जंगली गाईंनी हिंस्रपणा अंगी बाणवला असला तरीही त्यांना प्राण्यांची आणि माणसांची भीती वाटते. हा विचार मनात आला आणि अचानक जंगली गाईंविषयी मनात करुणा दाटून आली. विपरीत परिस्थितीत टिकून राहण्याच्या धडपडीत त्यांनी स्वत:चा स्वभाव बदलला, पण स्वत:च्या शक्तीवर स्वत:चाच विश्वास नाही, भीती मनातून गेलीच नाही. टिकून राहण्याच्या धडपडीत नुस्ते टिकणेच राहिले आहे.
मध्य प्रदेशमधल्या मडईच्या अभयारण्यातला प्रसंग. वनखात्याच्या उघडय़ा जीपमध्ये आम्ही पाच-सहा जण डोळे ताणून ताणून जाळीत काही दिसते आहे का ते शोधण्याच्या प्रयत्नात होतो. दुरून धप् धप् असा आवाज यायला लागला. गाईड म्हणाला, ‘गव्यांचा कळप येतो आहे.’ हे बोलणे होईपर्यंत तो कळप आमच्यापाशी पोहोचलासुद्धा. सगळे मिळून पंचवीस-तीस तरी गवे असतील. जीप रस्त्यात उभी राहिली. आमच्या आजूबाजूने ते गवे जात होते. अचानक जीप मधे आल्यामुळे कदाचित तेही गोंधळले असतील. एकमेकांना ढकलत, धडपडत, रस्त्यावरून खाली झुडपांमध्ये उतरत ते धावत होते. इतक्या जवळून त्यांच्या शक्तीची भीती वाटत होती. यातल्या एकाचेही डोके न फिरो, अशी मनातल्या मनात प्रार्थना करीत आम्ही जीव मुठीत धरून बसलो होतो. कळपाचा धष्टपुष्ट मुखिया चांगला सहा-सात फूट उंच आणि तितकाच रुंद होता. त्याच्या डोळ्यांकडे बघण्याचा धीरच होत नव्हता. सगळा कळप जात असताना तो जीपजवळ थोडं अंतर राखून उभा होता. कळपातलं शेवटचं वासरूही पुरेसं पुढे गेल्यावर तो निवांतपणे गेला. आम्हीही जरा सल होऊन बसलो. जीप त्याच रस्त्याने पुढे गेली. गवे पुढे गेले आणि आमची वाट डावीकडे वळली. जंगलात थोडी मोकळी जागा होती. तिथे गाईंचा एक कळप उभा होता. शंभर एक गाई-बल िशग उगारून डुरकत, खुरांनी जमीन उकरत उभे होते. ड्रायव्हरने झटक्यात जीप वळवली आणि गवे गेले होते त्या दिशेने आम्ही परत फिरलो. गव्यांना न घाबरलेले गाईड आणि ड्रायव्हर गाईंच्या कळपाला बघून परत फिरतात याची आम्हाला गंमतच वाटली.
स्पष्टीकरण देत गाईड म्हणाला, ‘जंगली जनावरांपेक्षा या गाई भयंकर आहेत. दुष्काळात जनावरांना पोसणं शक्य नसेल तर लोक त्यांना जंगलात आणून सोडतात. जंगली जनावरांच्या तावडीतून वाचली तर वाचली. रामभरोसे सोडलेली ही जनावरं जंगली जनावरांच्या भीतीने कळप करून राहतात आणि भीतीमुळेच आक्रमक होतात. जरा खुट्ट झालं की अंगावर धावून येतात. इतर जंगली जनावरं, अगदी वाघसुद्धा त्याची खोडी काढली नाही तर आपल्या मस्तीत जवळून निघून जातो, आपल्याकडे बघतसुद्धा नाहीत. पण या गाई भयंकर संशयी आहेत. त्यांच्यापासून चार हात दूरच राहिलेलं बरं.’ गाईंविषयी हे पहिल्यांदाच ऐकायला मिळत होतं. एरवी गाय म्हटलं की गरीब हेच विशेषण आणि करुण डोळे!
कोणी तरी म्हणाले, ‘असे कसे लोक घरच्या जनावरांना जंगलात आणून सोडतात.’
त्यावर दुसरा म्हणाला, ‘गरिबी वाईट असते. लोक जिथे घरातल्या विधवांना वृंदावनला आणून सोडतात, तिथे गाय-बलांचं काय घेऊन बसलास.’ मनात आलं, केवळ वृंदावनलाच नाही तर कुठल्याही तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अशा बायका दिसतातच. म्हाताऱ्या किंवा वयाने लहान असतील तर असहाय. महेश्वरला नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर राजवाडय़ाच्या िभतीतल्या ओवऱ्यांमध्ये जुन्या पुराण्या साडय़ांच्या पडद्यांचा आडोसा धरून काही बाया राहतात. दिवसभर घाटावर भीक मागतात. अहिल्याबाईने इतक्या दूरदृष्टीने विणकर बायांच्या हाताला व्यवसाय दिला आणि त्यांच्या रोजीरोटीची व्यवस्था केली, जी आजतागायत चालू आहे. तिच्याच वाडय़ाच्या आडोशाने या बायांनी राहावं यासारखी विरुपिका नाही. वरती मागांची खट् खट् चालू असते आणि खाली या बायका भीक मागत असतात. बोलता बोलता कधी भांडायला लागतील याचा नेम नसतो. आणि भांडायला लागल्या की जंगली गाईंसारख्याच िहस्र होतात.
गव्यांचा कळप बराच दूर गेला असावा. आम्हीही वाट बदलून दुसऱ्या दिशेने चालायला लागलो. पुन्हा नजर वाघाच्या शोधात गुंतली. कुठल्याही अभयारण्यात इतर कितीही प्राणी दिसले तरी वाघ दिसेपर्यंत चन पडत नाही. जंगलात एका टेकडीवर भीमबेटकासारखीच आदिमानवांची चित्रं असलेल्या गुहा आहेत अशी माहिती मिळाली होती. म्हणून त्या दिशेने मार्गक्रमण करायला सुरुवात केली. एका टप्प्यानंतर जीपमधून उतरून चढून जावे लागणार होते. त्या एरियात वाघ असण्याचीही शक्यता होती. पण गाईड न्यायला तयार होता आणि आम्हीही जायला तयार होतो. खडकांमधून वाट काढत वर गुहांपाशी पोचलो. चार-पाच चित्रं होती. मोठय़ा िशगांचे रेडे, गवे आणि वाघ. बहुधा ज्या प्राण्यांची भीती वाटत होती त्यांची चित्रं काढली असावीत. खडकाला वळसा घालून आणखी एक गुहा होती. तिथे आत पाऊल टाकलं आणि त्या क्षणीच बाहेर आलो. गुहेत उग्र वास भरून राहिला होता. मातीवर वाघाच्या पंज्यांचे अगदी ताजे ठसे होते. बहुतेक आमचा आवाज ऐकून वाघ उठून निघून गेला असावा. कदाचित जवळपासच कुठे तरी जाळीत थांबून आम्हाला बघतही असेल. आल्या पावली आम्ही परत फिरलो. धडधड उतरत जीपमध्ये येऊन बसलो. मनात आलं, आज जर ज्यांची भीती वाटते अशा प्राण्यांची चित्रं काढायची वेळ आली तर वाघाचे चित्र काढावे लागेल आणि त्याच्या जोडीला जंगली गाईंचीही चित्रं काढावी लागतील. िहस्र असणं हा वाघाचा स्वभावच आहे. पण त्याला माणसांची भीती वाटत नाही. जंगली गाईंनी िहस्रपणा अंगी बाणवला असला तरीही त्यांना प्राण्यांची आणि माणसांची भीती वाटते. हा विचार मनात आला आणि अचानक जंगली गाईंविषयी मनात करुणा दाटून आली. विपरीत परिस्थितीत टिकून राहण्याच्या धडपडीत त्यांनी स्वत:चा स्वभाव बदलला, पण स्वत:च्या शक्तीवर स्वत:चाच विश्वास नाही, भीती मनातून गेलीच नाही. टिकून राहण्याच्या धडपडीत नुस्ते टिकणेच राहिले आहे.
सुनंदा भोसेकर
sunandabhosekar@gmail.com