्ती, सौंदर्य प्रसाधने, साबण, डिटर्जन्ट्स, तंबाखू यांत प्रामुख्याने केला जातो. हा कृत्रिम सुवास केवळ ‘नैसर्गिक सुवासा’सारखा अशाच स्वरूपाचा तयार होतो. तर अत्तरे ही ताजी फुले व इतर सुगंधी मालापासून तयार केली जातात. भारतीय सुगंधकारांनी बाष्परूपातून सुगंधी घटक प्रामुख्याने चंदनाच्या तेलावर शोषून घेण्याची ही कला विकसित केली. अशा तेलावर काढलेल्या उत्पादनांना ‘अत्तर’ असं संबोधण्यात येतं. अत्तरे ही बकुळ, हिना, गुलाब, मोगरा, चाफा, निशिगंध, केवडा, पारिजातक, वाळा अशी अनेक प्रकारची असतात व ती नैसर्गिक असा मूळचाच सुगंध देतात. उत्तर प्रदेशातील कन्नोज हे अत्तरनिर्मितीचं केंद्र मानलं जातं आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अत्तरे व तत्सम उत्पादनांत त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
कन्नोज हे गंगा नदीच्या काठावर वसलेले, एक लाख लोकवस्तीचं छोटंसं गाव. या गावात घराघरात अत्तरनिर्मिती केली जाते. आजूबाजूच्या खेडय़ातील शेतकरी रोजच्या रोज अत्तरनिर्मित केंद्रांना ताज्या फुलांचा पुरवठा करीत असतात व सुगंधकार त्या फुलांवर प्रक्रिया करून अत्तरनिर्मिती करतात. या गावात खूप मोठय़ा प्रमाणात अत्तराची दुकाने आहेत. एखाद्या कोपऱ्यात तुम्हाला गुलाबाचा सुगंध येईल तर थोडे पुढे गेल्यावर मोगऱ्याचा. थोडय़ा वेळाने चंदनाचा तर मधूनच केवडय़ाचा सुगंध डोके वर काढेल. एखाद्या ठिकाणी तुम्हाला तप्त धरतीवर पडणाऱ्या पहिल्या पावसाच्या सरींनंतर येणारा मातीचा सुगंध येईल. त्याचं इथलं स्थानिक नाव ‘मिट्टी का अत्तर’. जरी ही अत्तरे घट्ट झाकण असलेल्या काचेच्या व अॅल्युमिनियमच्या बाटलीत बंद करून ठेवली असली तरी त्याचा सुगंध वातावरणात असतोच. मसाल्याच्या पदार्थापासूनदेखील अत्तरनिर्मिती केली जाते. या अत्तरांमुळे वातावरणात मसाल्याच्या पदार्थाचा वास दरवळतो. कन्नोजबाबत असं म्हटलं जातं की, येथील सांडपाण्यालासुद्धा सुगंध येत असतो आणि त्याला कारणसुद्धा तसंच आहे.
अत्तरात रस असणारे लोकच प्रामुख्याने कन्नोजमध्ये येतात. त्यात मुख्यत: व्यापारी असतात. ते आपणास हव्या असलेल्या मालाची खरेदी करतात किंवा मागणी नोंदवतात. अर्थात कन्नोजमधील व्यापारीसुद्धा देशाच्या निरनिराळ्या भागांत जाऊन आपल्या उत्पादनांचे नमुने दाखवून विक्री करीत असतो अथवा मागणी नोंदवून त्याप्रमाणे पुरवठा करीत असतो. कन्नोज गावात बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी फारशा सुखसोयी नाहीत. त्यामुळे बहुतेक लोक कानपूर किंवा लखनौला मुक्काम करतात व खरेदीसाठी काही तास कन्नोजला येतात. कामे उरकल्यावर परत जातात.अत्तरनिर्मिती करताना सुगंधी मालातील सुगंधी घटक बाष्परूपाने प्रामुख्याने चंदनाच्या तेलावर शोषून घेतले जातात व तयार झालेली अत्तरे मूळ स्वरूपातच वापरली जातात. पाश्चात्त्य देशांत सुगंधासाठी द्रावक म्हणून अल्कोहोल वापरला जातो. म्हणूनच मुस्लीम समाज पाश्चात्त्य सुगंध वापरीत नाहीत. इस्लाममध्ये मादक पदार्थाचे सेवन व बाह्य़ उपयोगासाठी वापर निषिद्ध आहे. इस्लामच्या या शिकवणुकीचा कन्नोजच्या अत्तरनिर्मिती उद्योगाला अप्रत्यक्षरीत्या फायदाच झाला आहे. येथून मोठय़ा प्रमणावर अत्तराची निर्यात सौदी अरेबिया व इतर मुस्लीम देशांत केली जाते. हाज यात्रेच्या वेळी तर येथील निर्यात कळसाला पोहोचलेली असते. लाखो हाज यात्रेकरू मक्का आणि मदिना येथून स्वत:साठी तसेच आप्तस्वकीय व मित्रमंडळींना भेट देण्यासाठी अत्तराची खरेदी करतात.
अत्तरनिर्मितीचा उद्योग भारतात शेकडो वर्षे चालू आहे. पुरातत्त्व खात्यातर्फे कन्नोजमध्ये उत्खनन करताना आजच्या काळात कन्नोजमध्ये अत्तरनिर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांसारखीच शेकडो वर्षांपूर्वीची उपकरणे सापडली आहेत. त्या काळीसुद्धा भारतातून इराणमध्ये, तेथून युरोपमध्ये अशी व्यापारी देवघेव होत असे. परंतु धार्मिक कटुता व सत्ता-संपत्तीचा हव्यास पुरविण्यासाठी जी निरनिराळी लहान-मोठी युद्धे झाली त्यामुळे ही देवघेव थांबली. तरीदेखील सुगंध तयार करण्याची कला व आवश्यकता टिकून राहिली.
ऐतिहासिकदृष्टय़ा मोगल साम्राज्याच्या काळात मोगलांच्या आसक्त, रंगेल स्वभावानुसार त्यांनी निरनिराळी अत्तरे, उटणे, उद-धूप इत्यादींचा अधिक वापर करून तग धरून राहिलेल्या या धंद्यास उत्तेजन दिले. मोगलांच्या अत्तरावरील प्रेमामुळे हा उद्योग भारतात सर्वत्र झपाटय़ाने वाढू लागला. मोगलांनीच अजून एका प्रकारे या उद्योगाला हातभार लावला. मोगल सम्राट, त्यांचे कुटुंबीय, मोगल दरबारातील सरदार या सर्वाना विविध सुगंधी फुलांचे, सुगंधी वनस्पतींचे आकर्षण होते. त्यामुळे त्यांनी विविध सुगंधी फुलझाडे व सुगंधी वनस्पतींच्या अनेक नव्या जाती मध्य आशियातून भारतात आणल्या. मोगलांच्या काळातच भारत हा एक महत्त्वाची आर्थिक सत्ता झाला होता व भारताचा जगातील विविध देशांशी व्यापार वाढीस लागला होता. त्या व्यापारात ‘अत्तर’ हा एक प्रमुख घटक होताच. गुलाबाच्या फुलांपासून अत्तर काढण्याची पद्धत तर मोगल सम्राट जहांगीरची पट्टराणी नूरजहाँने शोधून काढली. दक्षिण भारतातसुद्धा अत्तरनिर्मितीची छोटी-छोटी केंद्रे आहेत, पण अत्तर उद्योगाच्या चाव्या कन्नोजकडेच राहिल्या. कारण एकतर ते त्या वेळच्या विविध राजधान्यांपासून जवळ होते आणि दुसरे म्हणजे कन्नोजवर असलेला निसर्गाचा वरदहस्त! तेथील हवा व सुपीक जमीन ही विविध जातींच्या सुगंधी फुलझाडांना व सुगंधी वनस्पतींना पोषक आहे. त्यात पाणी मुबलक; परंतु तेथील वातावरण सर्वच वनस्पतींना पोषक नाही. तेथे न होणाऱ्या वनस्पती बाहेरून मागविल्या जातात. केवडा हा ओरिसामधून मागविला जातो, तर चंदनाचे तेल प्रामुख्याने दक्षिण भारतातून आणले जाते.
अत्तर हे सुगंधासाठी शरीरावर तसेच कपडय़ावर लावले जातेच, पण त्याचा सुगंध जसे वासाचे सुख देतात, तसाच ते मनावर आणि शरीरावर इष्ट परिणाम घडवून रोगनिवारणालाही मदत करतात. म्हणूनच आजच्या जमान्यात ते स्पा तसेच हेल्थ क्लबमध्येदेखील वापरले जाते. अस्सल गुलाब पाण्याला तर औषधी गुणधर्मामुळे खूपच मागणी असते. ते मुख्यत: डोळ्यांचे विकार तसेच जखमा धुण्यासाठी वापरले जाते. गुलाब पाणी, केवडा पाणी हे खाद्यपदार्थातदेखील वापरले जाते. खासकरून मिठाईत, पण कन्नोजच्या उत्पादनांचे सर्वात मोठे ग्राहक तंबाखू व पान-मसाल्याचे उत्पादक हे आहेत. अत्तर ही सिगारेटला सुगंध देतेच, त्याचबरोबर गुटख्यालासुद्धा देते. कन्नोजमधील जवळपास ९० टक्के उत्पादन तंबाखू व तत्सम उत्पादनात वापरले जाते. फुला-पानांतील वासाचा उपयोग दुरान्वयाने का होईना, पुनरुत्पादनाकडे होतो. फुलांच्या नयनमनोहर रंगाने व वासाने मधमाशा, फुलपाखरे आकर्षित होतात. त्यांच्या हालचालीने पुं-स्त्री परागांची सरमिसळ होते व वनस्पतीत बीजधारणा होते. सुगंधी फुलांपासून फुलांच्या अत्तरांची निर्मिती केली जाते. ही फुले सायंकाळी उशिरा अथवा रात्री उमलतात. या वेळेसच त्यात जास्तीत जास्त सुगंध असतो. सकाळी त्यातील सुगंध कमी होतो. म्हणून ती सायंकाळी तोडली जातात. त्यानंतर फुले अत्तरनिर्मिती केंद्रात येऊ लागतात व लगेच ती प्रक्रियेसाठी घेतली जातात. म्हणूनच कन्नोजमधील अत्तरनिर्मिती केंद्रे रात्रभर चालू असतात.
जर का एखाद्याने कन्नोजमधील एखाद्या अत्तरनिर्मिती केंद्राला भेट दिली तर त्यास काळ शेकडो वर्षे मागे गेल्याचा भास होईल. कारण आजही कन्नोजमध्ये अत्तरनिर्मितीसाठी पारंपरिक डेग-भपका पद्धतच वापरली जाते. पिढय़ान्पिढय़ा बांधलेल्या, आधुनिकीकरण न झालेल्या या कारखान्यात मोठमोठी तांब्यांची उपकरणे नजरेस पडतील. रांजणाच्या आकाराच्या मोठय़ा तांब्याच्या भांडय़ात सुगंधी फुले किंवा सुगंधी वनस्पती व पाणी १:२ या प्रमाणात घेतले जाते. म्हणजे एक किलो फुलांसाठी दोन लिटर पाणी. या सुगंधी वनस्पती व पाणी ठेवायच्या भांडय़ाला ‘डेग’ म्हणतात. डेग विटांनी बांधून काढलेल्या भट्टीवर ठेवला जातो. या भांडय़ाच्या तोंडावर मध्यभागी भोक असलेले झाकण लोखंडी क्लॅम्प्सने घट्ट बसवले जाते. हे झाकणसुद्धा तांब्याचेच असते. झाकणातून वाफ बाहेर येऊ नये म्हणून झाकणाला ओल्या मातीचा लेप दिला जातो. पोकळ बांबूपासून इंग्रजी एल आकाराचा पाइप तयार करून तो ‘डेग’च्या झाकणास मध्यभागी असलेल्या भोकात घट्ट बसविला जातो. तेथेसुद्धा ओल्या मातीचे लेपण लावले जाते. बांबूच्या वाहकाचे दुसरे टोक चंदनाचे तेल ठेवलेल्या डेगपेक्षा छोटय़ा गोलावर अशा, पण ‘सुरई’सारखे लांब तोंड असलेल्या भांडय़ाला जोडले जाते. या चंदनाचे तेल ठेवलेल्या भांडय़ाला ‘भपका’ म्हणतात. हा भपका पाण्याने भरलेल्या हौदासारख्या छोटय़ाशा टाकीत तरंगत ठेवलेला असतो. लाकडाचा वापर करून डेगला उष्णता दिल्यावर त्यातील पाण्याची वाफ होतेच, पण त्याचबरोबर त्यातील सुगंधी मालाचीसुद्धा वाफ होते. ती वाफ बांबूच्या वाहकातून भपक्यात येते. भपका थंड पाण्यात तरंगत असल्यामुळे थंडच असतो. येथे डेगमधून आलेल्या पाण्याचे परत द्रवात रूपांतर होते. भपका थंड राहण्यासाठी पाण्यात सतत हलवत राहतात. डेगमधून भपक्यात येणाऱ्या वाफेतील सुगंध भपक्यातील चंदनाच्या तेलात शोषला जातो. ही प्रक्रिया १०-१२ तास चालू ठेवतात. ज्यायोगे सुगंधी मालातील सर्व तेल भपक्यात निघून येते. भपका द्रवरूप पाण्याने भरल्यावर त्या जागी दुसरा लावला जातो. काढलेला भपका स्थिर ठेवल्यावर थोडय़ा वेळाने त्यातील तेल हलके असल्यामुळे पाण्यावर तरंगून वेगळे होते. तेल व पाणी वेगळे झाल्यावर भपक्याला तळाशी असलेल्या तोटीवजा नळातून पाणी काढून टाकले जाते. नंतर तोच भपका आतील मालासकट पुन:पुन्हा आळीपाळीने ऊध्र्वपातन क्रिया पूर्ण होईपर्यंत वापरला जातो. ऊध्र्वपातन क्रिया पूर्ण होऊन भपक्यातील पाणी काढून टाकल्यावर त्यातील सुगंधी तेल खास बनविलेल्या चामडय़ाच्या बुधल्यात ठेवले जाते. चामडय़ाच्या बुधल्यात सुगंधी तेल ठेवल्यावर त्यात असलेला पाण्याचा अंश चामडय़ातून पाझरतो व बुधल्यात फक्त सुगंधी तेल शिल्लक राहते. सुगंधी तेलातील पाण्याचा अंश काढणे गरजेचे असते. कारण पाण्यामुळे अत्तराला बुरशी येऊन अत्तराचा दर्जा बिघडू शकतो.
अत्तरनिर्मिती केंद्रात कोणाकडे १०, कोणाकडे २० तर एखाद्या मोठय़ा केंद्रात २५०-३०० डेग कार्यरत असतात. हे डेग ५० लिटरपासून ५०० लिटपर्यंतच्या विविध क्षमतांचे असतात. सर्वसाधारणपणे ५०० लिटर क्षमतेच्या डेगला १५ लिटर क्षमतेचा भपका जोडला जातो. त्यात पाच किलो चंदन तेल किंवा स्वस्तातील अत्तरांसाठी पॅराफिन अथवा डी.ओ.पी. ((D.O.P. – Di Octyl Phthalate) ठेवले जाते. फुलांपासून अत्तर काढण्याची प्रक्रिया १०-१२ तासांत होत असली तरी कर्पूर काचरी, जटामांसी, वाळा, सुगंध कोकिळा, नागरमोथा इत्यादी विविध प्रकारच्या जडीबुटींपासून अत्तरनिर्मिती करण्याची प्रक्रिया मात्र तीन ते पाच दिवस चालते. काही अत्तरे तर ३०-४० विविध प्रकारच्या जडीबुटींपासून तयार केली जातात.
ज्या वेळी मसाल्यांच्या पदार्थापासून अत्तरनिर्मिती करावयाची असते, त्या वेळी डेगमध्ये मसाल्याचे पदार्थ पाण्यासोबत भरले जातात. बाकी पद्धत तीच. तर पहिल्या पावसाच्या सरीनंतर येणाऱ्या मातीच्या वासाचे अत्तर तयार करण्यासाठी डेगमध्ये पाण्यात फक्त कच्ची, न भाजलेली गाडगी मडकी ठेवली जातात. स्थानिक कुंभाराकडून ही कच्ची गाडगी-मडकी मिळवून काही काळ पाण्यात भिजवून नंतर मग डेगमध्ये ठेवतात. बाकी प्रक्रिया तीच. गुलाब पाणी, केवडा पाणी तयार करताना भपक्यात चंदनाचे तेल ठेवले जात नाही व ऊध्र्वपातनाने फक्त गुलाब पाणी व केवडा पाणी तयार करण्यात येते. गुलाब पाणी किंवा केवडा पाणी पुन:पुन्हा वापरून दोन किंवा तीन ऊध्र्वपातनाने तयार केलेले आहे यावर त्याचा एक माणी किंवा दोन माणी असा दर्जा अवलंबून असतो. कारण त्याचा सुवास त्या मानाने कमी-अधिक असतो.
डेगमधील सुगंधी मालातील सुगंध जेव्हा वाफेबरोबर द्रव स्वरूपात भपक्यात येतो तेव्हा त्यातील जे घटक थोडय़ाफार प्रमाणात पाण्यात विद्राव्य असतात ते पाण्यात विरघळून जातात. त्यामुळे सुगंधी तेल वेगळे केल्यावर भपक्यातील जे पाणी शिल्लक राहते त्या पाण्यालासुद्धा सुगंध येतो. हे पाणी गल्लीबोळातील गटारात फेकले जाते. कन्नोजमधील सांडपाणी वाहून नेणारी गटारे बंदिस्त नसून उघडी आहेत. त्यामुळे त्यात टाकलेल्या पाण्याचा सुगंध वातावरणात पसरतो व संपूर्ण कन्नोज गावात सुगंध दरवळत राहतो. म्हणूनच गमतीने म्हटले जाते की, कन्नोजच्या गटारामधील सांडपाण्यालासुद्धा सुगंध येतो!
आधुनिक ऊध्र्वपातन यंत्रात सुगंधी माल ठेवलेल्या मालाच्या टाकीत पाण्याची वाफ सोडतात. वाफेमुळे सुगंधी मालाच्या पेशींमधील तेल मोकळे होऊन सुगंधी तेलाचीसुद्धा वाफ होते व ती पाण्याच्या वाफेत मिसळते. ही तेलमिश्रित वाफ कन्डेन्सरमध्ये थंड होऊन परत त्याचे द्रवात रूपांतर होते. हे द्रव एका भांडय़ात गोळा करून पाण्यावर तरंगणारे तेल वेगळे केले जाते. पण आपण जर का इथले अत्तरनिर्मितीसाठी वापरले जाणारे उपकरण पाहिले तर आपल्या असे लक्षात येईल की, आधुनिक ऊध्र्वपातन यंत्रात असलेला कन्डेन्सर हा महत्त्वाचा भागच इथे गायब आहे. इथल्या उपकरणात ‘भपका’ हाच कन्डेन्सर म्हणून तसेच सुगंधी द्रव्य गोळा करण्याचे भांडे म्हणून वापरला जातो. तेल आणि पाणी वेगळे करण्यासाठी तोटीवजा नळसुद्धा त्यालाच. त्यामुळे कोणासही ही भट्टी चालविता येते. तसेच या उपकरणांच्या निर्मितीसाठी खास अभियांत्रिकी ज्ञानाचीसुद्धा गरज लागत नाही. स्थानिक पातळीवर तांबट लोकांकडून ती बनवून घेतली जातात. हलवाहलवीत या उपकरणांना गळती लागली तर ती ‘ब्रेझिंग’ने ठीकठाक करता येतात. हे उपकरण किचकट नसल्यामुळे सहज जोडता अथवा सुटे करता येते. त्यामुळेच गरज पडल्यास हे उपकरण दूरवर घेऊन जाऊन अत्तरनिर्मिती करता येते. उपकरण घेऊन जाण्याचा प्रश्न येतो. कारण काही फुले अशी असतात, जी जवळपासच्या गावात उपलब्ध नसतात. दूरच्या ठिकाणी असतात. जी तेथून कन्नोजला पाठविणे शक्य नसते. फुले एकदा तोडली की ती काही तासांतच अत्तरनिर्मितीसाठी घ्यावी लागतात, अन्यथा त्याचा सुगंध निघून जातो.
चंदनावर सुगंधी मालातील सुगंध शोषून घेण्याची पद्धत मुळात चंदन तेलच किमती असल्यामुळे महागडी आहे. म्हणून स्वस्तातल्या अत्तरनिर्मितीसाठी चंदनाच्या तेलाऐवजी D.O.P. (DiOctyl Phthalate) अथवा पॅराफिनचा वापर केला जातो. चंदनाच्या तेलावरील अत्तरे व D.O.P.,, पॅराफिनवरील अत्तरे यांच्या वासात व रंगरूपात फरक पडतोच, पण किमतीतही पडतो.अशा तयार केलेल्या अत्तरांची किंमत त्याच्या दर्जाप्रमाणे दोन हजार रुपयांपासून १२ लाख रुपये किलोपर्यंत असते.
चंदनाच्या तेलाची किंमत प्रतिकिलो ७० हजार रुपयांच्या जवळपास पोहोचली आहे. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या चंदनाच्या तेलाच्या किमतीमुळे अत्तरांची किंमतसुद्धा वाढतच चालली आहे. चंदनाच्या व्यापारावर पूर्णपणे सरकारचे नियंत्रण आहे, तर रासायनिक घटकद्रव्यांपासून बनविलेल्या कृत्रिम सुगंधांची किंमत ५०० रुपयांपासून १० हजार रुपये प्रतिकिलो पडते. तंबाखू व्यवसायातील लोकांनी तसेच इतरांनी अत्तरांच्या वाढत्या किमतीमुळे कृत्रिम सुगंध वापरण्यास सुरुवात केली आहे. अस्सल गुलाब पाणी व केवडा पाण्यालासुद्धा कृत्रिम गुलाब पाणी व केवडा पाण्याबरोबर स्पर्धा करावी लागत आहे. कारण ऊध्र्वपातनाच्या सहाय्याने गुलाब पाणी व केवडा पाणी करण्याचा त्रास वाचविण्यासाठी, शुद्ध पाण्यात बाजारात विकत मिळणारे, पाण्यात विद्राव्य असे गुलाबाचे व केवडय़ाचे सुगंध इष्ट त्या प्रमाणात घालून कृत्रिम ‘गुलाब जल’ किंवा ‘केवडा जल’ तयार केले जाते.
संग्रहित लेख, दिनांक 18th Nov 2012 रोजी प्रकाशित
अत्तराची राजधानी कन्नोज
भारतातील अस्सल गुलाब, हिना, वाळा यांसारखी लोकप्रिय अत्तरे सोडली तर बहुतेक सुगंध एका अर्थी कृत्रिम सुगंधाच्याच वर्गात येतील. अत्तर ही ताजी फुले व इतर सुगंधी मालापासून तयार केली जातात. उत्तर प्रदेशातील कन्नोज हे अत्तरनिर्मितीचं केंद्र समजलं जातं. कन्नोजबाबत असं म्हटलं जातं की, येथील सांडपाण्यालासुद्धा सुगंध येत असतो..

First published on: 18-11-2012 at 04:14 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kannauj indias perfume capital