दत्तात्रय पाडेकर

गुजरातमध्ये नर्मदेच्या तीरावर वल्लभभाई पटेलांचा प्रचंड उंचीचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. त्यावरून बरीच उलटसुलट चर्चा झाली. परंतु त्याच्या उंचीपेक्षा त्याचं सौंदर्य आणि त्यातील कलात्मकता यावर खरं तर चर्चा व्हायला हवी होती.

गुजरातमध्ये नर्मदेच्या तीरावर मोदी सरकारने सरदार वल्लभभाई पटेलांचा प्रचंड उंचीचा भव्य पुतळा उभारला. त्यावरून देशभरात बरीच उलटसुलट चर्चा झाली. या पुतळ्यासाठी आलेला अवाढव्य खर्च, त्यामागचं राजकारण वगैरे अनेक मुद्दे त्यात चर्चिले गेले. हे सगळे मुद्दे आहेतच, पण हा पुतळा उभारताना सौंदर्य आणि कलात्मकता याचीही बूज राखली गेलेली दिसत नाही.

हा पुतळा उभारताना तो जगातला सर्वात उंच पुतळा व्हावा हाच एकमेव उद्देश होता का?  कारण जगातल्या ज्या उंच पुतळ्यांशी तुलना करून हा पुतळा उभारला गेला, त्या पुतळ्यांचं सौंदर्य व कलात्मकतेचा आदर्श आपण समोर ठेवलेला नाही असं खेदानं म्हणावंसं वाटतं.

वल्लभभाई पटेल यांचा हा पुतळा ज्यांनी घडवला ते शिल्पकार राम सुतार आता ९३ वर्षांचे आहेत. त्यांनीच संसदेच्या आवारातलं महात्मा गांधींचं अतिशय सुंदर शिल्प घडवलं आहे. राम सुतार यांचा शिल्पकलेतला अनुभव दांडगा आहे. त्यांचं काम, अनुभव, वय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या कलेबद्दल मला संपूर्ण आदर आहे.

असं असूनही वल्लभभाई पटेलांचं असं कलात्मकता नसलेलं शिल्प त्यांच्याकडून घडणं म्हणूनच दुर्दैवी वाटतं. राम सुतार यांच्या शिल्पातून महात्मा गांधींचं व्यक्तिमत्त्व जसं व्यक्त होतं तसं या पुतळ्यातून वल्लभभाईंचं व्यक्तिमत्त्व मात्र प्रतित होत नाहीत. लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांचा १८२ मीटर उंचीचा पुतळा तयार करणं हे एक मोठंच आव्हान होतं. ते राम सुतार यांनी पेललं खरं; पण पुतळ्याच्या उंचीएवढी कलात्मक उंची मात्र त्याला लाभलेली नाही. या पुतळ्याविषयी चर्चा करताना कुणीच त्याचं सौंदर्य आणि कलात्मकता याबद्दल बोलत नाही, ही आणखी दुर्दैवी बाब आहे. जगातल्या सगळ्या उंच पुतळ्यांशी स्पर्धा करताना त्यांच्या उंचीपेक्षा त्यांचं सौंदर्य आणि कलात्मकता या गोष्टींशी स्पर्धा होती तर जास्त चांगलं झालं असतं.

एक कलावंत आणि रसिक म्हणून मी या पुतळ्याकडे पाहतो तेव्हा मला कलेतील मूलभूत गोष्टी जाणवतात. या पुतळ्यामध्ये वल्लभभाई पटेल यांचा चेहरा, त्यांचे हात, पाय, त्यांनी पांघरलेलं उपरणं, झब्बा, त्यांचं धोतर या सगळ्या गोष्टी पाहताना त्या शैलीच्या दृष्टीने सुसंगत वाटत नाहीत. त्यांच्यात एकसंधता नाही. वल्लभभाईंचं हे शिल्प आपल्याला चहूबाजूंनी बघता येतं. हे शिल्प समोरून जसं दिसतं तसंच मागच्या बाजूनेही सौंदर्यपूर्ण दिसेल याबाबतचा विचार केलेला जाणवत नाही. त्यामुळे हे शिल्प काहीसं ठोकळेबाज वाटतं.

या पुतळ्यात वल्लभभाईंच्या चेहऱ्यावर असहायतेचे भाव दिसतात. ते त्यांच्या व्यक्तिमत्त्वात कधीच नव्हते. पुतळ्याचे हातही शरीराच्या मानाने थिटे वाटतात आणि पाय खूप बोजड वाटतात. पुतळा उंच उभारताना त्याचे पाय भक्कम केले असतील, परंतु त्यात सौंदर्य आणि कलात्मकतेचा मेळ आढळत नाही. या पुतळ्याची रचना अशी आहे की वल्लभभाई अवघडल्यासारखे उभे राहिलेत असं वाटतं. त्यामध्ये सहजता दिसत नाही. वल्लभभाईंच्या पुतळ्याची वेशभूषा (ड्रेपरी) करताना  शैलीबद्दलही दुर्लक्ष झालेलं वाटतं.

या पुतळ्याच्या जाहिरातीत ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’सह जे पुतळे आहेत, त्या सर्व पुतळ्यांमध्ये  सौंदर्य आणि कलात्मकता प्रामुख्याने आढळते. तोच तर त्यांचा केंद्रबिंदू आहे. या सर्व पुतळ्यांमध्ये प्रमाणबद्धता, लालित्य, सौंदर्य, कलात्मकता हे सगळे घटक आहेतच; शिवाय ते पुतळे ज्या चौथऱ्यांवर (पेडेस्टल) उभारले आहेत ते चौथरेही तेवढेच कलात्मक आहेत. मूळ शिल्पांना ते पूरक आहेत. ज्यामुळे शिल्पाचं सौंदर्यही वाढतं. तिथे पुतळ्याबरोबर चौथऱ्याचाही सखोल विचार केलेला जाणवतो. पण वल्लभभाई पटेलांचा पुतळा आणि त्याचा चौथरा यांच्यात काही सुसंगतता आहे असं वाटत नाही. त्यामुळे या पुतळ्यात कलात्मकतेपेक्षा अभियंतागिरीच जास्त जाणवते.

कलात्मक, उदात्त आणि सुंदर काय ते पाश्चात्य देशांमध्येच असतं आणि आपल्याकडे तसं काही नाही असं माझं अजिबात म्हणणं नाही. राम सुतार यांनीच घडविलेल्या महात्मा गांधींच्या कलात्मक आणि सुंदर पुतळ्याचं उदाहरण मी दिलंच आहे. त्याचप्रमाणे विधान- भवनाच्या आवारातला महात्मा फुलेंचा पुतळादेखील देखणा आणि कलात्मक आहे. या आवारातला हा एकमेव कलात्मक पुतळा शिल्पकार नारायण सोनवडेकरांनी घडवला आहे. त्याचप्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिकेने उभारलेले शिल्पकार मदन गर्गे यांनी केलेले शिवाजीमहाराज आणि संत तुकाराम यांच्या भेटीचे ‘शक्ती आणि भक्ती’ हे शिल्पही अप्रतिम आहे. कोल्हापूर येथील शिवाजी चौकातील कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी घडविलेले शिवाजीमहाराजांचे शिल्पही सौंदर्यपूर्ण आहे. या शिल्पाची उंची साधारण पाचएक फूट असली तरी कलात्मक उंची खूप मोठी आहे.

पूर्वी अशी शिल्पं मूळ आकारातच करावी लागत होती. त्यासाठी पुतळ्याचा सांगाडा (आर्मेचर), मातीकाम हे सगळं प्रत्यक्ष आकारातच करावं लागत असे. पण आज मात्र तसं नाही. पुतळ्याचं छोटं मॉडेल बनवून संगणक आणि तंत्राच्या साहाय्याने आपण हव्या तेवढय़ा मोठय़ा आकारात शिल्प सहजतेनं करू शकतो. ब्राँझ, संगमरवर, पाषाण किंवा लाकूड यांसारख्या माध्यमांमध्ये जेव्हा शिल्प बनवलं जातं तेव्हा त्या माध्यमाचं अंगभूत सौंदर्य त्यात प्रतित होत असतं. ती त्या माध्यमाची श्रीमंती वा वैभव असतं. कलात्मकतेचं हे महत्त्वाचं अंग आहे. परदेशात ब्राँझच्या शिल्पांना सहसा रंग लावला जात नाही. अनेक वर्षांच्या वातावरणाच्या प्रभावामुळे त्याला नैसर्गिक हिरव्या, निळसर रंगछटा प्राप्त होतात. काही वेळेला अशा शिल्पकृतींना मुद्दाम ‘पतीना’ करतात. त्यामुळे शिल्पाकृतीचे सगळे बारकावे तसेच राहून त्याला आणखीन सौंदर्य प्राप्त होतं. या नैसर्गिक हिरवट निळसर रंगछटांमुळे त्यातल्या सौंदर्याला उठाव येतो.

वल्लभभाईंच्या पुतळ्याचा एवढा मोठा प्रकल्प हाती घेऊन, त्यासाठी तीन हजार कोटी रुपये खर्च करून आपण कलेच्या दृष्टीनं नेमकं काय साधलं, याचा विचार व्हायला हवा असं मला मनापासून वाटतं.

वल्लभभाईंच्या पुतळ्यात आता कोणताही बदल शक्य नाही. पण हा लेखप्रपंच करण्याचं कारण म्हणजे आपल्याकडे भविष्यात होऊ घातलेली पुतळ्यांची मालिका! आपल्या सरकारने शिवाजीमहाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांचे आराखडे बनवले आहेत. या स्मारकांचे आणि पुतळ्यांचे मोठमोठे फलक लागलेले दिसतात. ही दोन स्मारकं तरी आपण कलात्मक आणि सौंदर्याची जाण ठेवून बांधणार आहोत का, हा खरा प्रश्न आहे. ‘शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचे आठवावे रूप’ असं आपण म्हणतो. शिवाजीमहाराज म्हटलं की त्यांचा रूबाब, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा डौल, त्यांचा पराक्रम या सगळ्या प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात. हे सगळं या शिल्पातून व्यक्त व्हायला पाहिजे. पण आता या पुतळ्यांचे जे फलक लागलेले आहेत ते पाहता हे उद्दिष्ट साध्य होईल असे वाटत नाही. आपण जर वल्लभभाई पटेल, शिवाजीमहाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे बनवणार असू, तर त्यातून खरे वल्लभभाई पटेल, खरे शिवाजीमहाराज, खरे बाबासाहेब आंबेडकर व्यक्त व्हायला हवेत. तरच आपल्या सगळ्यांना आणि पुढच्या पिढीच्या कलावंतांना काही सुंदर, कलात्मक आणि उदात्त घडविण्याची प्रेरणा मिळेल.