केशव खटींग यांच्या ‘सालोसाल’ या कवितासंग्रहाचे शीर्षकच संग्रहातल्या कवितांचा आशय काय असेल, या संबंधी अंदाज बांधण्यास साह्यभूत ठरू शकते. वर्षांनुवष्रे शेतकरी जीवनातल्या चढउतारांना आणि जगण्यातल्या अरिष्ट-सातत्याला हे शीर्षकच ध्वनित करणारे आहे. खटींग यांचा हा पहिलाच कवितासंग्रह त्यांनी ‘वेगवेगळ्या प्रकल्पांमुळे शेत शिवार, घरदार सोडावं लागलेल्या सर्वाना’ अर्पण केला आहे. या अर्पण पत्रिकेतून कवीचे आस्थाक्रम काय आहेत याची कल्पना येते. लोकहिताच्या वल्गना करीत एखाद्या योजनेसाठी शेतकऱ्यांच्या वहितीखाली असलेल्या जमिनी संपादित करायच्या, त्यांना काही तरी स्वप्ने दाखवायची प्रत्यक्षात अशा योजनांचे सांगाडे पाहण्यातच प्रकल्पग्रस्तांना पुढचे आयुष्य काढावे लागते. ‘सालोसाल’ कवितासंग्रहात ‘जीव झाले गुढेकरू’ या विभागात असलेल्या सहा कविता विस्थापितांच्या नशिबी आलेल्या अटळ शोकांतिकेला शब्दरूप देणाऱ्या आहेत. आपल्या मालकीच्या जमिनी आणि ज्या जमिनीशी आपले भावबंध जखडले आहेत, त्या सोडाव्या लागतात. तेव्हा विस्थापितांना दु:ख होणे स्वाभाविकच आहे, पण ज्यांच्या नावाचा ‘सातबारा’ नसतो अशीही माणसे गावाबरोबरच विस्थापित होतात. त्यांनी आपले बिऱ्हाड कुठे टेकवावे असा प्रश्न कवी ‘उस्मानमामा’ या कवितेत उपस्थित करतो. ‘आता पुनर्वसन होऊन जुनं गाव उठतंय तर नव्या गावात उस्मानमामाला कुठं काय?’ असा केवळ प्रश्न विचारून कवी थांबत नाही तो वाचकाला आणखी निरुत्तर करतो.
सालोसाल इमानदारीनं कष्टाचा गाळ उपसणाऱ्यांना
सुखाचे झरे का लागत नाहीत?
असा प्रश्न मग केवळ कवीच्या मनातला प्रश्न राहत नाही तर ते सार्वत्रिक आढळणारे सत्य म्हणूनच आपल्यापुढे येते.
ग्रामीण स्त्रियांच्या काही व्यक्तिरेखा कवीने ‘कोळपेंढय़ा लागलेल्या जीनगान्या’ या विभागातल्या कवितांमध्ये साकारल्या आहेत. ‘रिती’, ‘बयो’, ‘पोिशदी’ यासारख्या कविता ग्रामीण स्त्रीच्या सनातन दु:खाची कहाणी सांगतात.
जोजवून उभा मळा, नाही दांडालाच पाणी
भरल्या घरी माय तुही रिती रिती जीनगानी
या ओळीतून हे दु:ख नेमकेपणाने व्यक्त होते. घरादारांना सावरणाऱ्या, आपत्तीच्या काळात नेटाने झगडणाऱ्या आणि उभा जन्म ढोरकष्टात घालविणाऱ्या बाईचे रितेपण या कवितेतून येते. ना गाण्यात नाव ना सातबाराला नोंदणी एवढी निर्थकता या आयुष्याच्या शेवटी आहे. या विभागातल्या सर्वच कवितांमधून भेटणाऱ्या स्त्रिया राबराब राबणाऱ्या आहेत. त्यांच्या आयुष्यात सुखासमाधानाचे दिवस अपवादानेही येत नाहीत. ‘बयो’ कवितेत हीच सल कवी समर्थपणे मांडतो.
धुपून धुपून उभ्या देहाची धिपली केलीस बाई
चिघळतच गेला उभा जल्म जखमेसारखा
इतक्या चिवट जगण्याला सुखाची
खपली कशी आली नाही?
या संग्रहातल्या विविध कवितांमधून आलेल्या सगळ्या स्त्रिया आपल्यासमोर असलेल्या दु:खाचा निमूटपणे स्वीकार करतात. या अटळ अशा दु:खाबद्दल त्यांची कोणतीही तक्रार नसते. आपले सगळे दु:ख उरात साठवून संसाराचा गाडा ओढणे एवढेच या स्त्रियांना माहीत आहे. ‘माय पोिशदी घराची, दोरा झालेली हाराची’ यासारख्या आशयगर्भ ओळींमधून हे दु:ख शब्दरूप धारण करते. हाराचा दोरा सर्व फुलांना बांधून ठेवतो. दोरा हेच सर्वाना जोडून ठेवणारे सूत्र आहे. आपल्याला हारात माळलेली फुले दिसतात, पण त्यांना जोडून ठेवणारा दोरा दिसत नाही. त्याप्रमाणे शेतकरी कुटुंब संस्कृतीत बेदखल असलेली स्त्री केशव खटींग मोजक्या शब्दातून साकारतात. ना प्रतीक-प्रतिमांचा सोस, ना शब्दांची अनावश्यक उठाठेव. जे सांगायचे ते अनलंकृत आणि स्वच्छ शब्दात हे या कवितांचे वैशिष्टय़ आहे.
आजचा नेमका गाव कसा आहे ते सांगणाऱ्या अनेक कविता या संग्रहात आहेत. गाव नवा तसा जुना, अंगोपांगी मिश्रखुणा साकारलेल्या झोपडय़ाला किडलेला वासा जुना असा हा गाव आहे. या गावच्या राजकारणाच्या दोऱ्या बाहेरून हलवल्या जातात आज हा गाव जागोजागी तुटलेला आहे. जे खमके आहेत त्यांनी लुटलेला आहे. असा हा फाटका गाव ज्याने त्याने हवा तसा पिशवीत कोंबलेला आहे, असे कवी सांगतो.
‘आयुष्य पेरून पाहतो मातीत’ या विभागात असलेल्या सर्वच कविता आजच्या गावाचे नेमके चित्र उभे करतात. हे चित्र उभे करताना अनेकदा कवीच्या शब्दांमध्येच संभ्रम दिसतो, पण ही संभ्रमावस्था ग्रामसमाजामध्येच मोठय़ा प्रमाणावर आढळते. जुना गाव राहिलेला नाही आणि नव्या कल्याणकारी गावाचे स्वप्नही दिसत नाही. ना धड गाव धड शहर असे हे अर्धनागरी जग कवीच्या कवितेतून येत राहाते. जुन्या गावाच्या खुणा जशा कवितांमधून येत राहतात तशा नव्या पाऊलखुणाही मोठय़ा प्रमाणावर आढळतात. अर्थात गाव पांढरीचे आजचे वर्तमान हे कवीलाही सुखकारक वाटत नाही आणि विधायक अशा तोंडवळ्याचेही वाटत नाही. पुढच्या पिढय़ांच्या डोळ्यात हिरवाई उगवण्यासाठी आपण रानाची मशागत करणार आहोत हे सांगण्यासाठी कवी ‘वसन काढून औतावर उभाय’ असे कवी सांगतो. हे शेत कितीही नांगरले तरीही त्यातली हराळी खोलवर रुजलेली असल्याने ती निघता निघत नाही. असे कवीचे म्हणणे असले तरीही हे एकूणच ग्रामीण व्यवस्थेचेच वैशिष्टय़ आहे. ग्रामीण भागातल्या अपप्रवृत्तींना मुळासकट उखडण्याची आकांक्षा कवी शब्दातून व्यक्त करत असला तरीही या प्रवृत्ती मानवी जगण्याला पूर्णपणे वेढून असल्याची जाणीवही कवीच्या कवितेत मोठय़ा प्रमाणावर आढळते.
नोकरीच्या निमित्ताने शहरात बूड टेकल्यानंतर गावाकडून तुटलेला कवी आपण दोन्हीकडूनही तुटले गेल्याची भावना व्यक्त करतो. शहरातले रस्ते आपले वाटत नाहीत. इमारतींच्या छताची सावली शीतल वाटत नाही. हे दु:ख त्याला शहरात जाणवते आणि जर अधूनमधून आपण गावाकडे गेलो तर तिथेही आपण पूर्वीसारखे माणसांना कडकडून भेटत नाही. अशी ही कवीची सल आहे. या जगण्यातली अस्सलता गेलेली आहे आणि जुन्या, परिचित माणसासोबत ‘वळलेल्या दोरीसारखा संवाद होत नाही एकजीव’ असे या कवीला कायम वाटते. आपण गावातही आधीसारखे समरसून जाऊ शकत नाही आणि शहर आपले वाटत नाही अशी ही भावना आहे. अशा परिस्थितीत कवीला ओलावा मिळतो तो फक्त आपल्यासारख्याच कुणबीकीतून पळालेल्या अन शहरात तडफडणाऱ्या मित्रांचा. आजच्या खेडय़ांचे नेमके वर्तमान, शेतीधंद्यातून बाहेर पडणाऱ्यांची अगतिकता या बाबी ‘सालोसाल’ मधील कवितांमधून प्रकर्षांने दिसतात. यातल्या काही कवितांमध्ये नवेपणा असला तरीही आश्वासकतेच्या खुणा अधिक जोमदार आहेत.
‘सालोसाल’- केशव खटींग, प्रतिमा पब्लिकेशन्स, पुणे. पृष्ठे ८०,
किंमत १०० रुपये.

आसाराम लोमटे