३० जानेवारी हा ‘शाश्वत’च्या आनंद कपूर या एका तंत्रज्ञ असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांचा जन्मदिवस. (आनंद कपूर यांच्या निधनानंतर) त्यांनी आणि कुसुम कर्णिक यांनी सुरू केलेल्या कामांचा प्रवास कसा झाला, हे सांगणारं हे पुस्तकही त्याच दिवशी प्रकाशित झालं. वॉटरमार्क पब्लिकेशनने प्रकाशित केलेलं आणि डॉ. गीताली वि. मं. यांनी संपादित केलेलं हे पुस्तक सामाजिक कार्यकर्त्यांनाच नव्हे, तर समविचारी व्यक्ती, मित्रपरिवार एवढेच नाही, तर सरकारलादेखील उपयोगी पडेल असं आहे. आपल्याला आपल्याच भाषेत भावना व्यक्तकरता येतात, हा विचार करून या पुस्तकात मराठी, हिंदी व इंग्रजीतीलही लेख समाविष्ट करून घेतले आहेत. ‘शाश्वत’च्या कामाचा योग्य अर्थ लावणारी मेधा पाटकर यांची हिंदी कविता या पुस्तकात अर्पणपत्रिका म्हणून घेतली आहे.

‘शाश्वत’ संस्था आणि एकजूट संघटना यांच्यामार्फत होत असलेल्या सामाजिक कामाकडे त्रयस्थाच्या भूमिकेतून पाहत कामात आलेल्या अडचणी व अडथळे यांकडेही पाहिलं जावं असा प्रयत्न यात केला गेला आहे. संस्थेच्या कामाच्या वाटचालीचा आढावा या हेतूने हे पुस्तक काढलं असलं तरी त्यात संस्थेचा प्रवास कसा होत गेला, तसेच संस्थेच्या कामांत वेळोवेळी सहभागी झालेल्या सहप्रवाशांनाही त्यात सामील करून घेतल्यामुळे हे पुस्तक सर्वाना सोबत घेऊन वाटचालीचा मागोवा घेत जातं. ‘शाश्वत’चं काम सहभागी पद्धतीने चालणारं, सर्वसमावेशक अशा समाजकेंद्री कामाचा एक वस्तुपाठ असल्यामुळे त्याला नावही समर्पक दिलं आहे- ‘शाश्वत विकासाचे वाटाडे’!

अमराठी भाषकांनाही ‘शाश्वत’बद्दल आणि आनंद कपूर, कुसुम कर्णिक यांच्याशी झालेल्या चर्चा आणि देवाणघेवाणीबद्दल निश्चितच व्यक्त करायला आवडेल असा विचार करून पुस्तकाला भाषेच्या बंधनात न अडकवता सर्वाना त्यात सामावून घेण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे.

कुसुम कर्णिक आणि त्यांच्यामुळे नंतर आनंद कपूर यांच्याशी झालेली मत्री यामुळे विद्या बाळ यांनी मांडलेलं मनोगत फार हृद्य झालं आहे. संपादक म्हणून गीताली वि. मं. यांनी अनेक अंगांनी ‘शाश्वत’च्या कामाबद्दल, निवडक उपक्रमांबद्दल विचार मांडणारे लेख या पुस्तकात घेतले आहेत. पुस्तकाची कल्पना सुचल्यापासून प्रकाशित करण्याची तारीख ठरवली तो कालावधी खूपच कमी असला तरीही पुस्तकात ते जाणवत नाही, इतकी त्याची मांडणी नीटस झाली आहे. स्वत: कुसुम कर्णिक आणि आनंद कपूर यांचेही काही जुने लेख यात घेतले आहेत. त्यांचा मुलगा या कामाच्या प्रवासातला एक साक्षीदार आणि प्रवासी असल्यामुळे त्याचाही लेख यात आहे. निरनिराळ्या आंदोलनांत ज्यांनी सहभागी होऊन नेतृत्व केले, अशा मेधा पाटकर, सुनीती सु. र. यांचेही लेख आहेत. लोकांच्या प्रामाणिक प्रयत्नांना दाद देणारे मोजके सरकारी व प्रशासकीय अधिकारीही आहेतच. त्यांनीही ‘शाश्वत’च्या पथदर्शी कामाबद्दल लिहिले आहे.

पुस्तकाला मििलद बोकील यांनी प्रस्तावना लिहिली आहे. सामाजिक कामाबद्दल विशेष आस्थेने विचार आणि लेखन करू शकणारे जे मोजके लेखक आहेत, त्यात त्यांचं नाव अग्रणी आहे. प्रस्तावनेतून ‘शाश्वत’ संस्थेचा प्रवास अतिशय स्पष्टपणे समोर येतो. सामाजिक विकासाच्या प्रक्रियेत सामाजिक संस्थांकडून काय केले जाते आणि ‘शाश्वत’मध्ये काय केले जाते, याचा उत्तम आढावा त्यांनी प्रस्तावनेत घेतला आहे. आनंद कपूर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हे पुस्तक प्रकाशित केले गेले आहे. त्यामुळे त्यांचे मित्र, नातेवाईक आणि सहकारी यांनी लिहिलेले लेख आणि आठवणीही या पुस्तकात आहेत.

‘पर्यायी विकासनीती’ या संकल्पनेचा शोध आणि प्रत्यक्ष अनुभव देणारे ‘शाश्वत’ हे एक अतिशय वेगळे काम आहे. आदिवासींचे संघटन, सरकारी योजनांच्या निधीचा कौशल्याने उपयोग, स्थानिक पर्यावरणाचे जतन-संवर्धन, जमिनीची बांधबंदिस्ती करून केलेली शेती, िडभे जलाशयातील मासेमारीची जोड अशी अनेक कामे ही संस्थेमुळे सुरू होऊन आता स्थिरावली आहेत. भीमाशंकरचे अभयारण्य असो की िडभे धरणग्रस्तांचे पुनर्वसन असो; सुरुवातीपासूनच सोबतीला स्थानिक कार्यकत्रे असल्यामुळे काम नंतर स्थानिकांकडेच सोपवायचं आहे याची जाणीवपूर्वक तयारी होत होती. या सर्व कामांना व्यवस्थित अभ्यासाची जोड, सोबतच्या सर्वाचीही समज वाढावी याचा विशेष प्रयत्न आनंद कपूर आणि कुसुमताई करत गेले. लोकांचे ते मामा आणि ताई बनून त्यांच्यातलेच होऊन राहिले होते याचा प्रत्यय या लेखांतून येतो.

सामाजिक कामाला अनेक परिवार कसे जोडता येतात, विचारधारा वेगळ्या असल्या तरी लोकांचा कामाशी संपर्क कसा राहिला पाहिजे, प्रश्नांची तड लावण्यासाठी चिकाटीने कसा पाठपुरावा केला पाहिजे, अशा साध्याच वाटणाऱ्या; पण महत्त्वाच्या गोष्टी कुसुमताई लेखात मांडतात. तर एका लेखात आनंद कपूर त्यांच्या नात्याचा विचारपूर्वक मागोवा घेतात. हे पुस्तक अनेकांना सामाजिक कामाच्या गुंतागुंतीची झलक दाखवेल. पुस्तक वाचल्यावर हे काम सहजपणे पेलणारे आनंद आणि कुसुमताई यांनी ते किती समर्थपणे उभे केले आहे याची जाणीव होते. संस्थेला आणि कामाला मिळालेले अनेक पुरस्कार त्याची साक्ष देतात. हे पुस्तक संस्थेच्या वाटचालीचे आणि अशक्य अशा गोष्टी शक्य करून दाखविण्याची जिद्द बाळगणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांची साखळी उभी करणाऱ्या कुसुमताई आणि आनंद कपूर यांची संक्षेपात ओळख करून देणारे आहे.

‘शाश्वत विकासाचे वाटाडे’,

 संपादन- गीताली वि. मं.,

वॉटरमार्क पब्लिकेशन,