scorecardresearch

‘रानातल्या कवितां’ची कुळकथा..

लहानसं खेडं- झाडांनी दाटलेलं, झुळझुळ झऱ्यांनी गाणारं, अनेक पक्ष्यांच्या कंठातून किलबिल गाणारं होतं.

‘रानातल्या कवितां’ची कुळकथा..

कविवर्य ना. धों. महानोर यांच्या ‘रानातल्या कविता’ या पहिल्याच  कवितासंग्रहाला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. ‘नवे कवी, नवी कविता’  या पॉप्युलर प्रकाशनाने १९६७ साली सुरू केलेल्या कविता मालिकेतील  हा कवितासंग्रह. या संग्रहाची सुवर्णमहोत्सवी वर्षांतील नवी आवृत्ती प्रकाशित  होत असून, त्यात ना. धों. महानोर यांनी सांगितलेली  ‘रानातल्या कवितां’ची कुळकथा..

‘मराठवाडय़ाच्या टोकाला अजिंठा लेण्यांच्या पायथ्याशी पळसखेडे या आदिवासी परिसरात, जिथे गावात शाळा नाही, कोणी शिकलेलं नाही, आईवडील निरक्षर मजूर, मागेपुढे कुठे फारसा आधार नाही, अशा ठिकाणाहून तिथेच आयुष्यभर राहून अशी कविता व साहित्य तुम्ही कसं निर्माण केलं?’ असा मला नेहमी विचारला जाणारा प्रश्न. कुठेतरी परंपरा, साहित्याचा संस्कार असावा लागतो. ते काहीच नाही. असे अनेक प्रश्न. १९४०-५० हा माझ्या जन्माचा काळ. त्या काळी खेडं हे भजन-कीर्तन-भारूड-प्रवचन-नामस्मरण, सण-उत्सव, पालखी-उत्सव अशा अनेक चांगल्या मौखिक साहित्याने समृद्ध असं होतं. तमाशा, लोककला, जलसा, लोकनृत्य, पोवाडा व अनेक लोककलांनी खेडी, जत्रा छान व्यापलेल्या होत्या. रात्ररात्र हे उत्सव चालायचे. सूर्योदयाला जात्यावरली प्रसन्न ओवी. संसाराचं सुखदुख गाणारी जात्याची घरघर, लय, हलकं संगीत आणि अस्सल भाव असलेली कविता म्हणजे ओवी. झोपाळ्यावरली झिम्मा- फुगडीची गाणी, गपसप गोष्टी हे सगळं लोकसंस्कृतीचं लेणं थेट लहानपणापासून मी ऐकलं, त्यात मीही सहभागी असायचो. या सगळ्या सांस्कृतिक जगताचं उत्तम गीत-संगीत आणि शब्दकळा माझ्यावर संस्कार करून होती. लिखित साहित्याच्या आधी हे मौखिक समृद्ध असं साहित्य, कला माझ्या मनात बीज रोवून होती.

लहानसं खेडं- झाडांनी दाटलेलं, झुळझुळ झऱ्यांनी गाणारं, अनेक पक्ष्यांच्या कंठातून किलबिल गाणारं होतं. शेतीमध्ये जीव ओतून काम करणारे, त्या माऊलीवर निस्सीम प्रेम करणारे, अन्नाचा घास अवघ्या जगाला देणारे शेतकरी होते-आहेत. दरवर्षी सुंदर पावसाळा, भुईतून पिकांचा, झाडांचा नवा सतेज स्वर्ग निर्माण होतो आहे आणि शेतकरी समाजाचं खेडं आनंदाने नांदतं आहे. सुख-दुखात गाणं गात आहे. लोकसंगीत हा खेडय़ांचा प्राण. अशा काळात ज्वारी, बाजरी, कापूस, चवळी, तुरीसारख्या पिकांमध्ये, मोसंबी, सीताफळी, केळी, डाळिंब, कडुिनब आणि इतर वनश्री यांत मी संपूर्ण एकजीव झालेलो. त्यांचं माझं सुख-दुख, आनंद असा एकरूप संसार. जवळच्या अजिंठा डोंगराच्या घनदाट झाडीत, नदीनाल्यांत, पक्ष्यांमध्ये अजिंठय़ातल्या चित्रशिल्पांप्रमाणेच मी एकरूप होऊन जगलो. आदिवासी तांडे आणि आम्ही सगळे गणगोत झालो. हे अगदी लहानपणापासून. हे निस्सीम सौंदर्य एक दुसऱ्यात मिसळून गेलेलं.

डोंगरझाडी-झरे-लदबदलेली शेती आणि स्वर्गासारखी दरवर्षीची पिकांची बदलती रूपं. शेतीत पेरताना, झाडा-पिकांशी बोलताना, पाखरांशी सलगी करताना, झोपडीतल्या कंदिलाच्या मंद उजेडात रात्र रात्र पुस्तकं वाचताना, अनेक मराठी कवींच्या कविता गाताना दिवस बहरत गेले. दुष्काळ होते; पण कधीतरी, म्हणून आनंदाचे दिवस अधिक. दिवसभर शेतीचं कष्टाचं काम, रात्री पुस्तकांचं वाचन. नव्या कथा, कविता, कादंबऱ्या, ललित सगळं वाचलं. राजकीय, सामाजिक, वैचारिकही खूप वाचलं. संतसाहित्यही खूप वाचलं. सबंध आधुनिक मराठी कविता पुन्हा पुन्हा वाचली. रविकिरण मंडळाच्या कवितेनंतर मर्ढेकर, करंदीकर यांच्या समृद्ध अशा नव्या कवितेने पछाडलं. त्याच वेळी कात टाकून नव्याने आलेल्या कुसुमाग्रज, बोरकर, अनिल, ना. घ. देशपांडे, इंदिरा संत यांच्या १९५५-६० नंतरच्या कवितेने मला नवचतन्य मिळालं. दिलीप चित्रे, आरती प्रभू, म. म. देशपांडे, तुळशीराम काजे, सुरेश भट, मधुकर केचे, आनंद यादव, नारायण सुर्वे यांची सशक्त नवी कविता १९५८-६० मध्ये प्रसिद्ध झाली. भालचंद्र नेमाडे, अरुण कोलटकर, ग्रेस, चंद्रकांत पाटील यांचीही नवी कविता वाङ्मयीन नियतकालिकांतून, लघुनियतकालिकांतून येत होती. कवितेवर निस्सीम प्रेम म्हणून मी पुन्हा पुन्हा कविता वाचल्या. कवितेचं नेमकं सत्त्व, ‘कवितेचं असतेपण’ काय असतं हे नीट लक्षात आलं. रानात मग केळी, ऊस, ज्वार, कपाशी, झाडं- पिकं यांतलं सौंदर्य जे डोळ्यांत घट्ट होतं ते एकदोन ओळींत लिहिता येईल का, म्हणून धाडस केलं. कुणी वाचणार न वाचणार, पण आपला आनंद त्यात यावा एवढंच. शब्दकळा, लय, गीत, संगीत याचे व या वाचनाचे संस्कार घेऊन शब्द उतरत गेले. या आधीही सुंदर निसर्ग मराठी कवितेत होता. पण माझ्या निसर्गात शेती व भवतालाची सृष्टी, शेतकरी, तिथल्या प्रतिमा ठळक होऊन आल्या. कदाचित हे वेगळेपण रसिकांना भावलं असणार.

‘या शेताने लळा लाविला असा की

सुख दुखाला परस्परांशी हसलो रडलो

आता तर हा जीवच अवघा असा जखडला

मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो’

‘गारठय़ाची रात्र थंडाई हवेला’, ‘नितळ तळ्याच्या काठावरती हिरवे झाड’, ‘डोळे थकून थकून गेले’ अशा अनेक लहान लहान कविता ओठांवर रुंजी घालून आल्या. त्या चार चार ओळींत लिहिल्या. अजिंठय़ाची चित्रशिल्पं आणि त्यांचा आकृतिबंध पाहिलेला होता. ‘गाहा सत्तसई’मधल्या लहान लहान गाहा मनावर राज्य करून होत्या. बदलत्या नव्या कवितेच्या काळात शब्दांचा मितव्यय व आशयाचा घट्टपणा नेमका असावा, हे ओळखून होतो. नव्या प्रतिमा व ग्रामीण शब्दकळेला स्वतचा सरताज देत मी लिहित गेलो. जात्यावरल्या ओव्या दोन-चार ओळींतच सगळा आशय मांडतात. तेही उत्तम कवितेइतकंच छान. आपणही तसंच करावं म्हणून सुरुवात झाली. १९६०-६१च्या काळात आठ-दहा कविता लिहून झाल्या. या कविता अतिशय उत्साहात नियतकालिकांकडे पाठवल्या. परत येत गेल्या. त्याचं वाईट वाटलं नाही. आपण कुठेतरी कमी आहोत हेच बघितलं. कविता अकारण पसरट न करता नेमकी कशी करता येईल त्याचा विचार करत गेलो. शब्दांचा मितव्यय, नवनवे शब्द, नव्या प्रतिमा, लोकगीतांची लय, बऱ्याचदा माझी स्वतची बांधणी करून रानातलं कवितेत टिपत गेलो. निसर्ग व शेतीतली इथली सृष्टी ही एकरूप असल्याने हा नवा शेतीचा, पिकांचा, झाडांचा तिथल्या जीवनाचा माझा एकसंध असा भाव कवितेत आला. तोही सचेतन. बोलघेवडा. माझं त्याचं असं नातं कवितेत सजीव होऊन उतरत गेलं. रसिकांना आवडलं.

‘गुंतलेले प्राण ह्य रानात माझे

फाटकी ही झोपडी काळीज माझे

मी असा आनंदुनी बेहोष होता

शब्दगंधे तू मला बाहूत घ्यावे’

हे ऋणानुबंध अधिक घट्ट होते म्हणूनच तशी कविता झाली. ती शब्दबंबाळ, अवास्तव वर्णनाची होणार नाही याची काळजी घेतली. अभंग, रुबाई, गझल, भावगीत, सामाजिक वगरे नव्या मराठी कवितेत चांगलं आलेलं होतं, ते माझ्या कवितेत मी टाकलं. प्रयोग वगरे नाही. सरळ कविता म्हणजे कविता. तिच्या नव्या प्रतिमांना, आशयाच्या जाणिवांना थोडं घेरल्याप्रमाणे लिहित गेलो. दोन-तीन महिने घरात ठेवून पुन्हा वाचून एकेका शब्दासाठी तोडमोड करून खूप काही सांगणारी व काहीच न सांगताही मनात घर करणारी कविता उतरत गेली. शेतीमध्ये आंतरपीकपद्धतीमुळे अधिक उत्पन्न येतं. पीक सुंदर दिसलं. दहा-वीस एकरांच्या शेतीत कापूस, तुरी, ज्वारी, बाजरी अशी अनेक पिकं एकमेकांच्या जोडीने पेरलेली, बहरलेली असतात. एक दुसऱ्यांना वाऱ्याच्या हेलकाव्याने भेटतात. सरमिसळ होतात. चांगला संकर होतो. हे वास्तवातलं विलोभनीय चित्र पिकांचं. तसंच बऱ्याच कवितांमध्ये आहे. तेही गीत-कवितेत. छंदोमयी. अस्सल कविता व अस्सल गीत यांत भेद नसावा.

‘शेत गव्हाचे पिवळे जरा नशेत झुलते

आणि साळीचे उगाच अंग शहारून येते

पोटऱ्यातल्या गव्हाचे हसू ओंब्यात दाटते

केळ कांतीव रूपाची छाया पाण्यात शोधते’

किंवा

‘आंब्याच्या झाडाला मोहोराचा वास झेपता झेपेना

गाभुळ्या चिंचेला नवतीचा भर पोटी धरवेना’

हे वास्तवातलं पिकांचं, झाडांचं निसर्गचित्र. ही निसर्गकविता म्हणून शिकवतात किंवा समजून घेतात तशीच ती प्रेमकविता म्हणूनही शिकवतात. महानोरला हा शृंगारच दिसतो का? मानसिक-शारीरिक अनुबंधच दिसतात का? हो. त्यात काहीही वाईट नाही. प्रेम आणि निसर्ग यांच्याइतकं सुंदर, पवित्र, दुख पुसून टाकणारं जगात काहीच नाही अशी माझी समजूत आहे. एक सुंदर पोट्र्रेट, रेखाचित्र किंवा लावण्यमयी असं रूप जे दिसलं ते नीट मांडणी करून, ‘फॉर्म’ निर्माण करून- दोन ओळी, दोन ओळीमध्ये अंतर, पुन्हा बाजूला एखादी ओळ. बाकी त्यानंतरची कविता तुमच्या मनात घोळणारी. आणि काही न सांगताच अनेक गोष्टींची चेतावणी देणारी. ‘रान ओले’, ‘झाड’, ‘रातझडीचा पाऊस’ यांसारख्या दहा-बारा कवितांमध्ये शब्दांची, छंदांची नवी वीण करून पाहिली. हलकं गीत त्यात आहे. कुमार गंधर्वानी लोक कवितांमधून चिजा निर्माण केल्या. आपणही कवितेपुरतं काही करू, पण गांभीर्याने. केलं ते अनेक क्षेत्रांतल्या रसिकांनी, साहित्यिक कवींनी मनापासून स्वीकारलं. त्यातल्या कृषिसंस्कृतीतल्या यापूर्वी कवितेत न आलेल्या नवेपणामुळे. कवितेच्या असतेपणामुळे. याचं एवढं स्वागत होईल, आणि मोहोळासारखी माणसं त्यामुळे मला आयुष्यभर बिलगून राहतील असं वाटलं नव्हतं. सगळंच नवलाईचं, आनंददायी झालं, स्वप्नातल्या कवितांनी आयुष्य हिरवं केलं सर्वार्थाने.

दुष्काळ, शेतीची उद्ध्वस्तता यात तोच तोपणा टाळला. घट्टपणाने आल्या त्याच कविता ठेवल्या. दुष्काळाची ‘ग्रीष्माची कविता’ आणि अशाच शेती दुष्काळाच्या कविता, व्यक्तिगत दुखाच्या कविता पाच-सात संग्रहांत ठेवल्या. माझा मित्र चंद्रकांत पाटील यानं ‘प्रतिष्ठान’मध्ये ‘आठ कविता रानातल्या’ छापून आणल्या. त्याच वेळी ‘सत्यकथे’तही. सगळे नवे, त्या आधीचे साहित्यिक पळसखेडला येत गेले. राजकीय, सामाजिक, कला साहित्यातले दिग्गज येत राहिले. चार प्रकाशकांनी कवितासंग्रह मागितला. पहिलाच संग्रह म्हणून ‘रानातल्या कवितां’ची निवड, क्रम चंद्रकांत व मी मिळून अतिशय काळजीपूर्वक ठरवला. रामदास भटकळ यांनी ‘नवे कवी, नवी कविता’ या योजनेत तो प्रकाशित केला. (१९६७) त्याच वेळी त्याला राज्य शासनाचा पहिला मानाचा ‘केशवसुत पुरस्कार’ मिळाला. दुसऱ्या दिवशी भटकळांनी मुंबईत ग्रेस, सुर्वे, मी असा कविता वाचनाचा छान कार्यक्रम घडवून आणला आणि महाराष्ट्रभर मी महाराष्ट्राचा एक रानातला कवी झालो. शंभर तरी कमीत कमी नावं घ्यावी लागतील असे रसिक साहित्यिक पळसखेडला आले. सतत येत गेले. खेडं नामवंत झालं. कवी बा. भ. बोरकर, श्रीमती विजया राजाध्यक्ष यांनी १९६८ मध्ये ‘सत्यकथे’मध्ये दीर्घ लेख लिहिले. हा गोतावळा मला मराठी भाषा जिथे असेल तिथे जगभर लाभला. खेडय़ातलं दुख-दुष्काळ-कौटुंबिक व गावकीची धुळवड आयुष्याला वेटाळून असली तरी कवितांनी ती हलकी केली. अशा अनेक गोष्टी आहेत. आज या कवितासंग्रहाला पन्नास र्वष झाली हे पटत नाही. जुन्या आठवणींचा सुंदर झोका यानिमित्ताने मला तजेला देऊन गेला.

‘जन्मापासूनचे दुख, जन्मभर असे

जन्मभर राहो, मला त्याचे न फारसे

साऱ्यांसाठी झाले, उभ्या देहाचे सरण

सगे सोयरेहि कधी जातात दुरून

फुले वेचतानासुद्धा ओथंबते मन

जन्माचेच ओझे पोटी घट्ट लपेटून

डोळे गच्च अंधारून, तेव्हा माझे रान

रानातली झाडे मला फुले अंथरून’

मराठीतील सर्व लेख ( Lekha ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या