नेदरलँड्समधील डच रॉयल लायब्ररीत छत्रपती शिवाजी महाराज आणि डच  यांच्यातोालेला पत्रव्यवहार उपलब्ध आहे. पत्रांचा हा खजिना हाती लागतानाचा प्रवास आणि शिवकालीन इतिहासाच्या अनेक अंगांवर प्रकाश पाडणाऱ्या या पत्रांविषयी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने विशेष लेख..

तशी मला इतिहासाची आवड लहानपणापासूनच होती. चौथीतील ‘शिवछत्रपती’ या पुस्तकाने जागृत केलेल्या उत्सुकतेला पुढे अनेक कथा-कादंबऱ्यांचे खतपाणी मिळाले, पण शिवचरित्राबद्दल नवीन काही वाचण्याची इच्छा तितकीच तीव्र होती. त्यामुळे पुण्यात आल्यावर ‘भारत इतिहास संशोधक मंडळा’च्या वाऱ्या सुरू होणे हे क्रमप्राप्तच होते. त्यातूनच गजानन मेहेंदळे सरांसारख्या थोर संशोधकांशी परिचय झाला आणि त्यांनी लिहिलेला ‘श्री राजा शिवछत्रपती’ हा ग्रंथ वाचणे सुरू केले. त्यातून अनेक गोष्टींचा नव्याने परिचय झाला आणि निव्वळ वाचनाऐवजी काहीतरी संशोधन करावे या इच्छेने मनात मूळ धरले. मेहेंदळेकृत ग्रंथ वाचत असताना लक्षात आले, की इंग्रजी, फ्रेंच, डच, पोर्तुगीज, इ. भाषांतील अनेक प्रकारची साधने मराठेशाहीच्या संशोधनाकरिता उपलब्ध आहेत. त्यांपैकी अन्य साधनांच्या तुलनेत डच साधनांचा वापर तितकासा झालेला नाही, हे लक्षात आल्याने तिकडे मोर्चा वळवायचे ठरवले. उपलब्ध साधनांचा मागोवा घेणे, इंटरनेटवर नवीन साधनांचा शोध घेणे, इ. करत असताना लक्षात आले की ‘डच ईस्ट इंडिया कंपनी’चे मुख्य कागदपत्रं नेदरलँड्समधील द हेग इथल्या ‘नॅशनाल आर्काईफ’ (Nationaal archief) इथे आहेत. ते तिथे जाऊन पाहणे हाच एकमेव मार्ग होता.

अखेर एकदाचा गेल्यावर्षी जुलै मध्ये नेदरलँड्स इथे जाण्याचा योग आला. नंतर अजून काही दिवस सुट्टी घेऊन सर्वप्रथम डच इतिहासकार प्रो. खाईस क्रायत्झर (Gijs Kruijtzer) आणि प्रो. लेनार्ट बेस (Lennart Bes) यांची भेट घेऊन इतिहासकारांते वाट पुसत हेगमधील नॅशनाल आर्काईफ इथे मोर्चा वळवला. ‘डेन हाख सेंट्राल’ अर्थात हेग सेंट्रल रेल्वे स्टेशनला लागूनच नॅशनाल आर्काईफची अत्याधुनिक इमारत दिमाखात उभी आहे. तिला लागून डच रॉयल लायब्ररी (koninklijke bibliotheek) आहे. तिथे गेल्यावर सुहास्यमुद्रेने तिथल्या कर्मचाऱ्यांनी स्वागत केले. आपले सामान ठेवायला तिथे लॉकर्सची सोय उपलब्ध आहे. पासपोर्ट दाखवल्यावर ‘आर्काईफ’चे सदस्यत्व विनामूल्य मिळते. त्यांनी माझे मेंबरशिप कार्ड तयार केले. आर्काईव्हच्या रचनेची प्राथमिक कल्पना दिली. आर्काईव्हमध्ये पाऊल टाकल्यावर दिसणारे चित्र पाहून हर्षवायूच होणे बाकी होते. भव्य वातानुकूलित खोल्या. महत्त्वाचे म्हणजे विनामूल्य वायफाय इंटरनेट. पेनचा वापर करायला बंदी असल्याने पेन्सिलीकरिता स्टेशनरीचे दुकान हुडकावे असा विचार येताक्षणीच काउंटरवर अगदी छान टोक केलेल्या पेन्सिल्स ठेवल्या होत्या त्या दिसल्या. जगभरातील अनेक संशोधक तिथे शांतपणे काम करत बसलेले पाहणे हा एक वेगळाच अनुभव होता. आर्काईव्हमधील बहुतेक कर्मचारी हे सुरिनामी होते. तिथले कैक लोक हे मूळचे भारतीय वंशाचे. त्यामुळे मी भारतीय आहे हे कळल्यावर ते माझ्याशी अगत्याने हिंदीतून बोलायचा प्रयत्न करीत.

संशोधनाला सुरुवात करण्याअगोदर आपल्याला कुठल्या पत्रसंग्रहातील कितव्या क्रमांकाचा खंड पाहिजे ते काउंटरवरच्या माणसाला लिहून द्यायचे, मग तो एक ‘टाफेलनुमर’ अर्थात ‘टेबल नंबर’ देई. जागोजागी लावलेल्या टीव्ही स्क्रीन्सवर ते क्रमांक दिसत. आपला क्रमांक दिसला की आपण मागवलेले खंड घेऊन जायचे.

संग्रह इतका जगड्व्याळ आहे की पुस्तकाला पुस्तक लावून त्याची जाडी मोजल्यास सुमारे सव्वाशे किलोमीटर भरेल. इतक्या अवाढव्य संग्रहातून पाहिजे ते खंड काढायचे म्हणजे वेळ लागायचाच. पण डचांनी त्या संग्रहाची मांडणी इतक्या शिस्तबद्धपणे केलेली आहे, की त्यातून हवा तो खंड बहुतेकदा फक्त अध्र्या तासात मिळताना मी स्वत: पाहिले आहे. काही ठिकाणी फक्त मायक्रोफिल्म पाहण्याची सुविधा होती.  अनेक टेबलांना लॅपटॉपसाठीचे चार्जिग पॉईंट्स होते. काही टेबलं फक्त नकाशे पाहण्यासाठी राखीव होती. काही खोल्या या एकावेळी अनेक खंड मागवून दिवसभर त्यांचे परिशीलन करणाऱ्या घासू लोकांकरिता राखीव होत्या. शिवाय कागदपत्रे पाहताना मोठय़ा व लहान आकाराच्या वेगळ्या उशाही उपलब्ध होत्या. अनेक खंड मागवले असतील तर ते ठेवायला मोठी ट्रॉलीही दिली जात असे. गुंडाळीच्या स्वरूपातली कागदपत्रे पाहता यावीत म्हणून जड साखळ्या व पेपरवेटही दिली जात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे फोटो काढायला परवानगी होती, तीही विनामूल्य.

जे खंड होते त्यांची निगाही अशाच निगुतीने राखलेली. तिनेकशे वर्षे जुने, साधारण एक फूटभर लांब, अर्धा-पाऊण फूटभर रुंद आणि तितक्याच जाडीचे ते खंड हातात घेताना त्यांच्या वजनानेच छाती दडपून जात असे. अनेक खंडांचे वजन पाचेक किलो सहज असेल. असे हे जाडजूड खंड काउंटरहून टेबलापर्यंत नेताना पुष्कळच व्यायाम झाला. त्या खंडांभोवती जाड कागदी आवरण, त्यावरून दोरीने गाठ मारलेली, हे सगळे एका मोठय़ा पुठ्ठय़ाच्या बॉक्समध्ये ठेवलेले. बॉक्सवर खंडाच्या स्थितीप्रमाणे विशिष्ट रंगाचे स्टिकर लावलेले असे.

इथून पुढे मुख्य कामाची खरी सुरुवात होती. उपलब्ध साधने व अन्य पुस्तके यांच्या आधारे अगोदर बनवलेल्या नोंदींतील कागदपत्रे पाहण्यास सुरुवात केली. ती सर्व मिळूनही शिवाजी महाराज आणि डच यांमधील पत्रव्यवहार काही मिळत नव्हता. पण शोधाशोध सुरू ठेवल्यावर एकाच दिवशी तब्बल सात पत्रे सापडली. तात्काळ मेहेंदळे सरांना फोन करून बातमी कळवली. त्यांनी अजून पत्रे कुठे मिळण्याची शक्यता आहे याबद्दल काही सुचना केली. पुढे काही दिवसांनी अजून काही पत्रे सापडली. ही सर्व पत्रे इ.स. १६७३- १६८० या काळातील आहेत. यांबद्दलचा प्राथमिक तपशील खालीलप्रमाणे:

ही पत्रे म्हणजे मूळ पत्रांच्या डच भाषेतल्या भाषांतरित नकला आहेत. अस्सल पत्रे सापडत नाहीत. मूळ पत्रे मराठी, तेलुगु, तमिळ व एके ठिकाणी पोर्तुगीज भाषेत असल्याचा उल्लेखही तिथे आहे. याखेरीज शिवचरित्राशी प्रत्यक्ष संबंध नसलेली, परंतु आनुषंगिक माहिती पुरवणारी अजून ४-५ पत्रेही मिळाली. शिवाय पत्रांसोबतचा अन्य मजकूर वगैरे मिळून एकूण दोनेक हजार पानांचा ऐवज मिळाला.

सतराव्या शतकातील डच हस्तलिखिते वाचायची तर त्याकरिता तत्कालीन डच भाषा, तत्कालीन लिपीचे संकेत, इ. गोष्टींचे ज्ञान आवश्यक आहे. अनेकदा संदर्भावरूनही अर्थ लावावा लागतो. त्यामुळे लिप्यंतर, त्यानंतर भाषांतर व विश्लेषण अशी ही तिहेरी प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया किचकट आणि वेळखाऊ असल्यामुळे सर्व साधनांचे भाषांतर व संगतवार विश्लेषण करण्यासाठी किमान दोनेक वर्षे सहज लागतील. ते काम चालू असून तूर्तास पत्रांचे भाषांतर करून पाहता शिवचरित्राबद्दल समजलेल्या नवीन गोष्टी संक्षेपाने खालीलप्रमाणे-

१६७३ सालच्या आसपास वेंगुर्ला येथील कुणी ‘ढ’स्र्३ल्ली्र‘’ नामक व्यापारी/ देसाई स्वराज्याला उपद्रव देऊन तिथून पळून डचांच्या आश्रयास गेला होता. हा डचांचा दलाल असून त्याच्या वर्तणुकीबद्दल शिवाजी महाराजांनी तक्रार केली होती. त्याने केलेल्या अफरातफरी आणि उपद्रवांचा पाढा वाचून यापुढे दुसरा दलाल नेमण्याविषयी त्यांनी सूचना केली. उत्तरादाखल डचांनी ती मागणी मान्य करत असल्याचे कळवले.

शिवाजी महाराजांनी डचांना दिलेला कौल – १

 स्वत: शिवाजी महाराजांनी डचांना लिहिलेली पत्रे – ४

 डचांनी खुद्द शिवाजी महाराजांना लिहिलेली पत्रे – ३

 अष्टप्रधानांपैकी एक अण्णाजी दत्तो यांनी डचांना लिहिलेली पत्रे – ३

 दक्षिणचे सुभेदार रघुनाथ पंडित हणमंते यांनी डचांना लिहिलेली पत्रे – ४

 रघुनाथ पंडितांनी त्यांच्या हाताखालील अधिकाऱ्यांना लिहिलेली पत्रे – ७

 डचांच्या एका भारतीय गुप्तहेराने शिवाजी महाराजांबद्दल डचांना लिहिलेली पत्रे – २

अशी एकूण पत्रे – २४.

१६७६ साली शिवाजी महाराज व अष्टप्रधानांपैकी सुरनीस अर्थात महसूलमंत्री अण्णाजी दत्तो यांनी वेंगुल्र्यातील डच वखारीतले अधिकारी रोम्बाउट लेफर आणि अब्राहम लेफेबर यांसोबत व्यापारी हक्क कायम राखण्यासंबंधी वाटाघाटी केल्या, शिवाय त्यांच्याकडून कैक टन तांब्याची मागणी केली होती. डचांनी पुढील दोनेक वर्षे तांबे पुरवले, शिवाय ते तांबे जपानहून आणल्याचा उल्लेखही पत्रांसोबतच्या मजकुरात आहे. आणि या कालावधीत भारतातल्या पश्चिम किनाऱ्यावर जपानहून आयात केलेल्या तांब्याची आयात अन्य ठिकाणांपेक्षा दुप्पट प्रमाणात झाल्याचा पुरावाही इतर ठिकाणी मिळतो. शिवाय या प्रसंगी शिवाजी महाराजांनी वेंगुल्र्यातील डच वखारीला एक कौलही दिलेला मिळाला आहे. त्यात त्यांनी डचांचे व्यापारी हक्क कायम राहतील अशी ग्वाही दिलेली आहे.

१६७७ साली शिवाजी महाराज कर्नाटक मोहिमेकरिता दक्षिणेत आले. त्यांनी जिंजीचा किल्ला घेतल्यानंतर त्यांचे अभिनंदन करणारे पत्र डच कंपनीतील कोरोमांडल विभागाच्या गव्हर्नरने पाठवले. त्याच सुमारास त्यांनी डचांना त्यांचे पूर्वीचे व्यापारविषयक हक्क बहुतांश अबाधित राहतील, परंतु इत:पर स्वराज्यातून गुलाम विकत घेण्याची परवानगी नसेल असा एक कौलही दिला. त्याअगोदरचा पत्रव्यवहार मिळाला आहे. याच सुमारास संतोजी भोसले नामक सरदार तंजावराधिपती व्यंकोजी भोसल्यांकडून शिवाजी महाराजांना जाऊन मिळाले. त्यावेळेस त्यांच्या लष्करात डचांनी पेरलेला एक एतद्देशीय गुप्तहेरही होता. त्या हेराने सैन्याच्या हालचालींबद्दल डचांना पाठवलेली दोन पत्रेही मिळालेली आहेत.

१६७८ सालापासून तमिळनाडूच्या किनाऱ्यावर कावेरी नदीच्या ‘कोलेरून’ नामक शाखेच्या किनारी असलेल्या ‘पोटरे नोव्हो’ ऊर्फ सध्याच्या ‘परंगिपेट्टै’ या बंदरात वखार बांधण्याकरिता डच खूप प्रयत्न करीत होते. त्रस्थ हवालदारांकडून हिरवा कंदील मिळूनही गोपाळदास पंडित नामक अधिकाऱ्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव डचांना परवानगी नाकारली. त्यानंतर डचांनी जाणीवपूर्वक त्या बंदराची गळचेपी केली, परिणामी तिथला व्यापार ठप्प झाला. हे प्रकरण दक्षिणचे सुभेदार रघुनाथ पंडितांपर्यंत गेल्यावर त्यांनी संरक्षक तटबंदी न बांधण्याच्या अटीवर वखारबांधणीची परवानगी दिली. त्याप्रसंगी त्यांनी त्यांच्या हाताखालील अधिकाऱ्यांना लिहिलेली पत्रे सापडलेली आहेत. सतराव्या शतकातील भारतातील युरोपियन सत्तांपैकी डच कंपनी ही किमान भारतापुरती बहुतांशी निव्वळ व्यापारी संस्था म्हणूनच राहिली. परंतु व्यापारासंबंधीचे निर्णय घेण्याकरिता नेदरलँड्समधील कंपनीच्या संचालक मंडळाला भारतातील खडान्खडा माहिती असणे आवश्यक होते. त्यामुळे डच कागदपत्रांत अतिशय तपशीलवार आर्थिक माहितीसोबतच राजकीय माहितीही अतिशय तपशीलवारपणे येते. त्यातून तत्कालीन इतिहासाच्या अनेक अंगांवर प्रकाश पडतो. या साधनांमधून उपरिनिर्दिष्ट माहितीखेरीज अनेक गोष्टी उजेडात येतील ही अपेक्षा आहे. या पत्रांवर आधारित शोधनिबंधही प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहेत.

 

 

(छायाचित्र सौजन्य – Nationaal archief, The Hague)

निखिल बेल्लारीकर – nikhil.bellarykar@gmail.com