एखादी व्यक्ती आपल्याला आयुष्यात काय करायचंय, हे एका टप्प्यावर आल्यावर ठरवते. अनुभवातून शहाणपण येतं. शहाणपणातून समंजसपणा. समजूतदारपणे जग बघताना जग वेगळं दर्शन देतं. काय करायला हवं, हे सांगत जातं. गरजा समजतात. अनेक गोष्टी सोसाव्या लागतात. समाजातल्या पृष्ठभागावरच्या समस्या आणि तळातल्या समस्या सोडवण्याचे मार्ग सापडतात. कोणत्या वाटेने गेल्यावर समस्या सुटेल, हे समजतं. माणसांचा अनुभव येणं नि माणसांनी अनुभव देणं, हे घडतं. त्यातून जगाकडे नि जगण्याकडे पाहण्याच्या दृष्टीत बदल होतो. ही दृष्टी समाजासाठी विधायक असते. प्रारंभी असणारा राग, चीड नष्ट होते नि चिंतनशील समाजमनस्कता काम करू लागते. ‘रात्रंदिन आम्हां..’ हे विलास चाफेकर यांचं आत्मकथनही हेच सांगते.

अनेक दिशांनी विलास चाफेकर यांचं आयुष्य प्रवास करतं. हा प्रवास त्यांच्यापुरता सीमित न राहता कोणाला तसा प्रवास करायचा असेल तर त्याच्या तयारीसाठी उपयोगी पडतो. चाफेकर यांचं प्रत्यक्ष आयुष्य आणि पुस्तक  वेगळं राहिलेलं नाही. याचे कारण ते काहीच लपवीत नाहीत. सगळं आयुष्य लख्खपणे उलगडत जातात. त्यासाठी फार मोठं धाडस लागतं. कारण ते सर्व व्यक्त केल्यावर नवेच प्रश्न आयुष्यात निर्माण होतात. कधी लेखक एकटा असतो, एकटा जगतो, एकटा फिरतो. कधी सोबत खूप मोठा समविचारी माणसांचा तांडा असतो. मतभेद होतात. सगळं स्वीकारून न कोसळता पुढे जाणं घडतं. बऱ्याचशा आत्मचरित्रांतून ‘मी किती सोसलं’, हे सोसून ‘मी किती ग्रेट’ हा भाव असतो. त्यात काटे, खाचखळगे, रक्तबंबाळ होणं, त्रास यांचं भांडवल केलेलं असतं. इथे असं काहीच नाही. उलट, हे घडलं म्हणून बरं झालं, मी जगायला शिकलो, ही जगण्यावरची भक्ती दिसते.

upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
Lok Sabha Election, Lok Sabha Election 2024,
डोके ठिकाणावर ठेवून मतदान कराल ना?
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?

सामाजिक काम करणारा माणूस एका विशिष्ट उंचीवर आल्यावर सगळ्यांना दिसतो. मग त्यांना प्रश्न पडतो की, याने नक्की सुरुवात कुठून कशी केली? चाफेकर यांचं शब्दातलं जगणं वाचताना हा प्रश्न पडत नाही. जगताना घेतलेले दाहक अनुभव आणि समाजासाठी घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतरचा सोशिक समजूतदारपणा त्यांना जगताना हसायला शिकवतो. समाजाच्या ज्या स्तरात गेल्यावर अनेक गोष्टी जगण्याला सतावणार आहेत, हे माहीत असूनही तिथे जाऊन चाफेकर उभे राहतात. ‘तुम्ही इथे यायचंच नसतं’ अशी भूमिका समोरचा समाज घेतो. तरीही इथे येणं ही माझी सामाजिक जबाबदारी आहे, कर्तव्य आहे, जगण्याचा हेतू आहे, असं काम करता करता चाफेकर त्यांना जाणवून देतात. स्त्रियांच्या संदर्भात पुनर्वसनाचं काम असो, उद्योगधंदे करून अर्थार्जनाचं काम असो, वेश्यांमधलं काम असो, दुष्काळ निवारणाचं काम असो किंवा आपत्ती निवारणाचं काम असो; वेगळ्या जाणिवेनं काम करताना डोक्यावर ओझं घेतल्यासारखं चाफेकर काम करत नाहीत. तर ही जाणीव युवकांच्या मनात निर्माण करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू होतात. ‘आजची युवा पिढी’ अशी सुरुवात करून नुसते ताशेरे न ओढता जाणीवनिर्मितीची बांधणी सुरू होते. त्यातून राज्यात, परराज्यात संघटना उभी राहते.

खरंच हे काम सोपं नाही. पण कामाची एक रीत ठरवल्यावर अवघडही नाही, हेही चाफेकर यांनी सिद्ध केलंय. त्यांच्या कामातून त्यांना वजा करता येतं. कामात ते एकटे राहिले नाहीत. एकदा एका कार्यकर्त्यांशी (‘जाणीव’ संघटनेतल्या) बोलताना तो कार्यकर्ता असं बोलत होता, की हे काम सगळं माझं.. आमचं आहे. यातच चाफेकरांचा विजय आहे. जेव्हा कार्यकर्त्यांला एखादं काम ‘माझं’ वाटतं, ‘आपलं’ वाटतं, तेव्हा ते काम व्यक्तिनिष्ठ न राहता विचारांची बैठक त्या कामाला मिळते. ही बैठक ‘जाणीव’मधल्या कार्यकर्त्यांना मिळाली आहे. कदाचित ती कमी-जास्त असेल; पण आहे. जाणिवांचा विकास म्हणजे हे पुस्तक. ‘रात्रंदिन आम्हां’ नेहमीच युद्ध असेल, असं का म्हणायचं? ‘रात्रंदिन आम्हा कामाचा प्रसंग’ असंही असेल. ‘रात्रंदिन आम्हा ध्येयाचा ध्यास’ असंही असेल. आयुष्यात आलेल्या त्या, त्या प्रसंगानुरूप रिकामी जागा भरावी लागेल. कोणाही कार्यकर्त्यांला कामाची दिशा हे आत्मकथन नक्कीच देते. एखादी व्यक्ती आपल्या असलेल्या रूपात समस्त समाजापुढे जाणं अवघड आहे. गेली, तरी तिला वेळेची मर्यादा आहे. पण पुस्तकरूपात ते आयुष्य आलं की कितीही वेळा त्या माणसाला भेटता येतं.

एखाद्या व्यक्तीचं खासगी जीवन जाणण्याची उत्कंठा अनेकांना असते. हे झालं नट-नटय़ा, उद्योजक, खेळाडू, राजकीय नेते यांच्याबद्दल. पण सामाजिक कार्यकर्त्यांला व्यक्तिगत आयुष्य खूप कमी असतं. अशा व्यक्तीचं आत्मकथन रंजक तर असतच नाही. चाफेकर यांना तर प्रसिद्धीचं फार मोठं व्यासपीठ मिळालं नाही- जे खरं तर मिळणं गरजेचं होतं. हा माणूस आजही काम करतो आहे. पुस्तकाच्या शेवटी भविष्यात करायच्या कामांची यादी आहे. त्यांना सगळ्या शारीरिक व्याधी आहेत, तरीही लिखाणात मात्र निराशेचा स्पर्शही नाही. माणूस म्हणून कार्यकर्त्यांच्या मनात कधीतरी उद्विग्नताही येणारच. सामाजिक कार्यकर्ता पाहणं हे काही सर्वाना आनंददायक असत नाही. त्या अर्थाने तो ‘सेलिब्रिटी’ही नसतो. ज्यांना सामाजिक भान असतं त्यांना ही माणसं माहीत असली तरी ती आकर्षित करतात असं नाही. खरं म्हणजे सामाजिक काम खऱ्या अर्थाने करणारी माणसं कलावंत असतात असं मानलं जायला हवं. आजच्या भाषेत ते ‘रीअल हीरो’ असतात.

परंतु आज सामाजिक कामांची पद्धत, रिवाज बदललाय. युवावर्गात काही प्रमाणात सामाजिक भान येत चाललंय. अनेक संस्था युवकांमधील ही सामाजिकता विकसित करायचं काम करताहेत. हे पुस्तक अशा संस्थांना वेगळं बळ देईल. प्रत्यक्ष कामात झोकून दिलेली व्यक्ती कशी असते, हे या पुस्तकाच्या रूपाने लोकांपर्यंत जाईल. सामाजिक कार्यकर्त्यांचं आत्मकथनात्मक असं हे एकमेव पुस्तक नसलं तरी इतरांपेक्षा वेगळं जरूर आहे.

आज सामाजिक कामांत ज्या पद्धतीनं मार्केटिंग स्किल वापरलं जातं, तसं न करताही चाफेकरांच्या आजवरच्या कामाला यश मिळालंय. एकच उदाहरण सांगते. बिल गेट्स हा मायक्रोसॉफ्टचा सर्वेसर्वा. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती. ज्याच्या एका कृपाकटाक्षासाठी जगातील सत्ताधीशसुद्धा डोळे लावून बसतात, तो स्वत: होऊन चाफेकरांच्या शुक्रवार पेठेतल्या तीन खोल्यांच्या दवाखान्यात आला आणि त्यांना उत्कृष्ट कामाचं सर्टिफिकेट देऊन गेला. आणि ही गोष्ट जगाला कळली दहा वर्षांनी.. चाफेकर यांनी आत्मचरित्र लिहिलं तेव्हा! याची जाहिरात करावीशी त्यांना वाटली नाही. खरी गंमत पुढेच आहे. परदेशी फंडिंग एजन्सीने मदत चालू ठेवण्यासाठी अहवालातल्या आकडय़ांची फेरफार करायला सांगितली तेव्हा ‘आम्हाला कामासाठी पैसे हवे आहेत; पैशांसाठी आम्ही काम करत नाही,’ असं नम्रपणे सांगून ती मदत चाफेकर यांनी नाकारली. तरीही वेश्यावस्तीमधलं त्यांचं काम अजूनही सुरूच आहे.

‘रात्रंदिन आम्हां..’- विलास चाफेकर,

उन्मेष प्रकाशन,

पृष्ठे- ३२८, मूल्य- ३०० रुपये.

रेणू दांडेकर renudandekar@gmail.com