अतुल देऊळगावकर

‘बगळा’ ही लातूर-उस्मानाबाद जिह्यातल्या खास बोली भाषेतली कादंबरी. कानडी, तेलुगू, दखनी उर्दू यांची मिसळ त्यात आहे. ‘लाव’, ‘लास’ आणि ‘आव’ आदी प्रत्यय हे या बोलीचं वैशिष्टय़. या वैशिष्टय़ांसह या कादंबरीत नव्वदीच्या संक्रमणी युगात दूरदर्शन आणि भवतालच्या सांस्कृतिक संदर्भानी बाल-युवक गटाच्या घडलेल्या मानसिकतेचा एक कोन दिसतो. एकाच वेळी विनोदी आणि गंभीर वळणांवर नेणारा हा ‘बगळ्यां’च्या शाळेतील तास आहे.
गावोगावी १९९० च्या दशकात ‘दूरदर्शन’वर मिळेल ते पाहायला दाटी होऊ लागली. व्हिडीओ पार्लर आले. पडद्यावरल्या प्रतिमा गावागावांतील शैली बदलू लागल्या. घसा थंड करण्याचा आग्रह करणारे लोक भिंतींवर झळकू लागले. मोकळ्या जागा आणि मैदानांची हकालपट्टी करून व्यापारी संकुलं उभी राहू लागली. हा संसर्ग सर्रकन सर्वत्र पसरत गेला. गावांतील दुकानांपासून पिकांपर्यंत सगळं काही सारखंच दिसू लागलं. गावं आणि विभाग यांची वैशिष्टय़ं, खुणा तसेच ओळख पुसण्याचा वेग या काळातच वाढला असावा.

Artistes of the film Gharat Ganapati visit to Loksatta office
गणपतीच्या निमित्ताने घरातल्यांची गोष्ट ; ‘घरत गणपती’ या चित्रपटातील कलावंतांची ‘लोकसत्ता’ कार्यालयाला भेट
Loksatta lokrang Children mysteries Bharat Sasane in Marathi literature
बालरहस्यकथांचा प्रयोग
Koyna valley land misappropriation marathi news,
कोयना जमीन गैरव्यवहाराची हरित लवादाकडून दखल, सातारा जिल्हाधिकाऱ्यांसह पाच जणांना नोटिस
Esther Duflo books for children
बदलांची जाणीव करून देणारे चित्रग्रंथ मराठीत; ‘नोबेल’ विजेत्या एस्थर दुफ्लो यांची बालपुस्तके प्रकाशित
sunita Deshpande
आपुलकीचं नातं
Mountaineer Krzysztof Wielicki, Krzysztof Wielicki, Krzysztof Wielicki in mumbai, Girimitra Sammelan, Mulund s Girimitra Sammelan, Mount Everest, Hindu Kush mountain range, vicharmanch article
के टू शिखरावरील चढाईदरम्यान एका हिमभेगेत तंबूशिवाय मुक्काम करणारा गिर्यारोहक…
Kolhapur, rare snakes,
कोल्हापूर : गगनबावडा परिसरात दोन दुर्मिळ सापांचा आढळ
albanian author ismail kadare
व्यक्तिवेध : इस्माइल कादरे

तेव्हा संपूर्ण राज्यात लातूर भागातील मुलं दहावी-बारावीला राज्यात पहिला क्रमांक पटकावू लागली. मेडिकल-इंजिनीअरिंगला गुणवत्तेवर प्रवेश मिळवणाऱ्या यादीत ‘लातूर’चं प्रमाण वाढलं. त्यातून बारा महिने-अठरा तास रटरटून घेणारा ‘साचा’ तयार झाला. लेकरांना पेढे भरवणारे फोटो पेपरात येण्यासाठी असंख्य मायबाप तळमळू लागले. हा ‘दाब’ मुलांकडे स्थानांतरित होत गेला. अधिकाधिक मार्काचं उत्पादन करणारी प्रक्रिया खूप विकू लागली. मागणीनुसार दुकानं निघत गेली. ‘डॉक्टर-इंजिनीयर’ तयार करण्यासाठी, नववी ते बारावीपर्यंत सर्वकाही बंद. पोरं कडक बंदोबस्तात. थेटर ते हॉटेलं, सगळ्या ठिकाणी पहारेकरी असत.

अशा भारवाही वातावरणातही शालेय वर्गाच्या वर्णाश्रमातील मागच्या बाकांवरची मुलं नििश्चत आणि सदासुखी असत. कोणाच्याही अपेक्षांचं यित्कचितही ओझं नसलेली पाठीमागच्या जागेची ‘स्पेस’ विलक्षण साक्षात्कारी ठरू शकते. ही जागा वर्गात बसून, मनाने कुठेही संचार करण्यास सदैव मुभा देते. केवळ वर्ग आणि शाळा, मुलं तसेच शिक्षक, पालक आणि गावकरीच नाही तर समस्त जगाकडे पाहताना समदृष्टी आणू शकते. अशा आसनावर बसून प्रसाद कुमठेकर यांनी ‘बगळा’ ही कादंबरी चितारली आहे. त्यांच्यातील जपलेल्या ‘किडय़ा’स वाहिलेल्या अर्पणपत्रिकेत ते म्हणतात, ‘वटारलेल्या लालेलाल डोळ्यांच्या विखारातून चढलेल्या रडलेल्या, प्रसंगी शिव्या ओथंबलेल्या स्वरतारीच्या करंटातून संस्कार या वजनी लेबलाखाली खपवलेल्या जहरी फिनायलीच्या ग्यासातून, फटके, लाथा, बुक्क्या, मार, हग्यामार यांच्या तडाख्यातून गालावर, पाठीवर, कानाच्या वरच्या पाळीवर उठलेल्या लाल काळ्या निळ्या वळातून जगून वाचून राहिलेल्या माझ्या कुपोषित सुलेमानी रहेमानी किडय़ास मन:पूर्वक.’

आमच्या परिसराची ओळख करून देताना कुमठेकर सांगून टाकतात, ‘‘आमच्या आयुष्यात निसर्ग मनायला लहानगे लहानगे मरके मरके झाडं. बारके टेंगळं आल्यासारख्या टेकडय़ा. आनी आमी लोकं जात्याच कोणतीच गोष्ट जास्त रंगवण्याच्या भानगडीत पडत नाही. मोठेपणा म्हणून नाही तर आमच्याकडे ती कलाच नाही. कला म्हणून कोणतीही घ्या, आम्ही जशी आहे तशी वागवून घेतो.’’ आमची माणसं कशी? तर ती ‘‘कोरडीच. फार कुणाला िनदू नये, फार कुणाला वंदू नये. आमच्याकडं पाऊस पडतो तो पिकापुरता. त्यामुळं भरपूर पाऊस पडून काही वाहून जातच नाही. सगळं जिथल्या तिथं रुतून बसतंय. मातीपण अन् मान्संपण.’’

बालवयातील कुतूहल, निरागसता, प्रामाणिकपणा, चलाखी, लबाडी, चाणाक्षपणा आणि अस्सल व्रात्यपणा (आमच्या भाषेत- गैराती) हे सारं काही कुमठेकर यांनी झकास रंगवलंय. ‘बगळा’चा निवेदक सचिन गर्जे हा प्रमुख पात्र इयत्ता पाचवीमधील चिंतामणप्रसाद पुरुषोत्तम सरदेशमुख ऊर्फ चिंत्या याची ओळख करून देतो. ‘‘हा बाराचा, इचितर, बिलिंदर, डांबरट, आचरट, नादिष्ट, सर्किष्ट, तुमी मनाल ते सगळं बरं वाईट चिंत्या हाय. त्याची आनखीन एक ब्याड हेबिट म्हंजी चिंत्या कुनाला नाई म्हनत नाई. दिलाचा भोला हाये.’ असा बहुगुणी चिंत्या ‘महम्मद अझरुद्दिन श्टाइलनं बाऊन्ड्रीला फििल्डग करताना त्याच्या हाताला बॉल ‘टचिंग झाला अन् झाडात झुर्र्र्र्र.. मग सगळ्यांनी गूट केला अन् चिंत्याला सांगिटलं, बॉल तुझ्या हातानंच हरपलाय.’’ आता चिंत्याला अकरा रुपयाचा दंड भरावा लागणार याची जबरदस्त भीती. एवढे पैसे तर कोणाकडे नसतात. अकरा रुपयाची चिंता वागवत तो उदगीरच्या गल्लोगल्लीतून निघतो. नीट सरळ जातो तो चिंत्या कसला? ‘दुकानावरच्या पाटय़ा, त्येंच्या नावाचे आर्थ, डॉक्टरायच्या डिग्य्रा अन् स्पेलिंगी यांची बघाबघी करन्यामदी तो सोताच्या घरचा रस्ता पार इसरून गेला’ त्यातून चिंत्याचे दोस्त, त्यांची घरं व गावातल्या गल्ल्या, गल्ल्यातल्या गप्पांतले विषय यातून गावाचे बारकावे समजत जातात.

तेव्हा गावांत जातीद्वेषाचा विखार जडलेला नव्हता. नाव वा आडनावाऐवजी जातीवाचक उल्लेखच समक्ष व परोक्ष, होत असे. परस्परसंबंधांत वेळप्रसंगी निरनिराळे गुण आणि अवगुणही दिसत. तरीही गावातील नात्यांत ओल जाणवत असे. एखाद्याची फजिती झाली तर आनंद आहे, पण तो फार तात्पुरता आहे. हे सामाजिक पर्यावरण चोखपणे टिपलं आहे.

कुमठेकर यांनी आव आणि आविर्भाव यांना कटाक्षाने फाटा देऊन अतिशय नेमक्या तसेच अत्यल्प शब्दांत अनेक व्यक्ती व सभोवतालच्या दृश्य प्रतिमा चपखलपणे सादर केल्या आहेत. यातून राजा मुक्कावार, सुरेश मुदुडगे, संदीप नकाशे, शेख सदरुद्दिन, संजय काळे, संतराम साळुंखे, राज मोगले, केशव व संतोष ममदापुरे हे दोस्त, नाईक, चित्रे, करडखेलकर, बिरादार व गुऱ्हाळे आदी गुर्जी भेटतात. गावातील शकुन बघणारी मथराकाकी, घरमालकीण अव्वा, मीराकाकू, पिंकी, गोविंदकाका आणि पुरुषोत्तम अशी नाना तऱ्हेची माणसं दिसत जातात.

असा शोध घेताना चिंत्याला सायकलला दोन बगळे उलटे लटकवून नेणारा माणूस दिसतो. त्याच्या खोलात गेल्यावर एका बगळ्याला पंधरा- वीस रुपये मिळतात, असं गुपित त्याला समजतं. चिंत्याला तळ्यावर जाऊन बगळे मोजण्याचा नाद लागतो. तळ्यावर बरेच जण ‘राष्ट्रीय कार्यक्रमा’साठी येतात. तेव्हा दगडाने आडोशानं बसणाऱ्यांचे टमरेल नेम धरून उडवत ‘मज्जा’ बघण्यात या गँगला भारी आनंद होतो. चिंत्या तिथे जाऊन मोठय़ा चिकाटीने सगळे पंच्याण्णव बगळे मोजतो. तो ठरवतो, ‘बगळे पकडायला पाहिजेत. त्या बगळ्यांना विकून मला चेंडू घेता येईल आणि माझ्या काकाच्या पाठीचं कुबड काढण्याचं मला ऑपरेशन करता येईल.’

अचूक नेमाचा केशा दगडाने बगळा उडवायला निघतो. पण चिंत्या त्याला अडवतो. ‘अशानं पाप लागतंय. मला बगळा निसता पकडून पायजे. मारून न्हायी.’ बगळामय चिंत्या त्याच नादात शाळेच्या ‘इंट्रोल’मध्ये सारखा तळ्यावर जात राहतो. शंकरमामानं दिलेला बगळा पकडायचा फास घेऊन आवाज न करता बसून राहतो. त्याला माहिताय,‘बगळ्याचं अटेन्शन म्हनजे अर्जुनापेक्षा लय डेंजराय. तो बगतो बगतो अन गपकन माशे गिळतो.’ दररोज तळ्यावरच्या हजेरीमुळे वर्षांखेरीस वर्गशिक्षक ‘फादर ऑफ चिंतामनप्रसाद’ना पत्र धाडून बोलावून घेतात. मग घरात ‘आन्नाचा अमिताबच्चन झाला अन् तो बारकुल्या अमरिशपुरीच्या मुस्काटात द्यायला झेपावत होता. मीरावैनीची निरुपाराय नुस्ती पदर लावू-लावू रडन्यावर होती.’ तर शाळेत चिंत्या ‘मौत का कुआ मधे हुबा. त्याच्यापाई आमाला सगळ्यांलाच टेंगशेन आल्तं. ’

प्रयत्नांती अखेरीला चिंत्याला बगळा सापडतो. ‘यशाची झिंग चढलेल्या चिंतामनला मिंटातच लक्षात आलं की, बगळा तडफडतोय. सुटायसाठी धडपडतोय. त्यानं डोळा भरून पाहिलं अन् त्याच्या पायावरची पकड सैल केली. बगळा उडाला अन् बाकी बगळ्याजवळ जाऊन बसला. मग सगळेच बगळे एकसाथ उडाले. एकसाथ. उंच आकाशात. चिंतू खूप वेळ बगळ्यांची माळ बगत होता.’

बॉलचं जमेना म्हणून चिंत्या क्रिकेटला जात नाही. संतोषच्या बापाला समजल्यावर तो त्याला बेदम मारेल याचीच चिंत्याला काळजी. पण संतोषचा बाप म्हणते, ‘‘खेळात बॉल हारवितोयच.’’ ते दुसरे अकरा रुपये देतात. बॉल आणि खेळ चालू होऊन चिंतूचे सगळे प्रश्न निकाली निघतात.
कुमठेकरांनी ‘व्हावे लहानाहून लहान’ होत, वाचकांना साखर देणारा बारक्या दिला आहे. स्थानिक कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेल्या या सोंगाडय़ानं स्वत:कडे व स्वत:च्या घरातल्यांकडेसुद्धा तटस्थपणे पाहता येण्याचा दुर्मीळ गुण जपून ठेवलाय. त्यानं, कोणाचीही भीडभाड न ठेवता, कसलीही निषिद्धता न बाळगता मोकळ्याढाकळ्या भाषेत त्रयस्थपणे निवाडा करण्याचा हक्क राखून ठेवला आहे. स्वप्रतिमेच्या प्रेमग्रस्त काळात तो गावातील हरेक माणसाची वास्तव प्रतिमा दाखवतो आणि सर्वाची खिल्ली उडवतो.

तो योग्य जागा घेऊन मोजक्या शब्दांत पात्रपरिचय करून देतो. चिंत्याची मोठी बहीण पिंकी, ‘उत्तरं इना गेल्यावर पिंकी यकदम मोठय़ा मानसावानी वागती. तशी ती उत्तरं लई भारी देती. मराठीतल्या दहा मार्कावाल्या उत्तरासारखं. ती मंजे गृहपाठ वर्गपाठ करनार, मार्क घेनार. भुकं तर न्यू कॅट असतेत. चिंत्यालाबी हाये ते डोसकं रिंगरोडनं नसताना बायपासनं चालतं. मेनरोडनं न्हायी.’

भसकन् वरडणारी चिंत्याची घरमालकीण आव्वा, ‘एकदम पानपसंद मदल्या बाईसारकी झपमन कडू सुरातून गोड सुरात आली.’
‘करडखेलकर गुर्जीच्या तोंडात हर वक्त कलकत्ता १२० – ३०० पान, काश्मिरी किमामवालं. ते त्यांचं तोंड फकस्त दोन येळंला उघडीत असतील. येक पान खायला न् दुसरं गानं म्हनायला.’

‘बगळा’ ही लातूर-उस्मानाबाद जिह्यातल्या खास बोली भाषेतली कादंबरी आहे. कानडी, तेलुगू, दखनी उर्दू यांची मिसळ त्यात आहे. ‘लाव’, ‘लास’ आणि ‘आव’ आदी प्रत्यय हे या बोलीचं वैशिष्टय़ आहे. (‘करलालाव’, ‘जेवलालतो’, ‘झोपनाव’) तो सरळ सांगून टाकतो, ‘चिंतूच्या घरी रोजं अंगतपंगत राहती. सम्दिजन एकदमच जेवनार. आपल्या घरी ते न्हाई, कोन कवा जेवनार, कोन कवा. कायय आमच्या पप्पांचा यायचा टाइम नसतोय. अन् तसंबी आमच्या घरचे पुरुष बाययला तेवडा डिमांड न्हाई देत. बाम्नायकडं थोडं येगळं असतंय.’ इतर दोस्तांचे बाप कसे आहेत? हे देखील तो ओळखून आहे, ‘संत्याचा बाप लई खतरनाक दिसतोय. आमच्या सगळ्या बापात तेच्या येवढा शक्कतवाला कुनीच नसंल. पिच्चरमधल्या स्पॉटनानावनी. यक जरी ठिवला तर संत्या ग्यारंटीनं मुतनार.’

पूर्ण कादंबरीभर निखळ आनंददायी विनोदाची निर्मिती होत जाते. वाचताना जागोजागी अगदी सहज व नकळत हसू येतं. प्रकाश नारायण संत यांच्या ‘लंपन’नंतर मराठीला या कादंबरीद्वारे बऱ्याच वर्षांनी इतका प्रसन्न पोरगा भेटला आहे.(ता. क.- यथावकाश तळं बुजवून जागा साफ केली गेली. बगळे गायब झाले. मैदानावर मुलं दिसेनाशी झाली. मग मैदानाच्या जागी इमारत आली. बांधकामांनी शाळा मोठय़ा झाल्या तर शिकवणीच्या दुकानांचे मॉल झाले. पालक व बालक आपापल्या ‘पडद्यांत’ गुंग आणि बारक्या?)

लेखक, आस्वादक आणि पर्यावरण अभ्यासक ही अतुल देऊळगावकर यांची मुख्य ओळख. हवामान आणि पर्यावरणविषयक विविध जागतिक परिषदांमध्ये सहभाग. पर्यावरण, शेती, आपत्ती व्यवस्थापन, विकास, विज्ञान-तंत्रज्ञान यांवर सातत्याने लिखाण. ‘ग्रेटाची हाक : तुम्हाला ऐकू येतेय ना’, ‘डळमळले भूमंडळ’, ‘बखर पर्यावरणाची आणि विवेकी पर्यावरणवाद्याची’ आदी पुस्तके लोकप्रिय.
atul.deulgaonkar@gmail.com