श्रीरामकथेचे वर्णन रामरक्षा स्तोत्रात ‘शतकोटिप्रविस्तर’ केले गेले असून, गोस्वामी तुलसीदासांनी तेथेच न थांबता ‘रामायण शतकोटिअपारा’ असे म्हणत ‘अपार’ शब्द पुढे जोडला. बृहत्तर सांस्कृतिक भारतात दिसणारी रामरसायनाची मोहिनी इतकी विलक्षण आहे, की या विषयावर अनेक रामायणकारांनी आपल्या प्रासादिक रचना लिहिल्या. यातूनच रामकथेचे आदर्श समाजजीवनाचे विविध अवतार साकारले.

भारतीय प्राचीन वाङ्मयाचा विचार करता अनेक रामायणकारांनी केलेला सारस्वताचा परिसस्पर्श हा या वाङ्मयातील व्यक्तिरेखांशी सामान्यजनांचा सहजपणे जोडला जाणारा संबंध आणि त्याद्वारे उत्कट, उदात्त, आदर्श समाजजीवन प्रकट करण्याने अत्यंत प्रभावशाली आणि प्रतिभाशाली ठरतो.

जशी हवा आणि पाणी हे जगभर व्यापले आहे, त्याप्रमाणेच श्रीरामकथाही जगभर व्यापलेली आहे. आपण प्रथम जगातल्या इतर राष्ट्रांमध्ये आणि भाषांमध्ये असलेल्या रामायणांविषयी विचार करू. त्यानंतर भारतीय भाषांतील बहुचर्चित रामायणांकडे वळू या.

१९८१ साली मला मलेशिया, सिंगापूर, हाँगकाँग, बँकॉक आणि श्रीलंकेला झालेल्या तेलुगु साहित्य परिषदेच्या कार्यक्रमांना हजर राहण्याची संधी मिळाली. तेथील अनुभवाने मी स्तिमित झालो. या पूर्वेकडील राष्ट्रांमध्ये रामायणाचा प्रसार बऱ्याच मोठय़ा प्रमाणात झालेला होता. ठिकठिकाणी रामाची मंदिरे दिसत होती. राम हा तिथल्या समाजजीवनाचा अविभाज्य भाग असल्याचे जाणवत होते. वास्तविक मलेशिया हे मुस्लीम राष्ट्र. मात्र, तिथल्या राष्ट्रनेत्याचे नाव राम गुलाम महंमद असे होते. थायलंडमधला राजा ‘किंग रामा’ या नावाने ओळखला जातो. पर्यटकांना या राष्ट्रांच्या सांस्कृतिक खात्याकडून जे कार्यक्रम त्यांच्या राष्ट्राची संस्कृती म्हणून दाखवले जायचे, त्यात रामलीलेचा खेळ हटकून असायचाच. मध्यंतरी मॉरिशसच्या पोस्ट खात्याने तिकिटावर रामायणातल्या मारीचाचे चित्र छापले होते. ‘मॉरिशस’ हे नाव रामायणातल्या मारीचावरून पडल्याचे सांगण्यात येते. एकंदरीत रामकथा ही अशी वेगवेगळ्या कल्पनांमधून सर्वदूर पसरलेली आहे. ती त्यांची संस्कृती बनली आहे.

‘रामकथा’ ही त्रेतायुगातील कथा आहे. ॠग्वेदात ही मूळ कथा सापडते. महर्षी वाल्मीकीच्या प्रासादिक शैलीने आणि नाटय़पूर्ण अशा प्रसंगांनी नटलेली ही कथा जगभर विखुरली गेली आहे. यामागे करोडो लोकांची हजारो वर्षांपासूनची श्रद्धा कारणीभूत आहे. अशी हजारो वर्षांपूर्वी लिहिली गेलेली आणि जगभर विविध राष्ट्रांत समुद्राच्या लाटांप्रमाणे पोहोचलेल्या रामकथेची संगतवार सूची तयार करणे, ही खचितच सोपी गोष्ट नव्हे. कामिल बुल्के यांनी मोठय़ा परिश्रमाने ही सूची तयार करून रामायणाच्या अभ्यासकांवर फार मोठे उपकार केले आहेत. कामिल बुल्के यांनी भारतीय आणि विदेशी वाङ्मयात उपलब्ध असलेल्या रामायणांची सूची तयार केली.

युत्रुस्कान संस्कृतीतील रामायण-चित्रे

प्रख्यात पुराणवस्तू संशोधक के. राघवाचारी (नागपूर) यांनी युत्रुस्कान संस्कृतीत (इ. स. पूर्व ६००) आढळणारी रामायणाची चित्रे आणि इंडोनेशियामध्ये आढळणारी रामचित्रे प्रकाशित केली आहेत.

सुमारे तीस वर्षांपूर्वी अचानकपणे ‘तेलुगु आंध्रप्रभा’ या दैनिकातील एक सुटे पान सापडले. मात्र, साल आणि तारखेची नोंद त्या पानावर नव्हती. त्यावर युत्रुस्कान संस्कृतीतील रामायणावरील लेख आढळला. नागपूर येथील पुराणवस्तू संशोधन खात्यात साहाय्यक अधीक्षक पदावरून निवृत्त झालेल्या के. राघवाचारी यांनी रामायणावर केलेल्या अभ्यासाबद्दलचा तो लेख होता. ‘इ. स. पूर्व सहाव्या शतकातील रामकथा’ हे त्या लेखाचे शीर्षक वाचून माझे कुतूहल चाळवले. हा लेख जी. कृष्णा नावाच्या ख्यातकीर्त लेखकाने लिहिला असल्याने मी तो बारकाईने वाचला आणि त्याचा मराठीत अनुवाद केला.

इटलीतील युत्रुस्कान संस्कृतीमधील इ. स. पूर्व सहाव्या शतकातल्या काही चित्रांचे संशोधन करून त्यांनी त्यांची रामकथेशी सांगड घातली आहे. रामकथेशी युत्रुस्कान चित्रांचे असलेले साधर्म्य त्यांनी शोधून काढले. या चित्रांद्वारे युत्रुस्कानमधल्या नागरिकांत रामायणाविषयी बरीच माहिती असल्याचे दिसून येते. मोठमोठय़ा फलकांवर, पत्र्यांवर ब्रॉन्झ धातूचे आवरण घालून त्यावर काढलेल्या या चित्रांमधून रामकथा रेखाटल्यासारखी वाटते. भारतापासून हजारो मैल लांब असलेल्या युत्रुस्कान संस्कृतीवरील रामायणाचा प्रभाव त्यावेळच्या नागरिकांनी चित्रकृतींमधून व्यक्त केला, हे पाहून अचंबा वाटतो. फलकांवर, पत्र्यांवर, आरशांवर काढलेली ही चित्रे ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकातली आहेत, हे सिद्ध झाले आहे.

एका फलकावरील रंगीत चित्रात दोन दाढीधारी समोरासमोर बसलेले दिसतात. दोघेही आपापल्या आसनावर बसलेले आहेत. एकाच्या हातात राजदंड आहे. ते राजसत्तेचे चिन्ह समजायला हरकत नाही. राजदंड हाती घेतलेली व्यक्ती बहुधा दशरथ असावी. त्याच्या समोर बसलेली व्यक्ती मंत्री असावी. आपला हात हनुवटीवर ठेवून राजा मोठय़ा विचारांत गढलेला दिसतो. राजा आपल्या मंत्र्याचे बोलणे काळजीपूर्वक ऐकत असल्याचे त्याच्या अभिनिवेषातून दिसते. रामायणात मंत्री सुमंताचं पात्र मोठं महनीय मानलं आहे. राजा दशरथाचा सुमंत हा सारथी, सचिव सर्व काही होता. पुत्रकामेष्टी यज्ञ केल्यामुळे संतती प्राप्त होते, तो यज्ञ ॠष्यशृंगाच्या नियोजनाखाली करावा, असा सनतकुमाराने सांगितलेला हितोपदेश दशरथाच्या कानी सुमंतानेच घातल्याचा वृत्तान्त विदितच आहे.

दुसऱ्या एका चित्राद्वारे राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या वनवासाची आठवण करून दिली जाते. एक व्यक्ती स्त्रीला उचलून घेऊन जात आहे, तर दुसरी व्यक्ती धनुष्यबाणासह त्यांच्या पुढे मार्ग काढीत चालली आहे. या चित्रात रामरायाला पंख असल्याचे दाखविण्यात आले आहे. हे चित्र अरण्यकांडातले असावे.

तिसऱ्या चित्रात एक उंचीपुरी, भव्य व्यक्ती उभी आहे. ती कुठला तरी आदेश देते आहे. दुसरी व्यक्ती बाजूला आहे. ती अत्यंत कृश आणि लहान आहे. ती व्यक्ती त्या बलाढय़ व्यक्तीला काहीतरी सांगते आहे. या दोघांच्या मधे एक स्त्री गुडघ्यात मान घालून, साडी नेसून, डोक्यावर पदर घेऊन बसली आहे. हा प्रसंग युद्धकांडातला असावा. ती बलाढय़ व्यक्ती म्हणजे रावण, तर त्याच्याशी बोलणारी कृश व्यक्ती बिभीषण असावी. आणि त्या दोघांच्या मधे बसलेली स्त्री ही सीता असावी. चित्रातल्या बिभीषणाकडे पाहिले तर तो काहीतरी हितोपदेश करताना दिसतो आहे. बहुधा सीतेचे हरण करणे हे बरे नसल्याचे तो रावणाला सांगत असावा.

ग्रीक पुराणात इलियडची अशीच एक कथा आहे; परंतु त्या कथेची धाटणी वेगळी आहे. असो. मात्र, या तिन्ही चित्रांतून रामायणाच्या कथेशी साधर्म्य दर्शवणारी बाब समोर येते. रामायणात राज्यपालनाबरोबरच धर्मपालनालाही प्राधान्य दिले आहे. तर इलियडमध्ये केवळ राज्य संपादन करण्याला महत्त्व दिले आहे.

सामान्यपणे पूर्वेकडील राष्ट्रांतील सयाम, इंडोचीन, थायलंड आणि इंडोनेशिया आदी देशांत रामायणाची कथा काही अंशी तर्कसंगत आणि मानवतावादी भूमिकेतून आढळते. जुलै, १९६० च्या ‘नवनीत’ (हिंदी) मासिकात इंडोनेशियातल्या रामायणातील काही महत्त्वपूर्ण पात्रांची, प्रसंगांची खास तिथल्या शैलीत रेखाटलेली चित्रे प्रसिद्ध केली गेली आहेत. त्या पात्रांची वेशभूषा, केशभूषा, त्यांचे नृत्यमय आविर्भाव लक्षणीय वाटतात.

रामायणाची कथा वाचून, ऐकून ‘रामाची सीता कोण?’ असा प्रश्न विचारणे म्हणजे वेंधळेपणा ठरेल. परंतु हे खरं नाही. व्ही. फाऊसबॉल यांनी लिहिलेल्या बौद्ध रामायणात सीता ही रामाची चक्क बहीण आहे! आहे की नाही गंमत! व्ही. फाऊसबॉल यांनी लिहिलेल्या (मूळ चिनी भाषेत असल्याची नोंद) बौद्ध रामायणाचा मराठीत सारांशानुवाद शि. गो. भावे यांनी केला आहे. ही ‘दशरथ जातककथा’ इ. स. पूर्व ६०० मधील आहे. ही कथा अशी : फार प्राचीन काळी दशरथ नावाचा एक मोठा राजा होऊन गेला. त्याच्या सोळा हजार स्त्रियांमध्ये जी पट्टराणी होती, तिच्या पोटी त्याला दोन पुत्र आणि एक कन्या झाली. त्यापैकी ज्येष्ठ पुत्र साधुराम आणि दुसरा पुत्र लख्खण होय. राजपुत्रीचे नाव सीता होते. पुढे ती राणी मरण पावते. त्यानंतर त्या राजाने दुसरे लग्न केले. ती अत्यंत सुंदर आणि राजाची अत्यंत लाडकी राणी होते. पुढे ही सुंदर राणी मुलाला जन्म देते. त्याचे नाव ‘भरत’ असे ठेवण्यात येते. राजा राणीवर अतिसंतुष्ट होऊन तिला एक वर देतो. पण ती वर मागण्याचा हक्क राखून ठेवते. तिचा मुलगा आठ वर्षांचा झाल्यानंतर तिने आपल्याला दिलेल्या वराची पूर्ती करायला दशरथाला सांगितले. ‘भरताला राज्य द्या,’ असे तिने ठासून सांगितले. तिचा कावेबाजपणा पाहून राजा घाबरला. त्याने लगेच आपल्या मुलांना बोलावून सांगितले, ‘माझ्या प्रिय मुलांनो, तुम्ही येथे राहाल तर तुमच्यावर संकटे येतील. तेव्हा तुम्ही लांब कुठेतरी निघून जा.’ मुलांनी वडिलांच्या या निर्णयाला मान्यता दिली. तेव्हा राजपुत्री सीता म्हणाली, ‘दादा, मीही तुमच्याबरोबर येते.’ सारे वनात आश्रम बांधून राहत असतात. इकडे राजा दशरथाचा मृत्यू होतो. तेव्हा भरत रामाला राजधानीत पाचारण करण्यासाठी वनात जातो. पण राम वडिलांना दिलेल्या शब्दावर अटळ राहतो. मात्र, सीता भरताबरोबर राजधानीस परत येते. राम बारा वर्षांनंतर परत येण्याची ग्वाही देतो. तेव्हा भरत त्याच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्य चालवतो. पुढे निश्चित काळानंतर राम राजधानीस परततो आणि राज्य करतो.

या कथेत रावण नाही, हनुमंत नाही, लंका नाही. विशेष म्हणजे सीता ही रामाची बहीण आहे. अशी ही वेगळी रामकथा आहे. या कथेला बौद्ध रामायणाने वेगळी पुस्ती जोडली. महाराज दशरथ हा राजा शुद्धोधन होता. महामाया साधुरामाची आई झाली. दरबार म्हणजे बुद्धाचा दरबार होता. साधुराम म्हणजे गौतम बुद्ध होते.

भारतीय भाषांतील रामायणे

भारतीय भाषांमधील अनेक कवींनी रामकथेच्या प्रेमापोटी रामायणे लिहिली आहेत. तीही अत्यंत सरस, सुरस, प्रासादिक आहेत. याला कारण त्यांच्या ठायी असलेली रामभक्ती होय. राष्ट्रकवी मैथिलीशरण गुप्त म्हणतात..

‘राम तुम्हारा वृत्त स्वयं काव्य है।

कोई कवि बन जाए सहज संभाव्य है॥’

जैन रामायणाचा प्रसार कन्नड भाषेच्या माध्यमातून फार प्राचीन काळापासून झालेला आहे. जैन ग्रंथांत रामकाव्ये विपुलतेने लिहिली गेली आहेत. रामकथेला मुख्यत्वे दोन परंपरांचे आधार असल्याचे दिसते. विमलसूरीकृत रामकथांना जैनांतील श्वेतांबर मतवाद्यांची अधिक मान्यता लाभली. आणि दिगंबरवाद्यांनी या दोन परंपरांचा समान आदर राखला. आचार्य विमलसूरींच्या परंपरेत रचल्या गेलेल्या रामकथा अशा : ‘पउमचरित्र’- विमलसूया (प्राकृत, इ. स. तिसरे शतक), ‘पद्मचरित्र’ – रविवेणाचार्य (संस्कृत, इ. स. ६६०), ‘जैन रामायण’- हेमचंद्र (अपभ्रंश, इ. स. बारावे शतक), ‘रामपुराण’- जितदास (अपभ्रंश, इ. स. पंधरावे शतक)

पुढील काळात कर्नाटकात वैष्णवमताचा प्रसार झाला. त्यामुळे वैदिक परंपरेतली रामकाव्ये लिहिली जाऊ लागली. सर्वप्रथम कुमार वाल्मीकीलिखित ‘तोरवे रामायणा’चा उल्लेख होतो. भामिनी षट्पदी काव्यछंदात ही रचना केली गेली आहे. यानंतर कवयित्री गिरीअम्मा यांचे ‘सीताकल्याणम्’, लिंगराज कवीचे ‘अंगदसंधान’, मुद्दणकवीचे ‘रामाश्वमेध’, ‘रामपट्टाभिषेक’, ‘अद्भुत रामायण’ आदी रामायणांचा उल्लेख होतो. तसेच कुवेंपु (के. व्ही. पुट्टण्णा) यांनीही रामायण लिहिले आहे.

तेलुगु भाषेतही अनेक रामायणे लिहिली गेली आहेत. सर्वप्रथम गोनबुद्धा रेड्डी रचित ‘रंगनाथ रामायण’ (या रामायणाचा आधार घेऊन रामानंद सागर यांनी दूरदर्शन मालिका तयार केली.), त्यानंतर ‘भास्कर रामायण’, ‘शतकंठ रामायण’, ‘सहस्रकंठ रामायण’, ‘मोल्ला रामायण’, ‘रघुनाथ रामायण’, ‘गोपीनाथ रामायण’, ‘रामायण कल्पवृक्षम्’ अशी अनेक रसाळ रामायणे तेलुगुत आहेत. गोनबुद्धा रेड्डींच्या रामायणातून द्रविडांच्या आदर्श दृष्टिकोनाचा परिचय घडतो. कवीने मूळ वाल्मीकीकृत काव्यातल्या औचित्याचा भंग न करता काही काल्पनिक अशा कथा रचून वाल्मीकीकडून सुटलेले दुवे सांधत रामायणाची खुमारी वाढवली आहे. त्यातील एक कथाभाग असा : जांबुमाली हा शूर्पणखेचा मुलगा. येथे रामायणकर्त्यांने शूर्पणखेला ‘स्वरूपनखा’ म्हणजे नखशिखांत सुंदर स्त्री होती असे कल्पून लिहिले आहे. स्वरूपनखेचा पती विद्युत जिव्हा हा रावणाने सीतेचे हरण केल्याने चिडतो आणि भर दरबारात रावणाला जाब विचारतो. त्यामुळे रावण संतापून विद्युत जिव्हाला तिथेच ठार करतो. नवऱ्याच्या मृत्यूने स्वरूपनखा घाबरून जाते. ती आपला मुलगा जांबुमालीला घेऊन तडक दंडकारण्यात येते. ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या न्यायाने ती रामाची मदत घ्यायला येते. परंतु यावेळी एक अघटित घटना घडते. जांबुमाली आपला मामा रावणाचा वध करण्यासाठी सूर्यदेवापासून दिव्यास्त्र मिळावे याकरता एका झुडपात तपश्चर्येला बसतो. त्याला दिव्यास्त्र मिळण्याच्या क्षणी लक्ष्मण कंदमुळे गोळा करण्यासाठी तेथे येतो. अवकाशातून येणारे ते अस्त्र तो वरचेवर झेलतो आणि अस्त्राची धार पाहण्यासाठी झुडपावर वार करतो. त्याक्षणी झुडपातून रक्ताच्या चिळकांडय़ा उडतात. जांबुमाली ठार झालेला असतो. यावेळी स्वरूपनखा विचार करते- ‘सीतेच्या हरणापोटी आपल्या नवऱ्याचा जीव गेला. एकुलत्या एका मुलाला घेऊन रामाला शरण येण्याच्या क्षणी लक्ष्मणाकडून जांबुमालीचा वध झाला. आता नवराही नाही आणि पुत्रही नाही. अशा अवस्थेत समाजात एकटी स्त्री राहू शकत नाही. याला निमित्त राम आणि लक्ष्मण झाल्याने ती त्यांना आपल्याशी लग्न करण्याची इच्छा प्रदर्शित करते. शूर्पणखेच्या उच्छृंखलपणाला रामायणकर्ता अशा प्रकारे सावरतो.

याच धर्तीवर अशा आणखी छोटय़ा छोटय़ा कथांची पेरणी करून या कवीने मूळ रामायणाला सर्वागसुंदर करत स्त्रीची उदात्तता वाढवली आहे.

तमिळ भाषेतले सर्वोत्तम रसाळ रामायण म्हणून ‘कंबरामायणा’चा उल्लेख होतो. या रामायणकर्त्यांचे वैशिष्टय़ म्हणजे त्याने सीतेच्या नखालाही रावणाचा स्पर्श होऊ दिलेला नाही. मूळ वाल्मीकी रामायणात सीतेचे हरण करताना रावण तिचे केस आणि जांघेत हात घालून तिला उचलतो असे दाखवले आहे. पण या कवीने हा प्रसंग रावण सीतेला पर्णकुटीसह नेतो असा रंगवून स्त्रीला अधिक पवित्र ठेवले आहे.

अशीच दक्षिणेकडील तुळू, मल्याळम् आदी भाषांतही रामायणे आहेत. तुळू रामायण तर मंदार केशवभट या मराठी माणसाने लिहिले आहे.

सार्थक जीवनाचा बिंदू हा नैतिकता, संयम, धर्मनिष्ठता यांतूनच आकार घेतो. जीवन जसे सुगम आहे तसेच दुर्गमही. त्यातूनही आदर्श व्यक्तित्व जपणे यालाच माणूस म्हणतात. माणूस व परिवाराचे आदर्शत्व सांगणारी कथा म्हणजे रामायण. वेगवेगळ्या कालखंडांतील कवींनी ही रामायणे लिहिली असली तरी त्यातील एकसूत्रता आणि सचेततेचा स्रोत एकच आहे. कवींच्या प्रतिभेनुसार त्यातले भाष्य बदलेल, परंतु आदर्श नात्याची संकल्पना बदलणार नाही. म्हणूनच रामायण चिरस्मरणीय ठरले आहे.

प्रजासत्ताक दिन आणि आसियान परिषद यांच्या निमित्ताने केंद्र सरकारतर्फे दिल्लीत ‘रामायण महोत्सव’ झाला. आग्नेय आशियातील दहा देशांतील कलाकारांनी या महोत्सवात आपापली ‘रामकथा’ सादर केली. अतिशय महत्त्वाची घटना आहे ही! सर्वत्र सांस्कृतिक सपाटीकरणाचा वरवंटा फिरत असताना, एकतेच्या घोषामध्ये सर्व प्रकारच्या विविधतेची आहुती देण्याचे कार्यक्रम जोशात सुरू असताना हिंदुस्थानी संस्कृतीच्या मुळाशी असलेल्या रामकथेतील विविधता अधोरेखित करणारा हा महोत्सव दिल्लीत झाला. नंतर त्याचे प्रयोग अहमदाबाद, हैदराबाद आणि लखनौत.. एवढेच नव्हे, तर रामजन्मभूमी अयोध्येतही झाले. हे छानच झाले. किती वेगवेगळी रामायणे आहेत ही!

आपल्याला माहीत असते ती रामकथा वाल्मीकींची! खरे तर वाल्मीकींचा रामही आपल्या तेवढा परिचयाचा नाही. वाल्मीकींचा राम हा इक्ष्वाकु वा रघुवंशातला चौतिसावा राजा. ६४ वर्षांचे जीवनचरित्र त्याचे. त्याची कथा आपल्याकरता त्याचे बालपण, विवाह, वनवास, भरतभेट, राक्षसांशी लढाया, सीताहरण आणि रावणवध एवढय़ात संपते. अनेक चमत्कृतीपूर्ण कथांची पुटे चढवून त्याचे चरित्र आपल्यासमोर येते. त्याला आधार असतो सहसा तुलसीदासांच्या ‘रामचरितमानसा’चा.. नाथांच्या ‘भावार्थ रामायणा’चा. हल्ली तर रामानंद सागरांच्या दूरचित्रवाणी मालिकेचाही. आणि त्यातून अंतिमत: आपल्या नजरेसमोर ठेवली जाते ती एकच प्रतिमा : सदा युद्धाच्या पवित्र्यात असलेल्या, आकर्ण धनुष्य ताणलेल्या प्रभू रामचंद्राची! त्या प्रतिमेहून वेगळा राम- मग तो प्रत्यक्ष वाल्मीकींनी रंगविलेला असला- तरी तो न मानण्याकडेच आपला कल असतो. कारण? – आपली श्रद्धा बिनसते तेथे. ती बिनसू नये म्हणून मग सारी ज्ञानेंद्रियेच बंद करून टाकतो आपण. सांस्कृतिक सपाटीकरणाला प्रारंभ होतो तो तेथून.

पण हा आपला इतिहास नाही. ही आपली परंपरा नाही. केवळ आग्नेय आशियायी देशांतच नव्हे, तर प्रत्यक्ष हिंदुस्थानच्या या भूमीतही राम वेगवेगळ्या चरित्रांसह वेगवेगळ्या कथांतून, भाषांतून आपल्यासमोर आलेला आहे. थायलंडमध्ये (पूर्वीचा सयाम) ही रामकथा ‘रामकियन’ (म्हणजे ‘रामकीर्ती’) या नावाने येते, मलायातील ‘हिकायत सेरी’ म्हणून, तर जावामध्ये ‘काकविन’, तसेच ‘सेरत राम’ या काव्यरूपात येते. आपल्याकडेही बौद्धांची, जैनांची, शाक्तांची, वैष्णवांची वेगवेगळी रामचरित्रे आहेतच. सयाममधील रामाचा वर्ण हिरवा आहे. कुठे राम आणि सीता हे भाऊ-बहीण आहेत, तर कुठे सीता रावणाची औरस कन्या आहे. लाओसमधील रामायणातील राम हा तर एकपत्नीव्रतीही नाही. काही रामायणांत रावण हा वेदशास्त्रसंपन्न आहे. खुद्द वाल्मीकींच्या रामायणातील रामाचे रावणवधानंतरचे वर्तन आपल्यासाठी वेगळे आहे. अशोकवनातून सुटका झालेली सीता समोर आल्यानंतर वाल्मीकींचा राम तिला रूक्षपणे सांगतो, की ‘अद्य मे पौरुषं दृष्टमद्य मे सफल: श्रम:’- ‘आज मी माझे पौरुषत्व सिद्ध केले. आज माझे श्रम सफल झाले.’ आणि यानंतर तो म्हणतो, ‘मला तुझ्याबद्दल आसक्ती राहिलेली नाही. तुला जिकडे जायचे तिकडे जा. हवे तर भरत, लक्ष्मण, सुग्रीव, बिभीषण कोणाकडेही जाऊन राहा.’ – ‘नास्ति मे तय्याभिष्यंगो यथेष्टां गम्यतामिती’! हे सारे नागर समाजाने दुर्लक्षित केले असले तरी नांगरमुठय़ांच्या लोकगीतांनी ते जपले आहे. या लोकगीतांतील रामकथा ही लोककथाच आहे.

राम हा अनेकांच्या श्रद्धेचा विषय आहे. त्या श्रद्धेचा आदर करूनही रामकथेतील हे भिन्न-भिन्नत्व लक्षात घ्यायला हवे. संस्कृतीचे जीवन हे कधीही एकांगी नसते. तिला अनेक पदर असतात, विविध रूपे असतात. तिला एका साच्यात बसवण्याच्या प्रयत्नांतून तिचा डौलच नव्हे, तर तिच्यातील मानवीपणच संपून जाते. अशी रसहीन, शुष्क संस्कृती कोणत्याही राष्ट्राचे पोषण करू शकत नाही. केंद्र सरकारने ‘रामायण महोत्सव’ भरवून आपल्या संस्कृतीचा हा वैविध्यपूर्ण वारसा आपल्यासमोर पुन्हा एकदा आणला. तो किती मोठा आहे, हे रामायणाचे अभ्यासक लक्ष्मीनारायण बोल्ली यांच्या प्रस्तुत लेखातून समजावे..

डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली