आज होळी.. गेल्या वर्षभरातल्या अरिष्टं व अनिष्टांचं होळीच्या भडकणाऱ्या ज्वाळांत विसर्जन करून त्याच्या नावानं बोंब ठोकायची आपल्या भारतीय परंपरेनं दिलेली ही सणसंधी! त्याचंच हे काव्यरूप..

अफवांवर विश्वास ठेवू नका!

मग मी

सकाळी उठलो

तर ‘अच्छे दिन येणार’.. ‘अच्छे दिन येणार’

असा कालवा झाला

आणि टुण्णदिशी मी उडी मारली

तर

लगेच मोबाइलवर

अ‍ॅलर्ट :

‘अफवांवर विश्वास ठेवू नका!’

म्हणून

टीव्ही लावला,

तर ती बया

सारखं सांगत होती-

‘सूर्योदय झाल्याची पहिली बातमी

आमच्याच चॅनेलनं प्रथम दिली’ म्हणून.

लगेच मित्राला

फोन लावला

तर सारखं

‘तुम्ही ज्या व्यक्तीशी संपर्क साधू इच्छिता

ती व्यक्ती सध्या दुसऱ्या बाईबरोबर व्यस्त आहे’

असा संदेश सांगायले.

मग

शशिकलाला

विचारलं-

‘परमेश्वर मोठा

की पीएम मोठे?’

तर

बिचारी

मेणबत्त्या वळायला गेली.

मग मी

हे पारदर्शकतेचं नवीनच काय

झंगट काढलंय

म्हणून तात्यांना गाठलं.

तर ते म्हणाले-

‘त्यात नवीन काय?

आम्ही सगळे

सक्काळी सक्काळी लायनीत

बसायचो खुल्लम् खुल्ला!’

पुढं वाटेत उमेदवार भेटला.

म्हटलं, फारच खाज बुवा तुम्हाला

समाजसेवेची.. जनतेच्या भल्याची.

सगळी इस्टेट, प्रॉपर्टी पणाला

लावली..

जणू कर्णाचे अवतार.. दानशूर!

तर म्हणाला,

धंद्यात लॉस झाला;

आता पुढच्या पाच वर्षांत भरून काढणार!

म्हणून वॉर्डला विचारलं- कसं काय?

तर म्हणाला,

‘माझं काही खरं नाही. माझ्या नशिबाला

कधी ओपन, कधी राखीव, तर कधी महिला!

भोग आहेत.. झालं!’

तर डॉक्टर समजावून सांगत होते-

एकदम नका खात जाऊ

पाच वर्षे दिलीयत.

दमादमानं खावा.

माझं मलाच

कळाना

डोकं फिरल्यागत हे काय चाललंय देशभर

म्हणून

रस्त्यालाच शिवी घातली-

खड्डय़ात जा!

अन्

आरटीआयखाली कोर्टात गेलो.

तर कोर्टच म्हणालं,

‘चालतंय की!’

आता पब्लिकच म्हणाय

लागलं-

नायगांवकर, तुम्ही तरी बघा जरा-

लक्ष घाला..

म्हटल्यावर

‘आपण काय बाबा लहान गाढव!’

म्हणत दार ढकलून घेतलं

आणि

काळं फासलं!

– अशोक नायगांवकर

 

झेंडा आणि अजेंडा

कमळ-बाणाच्या भांडणात

हाताचे चाललेय काय

उधारी वसुलीसाठी

दुकानदारी चालू हाय

 

संस्था चालवण्यासाठी

खांद्यावर काँग्रेसचा झेंडा

ध्येयधोरण स्टेजसाठी

मतदारसंघात वेगळा अजेंडा

 

सोनियाचे नाणे चालत नाही

राहुलचे कार्ड ब्लॉक झालंय

धर्माच्या गाडय़ा सुसाट

सेक्युलर इंजिन लॉक झालंय

– दिनकर जोशी

 

धुळवड

काय झाले आजि, कळेना काहीच

चमत्कार थोर, वदवेना,

आमुच्या या देशी, आनंद आनंद

भरला अखंड दिशा दाही.

 

सारेच पुढारी, एक मेळवोनि

खेळतात रंग, पिचकाऱ्या,

मारताती फुगे हळूच लपून

एकमेकांवरी हसताना.

 

भगव्या रंगात, कोण हे नाहती

कपाळीला टिळा भगवाच,

टाकताती रंग, म्हणतात मग

करून आम्ही हे दाखविले.

 

उडवती आणि पिचकारी छान

धाकल्या भावाच्या अंगावरी,

तूच रे धाकला, आम्ही आहो थोर

जाणले साऱ्यांनी म्हणताती.

 

भाऊ  तो गोमटा, साजिरा, सोवळा

माखलेला असे केशरात,

वर्गातला तोच मॉनिटर जणू

साराच अभ्यास पारदर्शी.

 

ठेवितसे फुगा, रंग भरलेला

थोरल्याच्या खिशात नकळत,

फुटलियावरी खो खो खो खो करी

धाकल्या आनंद, होई फार.

 

घडय़ाळ बांधून, खेळी कुणी एक

उडविला रंग, बोलती ऐसे,

धरून हातात, पिचकारी रोखी

उडवितो पाणी सांगताती.

 

दिसेनाची रंग, कुठे कोणा काही

पिचकारी त्यांची रिकामीच,

बंद पडलेले घडय़ाळ बघती

म्हणती मनासी, काय आली वेळ.

 

रंगवुनी पंजा, कुणी टाकी रंग

फिकट ते सारे, रंगेनाच,

पिचकारीतही अधिकची हवा

पाणी उरे त्यात किंचितच.

 

इंजिनी बैसोनी आले पाहा कोण

मोकळ्या हातांनी मात्र कैसे,

नाही रंग हाती, नाही पिचकारी

कागदी भेंडोळी फक्त एक.

 

प्रिंटाच्या या आमुचा नीलरंग असे,

कधी ना कधी उडवेन,

सांगताती सर्वा, धीर ठेवा थोडा

बोलताती ऐसे खडसावून.

 

ऐशा मंडळींचा रंगला सोहळा

रंगातच सारे रंगियले,

आम्ही तो रांगेत, बघितले सारे

वाजवल्या टाळ्या, साऱ्यांसाठी.

 

कृपा करा एक, फार नाही थोडे

मागणे एकची साऱ्यांप्रति,

थोर सारे तुम्ही, तुम्हीच सर्वज्ञ

तुम्हीच आहा मायबाप.

 

धाडून द्या रंग, आणि धाडा पाणी

आम्हालाही थोडे मिळो द्या ना,

सदरे आमुचे रंगांमध्ये जरा

आणि पाण्यामध्ये भिजो द्या ना.

 

नाहीच धाडले तरी नको चिंता

नळातल्या थेंबे भागवूच,

वर्षांनी पाच, रंगवण्या बोट

लावूच आम्ही, रांग लांब.

– राजीव काळे


रंग बरसे

रंगासाठी पसे नव्हते म्हणून

पप्पूने

जमा केलेल्या भेंडीच्या बिया

व काढलेला रस जीव ओतून

 

होली है म्हणून

लोळलो मग

शर्ट काढून चिखलात

हमाम में सब नंगेची आरोळी ठोकून

 

झाड कापू नये तरी कापलंच

होळीसाठी

व इको फ्रेन्डलीच्या नावाखाली

जमा केलेला

दिलासा म्हणून आम्ही गावभरचा कचरा

 

झुमलो जरा रंग बरसे म्हणत

अमिताभ होऊन

व तुने मारी पिचकारी म्हणत रंगायचा प्रयत्न केला

कुणाच्यातरी डोळ्यात

 

आता कोणीच उरलेलं नाही

गावात

रंग घेण्यासाठी पसे आहेत

तोडण्यासाठी झाडे आहेत

मात्र लोळण्यासाठी चिखल नाही

व मित्रांची मफल आहे

अर्धवट जळून गेलेल्या होळीसारखी

आतल्या आत धुमसत

– वर्जेश सोलंकी

 

अध्यक्ष महोदय..

सरकार आहेच,

अध्यक्ष महोदय, सरकार आहेच.

 

दोन वर्षांपासून दुष्काळ आहे, पण

त्याआधी तीन-चार-पाच वष्रेही दुष्काळ होताच, अध्यक्ष महोदय.

त्यावेळी आमचं सरकार नव्हतं, हे विसरू नका.

शिवाय ग्लोबल वॉìमग वगरेही असतंच नं, अध्यक्ष महोदय?

 

तुरीचे भाव कोसळले परवा- हेही खरंचय.

पण कुठल्या काळी होता शेतमालाला भाव इथे, अध्यक्ष महोदय?

आधी तर आम्हीही मोच्रे काढलेच भावासाठी-

त्याला तर तुम्हीच साक्ष होता नं?

 

‘कोपर्डी’ वगरे झाली हे कबूल आहे,

पण आधीच्यांच्या काळात ‘खैरलांजी’ झालीच होती

हे आठवतंय का, अध्यक्ष महोदय?

आणि आम्ही आरक्षण वगरे देण्याच्या प्रयत्नात आहोतच

हे माहीत असेलच तुम्हाला, अध्यक्ष महोदय.

शिवाय समुद्रात शिवस्मारक आणि

इंदू मिलमध्ये आंबेडकरांची प्राणप्रतिष्ठाही विधिवत्.

 

सगळं रीतसर करतोय आम्ही अध्यक्ष महोदय,

सामाजिक न्याय वगरे सगळं.

 

आता बायका अजून मलांवरून घागरी वाहताहेत,

पण ते पिढय़ान् पिढय़ाच आहे, अध्यक्ष महोदय.

तूर्तास आम्ही कॅशलेस इकॉनॉमी करतोय,

आणि पेटीएम वगरेही,

हे राष्ट्रहिताचंच धोरण की अध्यक्ष महोदय!

शेतकरी आत्महत्या करताहेत

पोरी गर्भात मरताहेत किंवा गर्भाबाहेर बायका

मेळघाटात काही भूकबळी वगरे

आणि बेकारांना तर ओरडण्याची सवयच असते,

अध्यक्ष महोदय! बाय द वे-

आमच्या अध्यक्षांच्या मुलाच्या लग्नातला

राजमहालाचा सेट किरकोळ भाडय़ाचा होता हां!

आणि एकोणीस प्रकारचं जेवण

गरीब मतदारांच्या मुखात पडावं म्हणूनच, अध्यक्ष महोदय.

 

प्रश्न आहेत, अध्यक्ष महोदय,

प्रश्न असतातच आधीच्या सरकारपासूनचे,

पण आताचं सरकार टिकवावं लागतंच नं- अध्यक्ष महोदय!

सरकार टिकलं तर आम्ही टिकू- अध्यक्ष महोदय,

आणि तुम्हीही टिकाल, सरकार टिकलं तरच.

 

सरकार टिकणं महत्त्वाचं- अध्यक्ष महोदय,

बाकी सगळं चालतच असतं..

 

प्रश्न असतातच- अध्यक्ष महोदय,

पण सरकारइतके महत्त्वाचे नसतात ते,

अध्यक्ष महोदय..

ऐकताहात नं तुम्ही, अध्यक्ष महोदय..

– बालाजी सुतार

 

मत मागशी माझ्या सख्या परी..

(कविश्रेष्ठ भा. रा. तांबे यांची क्षमा मागून..)

 

मत मागशी माझ्या सख्या परी

मत कसे रे कुणा मी देवु तरी ।। ध्रु ।।

 

‘बाण’ जरी ‘कमळा’च्या द्रोणी

मते घेतली कळा सोसोनी

लाट ही पूर्वीची स्मरोनी

करी न घोष जरा धीर धरी..।। १।।

 

‘आघाडी’ची बातच मोठी

उगी लागले स्वबळा पाठी

खुर्ची पूजेस्तव ती ‘कोलांटी’

मारती जाहला उशीर जरी..।। २।।

तरुण तरुणीची प्रगल्भ कुजबुज

शेतकऱ्यांचे गूढ भाव’ गुज

सरकाराचे मर्म नवे तुज

मत मिळण्याशी छळ ना करी..।। ३।।

 

आला रे आला सण सखया

सामान्यांच्या जाण तु हृदया

आता मताचा भाव कळाया

लावतील ‘नोटा’ बुथवरी..।। ४।।

– प्रभाकर साळेगावकर

 

तुला आठवतंय..

तुला आठवतंय- पाणी फुकट मिळायचे

आणि आपण झाडांच्या गर्दीत राहायचो तेव्हा?

महिनाभर खपून जमा केलेले ओंडके आणि

काडय़ा शिलगावल्यानंतर आकाशात ठिणग्या उडायच्या

 

आपण अद्वातद्वा शिव्या बकून घ्यायचो

वर्गलढय़ातल्या सायबाचा आणि वर्णलढय़ातल्या बामणाचा

अवयवासहित उल्लेख करायचो

 

दुसऱ्या दिवशी फुकटचे पाणी गरम करायला

चौकात किती गर्दी व्हायची

खड्डय़ातल्या भोकातले जळते पसे शोधण्यासाठी आपण रात्रभर जागून पहारा द्यायचो

कधी काहीच सापडायचं नाही, कधी मागल्या वर्षीचेही चाराठाने वसूल व्हायचे

 

धुळवडीच्या राखेने अंग माखायचे तेव्हा बाप रिन साबणाने आपल्याला खसाखस धुऊन काढायचा

अगदी त्याचा कारकुनी शर्ट धोपटून काढल्यासारखा

दोन दिवसांत उन्हं उतरायची आणि कुठूनतरी वीर येऊन नाचून जायचे

एकदा तूही गेला होतास नाचत त्यांच्यामागे

नाचून परत आलास तोवर मी झोपी गेलो होतो

 

काल झोपेतून उठलो तेव्हा आजूबाजूला झाडेच शिल्लक नव्हती

रुपयाची किंमत अवमूल्यनात हरवली

राखेच्या दूरदर्शनचा करडा रंग जाऊन तिथे सॅटेलाइटचा अख्खा रंगीत स्पेक्ट्रम आलाय

चौकातली मोठी होळी जाऊन सोसायटीच्या आवारात लहान शेकोटी आलीय

आणि मी थेट तिच्यासमोर बोंबा मारतोय

 

सायबाच्या, बामणाच्या, धेडाखळगुटाच्या नावाने

इतकेच काय, होळी पेटवून धूर करणाऱ्यांच्या नावानेही

टीव्हीतून, ट्विटरवरून, पेपरातून

 

मानधन म्हणून काळपट झालेले चाराठाने मागतोय

चेकने देता येत नाही म्हणाले.

–  राहुल बनसोडे