scorecardresearch

महापुरुषाची सावली

महापुरुषांनाही खासगी, प्रापंचिक जीवन असते याची समाजाला फारशी कल्पना नसते.

महापुरुषांनाही खासगी, प्रापंचिक जीवन असते याची समाजाला फारशी कल्पना नसते. समाजाला दिसतो फक्त त्याच्या मुक्तीसाठी, न्यायासाठी, स्वातंत्र्यासाठी रणमैदानात लढणारा, संघर्ष करणारा योद्धा. महापुरुष बनण्यामागे अनेकांचे त्याग कामी आलेले असतात. पण याची जाणीव क्वचितच समाजाला असते. अशाच एका महापुरुषाला अफाट कष्ट उपसून साथ देणाऱ्या.. नव्हे, त्यासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या एका त्यागमूर्तीचा संघर्षमय जीवनपट योगीराज बागूल यांनी आपल्या पुस्तकातून मांडला आहे. या महापुरुषाचे नाव आहे- डॉ. बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यांच्यासाठी तन-मनाने कणकण झिजलेल्या त्यागमूर्तीचे नाव आहे- रमाबाई आंबेडकर.

योगीराज बागूललिखित ‘प्रिय रामू..’ या चरित्रग्रंथात बाबासाहेबांच्या सहचारिणी रमाबाई यांची संघर्षमय कहाणी शब्दबद्ध केली आहे. बाबासाहेब त्यांच्या पत्नीला ‘रामू’ म्हणत. त्यामुळेच परदेशातून त्यांनी आपल्या पत्नीला पाठविलेल्या पत्रांची सुरुवात ‘प्रिय रामू’ अशी असायची. लेखकाने रमाईंच्या या चरित्रग्रंथाला  बाबासाहेबांच्या नजरेतून ‘प्रिय रामू..’ असे नाव योजले आहे.

आपल्या प्रिय व्यक्तीसाठी, त्याने आरंभलेल्या जग बदलण्याच्या कार्याच्या आड न येता, किंबहुना त्यांच्या संघर्षमय जीवनाचा अविभाज्य भाग होऊन झिजणे म्हणजे काय असते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रमाईंचे जीवनचरित्र होय. कोकणातील वणंद गाव ते मुंबईतील राजगृहापर्यंतचा त्यांचा प्रवास हा जणू आजन्म कष्टांचाच आहे. रमाईंच्या त्या त्यागाला, कष्टांना लेखकाने सुरुवातीलाच नामदेव ढसाळांच्या कवितेतून वंदन केले आहे.

कोकणातील दापोलीजवळचे वणंद हे एक खेडेगाव. अठराविश्वे दारिद्रय़ाने पिचलेल्या धुत्रे कुटुंबात भिकू-रखमाच्या पोटी रमाबाईंचा जन्म झाला. घरातलं नाव ‘रामी’! रोज अडीच-तीन मैलांची पायपीट करून दाभोळ बंदरावर माशांच्या टोपल्या वाहण्याचे, हमालीचे काम भिकू करायचा तेव्हा कुठे सकाळ-संध्याकाळ कुटुंबाची हातातोंडाची गाठ पडायची. पत्नी रखमा मोलमजुरी करून फाटक्या संसाराला हातभार लावायची. पोटी जन्मलेल्या चार लहान जीवांना जगवणे हीच भिकू-रखमाची जिंदगी. तीही फार काळ कामी आली नाही. अपार कष्ट, उपासमारीने खंगलेले भिकू-रखमा एकामागोमाग इहलोकातून निघून गेले. रामी आणि तीन भावंडं एकाकी पडली. रामी अवघी सहा-सात वर्षांची. त्या लहानग्यांवर कोसळलेला दु:खाचा डोंगर सावरायला रामीचे मामा आणि चुलते पुढे आले. या सगळ्या लहानग्यांना ते मुंबईला घेऊन गेले. भायखळ्याच्या चाळीत रमाबाईंच्या नव्या आयुष्याला सुरुवात झाली. मात्र तिथेही गरिबीच होती.

पुढे त्यावेळचे समाजसुधारक गोपाळबाबा वलंगकर आणि सुभेदार रामजी सकपाळ यांच्या मैत्रीतून भिवा (बाबासाहेब) आणि रामी (रमाबाई) यांचे लग्न जमले. भायखळ्याचा मच्छीबाजार उठल्यानंतर मोकळ्या झालेल्या जागेत रात्री दहानंतर भिवा-रामीचा विवाह संपन्न झाला.

बाबासाहेबांच्या सांसारिक जीवनाला आणखी एक वाट फुटली होती. ती म्हणजे ज्ञानसाधना आणि सामाजिक क्रांतीची. पुढे बाबासाहेबांची हीच खरी ध्येयपूर्तीची वाट ठरली. ही वाट खडतर होती. खाचखळग्यांची होती. काटेरी होती. बाबासाहेबांच्या मागे निश्चलपणे, खंबीरपणे वाट तुडवताना रमाबाईंची फरफट झाली. परंतु अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी बाबासाहेबांची साथ सोडली नाही. बाबासाहेब समाजासाठी झटत होते, तर रमाबाई बाबासाहेबांसाठी झिजत होत्या.

बाबासाहेबांचे उच्च शिक्षण आणि सांसारिक जीवन एकाच वेळी सुरू झाले. पारंपरिक समजुतीनुसार, रमाबाईंच्या दृष्टीने तिच्या मनातील प्रापंचिक जीवन वेगळे होते. मात्र, बाबासाहेबांची जीवनसाथी म्हणून ती वेगळाच अनुभव घेत होती. संसारात लक्ष घालण्याऐवजी बाबासाहेब अभ्यासात मग्न राहत होते. पुढे बडोद्याची नोकरी, इंग्लंड-अमेरिकेतील उच्च शिक्षण हे सारे रमाबाईंच्या जुन्या सांसारिक जीवनाच्या कल्पनेच्या कोसोपल्याडचे होते. मात्र याची जाणीव झालेल्या रमाबाई त्या खडतर वाटेवर बाबासाहेबांच्या सोबती झाल्या.

बाबासाहेबांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर कुटुंबाची स्थिती बिकट झाली. बाबासाहेबांना मोठा धक्का बसला. कुटुंबाचा आधार नाहीसा झाला होता. त्यांचे बंधू आनंदराव एकटे कमावणारे आणि दहा तोंडे खाणारी. बाबासाहेबांना पुढील शिक्षणाचा ध्यास होता. बडोद्याच्या महाराजांकडून मंजूर झालेल्या शिष्यवृत्तीची तीन महिन्यांची आगाऊ रक्कम घेऊन, त्यातील काही पैसे घरखर्चाला ठेवून त्यांनी अमेरिकेला उच्च शिक्षणासाठी प्रयाण केले. त्यावेळी रमाबाईंना मनातून खूप वाईट वाटले. एकाच्या कमाईत भागत नव्हते. मग रमाबाई आपल्या जावेबरोबर रस्त्यावर खडी टाकण्याचे काम करू लागल्या. रात्री जंगलात जाऊन त्या सरपण आणत असत. लहान यशवंताचा सांभाळ करत रमाबाई अपार कष्ट उपसत होत्या. बाबासाहेबही मिळणाऱ्या शिष्यवृत्तीतील पाच-पन्नास रुपये आपले पोट मारून रमाबाईंना पाठवीत होते. असे असूनही बाबासाहेबांच्या शिक्षणात मात्र खंड पडला नव्हता. अमेरिकेहून पुढील शिक्षणासाठी लंडनला जाण्याचा त्यांनी बेत केला. ही वार्ता त्यांनी पत्राने रमाबाईंना कळविली तेव्हा त्यांना खूप वाईट वाटले. अडीच वर्षे पतीची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या रमाबाई उदास झाल्या. दीर आनंदरावांच्या निधनानंतर त्या कुटुंबावर पुन्हा एकदा दु:खाचा पहाड कोसळला. पण त्या खचल्या नाहीत. बाबासाहेब परदेशात उच्च पदव्या संपादन करीत होते, बॅरिष्टर झाले होते आणि इकडे त्यांची सहचारिणी कुटुंबाचे पोट भरण्यासाठी गोवऱ्या थापण्याचे काम करीत होती.

लहान वयात लग्न, पाच मुलांचा जन्म, चार मुलांचे मृत्यू.. हे सारे आघात सहन करत रमाबाईंनी बाबासाहेबांना खंबीरपणे साथ दिली. नंतरच्या काळात थोडे दिवस चांगले आले, परंतु प्रकृती साथ देईनाशी झाली. फक्त ३६ वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले. बाबासाहेबांचे रमाबाईंवर निस्सीम प्रेम होते. तिचे कष्ट पाहून त्यांचे मन तीळतीळ तुटायचे. त्यांनी आपल्या रामूला पाठवलेल्या पत्रात त्यांच्या या भावना प्रतिबिंबित व्हायच्या. ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ हा आपला जगप्रसिद्ध ग्रंथ बाबासाहेबांनी आपल्या ‘प्रिय रामू’ला अर्पण केला. अर्पणपत्रिकेत बाबासाहेबांनी लिहिले आहे.. ‘तिच्या हृदयाचा चांगूलपणा, मनाची कुलीनता आणि शीलाच्या पावित्र्यासह तिचे शालीन मनोधैर्य नि माझ्याबरोबर दु:ख सोसण्याची तिची तयारी अशा दिवसांत तिने मला दाखविली- जेव्हा मी नशिबाने लादलेला मित्रविरहित काळ चिंतेसह कंठीत होतो. या बिकट परिस्थितीत साथ देणाऱ्या रामूच्या आठवणींत कोरलेले हे प्रतीक..’

आपल्या प्रिय पत्नीबद्दलच्या भावना बाबासाहेबांच्या या अर्पणपत्रिकेतून व्यक्त झाल्या आहेत.

‘प्रिय रामू..’- योगीराज बागूल,

ग्रंथाली प्रकाशन,

पृष्ठे- २३०, मूल्य- २५० रुपये. 

मराठीतील सर्व लेख ( Lekha ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Priya ramu book by yogiraj bagul

ताज्या बातम्या