पुस्तकांमध्ये हिमालयाचे कितीही वर्णन असले तरी प्रत्यक्ष पाहिल्याविना त्याच्या भव्यतेची कल्पना येत नाही. भगवंताचे वैराग्य हिमालयात पाहायला मिळते. हिमालयातील चारधाम यात्रा- म्हणजे गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ व बद्रिनाथ ही यात्रा आद्य श्रीशंकराचार्यापासून चालत आलेली भारतीय परंपरा आहे. म्हणून हिमालयाला ‘देवभूमी’ मानले जाते. जेथे जेथे भगवंताची खूण किंवा वास आहे अशा ठिकाणांना ‘क्षेत्र’ म्हणतात. भाविक अतिशय कष्ट सहन करून भगवंताच्या दर्शनाकरता इथे जातात. केदारनाथ व बद्रिनाथ येथे सतत बर्फ पडत असतो. हिवाळ्यात भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी मंदिरे बंद होतात. कारण त्यापुढील सहा महिने हे ठिकाण संपूर्ण बर्फाच्छादित असते. त्यानंतर एप्रिल किंवा मे महिन्यात अक्षय्य तृतीयेला पुन्हा ही मंदिरे उघडली जातात.
अशी ही चारधाम यात्रा हजारो वर्षे सुरू आहे. या तीर्थक्षेत्रांचे काही नियम आहेत. येथील भौगोलिक परिस्थिती व वातावरणाचा अभ्यास करून ते बनवले आहेत. तरीही मानव निसर्गाच्या विरुद्ध जातो व त्याचा परिणाम म्हणजे गेल्या वर्षी निसर्गकोपाने झालेले केदारनाथ येथील अपरिमित नुकसान, प्रचंड जीवित तसेच वित्तहानी! या भीषण महाप्रलयात एक प्रचंड मोठी शिळा बरोबर केदारनाथ मंदिराच्या मागच्या बाजूला येऊन अक्षरक्ष: टेकू दिल्यासारखी उभी राहिली. त्यामुळे मंदिराच्या एका दगडालाही साधा धक्कादेखील पोहोचला नाही. मोठमोठय़ा इमारती या प्रलयात पत्त्यासारख्या कोलमडून जमीनदोस्त झाल्या. मात्र, पांडवांनी बांधलेल्या या स्वयंभू मंदिराला मंदाकिनी नदीच्या या उग्रावतारात जराही धक्का लागला नाही.
आमच्या चारधाम यात्रेच्या नेमाला यंदा २५ वष्रे पूर्ण होणार होती. परंतु गेल्या वर्षी झालेल्या महाप्रलयामुळे काहीशी धाकधूक आणि अस्वस्थता काहींच्या मनात असणे स्वाभाविक होते. अर्थात काहीही झाले तरी चारधाम यात्रेला जायचेच, असे आम्ही ठरवले आणि नेमाप्रमाणे अक्षय्य तृतीयेला यमुनोत्री येथे ३० जणांचा ग्रुप घेऊन आम्ही पोहोचलो. तिथे संपूर्ण शुकशुकाट होता. चारधामच्या घाटींमधून फक्त आमचीच तेवढी बस धावत होती. स्थानिक यात्रेकरू तेवढे आले होते. महाराष्ट्रातून केवळ आमचीच यात्रा कंपनी आली होती. त्यामुळे आम्हा यात्रेकरूंच्या येथील स्थानिक प्रसारमाध्यमांनी आवर्जून मुलाखती घेतल्या. २ मे रोजी यमुनोत्री, ४ मे रोजी गंगोत्री, ६ मे रोजी केदारनाथ आणि ९ मे रोजी बद्रिनाथ अशी चारधाम यात्रा निर्विघ्नपणे पार पडली.
श्री केदारनाथाच्या दर्शनाला निघालो तेव्हा रामपूर या बेस कॅम्पवरून गाडी सीतापूर पार करून गेल्या वर्षीपर्यंत गौरीकुंडपर्यंत जात असे. परंतु यावर्षी सोनप्रयाग येथील मंदाकिनी व सोनगंगेच्या संगमापाशी आलो तेव्हा गेल्या वर्षी मंदाकिनीच्या कोपात सोनप्रयाग, गौरीकुंड, रामबाडा हे महत्त्वाचे तिन्ही टप्पे अक्षरश: धुऊन गेल्याचे दिसले. पायी मार्गही होत्याचा नव्हता झाला होता. दरडी कोसळलेल्या. कडे भंगलेले. कधी खाली कोसळतील याचा नेम नाही. निसर्गाचे ते रौद्रभीषण तांडव पाहून वाटले, की श्री केदारनाथाच्या दर्शनाची आपली आस आता कशी पूर्ण करायची? पण या उद्ध्वस्ततेने आम्ही मात्र डगमगलो नाही. केदारनाथाच्या दर्शनाची अनिवार आस उराशी बाळगून आम्ही इथवर आलो होतो. सोनप्रयाग इथे बस थांबवून सर्व यात्रेकरूंचे बायोमॅट्रिक्स करण्यात आले. फिटनेस प्रमाणपत्र तपासण्यात आले. यावर्षी गढवाल निगमने ऋषिकेश, हरिद्वार तसेच प्रत्येक धामच्या बेस कॅम्पवर बायोमॅट्रिक्सची व्यवस्था केली आहे. तुमचा फोटो, नाव, पत्ता यानुसार तुम्हाला एक टोकन नंबर दिला जातो आणि या टोकन नंबराला व्हॅलिडिटी दिली जाते. या ठरावीक काळात तुम्ही चारधाम यात्रेत कुठे आहात, हे या व्यवस्थेमुळे प्रशासकीय यंत्रणेला कळत राहते. हे सर्व सोपस्कार करून आम्ही निघालो. सोनप्रयाग ते मुंडकटा गणेशपर्यंत पाच कि. मी.च्या रस्त्यावर सरकारतर्फे शटल सíव्हस सुरू करण्यात आली होती. छोटय़ा जीपने तुम्हाला इथपर्यंत सोडले जाते. तेथून पुढे जुन्या गौरीकुंडापासून ते जंगलचट्टी तीन कि. मी. अंतर घोडय़ाने जायचे. कारण पूर्वीचा रामबाडचा रस्ता संपूर्ण वाहून गेला आहे. परत जंगलचट्टी ते भीमबळी. आता येथून नवीन रस्ता काढण्यात आला आहे. अतिशय खडकाळ. ओबडधोबड. कुठे मधेच नदी लागते, तर कुठे कडे. हा जिकिरीचा रस्ता पार करत भीमबळीला पोचलो. येथून पुढचा रस्ता तर जणू मृत्युगोलच म्हणा ना! तरीही कुणी घाबरले नाही. ‘श्री केदारनाथ की जय! जय भोलेनाथ!’ असा जयजयकार करत हा रस्ता पार करताना कुणी अनामिक शक्ती सोबत असल्याचे जाणवत राहते. भीमबळी ते िलगचोली हा सात कि. मी.चा रस्ता संपूर्ण उभा चढणीचा आहे. घोडय़ावरच्या या प्रवासामुळे चालण्याचे कष्ट वाचतात. लिंगचोली येथे पोचल्यावर गढवाल निगमतर्फे राहण्यासाठी तिथे तंबू उभारले आहेत. विनामूल्य भोजनाची व्यवस्था आहे. हा संपूर्ण रस्ता सध्या बर्फाच्छादित आहे. त्यातूनच जावे लागते. त्यातच तंबू उभारले आहेत. पुढे जेथे हेलिपॅड आहे तिथवर पुन्हा तीन कि. मी. चालत जावे लागते. हेलिपॅडजवळही तंबू बांधले आहेत. या तंबूंमध्ये एकावेळी १० ते १२ यात्रेकरू राहतील अशी व्यवस्था आहे. प्रत्येकाला स्लीिपग बॅगा दिल्या जातात. त्यामुळे थंडीचा त्रास होत नाही. अजून हेलिकॉप्टर व्यवस्था सुरू झालेली नाही. हेलिपॅडपासून पुढे पुन्हा चार कि. मी.चा रस्ता पायी चालत जाऊन श्री केदारनाथाचे आत्मिक शांती देणारे दर्शन अखेरीस आम्ही घेतलेच. सकाळी पाचला केदारनाथच्या दर्शनाला निघालेले आम्ही संध्याकाळी सात वाजता मंदिराच्या दारात पोहोचलो होतो.  
आता या मार्गावर २२ कि. मी.पर्यंतचा रस्ता झाला आहे. गेल्या वर्षीपर्यंत १४ कि. मी.चा केदारनाथचा हा प्रवास आम्ही सकाळी पाच वाजता सुरू करून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत खाली उतरून सात वाजेपर्यंत पुन्हा बेसकॅम्पला माघारी यायचो. परंतु यावर्षीची केदारनाथ यात्रा ही त्याच्या अस्तित्वाची साक्ष होती. त्याच्या दर्शनाने जीवन कृतार्थ झाल्याची भावना झाली. गेल्या २५ वर्षांचे चारधाम यात्रेचे व्रत केदारनाथाने सगळ्या प्रतिकूलतेवर मात करत अखेरीस पूर्ण करून घेतले होते.                                               

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…
Story img Loader