‘त्या उजाड माळावरती.. बुरुजाच्या पडल्या भिंती।’

लोकजीवनातील त्या-त्या वेळच्या लोकसाहित्यातून निसर्गाची रूपं घट्ट वेढून आहेत.

ना. धों. महानोर

हिरवे हिरवे गार गालिचे..यांसारख्या शब्दकळांनी मराठी मनाला आजही भुरळ घालणारे निसर्गकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे अर्थात बालकवी यांची स्मृतिशताब्दी ५ मे रोजी सुरू झाली. त्यानिमित्ताने मराठीतील निसर्गकवितेच्या प्रवासाविषयी..

अर्वाचीन मराठी कवितेच्या दीडशे वर्षांच्या इतिहासाचं स्मरण केलं तरी मन प्रसन्न, खूपच आनंदमयी होतं. किती तरी स्थित्यंतरं नवनिर्माण मराठी काव्यात ओतप्रोत भरून आहे. त्यासाठी शंभरपेक्षा अधिक ग्रंथ लिहून झाले. आज फक्त कवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे- अर्थात ‘बालकवी’ यांच्यासंबंधी, त्यांच्यानंतरच्या- विशेषत: निसर्ग कवितेसंबंधी काही नोंदी घेता येतील. खूप राहून जाईल; तरीही थोडकं, नेमकं मला समजलं ते मी लिहितोय. अगदी प्राचीन काळापासून निसर्ग आणि माणूस, त्यांचं एकसंध जगणं चालत आलेलं आहे. लोकजीवनातील त्या-त्या वेळच्या लोकसाहित्यातून निसर्गाची रूपं घट्ट वेढून आहेत. लोकसंस्कृतीचा, तिथल्या माणसांचा अविभाज्य घटक म्हणजे निसर्ग! निसर्गाशी एकजीव होऊन जगणं हे आदिकाळापासून- ऋ ग्वेद, तसंच आणखी किती तरी ग्रंथांमधून भक्कमपणानं आलेलं आहे. महाकाव्यातही निसर्गाच्या छटाच अधिक आहेत. ‘मेघदूत’, ‘गाथा सप्तशती’पासून तर आजपर्यंतचं सर्वोत्तम साहित्य हे निसर्गामुळेच अधिक समृद्ध झालेलं दिसेल. माणूस आणि निसर्ग यांचं नातं अगदी स्वाभाविक असं आहे. मराठी संत साहित्यापासून आजवर ते अनेक अंगांनी बहरलेलं आहे. निसर्ग साहित्यातील प्रसन्न असा भावनिक अनुभव माणसाचं दु:ख, मरगळ विस्मरणात नेऊन टाकतो. असे हे ऋणानुबंध!

बालकवींचा जन्म धरणगाव या जळगाव जिल्ह्य़ातील खेडय़ातला. १८९० ते १९१७ असं अवघं सत्तावीस वर्षांचं आयुष्य! जळगावी १९०७ ला महाराष्ट्राचं पहिलं कविसंमेलन डॉ. कीर्तिकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालं. फार मोठे कवी त्यात सहभागी झाले होते. त्र्यंबक ठोंबरे या १७ वर्षांच्या कवीनं ‘बालमुकुंद’ ही निसर्ग कविता वाचली आणि अवघा रसिकवर्ग त्यांच्या प्रेमात पडला. त्यांनी ‘बालकवी’ असा त्यांचा गौरव केला. तिथून थेट ५ मे १९१७ पर्यंत- दहा वर्षांत बालकवींनी दीडशे तरी कविता लिहिल्या. निसर्गाचं, वनराई- झाडांचं, मानवी भावभावनांचं, वाहत्या निर्झरांचं, पक्ष्यांचं आणि सृष्टीच्या सचेतन-अचेतन विश्वरूप त्यांनी आपल्या कवितांमधून नव्या शब्दकळेनं आणि जिवंत अनुभवानं असं मांडलं, की अख्खा महाराष्ट्र त्या निसर्गकवितेनं वेडा झाला. झऱ्या-पाखरासारखीच खेळणारी शब्दकळा, नवा घाट त्यांच्या कवितेत आहे. दीर्घ अशा १०-२० कविता असूनही त्या वाचताना कुठे कंटाळा येत नाही. नवं चैतन्य देणारी, निस्सीम आनंद देणारी, शेवटी शेवटी निसर्ग प्रतिमा, प्रतीकं आणि गाढ अनुभव घेऊन येणारी, निसर्गाच्या पायवाटेकडून मृत्यूच्या डोहाकडे घेऊन जाणारी ही कविता मराठी कवितेच्या इतिहासात फार फार महत्त्वाची अन् मोलाची आहे. लक्ष्मीबाई टिळक, रेव्हरंड टिळक यांनी खूप सांभाळलेला हा कवी, दु:खाचा आगडोंब ओटीपोटी घेऊन वरवर हसणारा हा कवी; त्यानं ५ मे १९१७ स्वत:च आपलं आयुष्य संपवून टाकलं. मराठी साहित्य विश्वातील ही अतिशय करुण, दु:खद अशी घटना. या गोष्टीला शंभर र्वष झाली.

बालकवींच्या निसर्गाच्या वेगवेगळ्या रूपांच्या अम्लान अशा दीर्घकविता- ‘निर्झरास’, ‘फुलराणी’, आदी किती तरी; त्यांचा खूपच प्रभाव त्यानंतरच्या कवितांवर दिसून येतो. लहान-मोठय़ा सुंदर कविता नियतकालिकांतून येत होत्या, तरीही चंद्रशेखर शिवराय गोऱ्हे यांच्या ‘चंद्रिका’ या संग्रहातील कविता वाचल्या की ‘गोदागौरव’सारखी अप्रतिम छंदोबद्ध लयीतली आशयसंपन्न कविता रसिकांना वेटाळून टाकते. त्या छंदात पुन:पुन्हा आपण ती गातो. तशीच दीर्घ कविता माधव केशव काटदरे यांनीही लिहिली. ‘हिरवे तळकोकण’ या कवितेत त्यांनी केलेलं कोकणातल्या बहरत्या सृष्टीचं वर्णन मराठी कवितेत इतरत्र आढळत नाही. सबंध संग्रहात निसर्ग हाच मुख्यत: शब्दबद्ध झालेला. बालकवींच्या निसर्गपर दीर्घ अशा विलोभनीय कवितांचा प्रभाव इतका जबरदस्त, की अनेक कवींच्या दीर्घ कविता आणि आणखी लहानसहान कवितांमधूनही तो निसर्गत:च उमटत गेला. यशवंत, गिरीष, ग. ह. पाटील, ग. ल. ठोकळ यांसारख्या २५-३० कवींनी खेडय़ातील निसर्गाची रूपं, शेतीवाडीची रूपं थोडीफार कवितेत मांडली. खंडकाव्याचा तो काळ! त्यात निसर्गवर्णनंच अधिक. वर्णन सुंदर आहे, पण मर्यादित!

‘उंच उंच डोंगर भवती। चढले नील नभांत भिरभिर वारा व्यापुनियां । टाकी सारा प्रांत। । १।।

तरुवेलींनी फुललेल्या। त्या खोऱ्यांत सुरेख

झुळझुळ वाहे निर्झरिणी। स्फटिकावाणी एक।। २।।

– गोपीनाथ तळवलकर.

..

‘सुंदर हिरवे माळ, गडय़ांनो सुंदर हिरवे माळ’

– गिरीश

..

‘अजुनि कसे येती ना, परधान्या राजा

किरकिरती रातकिडे, झाल्या तिन्ही सांजा

वाट तरी सरळ कुठें पांदितिल सारी

त्यांतुनी तर आज रात्र अंधारी भारी’

– कवी यशवंत.

ग. ल. ठोकळांच्या ‘मीठभाकर’मध्ये निसर्गाशी निगडित ‘सुनीते’ आहेत. तसंच ग. ह. पाटलांच्या ‘लिंबोळ्या’मध्येही थोडं आहे. ‘बी’ कवींची ‘चाफा’ तसंच आणखी दोन-तीन कविता अप्रतिम निसर्गकवितेशी नातं सांगणाऱ्या आहेत. असं सुटय़ा सुटय़ा कवितांमध्ये, कुठं खंडकाव्यांमध्ये निसर्ग उतरलेला आहे. पुढे तो खंडित झाला.

अजिंठा डोंगराच्या माथ्यावर मेहकर या खेडय़ातल्या ना. घ. देशपांडे या कवीनं बालकवीच काय, त्याआधीची निसर्गकविता, छंदोबद्ध कविता पचवून विलक्षण सुंदर अशी कविता लिहिली. ‘रानारानात गेली बाई शीळ’, ‘नदीकिनारी’, ‘जुन्या गढीच्या भिंतीकडे’, ‘बकुळफुलं’ यांत खेडय़ातला नितळ, सुंदर शेतीवाडीचा निसर्ग दिसतो. गीतकाव्य, भावकाव्य यांत निसर्गप्रतिमांची छान गुंफण करून त्यांनी महाराष्ट्राला वेड लावलं. खेडय़ातल्या निसर्गाचा साजशृंगार, लोकगीतांची लय, आणखी अस्सल कवितांचा मितव्यय त्यांच्या कवितेत आहे. १९३२-४० या काळात या कवितांच्या रेकॉर्डद्वारे गजानन वाटवे, जी. एन. जोशी यांनी त्या घराघरांत पोहचविल्या. विलोभनीय निसर्गकविता, प्रेमकविता यांची गुंफण करत प्रत्येक संग्रहात ते नवं काही देत गेले.

‘रानारानात गेली बाई शीऽऽळ, रानारानात गेली बाई शीऽऽळ’

..

‘जरा निळ्या अन् जरा काजळी

ढगांत होती सांज पांगली

ढवळी ढवळी वर बगळ्यांची संथ भरारी गंऽऽ

कुजबुजली भवताली रानें

रात्र म्हणाली चंचल गाणे

नदीकिनारी, नदीकिनारी, नदीकिनारी गंऽऽ’

बालकवींच्या अतिशय घट्ट वीण असलेल्या निसर्गकवितेला ना. घ. देशपांडे अशा प्रकारे पुढे घेऊन गेले. रानांतला, खेडय़ांतला निसर्ग पहिल्यांदा त्यांनी शुद्ध भावकवितेत आणला. ही मोठीच गोष्ट! भा. रा. तांबेंच्या इंदौर – माळव्यातच भालचंद्र लोकलेकर नावाचे कवी होते. त्यांनीही निसर्गाची नवी रूपं नवी मुक्त लय बांधून छान कविता लिहिली-

‘धोरलकाठ। पाऊलवाट।

हळूहळू जाईल शामाराणी। घाटावर आणाया पाणी।

हरळी दाट। मऊसपाट।

झिम पोरी झिमा। फुगडय़ा फेरी।’

..

‘घाटावर चढे नार। नार निथळे पाण्यानं।

भर ज्वानीचं कपीस चाले भिजून मद्यानं’

ही वा. रा. कांत यांची रचना, किंवा

‘पलीकडच्या पाहते मळ्यातून

आंबराई सम मान उंचवून

बिंब वसंताचे का झळके, दिवसाच्या ऐन्यात

उन्हात बसली न्हात’

हे बी. रघुनाथ यांच्या कवितेतून येणारं खेडय़ात उघडय़ावर अंघोळ करणाऱ्या बाईचं चित्र. अतिशय सुंदर!

अशा पन्नासहून अधिक कवींच्या कविता सांगता येतील. त्यात चांगला, वेगवेगळ्या प्रदेशातला निसर्ग गुंफलेला आहे. बालकवींच्या नंतर निसर्गकवितेचं थेट नातं आणि पुढे जाणं हे आपण ना. घ. देशपांडेंमध्ये पाहतो. दुसरा अतिशय सुंदर निसर्गकविता भरभक्कम आणि आजही टवटवीत ठेवणारा निसर्गकवी म्हणजे बा. भ. बोरकर! नाघंसारखीच बोरकरांनीही दीर्घकाळ मुख्यत: निसर्गकविता-प्रेमकविताच अधिक लिहिली. गीतकाव्यातील लयीची आणि निसर्गरूपाची कविता सुरुवातीला ‘दूध सागर’, ‘आनंद भैरवी’ मध्ये दिसते. ‘माझ्या गोव्याच्या भूमीत’, ‘सरीवर सरी’ अशा निसर्गकवितांनी बोरकरांनी मराठीला समृद्ध केलं. गोव्याचा समुद्रकाठचा व महाराष्ट्राच्या अनेक प्रदेशांतला निसर्गही सुंदर प्रेमकवितांद्वारे त्यांनी मराठी कवितेला दिला. प्रत्येक दहा वर्षांच्या टप्प्यावर नवा शब्द, नवं गीत, नव्या जाणिवा आयुष्यभर देणारा हा कवी! बोरकरांच्या अनेक कवितांमधलं ‘चांदणं’ अनेक रूपांनी प्रेमकवितेत, निसर्गकवितेत येतं. ते बालकवींच्या ‘तारकांचे गाणे’ आणि आणखी तशाच कवितांची आठवण करून देणारं आहे.

‘चांदणं’ मराठी कवितेत अतिशय चपखल आणि रात्रीच्या निवांत एकांताच्या प्रहरी फारच थोडय़ा कवींनी उजळलं. आणि अनेकांनी नको तिथे नको तेवढा या चांदण्याचा भुसाही करून टाकला; त्यात आपली तक्रार कशासाठी असावी? ‘चांदणं टिपूर’ हा कवींचा कवितेतला आवडता खेळ! अनंत काणेकर, ग. दि. माडगूळकर, शान्ताबाई शेळके, इंदिरा संत यांनी काही कवितांमधून छान चांदण्यांची बरसात केली, पण फार नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना समुद्र अतिशय प्यारा! ‘सुनील नभ हे। सुंदर नभ हे। नभ हे अतल अज्ञ’ अशी एक त्यांची छान कविता आहे. शिवाय कोकण, गोवा या परिसरातली मितव्ययी लहान लहान पण सुंदर निसर्ग कविता शंकर रामाणी यांनी लिहिली आहे.

‘काव्यरत्नावली’ हे कवितेला वाहिलेलं मासिक जवळपास चाळीस र्वष नियमित चाललं. अर्वाचीन मराठीतले थेट केशवसुत, गोविंदाग्रजांपासून बालकवी आणि आणखी अनेकजणांनी त्यात लिहिले. चर्चा-परिसंवादही खूप झाले. खान्देश आणि त्याला जोडून असलेल्या वऱ्हाडानं खूप प्रतिभावंत कवी मराठीला दिले. त्या संपन्न अशा काळात जळगावही कवितामय झालेलं. फैजपूर या जळगाव जिल्ह्य़ातील गावी बाळ सीताराम मर्ढेकर यांचा जन्म झाला. त्यांचे वडील खान्देशात दीर्घकाळ शिक्षक होते. मर्ढेकरांचं मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण खान्देशातच झालं. असोडा या बहिणाबाईंच्या गावी ते सहावी-सातवीत होते. इथली उत्तम शेती, वाघूर-तापी-गिरणा नद्यांचा सुंदर वाहणारा प्रवाह त्यांनी पाहिला. पुढे मर्ढेकर शहरांमध्ये शिकले, आकाशवाणीमुळे देशभर फिरले. तरीही इथलं बालपण त्यांच्या मनात रुजलेलं होतं. इथलं शेतीजीवन- पेरणी, मळणी, उपटणी- त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेलं. भुईमूग जमिनीतून उपटताना दोन्ही हातांची शक्ती लागते. बहुसंख्य स्त्रियाच हे काम करतात. ती अतिशय विलक्षण अशी अवस्था. पण लिहिणं अवघड.

‘बोंड कपाशीचे फुटे उले वेचताना ऊर

आज होईल का गोड माझ्या हाताची भाकर

भरे भूईमूग-दाणा उपटता स्तन हाले

आज येतील का मोड माझ्या वालांना चांगले!

वांगी झाली काळीनिळी काटा बोचे काढताना

आज होतील का खुशी माणसं गं जेवताना!’

या कवितेवर समीक्षकांची किती मोठी दीर्घ चर्चा झाली! मी ती वाचली. ‘प्रौढत्वी निज शैशवास जपणे, बाणा कवीचा असे’ या उक्तीप्रमाणे मर्ढेकरांनी ही नितांत सुंदर हंगामातल्या कृषीजनांच्या प्रत्यक्ष जीवनावरील कविता लिहिली. तिचं नातं कवयित्री बहिणाबाईंच्या कवितेशी, कृषीसंस्कृतीशी आहे. इतकं त्या कवितेवर विद्वानांनी लिहिलं, तरी ती मला अजून शिल्लकच वाटते. मर्ढेकरांचं सर्वार्थानं घट्ट नातं बालकवींशी, त्यांच्या कवितेशी आहे. बालकवींच्या प्रदेशात ते प्रत्यक्ष वावरले होते. त्या गावात, परिसरात ते वाढले. बालकवी म्हणूनच त्यांच्या मानगुटीवर बसला, असं माझं मत आहे. आधुनिकता आणि आदिभौतिकता, ज्ञानापेक्षा विज्ञानाची सांगड घालून जीवसृष्टी आणि माणूस यांची गुंफण हे मर्ढेकरांच्या कवितेचं वेगळेपण आणि सामथ्र्य आहे.

झाडे कार्बन वायू आत घेतात, ऑक्सिजन वायू सोडतात. या सचेतन-अचेतनाची ही कविता..

‘नितळ न्याहाळीत हिरवी झाडे

काळा वायू हळूच घेती..’

किंवा

‘न्हालेल्या जणू गर्भवतीच्या

सोज्वळ मोहकतेने बंदर

मुंबापुरीचे उजळित येई

माघामधली प्रभात सुंदर’

– अशा कितीतरी कविता!

‘आला आषाढ-श्रावण

आल्या पावसाच्या सरी

किती चातकचोचीनं

प्यावा वर्षांऋ तु तरी..’

या कवितेत पुढे वर्णन करताना, पावसाची झड संपल्यावर-

‘चाळीचाळीतून चिंब

ओली चिरगुटे झाली

ओल्या कौलारकौलारीं

मेघ हुंगातात लाली’

हे अतिशय सूक्ष्म असं निरिक्षण हळुवार शब्दांत मर्ढेकर मांडतात. आणि एखाद्या छान छायाचित्रासारखं ते डोळ्यांवर कायमचं तरंग होऊन राहतं. ‘शिशिरागम’मधला निष्पर्ण, उदासवाणा निसर्ग, माणसांच्या थकून मोडलेल्या भावभावना वर्णन करणारे मर्ढेकर-

‘कधी लागेल गा नख तुझे माझिया गळ्याला

आणि सामर्थ्यांचा स्वर माझिया गा व्यंजनाला’

अशी विश्वात्मक जाणीवही व्यक्त करतात. हा कवी निसर्गातल्या उदास, दु:खी, भरडलेल्या जीवनाविषयीची कविता लिहिताना पुन:पुन्हा सद्गदित होतो आणि त्यासंबंधी मन:पूर्वक लिहितो.

अशा वेळी पुन्हा आठवण होते ते बालकवींची व त्यांच्या शेवटच्या काळातल्या दु:खाच्या प्रचंड कोलाहलात अडकलेल्या कवितांची..

‘भिंत खचली कलथून खांब गेला

जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाला’

किंवा

‘कोठुनि येते मला कळेना

उदासीनता ही हृदयाला?

काय बोचते ते समजेना

हृदयाच्या अंतर्हृदयाला?’

दु:खानं ओतप्रोत भरलेल्या या बालकवींच्या कविता. मर्ढेकर त्यात संपूर्ण बुडून गेलेले. मुंबई मराठी साहित्य संघाच्या विभागीय संमेलनात (१९५२) मर्ढेकर बालकवींच्या ‘खेडय़ांतील रात्र’ या कवितेसंबंधी बोलले. ही फारच ऐतिहासिक-भावनिक घटना आहे. ती कविता-

‘त्या उजाड माळावरती

बुरुजाच्या पडल्या भिंती;

ओसाड देवळापुढतीं वडाचा पार

अंधार दाटला तेथ भरे भरपूर.

ओढय़ांत भलु ओरडती,

वाऱ्यांत भुतें बडबडती,

डोहांत सावल्या पडती काळ्या शार

त्या गर्द जाळिमधिं रात देत हुंकार..’

१९५५-८० हा मर्ढेकरांच्या कवितेचा, नव्या मराठी कवितेचा सुवर्ण काळ. या काळात लिहित्या झालेल्या अरुण कोलटकर, दिलीप चित्रे, आरतीप्रभु, भालचंद्र नेमाडे, नारायण सुर्वे, ग्रेस, सुरेश भट, रेगे, चंद्रकांत पाटील, मनोहर ओक, प्रभा गणोरकर, अनुराधा पाटील, यशवंत मनोहर, नामदेव ढसाळ यांसारखे पन्नास तरी कवी-कवयित्री, ज्यांनी सर्वार्थानं मराठी कवितेला संपन्नता दिली. पूर्वीचे कुणाचेही प्रभाव न ठेवता स्वतंत्र प्रतिभेची कविता या कवींनी लिहिली. त्यांच्याही कवितांमध्ये निसर्ग कविता आहेच; परंतु कमी. ना. घ. देशपांडे- बा. भ. बोरकर – बा. सि. मर्ढेकर यांच्यासारखी भक्कम निसर्ग कविता वा बालकवींशी नातं, यांतील दोन-चार कवींचंच. तशी आरतीप्रभूंची बरीच कविता निसर्गाची. कधी कोकण, तर कधी छान भुईची हिरवी कविता. त्यांच्या ‘जोगवा’, ‘दिवे लागण’मध्ये निसर्ग खूप आहे, आणि पुन:पुन्हा वाचावा असा! अरुण कोलटकरांची निवडुंगाची प्रभावी कविता किंवा ज्ञानेश्वर समाधीवर्णनाचा सुरुवातीचा भाग; नेमाडे यांची ‘पिंगट रानाला राघू सोडून चालले रानभर’ अशी शेतशिवारातील संदर्भ देणारी अप्रतिम कविता; प्रभा गणोरकरांच्या ‘व्यतीत’ आणि आणखी दोन संग्रहांमध्ये शहरी निसर्गाच्या जाणिवा तीव्रपणानं आलेल्या आहेत. निसर्गाचं भान- विशेषत: खेडी, तिथल्या निसर्ग प्रतिमा अनुराधा पाटील यांच्या कवितेत खूप येतात. निसर्गाचं रूपवर्णन करणाऱ्या त्या कविता आहेत. वसंत सावंत यांच्या कवितेत कोकण-गोव्यातला वेगळाच निसर्ग भेटतो. त्यासोबतच प्रकाश होळकर, प्रकाश किनगावकर, उत्तम कोळगावकर, दिनकर मनवर, अजय कांडर या अलीकडच्या कवींच्या कवितांमध्येही निसर्गाचं, त्या त्या प्रदेशांचं रूप, सौंदर्य दिसून येतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Marathi nature poetry tryambak bapuji thombre balkavi