प्रिय तातूस,
पाऊस दाराशी उभा आहे, पण त्याची दखल घेणारे पाडगावकर नाहीत म्हणून हळहळ वाटली. माझ्या मते, यंदा ढगांना अधिकच दाटून येणार असे वाटतेय. सगळ्यांच्या अंदाजाप्रमाणे शंभर टक्क्यांहून अधिक पाऊस पडणार म्हणतात. आपल्याला काही कविता सुचत नाहीत; पण कवितेसारखं काहीतरी आतून दाटून मात्र येतं. प्रेमबीम वगैरे पावसातच कसं काय उफाळून येतं, काही कळत नाही.
नानाने परवा ‘सैराट’ सिनेमा बघितला. एकदा- दोनदा नव्हे, चांगला दहा वेळा बघितला. मी आपलं म्हटलं, ‘एकदा बघून समजत नाही इतका अवघड वगैरे आहे की काय?’ त्यावर त्याने म्हटले की, ‘या वयातदेखील ‘याड’ लावणारा सिनेमा आहे म्हणून आम्ही सगळेच गेलो होतो. समाजातील सर्वाना सिनेमा बघायला मिळावा म्हणून वेगवेगळ्या रेशन-कार्डधारकांसाठी वेगवेगळे दर ठेवले होते. हे प्रथमच मराठीत घडले. त्यामुळे पंचाऐंशी कोटीच्या वर बिझनेस झाला म्हणतात. इन्कम टॅक्सची भानगड नको म्हणून खरे तर हल्ली खरा गल्ला कुणी दाखवत नाहीत; पण नागराजने नशीब काढले बघ!’
मल्टिप्लेक्समध्ये समाजाच्या सर्व स्तरांतले लोक (अगदी झोपडपट्टीमधलेदेखील!) आजूबाजूला सिनेमा बघायला आलेले बघून मला समरसता जाणवली. हल्ली कसं स्विमिंग पूल वगैरे मोठमोठय़ा सोसायटय़ांतून झालेत. पण ते काय आपले वाटत नाहीत. पण चक्क दगडी बांधकामाची भलीमोठी विहीर बघून आपले गावचे दिवस आठवले. इतिहासात हीर-रांझा, दुष्यंत-शकुंतला, लैला-मजनू, रोमिओ-ज्यूलिएट अशी काय काय प्रेमवेडी युगुले दाखवलीत.. त्यातच आता आर्ची आणि परशा अजरामर होणार म्हणतात. शेतातल्या प्रेमामुळे हा सिनेमा आपल्याला आवडला, असं मी म्हणालो.
म्हणजे उद्या या सिनेमावर प्रश्नपत्रिका काढायची झाली तर प्रेम करण्यासाठी कुठले शेत वापरावे? – १) ऊस, २) ज्वारी, ३) मका, ४) हरभरा – असा प्रश्न विचारला जाईल. मला तर ना. धों.ची ‘पिकात धुडगुस घालून जा..’ ही कवितेची ओळ आठवली. खरे तर नागराजच्याही आधी रांगडं प्रेम करायला मराठी कवितेत महानोरांनी शिकवलं. मला काही कवितेतलं फारसं समजत नाही; पण विषय निघाला म्हणून आठवलं.
सिनेमा प्रेमावर आधारलेला आहे. प्रेम हा तर आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. अरे, म्हणून तर शेजाऱ्यावर प्रेम करा, असे म्हणतात. म्हणजे आपण शेजाऱ्यावर प्रेम करायचं. त्याने त्याच्या शेजाऱ्यावर प्रेम करायचं. असं करत चाळीतले सर्व लोक एकमेकांवर प्रेम करायला लागतील. जीवन म्हणजे एक लांबलचक चाळच आहे की काय असं मला वाटतं.
जगातले सगळे प्रॉब्लेमदेखील अगदी प्रेमामुळेच होतात असं वाटतं. परवा मी एका प्रवचनाला गेलो होतो. तिथे प्रवचनकारांनी ‘प्रत्येकाने आपापल्या बायकोवर प्रेम करावं, जगातले नव्वद टक्के प्रश्न सुटतील..’ असं म्हटल्यावर सर्व श्रोत्यांनी टाळ्या वाजवल्या. महिलावर्गाने जरा जास्तच वाजवल्या.
खरं सांगतो तातू, मला हे सुभाषित सांगणाऱ्या लोकांचं आश्चर्य वाटतं. अगदी साधी गोष्ट ते आसनावरून सांगतात तेव्हा वाटतं, काय महाराज बोलले! ‘तारुण्य म्हणजे पाठीवरची सॅक आहे. तिच्यात तुम्ही आनंद भरा’ किंवा ‘आयुष्य हे वडय़ासारखं चविष्ट बनवा आणि पावाच्या लुसलुशीत गादीमध्ये त्याला सुरक्षित जपा’ असं म्हटलं की मला हे लोक खूप थोर वाटतात. रोजच्या वापरातल्या गोष्टींतून इतकं छान तत्त्वज्ञान सांगता येतं, हे आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या लक्षातच येत नाही. जाहिरातवाले लोक पण मला गेट्र वाटतात तातू. परवा टीव्हीवर ‘तिने पांढऱ्या केसांना तोंड काळं करा सांगितलं आणि मग केसांनी डाय केला!’ अशी जाहिरात दाखवली गेली होती.
तर सांगायची गोष्ट म्हणजे हे सिनेमा वगैरे दिग्दर्शकांना सुचतं कसं? कथा काय? कविता काय? आपली तर मतीच गुंग होते. वाडीतले आम्ही सगळे ‘सैराट’ बघितल्यावर आमचं एक छोटं मंडळ आहे, जिथे आम्ही सगळे महिनाअखेरीस जमतो, त्यात आम्ही ‘सैराट’वर चर्चा करायचं ठरवलं. आमच्यामध्ये तात्यांना जास्त कळतं. त्यामुळे तात्या प्रमुख वक्ते होते. मराठीत ‘सैराट’ शब्द कुठे वापरलाय याचा त्यांनी आढावा घेतला. ‘वाक् संप्रदाय आणि म्हणी’ या कोशातील ‘बाई वैराट, बोलणं सैराट’ ही म्हणही त्यांनी सांगितली. एकूणच त्यांना सिनेमा आवडला मात्र!
तर अण्णांचं म्हणणं, या सिनेमामुळे जे शिकायला मिळतं ते- १) शिक्षण घेत असताना प्रेमात पडू नये. २) प्रेम करायचं असेल तर दोघांनीही घरच्यांची परवानगी घ्यावी. ३) आपण आपली कुवत असेल त्याच व्यक्तीच्या प्रेमात पडावे. ४) लग्न करण्याआधी प्रेयसीची कुंडली तपासून घ्यावी. थोडक्यात म्हणजे आपण आपली पायरी ओळखावी. उगाच हापूसच्या नादी लागू नये. आणि समजा, पळून जायचेच असेल तर जिथे आपली भाषा समजेल तिथपर्यंतच पळून
जावे. असो. हल्ली जागेचा प्रॉब्लेम असल्यामुळे आवरते घेतो.
तुझा-
अनंत अपराधी
अशोक नायगावकर – ashoknaigaonkar@gmail.com

Shukra Gochar In Mesh
२४ एप्रिलपासून ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत?सुख-समृद्धीचा कारक ग्रह राशी बदल करताच मिळू शकते चांगला पैसा
18 Months Later Shukraditya Rajyog in Mesh
दीड वर्षांनी शुक्रादित्य योग बनल्याने ‘या’ राशींना लाभणार पद, पैसे व प्रेम; २४ एप्रिलपासून जगण्याला मिळेल नवं वळण
this is true love old couple eating in one plate
याला म्हणतात खरं प्रेम! एका ताटात जेवणाऱ्या आजी-आजोबांचा व्हिडीओ पाहून नेटकरी झाले भावूक
True and pure love
आयुष्यात फक्त असं प्रेम मिळाले पाहिजे! आजोबांना घास भरवणाऱ्या आजींचा व्हिडीओ बघाच