scorecardresearch

शोध.. शहीद भगत सिंगांचा!

‘‘तुम्हाला भगत सिंग माहीत आहेत का?’’ असं मी या वसाहतीतल्या रहिवाशांना विचारलं.

विख्यात पत्रकार कुलदीप नय्यर यांनी लिहिलेल्या शहीद भगत सिंग यांच्या ‘शहीद’ या चरित्राचा भगवान दातार यांनी केलेला मराठी अनुवाद रोहन प्रकाशनातर्फे प्रसिद्ध होत आहे. त्या चरित्रास लेखकानेलिहिलेली प्रस्तावना..
‘फॉंसी की कोठी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्या कोठडीत भगत सिंग यांना ठेवलं होतं, त्याच्या आजूबाजूला आता एका भव्य मशिदीचे मिनार उभे आहेत. पण भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना जिथे फाशी देण्यात आली, त्या जागी एखादी कमान, एखादा स्तंभ किंवा एखादा साधा नामफलकही नाही.
या तीन तरुण क्रांतिकारकांना २३ मार्च १९३१ रोजी जिथे फाशी देण्यात आली तो लाहोरचा मध्यवर्ती तुरुंग आज भग्नावस्थेत उभा आहे. या तीन हुतात्म्यांना जिथे ठेवलं होतं त्या कोठडय़ांची आता पडझड झाली आहे. ज्या चौथऱ्यावर या तिघांना फाशी देण्यात आली तो चौथरा आता ‘ट्रॅफिक आयलंड’ म्हणून वापरला जातो. लाहोरमधल्या इतर रस्त्यांप्रमाणे इथूनही वाहनं जिवाच्या आकांताने धावत असतात. वाहनांचे आवाज, धूर आणि धूळ यांनी हा आसमंत भरलेला असतो. तुरुंगाचे अवशेष आणि मशीद यांच्यामधून जाणारा रस्ता आपल्याला एका मनोरुग्णालयाकडे घेऊन जातो. या तीन हुतात्म्यांची कुठलीही स्मृती मागे राहू नये असाच प्रशासनाचा प्रयत्न असावा असं वाटतं. विशेष म्हणजे या परिसरात उभ्या राहिलेल्या वसाहतीला ‘शदमन’ असं नाव देण्यात आलं आहे. ‘शदमन’ म्हणजे ‘सुखाचा सागर’!
पाकिस्तानात गेलो होतो तेव्हा मी या भागाला मुद्दाम भेट दिली. ‘‘तुम्हाला भगत सिंग माहीत आहेत का?’’ असं मी या वसाहतीतल्या रहिवाशांना विचारलं. बहुतेकांनी त्यांचं नाव ऐकलेलं नव्हतं. फार थोडय़ाजणांना ते इथे तुरुंगात असल्याची आणि नंतर त्यांना फाशी दिल्याची पुसटशी माहिती होती. ‘‘आम्ही इथे आलो तेव्हा इथे फक्त पोलिसांची क्वार्टर्स होती. कॉलनी जशी वाढायला लागली तशी ती क्वार्टर्स पाडून टाकण्यात आली,’’ असं पन्नाशीतल्या एका गृहस्थाने सांगितलं. मात्र, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान झुल्फिकार अली भुत्तो यांना सुमारे ३० वर्षांपूर्वी दिलेल्या फाशीची आठवण मात्र अनेकांच्या मनात ताजी होती. पाकिस्तानच्या ‘नॅशनल असेंब्ली’चे सदस्य अहमद रझा कसुरी यांचे वडील नवाझ महमद अहमद खान यांची याच ठिकाणी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. भुत्तो यांनीच त्यांच्या खुनाची सुपारी दिल्याचं बोललं जातं. गोळीबार झाला तेव्हा कसुरी या ट्रॅफिक आयलंडला वळसा घालून चालले होते. त्यांच्या शेजारी बसलेले त्यांचे वडील गोळीबारात ठार झाले. भगत सिंग, सुखदेव व राजगुरू या तिन्ही क्रांतिकारकांच्या मृतदेहांची अधिकृतपणे ओळख पटवण्यासाठी कसुरी यांच्या आजोबांनाच पाचारण करण्यात आलं होतं. नवाझ महमद अहमद खान यांचा अगदी त्याच ठिकाणी खून झाल्यामुळे या क्रांतिकारकांच्या आत्म्यांनी त्यांचा सूड घेतला, असं अनेक वयस्कर लोक मानत होते.
१९८० च्या दशकात ‘जागतिक पंजाबी परिषद’ लाहोरमध्ये झाली होती. ही परिषद ज्या सभागृहात झाली तिथल्या भिंतीवर फक्त एकच चित्र लावण्यात आलं होतं आणि ते भगत सिंग यांचं होतं. प्रसिद्ध उर्दू कवी आणि पंजाबी स्वातंत्र्यसैनिक- ज्यांनी पाकिस्तानचं स्वप्न सर्वप्रथम बघितलं, त्या महमद इक्बाल यांना टाळून आपण भगत सिंगांचं छायाचित्र कसं काय लावलंत, असं मी विचारलं, तेव्हा ‘‘फक्त एकाच पंजाबी माणसाने देशासाठी बलिदान दिलं, तो म्हणजे भगत सिंग!’’ असं उत्तर मला देण्यात आलं.
पाकिस्तानातून परतल्यानंतर मी दक्षिण भारताचा दौरा केला. दक्षिण भारतातल्या अनेक गावांमध्ये भगत सिंग यांचा पुतळा पाहून मला आश्चर्य वाटलं. दिल्लीत परतल्यानंतर मी याविषयी एक लेख लिहिला. त्यानंतर थोडय़ाच दिवसांत हरजिंदर सिंग आणि सुखजिंदर सिंग यांचं एक पत्र मला मिळालं. लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या हत्येबद्दल या दोघांनाही फाशीची शिक्षा देण्यात आली होती. त्यांनी पत्रात जे लिहिलं होतं ते विचार करायला लावणारं होतं. त्यांनी माझ्यातल्या न्यायबुद्धीपुढे प्रश्नचिन्ह निर्माण केलं. ‘तुम्ही भगत सिंगचा गौरव करून त्याला क्रांतिकारक मानता, तर मग आम्हाला दहशतवादी का म्हटलं जातं?,’ असं त्यांनी या पत्रात विचारलं होतं. ‘आम्ही जे काय केलं तेही आमच्या उद्दिष्टासाठीच होतं. आपण ज्यांना ‘पंजाबचा सिंह’ मानतो त्या लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा सूड भगत सिंग यांनी घेतला होता. जनरल वैद्य यांनी १९८४ मधल्या सुवर्णमंदिरातील लष्करी कारवाईचं नियोजन केलं होतं; म्हणून आम्ही त्यांचा बळी घेतला,’ असं त्यांनी या पत्रात म्हटलं होतं.
आता आणखी अनेक अतिरेकी स्वत:ची तुलना भगत सिंगबरोबर करायला लागतील अशी भीती मला या पत्रामुळे वाटायला लागली. त्यामुळे त्यांचं जीवन आणि तत्त्वज्ञान लोकांसमोर मांडावं आणि ‘दहशतवादी’ व ‘क्रांतिकारक’ यांच्यात नेमका काय फरक आहे, ते लोकांना स्पष्ट करून सांगावं असं मला वाटलं. क्रांतिकारकाच्या दृष्टिकोनातून एखाद्या व्यक्तीची हत्या म्हणजे काय असतं, ते भगत सिंग यांनीच स्पष्ट केलं होतं : ‘‘मानवी जीवनाचं महत्त्व आम्ही जाणतो. कोणत्याही माणसाचं आयुष्य आम्ही अतिशय पवित्र मानतो. एखाद्याला साधं जखमी करण्यापेक्षा स्वत:चा जीव द्यायला आम्ही अधिक तत्परतेने तयार असतो.’’
भगत सिंग यांच्या मनात कुणाविषयीही द्वेष नव्हता किंवा कुठलीही सूडभावना नव्हती.
‘‘क्रांतिकारकांकडून होणाऱ्या हत्यांना राजकीय महत्त्व होतं. कारण त्यातून अंतिम संघर्षांसाठी उपयुक्त ठरणारी एक मनोवृत्ती आणि वातावरण तयार होत असतं.’’
सर्वसामान्य जनतेला समान आर्थिक संधी न देणारं कोणतंही शासन किंवा व्यवस्था उलथवून टाकण्यावर क्रांतिकारकांचा भर असतो. क्रांतिकारकांच्या तत्त्वज्ञानानुसार आर्थिक शक्ती नसलेल्यांना ती मिळवून देणं आणि प्रत्येक व्यक्तीला सन्मान देणं हे महत्त्वाचं असतं. दुसऱ्या बाजूला दहशतवादी हा व्यक्तिगत सूडाच्या भावनेने पेटलेला असतो. त्याला कुणाचा तरी सूड घ्यायचा असतो; जो राज्यकर्त्यांच्या हातचं बाहुलं बनलेला असतो. याचा अर्थ एकजण व्यवस्थेविरोधी विद्वेष पसरवतो, तर दुसरा त्याला बळी पडतो.
या पुस्तकासाठी संशोधन करणं ही अतिशय कठीण गोष्ट होती. हे काम सुमारे सात र्वष चालू होतं. भगत सिंगांचं जीवन आणि त्या काळातली परिस्थिती जाणून घेण्यासाठी पाकिस्तानच्या ताब्यात असलेले जुने दस्तावेज व कागदपत्रे अतिशय उपयुक्त ठरली असती. पण पाकिस्तानमधली ही कागदपत्रं भारतीयांसाठी खुली नाहीत. दोन्ही देशांच्या नागरिकांना एकमेकांकडची कागदपत्रं पाहता यावीत, यादृष्टीने दोन्ही देशांत कुठल्याही स्वरूपाचा करार झालेला नाही. मी यासाठी एका मित्रामार्फत पाकिस्तान सरकारशी संपर्क साधला. अतिशय फुटकळ कारण सांगून त्यांनी मला नकार दिला. ‘आपणास कागदपत्रं दाखविण्याने आम्ही शिखांच्या प्रश्नात निष्कारण ओढले जाऊ अशी आम्हाला भीती वाटते,’ असं कारण पाकिस्तानने दिलं. भगत सिंग हे शीख होते एवढं एक कारण सोडलं, तर त्यांना १९३१ साली दिल्या गेलेल्या फाशीनंतर ५० वर्षांनी उद्भवलेल्या शिखांच्या प्रश्नाशी या कागदपत्रांचा काय संबंध येतो, हे मला काही केल्या कळू शकलेलं नाही.
लंडनमधील इंडिया ऑफिस लायब्ररीमध्ये भगत सिंग यांच्यासंदर्भात कुठलीही माहिती उपलब्ध नाही. या ग्रंथालयाने आपल्याकडची पुस्तकं, अहवाल आणि कागदपत्रं अन्य ग्रंथालयांना दिली आहेत. याचा अर्थ स्वातंत्र्यानंतर जे दस्तावेज भारत आणि पाकिस्तानकडे सहजपणे यायला हवे होते त्यांच्यापासून या दोन्ही देशांना वंचित ठेवण्यात आलं आहे. या इंडिया ऑफिस लायब्ररीची कशा प्रकारे वाटणी करावी याबाबत दोन्ही देशांत एकमत न झाल्यामुळे ती सगळीच्या सगळी ग्रंथसंपदा लाटण्याचं ब्रिटिशांना एक निमित्तच मिळालं.
तिन्ही क्रांतिकारकांना देण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेविरुद्ध प्रीव्ही कौन्सिलकडे केलेल्या अपिलाबाबत थोडीफार माहिती मिळू शकली. पण ही माहिती आपल्याकडेही उपलब्ध होती. या संदर्भातील अतिशय महत्त्वाची माहिती असलेल्या फाइल्स नष्ट करण्यात आल्या असाव्यात किंवा मुद्दाम रोखून धरल्या जात असाव्यात असा माझा संशय आहे. मला अशी खात्री आहे की, ब्रिटिश सरकारने भगत सिंग आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांना फाशी देण्याचा निर्णय आधीच घेतला होता, हे स्पष्ट करू शकणारी कागदपत्रं आणि त्यावेळच्या तारा (टेलिग्राम्स) कुठे ना कुठे दडवून ठेवलेल्या असतील.
भगत सिंग यांच्या मनातल्या क्रांतीविषयीच्या कल्पना फ्रेंच राज्यक्रांती, अमेरिकेचा स्वातंत्र्याचा जाहीरनामा आणि रशियातली बोल्शेविक क्रांती यांवर आधारलेल्या होत्या. सामाजिक दुष्प्रवृत्तींविरुद्धचा लढा, अन्यायाखाली दडपलेल्या जाती-जमातींमधील जागृती आणि सामाजिक दडपशाही व असमानतेच्या विरोधातला लढा या सर्व गोष्टी स्वातंत्र्यलढय़ाचा एक भाग बनल्या होत्या. भगत सिंग यांनी तुरुंगात असताना किमान चार पुस्तकं लिहिली होती असं मला माझ्या संशोधनात आढळून आलं. ‘द हिस्ट्री ऑफ द रिव्होल्युशनरी मूव्हमेंट ऑफ इंडिया’, ‘द आयडियल ऑफ सोश्ॉलिझम’, ‘ऑटोबायोग्राफी’ आणि ‘अ‍ॅट द डोअर ऑफ डेथ’ ही ती चार पुस्तकं होत. ही चारही पुस्तकं मिळवण्याचा मी प्रयत्न केला; पण तो व्यर्थ ठरला. भगत सिंग यांना फाशी दिलं जाण्यापूर्वी या पुस्तकांची हस्तलिखितं तुरुंगातून बाहेर पाठवली गेली होती असं मला सांगण्यात आलं. प्रारंभी ही हस्तलिखितं काही क्रांतिकारकांच्या ताब्यात होती. १९४० च्या दशकात ती कुमारी लाज्यावती यांच्याकडे देण्यात आली. लाज्यावती या नंतर जालंधरच्या कंेद्रीय महाविद्यालयाच्या प्राचार्या बनल्या. लाज्यावती आता हयात नाहीत; पण फाळणीपूर्वी त्यांनी ही हस्तलिखितं लाहोरमधल्या कुणाजवळ तरी दिली होती. ती भारतात पाठवावीत अशी सूचनाही त्यांनी केली होती. ज्या कुणाकडे ही हस्तलिखितं दिली होती त्याने भारतात परतण्यापूर्वी घाबरून ही हस्तलिखितं जाळून टाकल्याचं त्यांना सांगितलं. अर्थात् माझा या गोष्टीवर विश्वास बसत नाही. ही हस्तलिखितं केव्हा ना केव्हातरी प्रकाशात येतील असं मला अजूनही वाटतं.
माझ्या पुस्तकासाठी माहिती जमवताना मी पहिली कुठली गोष्ट केली असेल, तर ती भगत सिंगांच्या भावांना शोधून काढणं, ही. दुर्दैवाने माझी भेट होण्यापूर्वीच भगत सिंगांचे बंधू कुलबीर सिंग यांचं निधन झालं. त्यांचे धाकटे बंधू कुलतार सिंग सहारणपूरमध्ये राहत होते. सहारणपूर उत्तर प्रदेशात आहे. भगत सिंगांबरोबरच्या झालेल्या शेवटच्या भेटीची त्यांच्या मनातली आठवण आता अतिशय धूसर आणि अस्पष्ट बनली आहे. भगत सिंग यांच्या कुटुंबातले अन्य सदस्यही राष्ट्रीय चळवळीत सहभागी असल्याचं मला समजलं. भगत सिंग यांचा जन्म झाला त्यावेळी त्यांचे काका अजित सिंग हे लाला लजपतराय यांच्याबरोबर ब्रह्मदेशातील तुरुंगात होते. त्याचवेळी त्यांचे आजोबा उघडपणे काँग्रेसचं कार्य करत होते.
१९९२ सालच्या डिसेंबरमध्ये मी सुखदेवचे धाकटे बंधू मथुरादास थापर यांचा पत्ता शोधण्यात यशस्वी झालो. त्याच महिन्यात मी त्यांना एक पत्र लिहिलं. मार्च १९९३ मध्ये थापर यांनी मला त्याचं उत्तर पाठवलं. त्यांची कहाणी अतिशय हृदयस्पर्शी होती. पंजाब पोलिसांकडून होणाऱ्या सततच्या छळामुळे आपल्याला सयालपूर (आताचं फैसलाबाद) सोडावं लागल्याचं त्यांनी त्यात लिहिलं होतं. मी सुखदेव यांचा भाऊ आहे एवढं एकच कारण त्या छळामागे होतं.
मथुरादास थापर यांचं वय त्या वेळी ८२ वर्षांचं होतं. आपल्या पत्रात त्यांनी अत्यंत कडवटपणे लिहिलं होतं : ‘‘अन्य एक क्रांतिकारक डॉ. किचलू यांच्या मुलाला महिना पाच हजार रुपये मानधन आणि फ्लॅट मिळाला आहे. आमच्या कुटुंबीयांच्या बलिदानाशी त्यांची तुलना करायला हवी.’’
लाहोर कटाच्या कामकाजाच्या एका पुस्तकाकडे त्यांनी माझं लक्ष वेधलं. त्यांनी हे पुस्तक पाकिस्तानातून आणलं होतं आणि नवी दिल्लीतील नॅशनल अर्काइव्हज्मध्ये ठेवलं होतं. हे पुस्तक सुखदेव यांना त्यांच्या फाशीपूर्वी तुरुंगाधिकाऱ्यांनी वाचायला दिलं होतं. त्या पुस्तकाच्या समासामध्ये सुखदेव यांनी काही नोंदी केल्या होत्या. पाकिस्तान सरकारकडे या खटल्याच्या कामकाजाची उर्दूमधली मूळ प्रत आहे आणि मी ती पाहिलीही आहे.
थापर यांचं पत्र आजही माझ्याजवळ आहे. मी ते जपून ठेवलं आहे. (पाहा : परिशिष्ट १) त्या पत्राच्या शेवटी त्यांनी म्हटलं आहे- ‘‘तुम्ही ऐतिहासिकदृष्टय़ा अत्यंत महत्त्वाचं पुस्तक लिहीत आहात. त्यासाठी माझा तुम्हाला उपयोग होईल अशी मला आशा वाटते.’’ दुर्दैवाने आमची भेट होण्यापूर्वीच त्यांचं निधन झालं. माझ्या पुस्तकाबद्दल त्यांना काय वाटत होतं ते मला सांगता येणार नाही. माझं पुस्तक अत्युत्तम आहे असा माझा दावा नाही; पण मी त्यासाठी अतिशय कष्ट घेतले आहेत, हे मात्र नक्की. भगत सिंग जसं जगले तसं मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे.
मथुरादास थापर आणि पोलिसांना माहिती पुरवणारा हंसराज व्होरा यांच्यातला पत्रव्यवहारही मी वाचला आहे. हा पत्रव्यवहार, विशेषत: आपण पोलिसांना माहिती का दिली याविषयी व्होरा याने केलेला खुलासा आणि मथुरादासने त्यांना दिलेलं उत्तर यांचा मी या पुस्तकाच्या उपसंहारात समावेश केला आहे.
ज्येष्ठ क्रांतिकारक भगवतीचरण यांच्या पत्नी दुर्गादेवी गाझियाबादमध्ये त्यांच्या मुलासोबत राहत असल्याची माहिती मला कुलतार सिंगांकडून मिळाली होती. त्यांना स्मृतिभ्रंशाचा विकार होता. पण तरीही सँडर्सच्या खुनानंतर भगत सिंग लाहोरमधून कसा पळून गेला, याची संपूर्ण हकिगत त्यांनी मला सांगितली. भगत सिंग यांच्या पलायनात त्यांची फार महत्त्वाची भूमिका होती. त्यादेखील काही वर्षांपूर्वी मरण पावल्या.
भगत सिंगांवरील अनेक पुस्तकं आणि त्यांचं स्वत:चं लिखाण यांचा हे पुस्तक लिहिताना मला खूपच उपयोग झाला. भगत सिंग यांच्या तोंडी घातलेली वाक्यं मी त्यांच्या पत्रांतून, निवेदनांतून आणि भाषणांतून घेतली आहेत. इतिहासाशी मी कुठेही प्रतारणा केलेली नाही.
क्रांतिकारकांची चळवळ दडपून टाकण्यासाठी ब्रिटिश पोलीस जी पद्धत वापरत असत त्याविषयीची माहिती मला पोलिसांच्या दस्तावेजातून मिळाली. गुप्तचर खात्याचे फार थोडे अहवाल आपल्याकडे उपलब्ध आहेत; पण त्यांचा मला खूप उपयोग झाला. पश्चिम बंगाल सरकारने प्रसिद्ध केलेल्या अमिया के. सामंता यांच्या ‘टेररिझम इन् बेंगॉल’ या सहा खंडांच्या पुस्तकात याविषयी खूपच माहिती दिली आहे. त्या पुस्तकातील काही माहितीचा वापर मी इथे केला आहे.
महात्मा गांधींच्या लिखाणातून क्रांतिकारकांविषयीच्या त्यांच्या दृष्टिकोनाची बरीच माहिती आपल्याला मिळू शकते. त्यांना क्रांतिकारकांच्या धैर्याचं कौतुक वाटत होतं; पण बॉम्ब आणि बंदुकांच्या वापराचं त्यांनी कधीच समर्थन केलं नाही. क्रांतिकारकांच्या देशभक्तीबद्दल त्यांना शंका नव्हती; पण बळाच्या वापराने भारताला स्वातंत्र्य मिळू शकणार नाही असं त्यांचं ठाम मत होतं. कार्यपद्धतीबाबत गांधीजी आणि भगत सिंग म्हणजे अगदी दोन टोकं होती. भगत सिंगांचा हिंसेवर विश्वास होता आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हिंसेचा वापर करण्यास ते कधीच कचरत नव्हते. गांधीजी मात्र आयुष्यभर अहिंसेच्या बाजूने ठाम राहिले. या मार्गाचा त्यांनी एकदाही फेरविचार केला नाही.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा इतिहास लिहिताना डॉ. पट्टाभिसीतारामय्या यांनी भगत सिंग यांचा खास गौरव केला आहे.. ‘‘गांधीजी आणि भगत सिंग हे सारखेच लोकप्रिय होते. गांधीजी त्यांच्या सत्याच्या प्रयोगांबद्दल, तर भगत सिंग त्यांच्या शौर्याबद्दल. दोघांची पहिल्यांदा भेट झाली तेव्हा भगत सिंग अवघ्या २१ वर्षांचे होते, तर गांधीजी ५९.’’
त्या काळातली अनेक वृत्तपत्रं मी बारकाईने अभ्यासली. भगत सिंग यांना जवळून पाहिलेल्या काहीजणांशी मी चर्चाही केली. त्यांना पाहिलेल्यांपैकी आता फारसं कोणी जिवंत नाहीत. भगत सिंग यांचे मित्र वीरेंद्र सिंग हे माहितीचे मुख्य स्रोत होते. ते जालंदर येथून प्रसिद्ध होणाऱ्या ‘दैनिक प्रताप’चे संपादक होते. सात वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं. भगत सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांवरचा खटला चालू असताना वीरेंद्र सिंग लाहोरच्या तुरुंगातच होते. त्यांच्याविषयीही पोलिसांना संशय होता. पण कुठलाच पुरावा न मिळाल्यामुळे त्यांची मुक्तता करण्यात आली.

मराठीतील सर्व लेख ( Lekha ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi book reivew