अमेरिकेतील बॅडलँड नॅशनल पार्कच्या घनदाट जंगलातील रात्रीच्या गहन, गूढ प्रवासाविषयी.
जवळपास १४५० किलोमीटरचे अंतर पार करून मी किर्र्र जंगलात पोहोचलो. आता संध्याकाळ झाली होती. सरत्या वर्षांची संध्याकाळ. ती एका वेगळ्या विश्वात घालवावी आणि नव्या वर्षांचे स्वागत एका रोमांचित वातावरणात करावे म्हणून मी एकटाच शेवरले क्रूस घेऊन शिकागोहून निघालो होतो बॅडलँड नॅशनल पार्कसाठी. सोबत थोडेसे खाण्याचे सामान, पाणी आणि गरम कपडे एवढेच. मोबाइल होता, पण त्याने रस्त्यातच साथ सोडली होती. या प्रवासात मी केव्हा नेटवर्कच्या बाहेर आलो हे कळलेच नाही. माझा शिकागोचा मोबाइल दक्षिण डोकोटामध्ये काम करत नव्हता. बॅडलँडच्या जंगलात मी प्रवेश केला तेव्हा पुढे रस्ता कुठे जातो हे माहीत नव्हते. कदाचित तो राखीव वनक्षेत्रात जात असावा; जिथे शिकार शोधून काढणारे सर्वाधिक धोकादायक प्राणी होते. मी जंगलाच्या ज्या मध्य भागात पोहोचलो होतो, तो भागही काही सुरक्षित नव्हता. रस्त्याच्या आजूबाजूला अगदी जवळ रानगव्यांचे कळप, जंगली मेंढय़ा आणि भारतात न दिसणारे अन्य प्राणी चरत होते. भयानक विषारी सापांचाही हा प्रदेश, पण कडाक्याच्या थंडीमुळे साप दिसण्याची शक्यता नव्हती. तरीही गवतात शिरणे धोकादायकच होते. लाल रंगाची गाडी रस्त्यात उभी करून रानगव्याचे फोटो काढणेही मला धोकादायक वाटले. सूर्य मावळतीला लागला असल्याने आणि मनुष्यप्राण्यांची वस्ती कित्येक किलोमीटर मागे टाकून मी जंगलीप्राण्यांच्या वस्तीत प्रवेश केल्याने, आता येथे कोठेतरी थांबले पाहिजे असे मी ठरविले. मावळतीच्या सूर्याच्या साक्षीने एक जागा शोधून रात्रीच्या मुक्कामासाठी जंगलात गाडी पार्क केली.
आता काळोख वाढू लागला होता. किर्र्र अंधाराकडे वाटचाल सुरू झाली होती. उणे २ डिग्री सेल्सिअस असलेले तापमान आणखी कमी होऊ लागले होते. थंडी वाढत होती आणि एवढय़ा रात्री अनोळखी प्रदेशातल्या निर्मनुष्य किर्र्र जंगलात मी हिंस्र श्वापदांचे आवाज ऐकत गाडीत बसलो होतो. क्षणभर भीतीने अंगावर सर्रकन काटा उभा राहिला. मी प्रचंड घाबरलो. मला दोन गोष्टींची भीती वाटू लागली. एक म्हणजे, मध्यरात्री रानगव्याने आपल्यावर हल्ला केला तर? आणि दुसरी म्हणजे कोणी लुटारू बंदुकीच्या जोरावर आपल्याला लुटून कार घेऊन गेला तर? अन्य धोकायदायक प्राण्यांमध्ये आणखी भीती होती ती बॅडलँडच्या विषारी सापांची, पण प्रचंड थंडीमुळे ती शक्यता कमी होती. दिवसभर गवत खाल्यामुळे आणि तसाही रानगवा हा रात्री भटकणारा प्राणी नसल्यामुळे त्याने रात्री हल्ला करण्याची शक्यताही कमी होती, त्यामुळे मला थोडा धीर आला. आणि एखाद्या लुटारूने इतका लांबचा प्रवास करून मध्य जंगलात एखाद्याला लुटण्यासाठी प्रचंड परिश्रम घेणेही अशक्य होते. या विचारांनी मी निर्धास्त झालो आणि रात्र तेथेच घालविण्याचा निर्णय घेतला. परत मागे जाण्याचा विचार केला तरी रस्त्यात बसलेल्या कित्येक रानगव्यांचा सामना करत परतणे शक्य झाले नसते.
सूर्य अस्ताला जाताच निरभ्र आकाशात चांदण्यांनी गर्दी सुरू केली. ताऱ्यांचा खेळ सुरूझाला. चंद्रही थोडासा डोकावू लागला. जंगली कुत्र्यांचे काही काळ ओरडणे सोडले तर बाकी रात्र अत्यंत शांत होती. फक्त थंडी वाढत होती. तापमान उणे १३.३ डिग्री सेल्सिअसवर आले होते. एवढय़ाही रात्री आकाशाचा फोटो घेण्याचा मोह आवरला नाही. कारण माझ्या या विशेष अविस्मरणीय रात्रीचा निर्माता मी स्वत: होतो. २०१५ ला गुडबाय करताना आसमंत दणाणून सोडेल अशा आवाजात मला २०१६ चे जोरात स्वागत करायचे होते. पण माझ्या या आवाजाने जंगलातले प्राणी गोळा झाले तर? या विचाराने माझी काही हिंमत झाली नाही. मी मनातल्या मनात नव्या वर्षांचे स्वागत केले. कारचा हिटर सुरू करून अधेमधे ऊब घेतली. एक रोमांचित करणारा थरार अनुभवत केव्हा झोपी गेलो कळलेही नाही. पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग आली तेव्हा मनमोहक सूर्योदयाने आणि अप्रतिम निसर्ग सौंदर्य लेवून नवे वर्ष उजाडले होते. रानगवे, जंगली बकऱ्या, हरीण आणि अन्य प्राण्यांचा दिनक्रम सुरूझाला होता. त्यांना निरोप देत आणि त्यांचे आभार मानत मी परतीचा प्रवास सुरू केला.
शाँबर्ग (शिकागो) ते बॅडलँड नॅशनल पार्क आणि परत शाँबर्ग असा २९०० किलोमीटरचा प्रवास एकटय़ाने तीन दिवसांत कारने करण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. ३० डिसेंबरला प्रवासासाठी निघालो. त्यापूर्वी नुकतीच बर्फवृष्टी झाली होती. वादळामुळे बर्फ रस्त्यावर जमून संबंध रस्ताभर बर्फाची चादर पसरली होती. त्यातच मिनेसोटा आणि दक्षिण डाकोटाच्या प्रवासादरम्यान बर्फाळ वादळ सुरूझाले होते. गेल्या वर्षभरापासून शिकागोत राहिल्यामुळे इथल्या वातावरणाची सवय झाली होती. आता मोठे वादळ येऊ शकते, हे लक्षात आहे. वादळाचा वेग वाढू लागला होता. हे सर्व माझ्यासाठी नवे होते. यासर्व तुफानाचा फोटो घाव्या असा विचार मनात डोकावला, पण रस्त्यावरची नजर अजिबात ढळू न देता ताशी २० किलोमीटरच्या वेगाने मी समोरचे शहर गाठण्याचा प्रयत्न केला. काही वेळ वादळाशी सामना करत मी ‘सु-फॉल्स’ला पोहोचलो. तेथे रात्र घालविण्याचा निर्णय घेतला. सकाळी उठलो तेव्हा आकाश पूर्णत: निरभ्र होते. हवामान चांगले होते. त्यामुळे मी बॅडलँडच्या दिशेने प्रवास सुरू केला. संपूर्ण दिवसभर प्रवास करून मी बॅडलँडच्या जंगलात कितीतरी आतपर्यंत शिरलो होतो ते एका वेगळ्या अनुभूतीसाठी. सरत्या वर्षांला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षांचे स्वागत करण्यासाठी अनुभवलेला हा थरार, माझ्या अमेरिकेच्या वास्तव्यातील सर्वाधिक रोमांचक असा होता.
समीर बोबडे – skbobade@gmail.com
संग्रहित लेख, दिनांक 24th Apr 2016 रोजी प्रकाशित
बॅडलँडच्या जंगलात!
अमेरिकेतील बॅडलँड नॅशनल पार्कच्या घनदाट जंगलातील रात्रीच्या गहन, गूढ प्रवासाविषयी.
Written by समीर बोबडे

First published on: 24-04-2016 at 01:30 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Badlands national park