माणूस जगतो तो निसर्गाच्या आधाराने. त्याला मिळणारा प्रत्येक श्वास, त्याच्या भोवतालच्या सृष्टीतली हालचाल, त्याच्या भोवतीच्या पर्यावरणाचे उसासे आणि असंख्य जिवांनी भरलेले अवघे चराचर.. ही सृष्टीची किमया साकारणारा पाऊसच आहे. तो पारखा झाला तर माणूस माणसात राहत नाही. अन् त्यानेच जर दिलदारी दाखवली तर मग तरारणाऱ्या कोंभासारखे जगणेही पीळदार होऊन जाते.. केवळ छाती भरून मृद्गंध घेण्यासाठी आसुसलेल्यांना या पावसाने उल्हसित केलेच; पण छाती फाटेस्तोर राबले तरीही हाती काही उरत नाही असा अनुभव नेहमीच घेणाऱ्यांना त्याने ‘आबाद’ केले आहे. त्यांच्या जगण्याचा जामीनदार म्हणूनच धावून आलाय तो..
ज्या उजाड माळरानावर भयाण दुपारी दुष्काळाच्या जिभा फिरलेल्या असतात, तिथेच आता गवताला तुरे लागावेत, ही करामत कोणाची? आईचा तेल माखणारा हातही पारखा झालेल्या एखाद्या अनाथ लेकराचे केस वाऱ्यावर भुरुभुरु उडताना दिसावेत तसे ज्या डोंगरांचे माथे दिसू लागतात, तिथेच दाटून आलेली हिरव्यागार गवताची उतू जाणारी साय पसरवतो कोण? अन् वाऱ्यावर डफासारखी थरारणारी हिरवी सळसळ कोणाचं बोट धरून येते? निष्पाप झाडानं आपले हडकुळे हात पसरावेत आभाळाच्या दिशेनं बेदम आघात झालेल्या शरणागतासारखे, त्याच झाडांवर आता पाखरांची किलबिल.. हा चमत्कार तरी कशाचा? गणगोत तुटल्यासारखे दूरवर गेलेल्या उदास पाऊलवाटांना रंगीबेरंगी फुलांनी सजवतो कोण? अन् जिथे गरम उसासे टाकून भेगाळलेल्या भुईलाच जावेत खोलवर तडे-तिथे हे उललेले काळीज सांधतो तरी कोण? भगभगीत उन्हात सरभर झालेली माणसे कशाच्या आधाराने पुन्हा धडपडून सावरतात?
..हे सारे वास्तवात उभे करण्याचा संजीवक वकूब धारण करणारा पाऊस म्हणजे जणू आभाळाचाच हात.
..तो झरतो म्हणजे आभाळातून थेंबाथेंबाने पाणी झरते- एवढेच थोडे आहे? त्याच्या झरण्यातून पाझरतो विश्वास. त्याच्या आधारानेच जगण्याला सजवतो आपण आणि बांधतो पापण्यांना स्वप्नांचे तोरण. अशावेळी तो वाटतो आपल्या आतडय़ातल्या नात्यांचा आणि जिवंत हाडामांसाचा! म्हणूनच तो जेव्हा वाट पाहायला लावतो तेव्हा माणसे त्याच्या नावाने बोटे मोडू लागतात. तळतळून बोलताना आढळतात.. ‘कोणता दावा साधलाय.. जणू साता जन्माचा वैरी होऊन बसलाय.’ जिथे आभाळाचा रंग पाहून एकमेकांशी कसे वागायचे ते ठरवले जाते, तिथे पावसाची हजेरी लाखमोलाची! आभाळात ढगांचा पत्ता नसेल आणि पावसाच्या नक्षत्रातही लख्ख चांदण्यांनी लदबदलेले आभाळ दिसत असेल तर मग ‘काळ तर मोठा कठीण आला..’ असे वाटू लागते. व्यवहार ठप्प होतात. हात आखडते घेतले जातात. अन् तो येऊ लागला की मग त्याच्यावरचा राग कुठल्या कुठे निघून जातो. त्याच्याशी भांडणारेसुद्धा जणू नंतर त्याच्याच कुशीत शिरू पाहतात. तो येतो तेव्हा सरसकट सारखाच अन् कृत्रिम लयीत नाही बरसत. बनचुका सराईतपणा नसतो त्याच्या येण्यात. अगदी जिवावर आल्यासारखे येतो तेव्हा त्याचे मुळूमुळू येणे म्हणजे ‘मोले घातले रडाया’ असे वाटू लागते. पण जेव्हा कडकडाट, धडधडाट करीत तो येतो तेव्हा सगळा आसमंत फाटू लागतो की काय, असे वाटू लागते. थरकाप उडतो जिवाचा. चवताळलेल्या नागासारखा भासू लागतो तो. ओल्या मातीला भिडणाऱ्या बलांनी नागासारख्या शेपटय़ा करीत भुई िशगावर घ्यावी, तसला त्वेष असतो त्याच्या येण्यात. दात-ओठ खाऊन तावातावाने बरसतो तो. त्याचा धसमुसळेपणा कधी कधी अनावर संतापात उतरतो अन् एरवी त्याला शिव्या घालणारे आपण घरटय़ात बसून भीतीच्या कोठारात र्अधओल्या अंगाने निमूटपणे त्याचे हे रूप पाहतो. त्याची रग चिडीचूप करते आपल्याला. ताशा बडवल्यासारखा तो कोसळू लागतो तेव्हा होणारा झाडा-पानांचा घायटा एखाद्या अनाहत नादासारखा भासू लागतो.
यंदा त्याने कमाल केलीय. आई-बापावर रुसून गेलेल्या पोरासारखा नाही वागला तो. मुलूख सोडून परागंदा झाल्यासारखे केले नाही त्याने. लहरी जुगाऱ्याने भीड चेपल्यानंतर अगदीच निसवल्यासारखे वागावे, तसेही केले नाही. एखाद्या डरपोक माणसाने जीव मुठीत धरून पळून जावे असा भेकडपणाही नाही दाखवला आणि अध्र्यावर साथ सोडून गुंगाराही नाही दिला. थोडक्यात काय, तर पत्ता विसरला नाही तो. समजूतदार होऊन बरोबर वेळेवर आला. ‘एकदा आला अन् नादी लावून गेला’ असेही केले नाही त्याने. अखंड बरसतोय तो संततधार. त्याने वाट पाहायलाही लावली नाही अन् हातही आखडता घेतला नाही. किती किती बदललंय सगळं त्याच्या येण्याने. जिथं मुक्या जनावरांना उभं राहायलाही सावली दिसत नाही तिथं आता झाडे हिरवीगर्द झाली आहेत. हिरवंगार गवत माजलंय रानात अन् त्याचा उग्र वास येऊ लागला आहे. नदी-नाले वाहू लागलेत. उन्हात नदीच्या रखरखीत पात्रात झालेले खड्डेच खड्डे अन् वाळूवर दिसणाऱ्या मृगजळाच्या लाटांचे निशाणही शिल्लक राहिले नाही. सर्वस्व गमावल्यासारखे विवस्र्त् झालेल्या नद्या आता दमा-धीराने वाहू लागल्या आहेत. दोन्ही किनाऱ्यांना तटतटून जाणारा त्यांचा प्रवाह काय काय घेऊन जातोय सोबत.. कुठली कुठली माती अन् कुठले कुठले वाहून आलेले पाणी या सर्वाना एकजीव करत तो धावतोय पुढल्या दिशेनं. यंदा आभाळात वांझ ढगांचे कळप भटकले नाहीत. आभाळ कायमच काळेभोर अन् सदैव झरण्याच्या तयारीत असलेले. मनाला वाटेल तेव्हा पाऊस येतोय. त्यामुळे जागोजागी पिकांनी बाळसे धरले आहे. एरवीचे कुपोषण पिकांच्या वाटय़ाला आलेले नाही. डवरून आलेल्या निसर्गाचे नाना रंग सुखावत आहेत. मनाला उभारी देत आहेत. जीवघेणा दाह अन् सर्वागाची भाजणी होत असताना पावसाने दडी मारलीय असे वातावरण यंदा जाणवले नाही. तळ गाठलेले जलसाठे तुडुंब भरत आहेत. शेताशिवारात पाणी थळथळताना दिसत आहे. जवळचे होते-नव्हते टाकून पेरणी केली आणि आता तो आलाच नाही तर काय करायचे? असे म्हणत डोळ्यांत सारा जीव गोळा करून वाट पाहण्याची पाळी पावसाने आणली नाही. तो मनमुराद बरसतोच आहे. कुठे ‘महामूर’, तर कुठे ‘धुंवाधार’, कुठे ‘एकठोक’, तर कुठे ‘बेलगाम’.. काही ठिकाणी तर त्याची अक्राळविक्राळ ताकद थरकाप उठवीत आहे.
भर उन्हाळ्यात हंडाभर पाण्यासाठी केलेली वणवण अन् आता चौमाळ पसरलेले पाणी.. आधी घशाची कोरड अन् आता जागोजागी पायाखाली जाणवणारी आश्वासक ओल. हीच ओल झिरपत जाते तेव्हा मोकळे होतात जमिनीच्या पोटातले पाझर अन् आटलेल्या विहिरींना फुटतो पान्हा. पाषाणाला भेदून पाणी घेऊ लागते प्राणांतिक जोमाने जोरदार मुसंडी. तळाचा खडक फुटून पुन्हा पाणी धडपडू लागते जमिनीच्या पोटातून वर येण्यासाठी. जमिनीच्या पोटातच राहिलो तर मृत, अन् कातळ भेदून भुईवर आलो तरच आपण जिवंत- असली भारी जिद्द असते या पाण्यात. हे पाणी आता खळाळताना दिसू लागले आहे.. जागोजागी रांगताना दिसू लागले आहे. नक्षत्रागणिक त्यात भर पडू लागली आहे. सगळीकडे शेता-शिवारात दिसून येणारी नवथर हिरवाई, डवरून आलेली घनगर्द झाडी, गुराढोरांच्या, पाखरांच्या, किडय़ा-मुंग्यांच्या.. सगळ्यांच्याच जगण्याच्या बुडाशी आहे या पाण्याची ओल.
जेव्हा पावसाने दगा दिलेला असतो तेव्हा रानोमाळ पसरणाऱ्या वाळलेल्या गवतासारखी माणसे सरभर होतात. पोटापाण्यासाठी गाव सोडतात. पाऊस ताल धरत आला की जगण्याचाही सावरला जातो तोल.अन् तो रुसला तर बिघडून जाते जगण्याचीच लय. पडत्या पावसाने अनेक दारांच्या उंबऱ्यापर्यंत लागतेय पाणी आणि छप्परही लागते गळायला. अशा वेळी जागोजागी घरातली तुटकीफुटकी भांडी ठेवून घरात होणारा चिखलाचा डेरा उपसला जातो. पण आता पीकपाणी चांगले राहील, हंगाम करपणार नाही, पोटापाण्यासाठी बिऱ्हाड पाठीवर घेऊन जायची पाळी येणार नाही अशी भावनाही झड-पावसात चेहरे उजळून टाकते.
दगा न देता हाच पाऊस सखा होऊन येतो तेव्हा जगण्यावरचा भरवसा वाढू लागतो. पाखरांच्या चोचीत दाणे येतील. पोरासोरांच्या चेहऱ्यावर हसण्या-बागडण्याचे सुख हुंदडेल. दुष्काळात झेललेले घाव भरून येतील. जळत्या घरातून उडय़ा टाकून शिक्षणाच्या वाटा धुंडाळण्यासाठी बाहेर पडलेल्यांचे चेहरे गावाकडच्या धास्तीने काळवंडणार नाहीत. पोरीबाळींचे हात पिवळे करण्याची वेळ आली असताना धास्तीने झोप उडालेल्या बापावर गळफास घेण्याची पाळी येणार नाही. उजाड झालेल्या वस्त्यांमध्ये भणाण वारा हक्काने खेळणार नाही. दुष्काळाची चाहूल घेऊन येणाऱ्या भीषण पावलांच्या आवाजाने दचकून माणसे झुरणी लागणार नाहीत. जणू ‘असे काही होणारच नाही याची हमी मी देतो,’ असे म्हणतच पुढे येतो पाऊस.. आणि पाहता पाहता माणसे कडेलोटापासून बाजूला होतात. काहीच अपराध नसताना जेव्हा एखादे बालंट अंगावर यावे आणि जगणे नकोसे व्हावे असे वाटू लागते तेव्हा एखाद्या ‘जामीनदारा’सारखा धावून येतो पाऊस. गांजलेल्या माणसांभोवती घोंघावणाऱ्या असंख्य प्रश्नांचे भुंगे तो थोपवतो. घेतो साऱ्यांच्याच जगण्याची हमी तेव्हा तो आपल्या सगळ्यांसाठीच किती मोठा तारणहार असतो. माणूस जगतो तो निसर्गाच्या आधाराने. त्याला मिळणारा प्रत्येक श्वास, त्याच्या भोवतालच्या सृष्टीतली हालचाल, त्याच्या भोवतीच्या पर्यावरणाचे उसासे आणि असंख्य जिवांनी भरलेले अवघे चराचर..ही सृष्टीची किमया साकारणारा पाऊसच आहे. तो पारखा झाला तर माणूस माणसात राहत नाही अन् त्यानेच जर दिलदारी दाखवली तर मग तरारणाऱ्या कोंभासारखे जगणेही पीळदार होऊन जाते.. केवळ छाती भरून मृद्गंध घेण्यासाठी आसुसलेल्यांना या पावसाने उल्हसित केलेच; पण छाती फाटेस्तोर राबले तरीही हाती काही उरत नाही असा अनुभव नेहमीच घेणाऱ्यांना त्याने ‘आबाद’ केले आहे. त्यांच्या जगण्याचा जामीनदार म्हणूनच धावून आलाय तो..
आसाराम लोमटे – aasaramlomte@gmail.com