तांब्यांची चैतन्यमय आणि सौंदर्यवादी कविता तिच्या गीतप्रवृत्तीसकट रसमधुर उत्कटतेनं बाकीबाब बोरकरांनी पुढे नेली. विराग आणि अनुरागाचा मेळ घालत त्या कवितेनं ऐंद्रिय संवेदनांचं एक इंद्रजालच निर्माण केलं. याच धुंदमदिर वातावरणाचं नेपथ्य असताना कवितेच्या रंगमंचावर बोरकरांच्याच पूर्वप्रतिष्ठित कवितेचा प्रभाव घेऊन पाडगांवकर आले. खलील जिब्रानच्या भावप्रवण जीवनासक्तीचा आणि चिंतनाचा संस्कारही घेऊन ते आले. स्वत:चं स्वतंत्र स्थान मराठी कवितेच्या प्रांतात त्यांनी सहज निश्चित केलं.
उत्तम नेपथ्य असलेल्या रंगमंचावर उत्सुक आणि स्वागतशील प्रेक्षकांसमोर एखाद्या तरुण, प्रतिभावंत अभिनेत्यानं पहिला प्रवेश करावा आणि पसंतीची टाळी घ्यावी, तसा पाडगांवकरांचा मराठी काव्यक्षेत्रातला प्रवेश होता.
तांब्यांची चैतन्यमय आणि सौंदर्यवादी कविता तिच्या गीतप्रवृत्तीसकट रसमधुर उत्कटतेनं बाकीबाब बोरकरांनी पुढे नेली. विराग आणि अनुरागाचा मेळ घालत त्या कवितेनं ऐंद्रिय संवेदनांचं एक इंद्रजालच निर्माण केलं.
याच धुंदमदिर वातावरणाचं नेपथ्य असताना कवितेच्या रंगमंचावर बोरकरांच्याच पूर्वप्रतिष्ठित कवितेचा प्रभाव घेऊन पाडगांवकर आले. खलील जिब्रानच्या भावप्रवण जीवनासक्तीचा आणि चिंतनाचा संस्कारही घेऊन ते आले. स्वत:चं स्वतंत्र स्थान मराठी कवितेच्या प्रांतात त्यांनी सहज निश्चित केलं.
कवितावाचनाचे प्रयोग करणाऱ्या विंदा करंदीकर, वसंत बापट, मंगेश पाडगांवकर या त्रयीमधल्या प्रत्येकाची कविता स्वतंत्र बाजाची होती. महाराष्ट्रभर एकत्र काव्यवाचन करणाऱ्या या तिघांनी कवितेच्या श्रोतृवर्गाचा मोठाच विस्तार केला आणि प्रत्येकानं स्वत:चा स्वतंत्र श्रोतृवर्गही निर्माण केला. पाडगांवकरांच्या कवितेला जो रसिकवर्ग मिळाला त्यानं त्यांच्या कवितेला, काव्यप्रेमाला आणि आत्मप्रेमालाही रसरसून बहर आणला. जवळजवळ ४०-५० र्वष हा रसिकवर्ग त्यांनी टिकवला, जोपासला आणि प्रयत्नपूर्वक वाढवला.
या प्रयत्नांत त्यांची कविता एकीकडे अधिकाधिक रसिकसन्मुख होत गेली आणि दुसरीकडे तिला मोठी करण्याचे प्रयोगही रसिकसन्मुख होत राहिले. रसिकसन्मुखता ही पाडगांवकरांच्या कवितेची मुख्य ओळख आहे. आणि कमालीची भावप्रवणता हे तिच्या प्रकृतीचे मुख्य लक्षण आहे.
पाडगांवकरांनी कवितेवर मनापासून प्रेम केलं. मराठी वाङ्मय परंपरेचा त्यांचा उत्तम अभ्यास होता. तंत्रावर त्यांची फार पक्की पकड होती. वृत्त-छंदांमधल्या गण-मात्रांची लहानशी चूकही त्यांच्या लगेच ध्यानात येत असे. उच्चारांमध्ये रचनादोष सावरून घेण्याचे कवींचे प्रयत्नही त्यांच्या सजग श्रुतीपुढे सहज विफल होत. शब्दांचा नाद, अनुनाद, रचनेची लय आणि भावकवितेचं भावगीतात रूपांतर होतानाही त्यांच्या आशयाचा गाभा धक्का न लावता सांभाळण्याचं अवधान यामुळे त्यांच्या कविता आणि गीत यांची वैशिष्टय़ं थोडय़ाफार फरकानं, पण समानच राहिली.
पाडगांवकर कष्टाळू होते आणि त्यांचं कविताप्रेमही सच्चं होतं. त्यामुळे उदंड लोकप्रियता मिळूनही ते समाधानानं पूर्वपुंजीवर तृप्त झाले नाहीत किंवा आपल्याच जुन्या कवितांचे साचे कुरवाळत राहिले नाहीत. त्यांनी कवितेचे नाना घाट तपासले, वापरून पाहिले. त्यांनी गझल लिहिली, भावगीतं लिहिली, वात्रटिका लिहिल्या, ‘उदासबोध’सारखी वेगळ्या धर्तीची रचना करून पाहिली. त्यांनी राजकीय उपहासिका लिहिल्या, बालगीतं लिहिली, कुमारवयीन मुलांसाठी कविता लिहिली, जाहिरातींसाठी कविता लिहिली आणि वृत्त-छंदांतल्या कवितांबरोबरच मुक्तकविताही लिहिली
आपले हे प्रयोग रसिकांना आवडतील की नाही, अशी भीती नसलेले ते सुदैवी कवी होते. त्यांची कविता कायम रसिकसन्मुखच राहिली असल्यानं त्यांच्या प्रयोगशीलतेच्या सीमाही त्यांना ठाऊक होत्या. त्या सीमाबद्ध अवकाशात ते लीलया संचार करीत राहिले. प्रत्येक प्रयोगाला रसिकांची उत्स्फूर्त दादही मिळवत राहिले.
त्यांच्या कवितेनं काव्यरचनेचा अभ्यास करणाऱ्या नवोदितांना तर आदर्श पुरवलेच; पण भावगीतांच्या प्रेमिकांनाही सुखावले. भावगीत आणि भावकविता यांच्यामधलं अंतर पुसून टाकणाऱ्या कवींमध्ये जशा शांताबाई शेळके तसेच पाडगांवकरही होते.
पाडगांवकरांनी कवी म्हणून त्यांच्या उत्तर आयुष्यात काही अधिक वजनदार कामे हातात घेतली. मीरा आणि कबीर या दोघांचे अनुवाद त्यांनी केले. दोन्ही अनुवादांना दीर्घ प्रस्तावनाही लिहिल्या. या दोघांच्या रचनांची प्रकृती मराठीपेक्षा कितीतरी वेगळी. मीरेचा नृत्यमग्न, उत्कट भक्तिप्रेमाचा आवेग आणि कबीराची धुंद उदासी मराठीत आणणं कठीण. पण त्यामुळे पाडगांवकरांच्या अनुवादाचं मोल कमी होत नाही.
पाडगांवकर अखेपर्यंत काम करीत राहिले. कवितेत राहिले. त्यांच्या पिढीतले सारे नामवंत मोहरे आधीच एकामागून एक काळाच्या पडद्याआड जात होते. आता पाडगांवकरही गेले. त्यांच्याविषयीच्या व्यक्तिगत आठवणी मनात ठेवून त्यांना विनम्र श्रद्धांजली.