शाळेत असताना जिब्राल्टरचा प्रचंड डोंगर असलेला एक काळा-पांढरा फोटो भूगोलाच्या पुस्तकात पाहिला होता. परंतु जिब्राल्टर हे काय आहे, कसे आहे हे कळण्याकरिता नंतरची काही दशके जावी लागली. त्यासाठी स्पेनला भेट द्यावी लागली. आमच्या स्पेन आणि पोर्तुगालच्या दौऱ्यात ‘जिब्राल्टर’ हा एक खास टप्पा होता. त्याची कहाणी खरोखरच आश्चर्यकारक आहे. स्पेनच्या दक्षिणेकडच्या टोकावर भूमध्य समुद्राच्या आणि जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीच्या तोंडाशी असलेला हा भाग स्पेन या देशाचाच एक तुकडा आहे. पण त्याची मालकी मात्र ब्रिटिशांकडे आहे. स्पेनच्या या छोटेखानी तुकडय़ाचे क्षेत्रफळ ६.७ चौरस कि. मी. आहे. युरोपीय महासंघात ब्रिटन सामील असताना त्यांच्या या वसाहतीत स्पेनच्या व्हिसावर सर्वाना सहज प्रवेश मिळत असे. परंतु युरोपीय महासंघातून बाहेर पडल्यावर ब्रिटनने ताबडतोब इथे इमिग्रेशन कार्यालय उघडले. त्यामुळे ‘डबल एंट्री व्हिसा’ असल्याशिवाय या प्रदेशात कोणालाच जाऊ दिले जात नव्हते. त्यामुळे आमच्यापैकी भारत वगळता इतर देशांतून आलेल्यांना या ठिकाणी प्रवेश मिळाला नाही. आमच्या पारपत्र आणि व्हिसाची कडक तपासणी झाल्यावर आम्ही या अफलातून ब्रिटिश वसाहतीत प्रवेश केला. ब्रिटिशांनी येथे एक छोटा विमानतळ उभारला आहे. तेथून लंडनला जायला अडीच तास लागतात. तसेच या प्रदेशाला लागून असलेल्या समुद्र परिसरात ब्रिटिशांच्या नाविक दलाची एक तुकडी या वसाहतीचे रक्षण करते आणि मोक्याच्या जागी असलेल्या येथल्या सामुद्रधुनीवर लक्ष ठेवते.
जिब्राल्टरचा इतिहास रोमांचक आहे. रोमन काळात या प्रदेशाची मालकी रोमन राज्यकर्त्यांकडे होती. इ. स. ७११ मध्ये जिब्राल्टरच्या समोरच असलेल्या मोरोक्को या इस्लामिक प्रदेशाच्या सुलतानाने हा भाग आपल्या ताब्यात घेतला. आक्रमण करून घेतलेल्या या प्रदेशाची मालकी पुढे जवळजवळ ७०० वर्षे या सुलतानांकडे होती. नंतर १४६२ साली इंग्लंडच्या डय़ूक ऑफ मेडीनाने हा प्रदेश काबीज केला आणि त्यावर ब्रिटिशांचे राज्य प्रस्थापित झाले. वास्तविक ६.७ चौरस कि. मी. आकाराचा स्पेनचा हा दक्षिणेकडचा तुकडा; परंतु अत्यंत महत्त्वाच्या, मोक्याच्या जागी. त्यामुळे ब्रिटिश राज्यकर्ते भूमध्य समुद्राच्या तोंडाशी १३ कि. मी. रुंदीची सामुद्रधुनी असलेला हा प्रदेश सोडणे शक्यच नव्हते. येथून अत्यंत मोक्याच्या जागी असलेल्या सुवेझ कालव्याकडे जाणाऱ्या प्रत्येक जहाजावर पहारा ठेवता येऊ शकतो हे ब्रिटिशांनी ओळखले होते. आश्चर्य वाटेल, पण स्पेन हा देश १४६२ सालापर्यंत मुस्लीमबहुल होता आणि त्यांच्याच ताब्यात होता. त्या वर्षी बहुसंख्य मुस्लिमांना तेथून स्थलांतरित केल्यानंतर ख्रिस्ती धर्म तेथे मोठय़ा प्रमाणावर स्वीकारला गेला. मशिदींची चर्चेस झाली आणि स्पेन हा ख्रिस्तधर्मीय झाला.
जिब्राल्टरसाठी स्पेनचे इंग्रजांबरोबर भांडण चालूच होते. १९६७ आणि २००२ अशा दोन वेळा जिब्राल्टरमध्ये सार्वमत घेतले गेले. दोन्ही वेळा तिथल्या जनतेने ब्रिटनमध्यचे राहण्याचा निर्णय घेतला. तरी अजूनही स्पेन आणि ब्रिटन यांचे एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयोग सुरूच आहेत. भारत आणि इतर अनेक देशांवर ब्रिटिशांची राजवट होती त्या काळात जिब्राल्टरचे महत्त्व अनन्यसाधारण होते. कारण ब्रिटिशांची सुवेझमधून जाणारी सर्व जहाजे, आरमारी बोटी येथूनच भूमध्य समुद्रात शिरत असत. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांनी येथे मोठा नाविक तळ उभारला होता. त्यामुळे या सर्व प्रदेशावर त्यांची हुकमत होती. भूमध्य समुद्रही त्यांच्या संपूर्ण ताब्यात होता असे म्हणायला हरकत नाही. युद्धाच्या वेळी सर्व नागरिकांना ब्रिटन आणि मोरोक्कोमध्ये हलविण्यात आले होते. जिब्राल्टरच्या प्रचंड खडकाचा उपयोग तटबंदीसारखा होत होता. जर्मन फौजा आणि आरमार यांनी स्पेनचा हुकूमशहा फ्रँकोकडे स्पेनमध्ये उतरण्यासाठी परवानगी मागितली ती केवळ ही मोक्याची जागा घेण्याकरिता! पण फ्रँकोने त्यांना परवानगी नाकारली. स्पेनने जिब्राल्टरच्या सीमा बंद करून ब्रिटिशांची कोंडी करायचे प्रयत्न १९८५ पर्यंत केले; परंतु ब्रिटनने त्याला दाद दिली नाही. मात्र, युरोपीय महासंघ झाल्यावर सर्व युरोपीय जनतेकरिता जिब्राल्टर खुले झाले.
जिब्राल्टर ब्रिटिश आधिपत्याखाली असले तरी हे राज्य वैशिष्टय़पूर्णरीत्या चालवले जाते. येथली लोकसंख्या आहे सुमारे ३२,०००! या प्रदेशाला स्वतंत्र पार्लमेंट आहे. त्यात १७ सदस्य निवडून दिले जातात. त्यापैकी दहा जणांचे मंत्रिमंडळ, तर एक सभापती असतो. या प्रदेशाला स्वतंत्र ध्वज आहे. पण ब्रिटिशांचा युनियन जॅकही सोबत असतो. राज्याला प्रमुख कार्यकारी अधिकारी असतो. शिवाय ब्रिटनहून पाठवलेला गव्हर्नरही असतो. त्याचा छोटेखानी छान बंगलाही आम्ही पाहिला. या प्रदेशाची मुख्य आहेत सांप्रतची ब्रिटिश राणी एलिझाबेथ द्वितीय. कारभार जरी मंत्रिमंडळाकडे असला तरी संरक्षण, परराष्ट्र व्यवहार हे सर्व इंग्लंडमधून पाहिले जातात. नोकरीच्या निमित्ताने दररोज स्पेनमधून १५ हजारच्या आसपास लोक या शहरात येत असतात. येथे राहणाऱ्या ३२ हजार नागरिकांत मूळचे ब्रिटिश, मोरोक्कन, भारतीय, पोर्तुगीज, ज्यू, जर्मन असा सारा मिश्र कारभार आहे! ते सर्व आता ब्रिटिश नागरिक आहेत. त्यामुळे त्यांना ब्रिटनमध्येही त्याच दर्जाने वागवण्यात येते. ‘ब्रेक्झिट’च्या वेळी युरोपीय महासंघातून बाहेर पडण्यासाठी जे मतदान झाले त्यात येथील नागरिकांनीही भाग घेतला होता.
जिब्राल्टर हा प्रदेश ‘टॅक्स हेवन’ आहे. या प्रदेशाचे उत्पन्न म्हणजे येथे मोठय़ा प्रमाणावर येणारे जगभरचे पर्यटक. ऑनलाइन गॅम्बलिंग, तसेच प्रचंड प्रमाणावर येणाऱ्या पर्यटकांमुळे रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, दुकाने स्थानिकांना मोठे उत्पन्न मिळवून देतात. येथील दरडोई उत्पन्न ५० हजार पौंडांच्या वर आहे. या प्रदेशात रस्ते अरुंद, परंतु स्वच्छ आहेत. उंच-सखल प्रदेश असल्याने याला आपसूकच नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे. तिन्ही बाजूंना नितांतसुंदर समुद्र आणि त्यालगतचा स्पेन-मोरोक्कोचा किनारा यामुळे या प्रदेशाला अप्रतिम देखणे सौंदर्य प्राप्त झाले आहे. समुद्राला लागून सुंदर बाग, कठडे यामुळे येथे फिरताना खूप मजा येते. या छोटय़ा शहरात सुंदर बंगले, मोठय़ा इमारती हेतच, पण एक स्टेडियमही आहे. लंडनच्या बी.बी.सी.च्या माध्यमातून सर्व तऱ्हेची वृत्तपत्रादी, तसेच रंजनात्मक सेवा पुरवल्या जातात. जागतिक कंपन्यांची बडी कार्यालयेही येथे आहेत. सुंदर हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि अप्रतिम सदनिका असलेल्या इमारती जिब्राल्टरमध्ये आहेत. प्रवाशांना मार्गदर्शन आाणि सोयीसुविधांकरिता मार्गदर्शक तसेच छोटय़ा व्हॅन्स तैनात आहेत. आम्ही गेलो त्यावेळी हवामान २५ सेंटिग्रेडच्या जवळपास होते. निळा समुद्र, निळे आकाश, किनाऱ्यांची सौंदर्यपूर्ण बांधणी यामुळे हा सर्वच प्रदेश अत्यंत प्रेक्षणीय झाला आहे. येथे समुद्राचे पाणी शुद्धिकरण करून नागरिकांना पुरवले जाते असे आम्हाला सांगण्यात आले.
या प्रदेशाचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘रॉक ऑफ जिब्रॉ हॉर’ (Rock Of Gibro Hor). त्याच्या सौंदर्याचा महिमा काय वर्णावा! तो पाहण्यासाठी पर्यटकांची अक्षरश: झुंबड उडते. ४२६ मीटर उंच असलेला हा देखणा डोंगर सर्व बाजूंनी दिसतो. जवळजवळ ४०० मीटपर्यंत वर जाण्यासाठी केबल कार आहे. भूमध्य समुद्राने वेढलेला आणि लाइमस्टोन, सॅन्डस्टोन, डोलोमाइट आणि अशाच खनिजांनी तयार झालेला हा सुंदर डोंगर राखाडी, पारवा तसेच विविध रंगांची अनुभूती देतो. तो अत्यंत प्राचीन म्हणजे ‘जुरासिक एज’मधला आहे असे सांगितले जाते. २० कोटी वर्षांपेक्षाही प्राचीन असलेला हा डोंगर हवामान, समुद्र आणि अनेक घडामोडींमुळे बदलत जाऊन आजच्या स्थितीत आला आहे.
या डोंगरात अनेक गुहा होत्या आणि आजही आहेत. प्राचीन काळी त्यात मनुष्यवस्ती होती. या गुहा निरनिराळ्या ठिकाणी आहेत. त्यापैकी सेंट मायकल केव्ह म्हणजे एक देखणे आश्चर्यच! या गुहेमधले खडकांचे रंगीत आकार अजब आहेत. या मोठय़ा गुहेत निरनिराळ्या उंचीवर सभागृह आहे. त्यात खुर्च्या ठेवल्या आहेत. गुहेतल्या अफलातून आकारांवर वेगवेगळ्या रंगांचे प्रकाशझोत पाडून ती विलक्षणरीत्या सजवली आहे. ३०० मीटर उंच आणि ५०-६० मीटर खोली असलेल्या या गुहेत फिरणे म्हणजे काय, याचे वर्णन करणे केवळ अशक्य! हे अद्भुत सौंदर्य पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येथे येत असतात. या प्रदेशात जवळपास २५० रानमाकडे असून त्यांना शेपटय़ा नाहीत. त्यांची चांगली निगा राखली जाते.
जिब्राल्टरचा आमचा गाइड थॉमस हा मूळचा केरळी होता. त्याचे पूर्वज केरळचे. आता तो ब्रिटिश नागरिक आहे. त्याला राहायला सरकारी अनुदानित घर आहे. त्याच्या छोटय़ा व्हॅन्स आहेत आणि टुरिस्ट गाइड म्हणून तो काम करतो. त्याने खूप आपलेपणाने आमचे आगतस्वागत केले. आपली मूळ भूमी असलेल्या भारताविषयी त्याने बरेच प्रश्न आम्हाला विचारले आणि आपल्या पूर्वजांच्या मातृभूमीविषयीची आपली जिज्ञासा शमवली.
– सुभाष चिटणीस